प्लेझर बॉक्स:अपर्णा कुलकर्णी- उत्पात

       तुमच्या रोजच्या पाहण्यात, संपर्कात अशी काही माणसं असतात, ज्यांच्याबद्दल तुम्हाला मनोमन आदर वाटत असतो. ती माणसं त्यांच्या वागण्या बोलण्यातून तुमच्यापुढे काही आदर्श ठेवत असतात. अशीच माझी एक मैत्रीण आहे, वैद्य अपर्णा कुलकर्णी- उत्पात. मैत्रीण तरी कशी, तर आमच्या कॉलेजमध्ये ३-४ वर्षांपूर्वी जर्मन language कोर्सेस सुरु झाले. तेंव्हा ताईची मुलगी स्पोर्ट्स प्रॅक्टिससाठी जवळच कुठेतरी यायची. तेंव्हा तिला या कोर्सेसबद्दल कळलं, आणि जर्मनच्या बॅचमधे या ताईची आणि माझी ओळख झाली. तीचं दैनिक सागरमधे आयुर्वेदावर एक सदर यायचं, तेंव्हा तीचं नाव वाचलेलं होतं. त्याच वैद्य अपर्णा इथपासून ते अपर्णाताई हा प्रवास म्हणजे माझ्या कॉलेजच्या आयुष्यातील सुंदर आठवणींचा भाग आहे. उगाच वेळ घालवायचा म्हणून नाही, तर नेटाने तीही माझ्या बरोबरीने शिकत होती, जिथे जे अडेल ते नि: संकोच विचारत होती, आमचेही doubts क्लिअर करत होती, असं करत करत आम्ही B1 पर्यंत आलो. कोल्हापूरला परिक्षेला जायचो तेव्हा मला कसं टेन्शन आलं आहे, हे सांगणारी ताई मार्क्स मात्र दणदणीत मिळवत होती. तिचा उत्साह, सतत नवं काहीतरी करून पाहण्याची जिद्द, समंजसपणा याचा माझ्या मनावर खोलवर ठसा उमटलेला आहे. ती छान छान काहीतरी लिहायची. ते सगळे तीचेच रोजच्या जगण्यातले अनुभव ती शब्दांकित करत होती. तेव्हा कधीतरी मी तिला तुझं स्वतःचं पेज कर, असं सुचवलं होतं. ते तर तिने केलंच, पण तिचे ५० लेख पूर्ण झाल्यावर तिने तिच्या या लिखाणाला पुस्तकाचं रूप दिलं, ते हे पुस्तक 'प्लेझर बॉक्स '. आत्ता मागे आमची भेट झाली, तेंव्हा तिने हे गोड सरप्राइज मला देऊ केलं. सुरुवातीला तिच्या मनोगतात तिने माझाही उल्लेख केला आहे. मी तिला प्रेरित केलं हे म्हणणं म्हणजे पुलंच्या भाषेत, ' नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडतो' असं म्हणण्यासारखं आहे. ती मुळातच ताऱ्यासारखी स्वयंप्रकाशी आहे. तिला बाह्य कोणत्याही प्रेरणेची गरज कधीच पडायची नाही. 
      हे पुस्तक म्हणजे तिने वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. काही काही माणसांचा मला खूप हेवा वाटतो, कारण त्यांना थोडक्या शब्दांत खूप आशय सांगता येतो. वपुंचं वपूर्झा कसं आहे, कुठलंही पान उघडा आणि वाचा. मागचं काही वाचलेलं असायला हवं, याची गरज नाही. एक हटके असं शीर्षक आणि नावाला जागेल असा गोळीबंद विचार असं पुस्तकाचं स्वरुप आहे. त्या पानावरचा तो विचार स्वतंत्र आहे. यात कुठेही उगाच अलंकारिक भाषा नाही, टोकाचे विचार नाहीत, "woke" पणा नाही. आशावाद आहे, पण स्वप्नाळूपणा नाही. आहे ती परिस्थिती, मर्यादा स्वीकारायची तयारी आहे, पण उगाच निराशेचं सावट नाही. कुठेही भडकपणा नाही, तर तिच्या रोजच्या वावरण्यात जो साधेपणा आणि पोक्तपणा आहे, तोच लिखाणात उतरला आहे. 
      नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्या सांभाळणाऱ्या स्त्रीयांची मनोवृत्ती, भविष्याची तरतूद करण्याच्या नादात वर्तमान हातून कसा सुटत चालला आहे, रोज अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून मिळणारा आनंद दोन्ही हात पसरुन आपला कसा करुन घ्यायचा हे तिचे लेख शिकवतात. एक गृहिणी, आई, मैत्रीण, वैद्य अशा अनेक भूमिका बजावताना आलेल्या अनुभवांनी दिलेलं शहाणपण तिने शब्दांत मांडलं आहे. हे सगळं लिहिताना तीने जो सहज भाव ठेवला आहे, तो मला कौतुकास्पद वाटतो. तुमचं जवळचं आपलं माणूस ज्या मोकळेपणाने तुमच्याशी गुजगोष्टी करेल, तसा काहीसा फील तिच्या लिखाणातून येतो. सगळ्यांनीच क्रांतिकारक, अतीव वैचारिक लिहिण्याची गरज नसते. सहज सोप्या भाषेतही मनाला भिडणारं असं लिहता येतं. बहिणाबाईंच्या कविता, जात्यावरच्या ओव्या मनाचा ठाव घेतात, त्याला कारण त्यातला शुद्ध आशय आणि असाच सहजभाव. ताईच्या लिखाणाची शैली मला तशा स्वरूपाची वाटते. जगण्याचा सोहळा साजरा करायची प्रेरणा देणारं लिखाण असं वर्णन मी करेन. 
    ताईचे असे अजून अनेक प्लेझर बॉक्स आम्हाला वाचायला मिळावेत, अशा तिला मनःपूर्वक शुभेच्छा ! तुझ्यातली लेखिका उत्तरोत्तर समृध्द होत राहो! 

प्लेझर बॉक्स
लेखिका: वैद्य अपर्णा कुलकर्णी उत्पात
विझक्राफ्ट पब्लिकेशन
पृष्ठ संख्या: १२०
मूल्य: २२५/- 

- नेहा ज्योती प्रदीप जोशी
( १५.०१.२०२२) 

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार