आयदान- उर्मिला पवार


      आजवर वाचलेल्या आत्मचरित्रांचा विचार केला तर ते कुणी लिहिलं आहे, यावरुन त्यात कोणता मजकूर जास्त वा कमी असेल याचा आधीच अंदाज बांधता येतो. लिहिणारी “ती” असेल तर तिचं बालपण, पालक, भावंडं, त्यापुढे लग्न, नवऱ्याचं कुटूंब, तिथले हरतऱ्हेचे नातेसंबंध, संसारातील सुखाचे क्षण आणि वादळे हा भाग तर हटकून असतोच आणि जास्त प्रमाणात असतो. आत्ता वाचलेलं पुस्तक माझं हे निरीक्षण खरं ठरवतं. पण यात वर नमूद केल्यापेक्षाही दोन अधिकच्या आणि विशेष गोष्टी आहेत. एक म्हणजे लेखिका मूळची born and brought up in कोकण म्हणजे रत्नागिरीतील फणसवळे आणि सासरकडून सिंधुदुर्गातील भिरंवडेकडची असल्यामुळे सुरुवातीच्या भागात अस्सल कोकणी लाल मातीचा गंध जाणवतो. आणि हे एका विचारी दलित स्त्रीनं लिहिलेलं आत्मचरित्र असल्यामुळे बालपणापासून ते अगदी वृद्धापकाळापर्यंत वेगवेगळ्या तऱ्हेने आणि वेगवेगळ्या वाटेने जातीभेद तिच्या आयुष्यात कसा झिरपत गेला, ते दाखवून देण्यात लेखिका यशस्वी ठरली आहे. 

हे पुस्तक आहे उर्मिला पवार यांनी लिहीलेलं आयदान. आयदान म्हणजे आपल्या संसारात बांबूपासून तयार केलेली सूपं, रोवळ्या, परद्या, हारे, करंडे. यांना ‘आवतं’ असंही म्हणतात. कोकणाबाहेर बुरुड नावाच्या भटक्या विमुक्त जातीचे बांधव तर कोकणात महार बांधव यांचा, त्यातही भगिनींचा हा चरितार्थ चालवण्यासाठीचा व्यवसाय होता. लेखिकेची आई संसाराला हातभार लागावा म्हणून अहोरात्र अशी आयदानं करत असे, म्हणूनच मुखपृष्ठावर बांबूच्या चकत्यांनी जिचा चेहरा वेढलेला आहे, अशा अंबाडा घातलेल्या स्त्रीच्या चेहऱ्याची एक बाजू दाखवली आहे. 

कोकण म्हणजे खायची प्यायची सुबत्ता, खेळीमेळीने मिळून मिसळून राहणारी, छोटी मोठी कामं करत गुण्यागोविंदाने राहणारी माणसं अशीच एक सर्वसाधारण प्रतिमा डोळ्यांपुढे उभी राहते. ती खोटी आहे, असं नाही. पण त्यालाही अनेक कंगोरे आहेत, जे या पुस्तकामुळे लक्षात येतात. इथेही प्रचंड हलाखी होती, लोक जातींच्या कुंपणांच्या आडून किंवा आधारानेच सारे नित्याचे व्यवहार करत होती, आपण एखाद्या व्यक्तीला तो अमुक एका जातीचा असल्यामुळे जी हीन किंवा मानाची वागणूक देतो आहोत, ती योग्यच आहे याबाबत कोणतंही दुमत नसण्याचा तो काळ. अशात जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा ओघ कोकणच्या दिशेने आला, तेव्हा झालेली स्थित्यंतरं यात लेखिकेने नेमकेपणाने दाखवली आहेत. “ देवाने काय दिलं आम्हाला आजवर?” हा रोकडा सवाल विचारायची ताकद मिळाली. कोणताही धर्म म्हणजे अनेक प्रतीकांची मांदियाळी, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अनंत भावना आणि आठवणी. ही सगळी ओझी त्यागून नवा धर्म, नवा विचार स्वीकारताना गावागावांतून नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या, ते या आत्मचरित्रामुळे लक्षात येतं. शिवाय शहरी पांढरपेशी तथाकथित पुरोगामी आणि “सुशिक्षीत” समाजात निदर्शनात येणार नाही अशारीतीने जातीवाद अजूनही कसा यथास्थित पोसला- जोपासला जातो, याचीही अनेक उदाहरणं लेखिका आपल्यापुढे मांडते. या सगळ्यांवर मात करत एक साहित्यीक म्हणून लेखिकेची जडणघडण, जोडीला स्त्री सक्षमीकरणासाठी लेखिकेने केलेली प्रामाणिक कामगिरी याचा मागोवा या लिखाणात घेतला आहे. 

मला हे लिखाण अतिशय संतुलित वाटलं. आलेले कटू अनुभव लेखिका ताकदीने मांडतेच, पण आजवरच्या आयुष्यातले आनंदाचे प्रसंग, त्यातही कोकणच्या मातीतले unique अनुभवही तितक्याच समरतेने वाचकांपुढे उभे करते. आमचं गाव हे काय प्रस्थ असतं इथून ते गावातले बाजार, इथलं food culture,चालीरीती, उत्सव ते सासू सुनेची भांडणं, एकेक ठिगळ जोडत चालू असणारे असंख्य संसार,अतरंगी माणसांच्या सतरंगी तऱ्हा, त्यातही स्वभावाचा आणि मालवणी भाषेचा खास ठसका या सगळया गोष्टी या लिखाणात आहेत. या सगळ्यांतून लेखिकेला लिखाणाची प्रेरणा मिळत गेली, हे ती आवर्जून नमूद करते. इथल्या लोकांसाठी एक वचन सांगितलं जातं, *“ इलास पावन्यानू बसाबसा… बसतलास तर डाळी आसा… खातलास तर पान आसा… जेवतलास तर पेज आसा… आणि जातलास तर सकळ आसा… पिपळाबुडसून वाट आसा…”* हा खास कोकणी स्वभावाचा अर्क वाचकांपर्यंत थेट पोहोचेल, अशारीतीने लेखिका तिचं मनोगत व्यक्त करते. 

यातील सुखाचे, दुःखाचे, उपेक्षेचे, जयपराजयाचे, सृजनाचे, आशेचे अनेक क्षण आपल्याला थक्क करून टाकतात. आपण गृहीत धरत आलेल्या आपल्या सुखासीनतेची शरम वाटायला आणि डोळे उघडायला भाग पाडणारं लिखाण असं या पुस्तकाचं मी वर्णन करेन. समाजाचा एक घटक म्हणून आणि त्याच जोडीला कोकणावरील त्यातही जुन्या कोकणावरील प्रेमासाठी आवर्जून वाचावं, असं आत्मचरित्र उर्मिला पवार लिखीत आयदान ! 
_ नेहा ज्योती प्रदीप जोशी
( ०१.०३. २०२४) 

आयदान
उर्मिला पवार
ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या - २७१
मूल्य - २२० रुपये

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा