माणूस आणि नॉट गॉन विथ द विंड
#पुस्तकांच्या_पानांवरुन
चित्रपटसृष्टी हीच मुळात उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची मांदियाळी आहे. इथे अनेक चेहरे येतात, काही चमकून जातात. उदंड तारे तारका आणि अगदी थोडकेच ध्रुव! अशा या कीर्ती, संधी, यश यातल्या कोणत्याच बाबतीत कसलीच शाश्वती नसणाऱ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणे, अधिराज्य गाजवणे हेही दिग्विजय केल्यासारखं आहे. पण अशा होऊन गेलेल्या तरीही अविनाशी असणाऱ्या दिग्विजयी कलाकार आणि कलाकृतींचा आढावा घेणारं पुस्तक म्हणजे फ्लॅशबॅक: चंदेरी दुनियेत माणूस. संस्थापक संपादक श्री ग माजगावकर यांच्या माणूस या साप्ताहिकात वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या चित्रपटविषयक लेखांचे संकलन म्हणजे फ्लॅशबॅक. कुठल्याही विषयाची समीक्षा करणे ही अभ्यासपूर्ण प्रक्रिया असते. एरवीच्या कॉमेंट्स पास करणे यापेक्षा तर खूपच वेगळी! आधी एक रसिक आणि नंतर एक अभ्यासक म्हणून एखादा कलाकार अगर कलाकृती अभ्यासणे, अशा आशयाचं लिखाण यात वाचायला मिळेल. मूळ पुस्तक व्यक्तिवेध, संवाद, आस्वाद, रसास्वाद अशा चार भागांत विभागलेलं आहे. पहिल्या भागात मा. विनायक, राजा परांजपे, वसंत पवार, हंसा वाडकर, सी रामचंद्र, सुलोचना, जॉन फोर्ड, पॉल म्युनी, इंग्रिड बर्गमन, मीनाकुमारी ते जुन्या नव्या कोणालाही तितकाच जवळचा वाटणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यावर तितक्याच मातब्बर व्यक्तींनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. संवाद या भागात विजय तेंडुलकर, हृषिकेश मुखर्जी, नाना पळशीकर, दादा कोंडके या दिग्गजांच्या मुलाखती, अनौपचारिक गप्पा वाचायला मिळतील. तर तिसरा पण खूपच रंजक असा आस्वाद हा भाग म्हणजे काही नावाजलेल्या चित्रपटांची उदा. टू सर विथ लव्ह, बॅटल ऑफ अल्जियर, आक्रोश, एक अधूरी कहानी, गांधी ई. अभ्यासपूर्ण समीक्षा आहे. ज्या व्यक्तीला मुळातच चित्रपट पाहायला आवडतात, ज्याने अनेक जुने नवे चित्रपट पाहिलेले आहेत, त्याने तर हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. त्या माध्यमाची glory समजून घ्यायला मदत करेल असं हे पुस्तक फ्लॅशबॅक!
दुसरं पुस्तक म्हणजे ख्यातनाम लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेलं नॉट गॉन विथ द विंड. हे पुस्तक म्हणजे खरोखरीच माझ्यासाठी serendipity ठरलं. जगभरात गाजलेल्या साहित्यावर आधारित तद्दन फालतू, बरे, चांगले, उत्तम ते प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमेचे चित्रपट बनत असतात. अशा वाऱ्यासोबत वाहून न गेलेल्या आणि वाऱ्यावर स्वार झालेल्या जगातील अव्वल चित्रशिल्पं आणि शब्दशिल्पांचा अभ्यासपूर्ण ललित मागोवा म्हणजे हे पुस्तक. याची सुरुवातच मुळात गॉन विथ द विंड (खरं तर नॉट गॉन!) या कादंबरीपासून आणि त्यावर आधारित चित्रपटापासून होते. मार्गारेट मिशेल ही लेखिका तिच्या या एकमेव कादंबरीमुळे साहित्याच्या क्षेत्रात स्वतःच एक ध्रुव बनून अबाधित राहिली आहे. क्राइम अँड पनिशमेंट, ऑथेल्लोचा मराठीतील झुंजाररावपर्यंतचा प्रवास, देवदास आणि प्रिन्स मिष्किन, द गॉडफादर, मॉबी डिक ते एम टी आयवा मारू, द गूड अर्थ ते मदर इंडिया, स्पार्टाकस ते लगान, चार्ली चॅप्लिनचा प्रचंड धाडसी आणि काळाची पावले अचूक ओळखलेला द ग्रेट डिक्टेटर अशा अनेक रंजक कहाण्या, या प्रत्येक शब्द आणि चित्रशिल्पासाठी घेतलेले अपार कष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने पडद्यामागची कहाणी इथे वाचायला मिळते. शिवाय इथे लेखक समीक्षेच्या नव्हे तर रसास्वादाच्या भूमिकेतून लिहीत असल्याने जागोजागी दिलेली दिलखुलास दाद आणि कौतुकामुळे आपल्याला वाचायला हुरुप येतो. जिथे टीका करायची, ' नाही आवडलं बॉ ' हेही तितकंच conviction ने सांगितलं आहे. एखाद्या अतिशय नावाजलेल्या साहित्यावर आधारित जेव्हा तद्दन रद्दी असं काही आपल्यापुढे येतं( उदा. ऑथेल्लो ते ओमकारा) तेंव्हा त्याला लेखक " दुसऱ्याच्या भरुन ठेवलेल्या अमृतकुंभात आपले चार ताकाचे थेंब टाकून सगळ्याचाच विचका करुन टाकणे" असं म्हणतात. मला पूर्णपणे अनपेक्षित असलेली द ब्ल्यू अँजेल या कादंबरीतून प्रेरित झालेल्या तुमच्या माझ्या लाडक्या पिंजरा या चित्रपटाची कहाणी तर नक्कीच वाचावी अशी आहे. मुघल ए आझम या भव्यदिव्य स्वप्नाचा दैदिप्यमान इतिहास तुम्हाला आता तसे चित्रपट का बनत नाहीत, याचं उत्तर द्यायला मदत करतो. उत्तम पटकथा, जी जान झोकून देणारा दिग्दर्शक, आणि या मेहनतीवर सोन्याचा कळस चढवणारे हाडाचे कलाकार ही भट्टी जमून आली, की काय काय चमत्कार होऊ शकतात त्याचं वास्तव सांगणारं पुस्तक म्हणजे नॉट गॉन विथ द विंड! माझ्यातला literature lover या पुस्तकामुळे नक्कीच मनोमन सुखावला आहे.
जागोजागी दिलेली छायाचित्रे, ओघवती भाषा आणि एक हटके विषय यामुळे चित्रपटप्रेमीने किंवा ज्यांना नव्याने या माध्यमाच्या प्रेमात पडायचं आहे अशा रसिकांनी, अभ्यासकांनी आवर्जून वाचावीत अशी ही दोन पुस्तकं - फ्लॅशबॅक: चंदेरी दुनियेत माणूस आणि नॉट गॉन विथ द विंड!
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
(३१.०१.२०२३)
फ्लॅशबॅक:चंदेरी दुनियेत माणूस
माणूस प्रतिष्ठान
मौज प्रकाशन गृह
पृष्ठ संख्या: ३४५
मूल्य: ३५०/-
नॉट गॉन विथ द विंड!
लेखक: विश्वास पाटील
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या: २५१
मूल्य: ३९०/-
Comments
Post a Comment