अज्ञात झऱ्यावर रात्री
वाचक म्हणून मी दिवसेंदिवस समृध्द होत चालले आहे, याची मला गेल्या वर्षाच्या शेवटच्या आणि या वर्षाच्या प्रारंभीच चांगलीच प्रचिती आली आहे. मी आजवरच्या आयुष्यात भाषणाच्या केवळ एकाच स्पर्धेत भाग घेतला, तोही गेल्याच वर्षी, कारण निमित्त होतं वाचन प्रेरणा दिन. तेव्हाच एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा होती, विषय होता- साहित्य. या दोन्ही स्पर्धात मला चांगलं यश मिळालं, ही वाचक म्हणून माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे. या स्पर्धेचं बक्षीस म्हणून एक छान पुस्तक देण्यात आलं. त्यामुळे या वर्षीच्या #पुस्तकांच्या पानांवरुन, वर्ष २०२३ मधलं पहिलं पुस्तक आहे, अरुणा ढेरे लिखीत 'अज्ञात झऱ्यावर रात्री' .
कविता, लघुकथा, वृत्तपत्रातले लेख अशा अनेक माध्यमातून आजवर जितक्या अरुणाताई कळल्या, तितकी मी त्यांच्या पोक्त, तरल, वैचारिक तरी मनाला भावणाऱ्या आशयघन लिखाणाची चाहती आहे. अजून सगळं वाचून व्हायचं आहे, पण जे आणि जेवढं वाचलं तेवढं मनाचा एक कोपरा कमावून बसलं आहे. मानवी मनाचे, स्त्री- पुरुष नातेसंबंधांचे अनेक पदर त्यांनी ज्या विलक्षण प्रौढपणे उलगडून सांगितले आहेत, ते त्यांच्या लेखणीची ताकद आणि विचारी तितक्याच संवेदनशील मनाची ओळख पटवून देतात. आपल्याच मनातल्या आपल्यालाही पुरत्या ओळखू न आलेल्या एखाद्या भावनेचं त्यांच्या लिखाणात प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. त्यांच्या कविता, कृष्णकिनारा, मैत्रेयी वाचून नेहमी मला ' लागे हृदयी हुरहूर' असाच अनुभव आला आहे. याही पुस्तकाने तीच परंपरा कायम राखली आहे.
एकूण १५ लघुकथांच्या माध्यमातून त्यांच्याच भाषेत त्या, ' नव्या आणि जुन्या स्त्रीचे जगणे' शोधू पाहतात. " आजचे आपण- आजच्या कालभानाशी आणि स्थलभानाशी जोडलेले आपण- माणूस म्हणून, बाई म्हणून या काळाच्या हातून काही स्वीकारतो, काही नाकारतो. काही पेटतहानेने शोषतो, काहीं निर्धाराने गिळून टाकतो. या कथा म्हणजे त्या स्वीकार- नकाराच्या, शोषण्या- गिळण्याच्या नोंदी आहेत, असे म्हटले तरी चालेल." काही नाती ' नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही ' अशी असतात ; एखाद्या नात्यात काही प्रसंग, काही वेळा पावसात चकाकणाऱ्या वीजेसारख्या असतात. त्या माणसाचं, त्या अवस्थेतलं सारं भावविश्व व्यापून टाकण्याची क्षमता ते बाळगून असतात. या गोष्टी असंच काहीतरी हळुवार उलगडून दाखवतात. अज्ञात झऱ्यावर रात्री, की आपुला ठावो न सांडिता, उमज, नातं, आपण एकमेकांना, कधीतरीची गोष्ट, देखता देखता होते या कथा आधुनिक काळातल्या स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या आहेत. ही स्त्री एखादी तरुणी, नवविवाहिता, संसारी स्त्री ते अगदी सासू, आजी झालेल्या सगळ्या भूमिका जगते. जुन्या नव्या पिढीत असलेला प्रचंड फरक लक्षात घेतला तरी त्यातलं स्त्रीत्व एकाच कुळीचं आहे, याची साक्ष देणाऱ्या या कथा आहेत. या कथा समजायला अनुभवांचं पाठबळ हवं, जे माझ्याकडे आत्तातरी नाही. दहा वर्षांनी याच कथा मला एक नवा विचार, नवी अनुभूती देतील, याची मला पूर्ण खात्री आहे.
पूजा, मला सर्वांत जास्त आवडलेली: तिच्या नशीबाची कहाणी, सती या कथा लोककथा आणि लोकगीतांवर आधारित आहेत. महादेवी (११ व्या शतकातील शैव संत) , त्या सहा जणी (बौद्ध भिक्षूणी कुंडलकेशा), सर्वांत जास्त आवडलेली गोष्ट नंबर विभागून जिला जातो ती पैल तो गे काऊ कोकताहे (समर्थशिष्या वेणाबाई) या कथा संत स्त्रियांचे चरित्र नव्याने उलगडून दाखवतात. उत्तरपर्वात एकदा ही कथा द्रौपदीचं लोकविलक्षण स्त्रीत्व आणि त्याचे कितीही अभ्यासले तरी न लक्षात येणारे अनेक कंगोरे आपल्यापुढे मांडते. या सगळ्या कथा चित्त एकाग्र करुन स्वतःला त्या त्या जागी कल्पून, त्या गोष्टीतल्या ' ती ' च्याशी स्वतःला जोडून घेऊन वाचायच्या कथा आहेत. वरवरचं, टाईमपास, सहज चाळणे यासाठी या गोष्टी नव्हेत, यांना special attention लागतं! समर्थांच्या वचनाचा आधार घेऊन थोडा बदल करुन मी या पुस्तकाबद्दल एवढंच म्हणेन, 'वाचता अंतरी घेता, क्षणक्षण विचार करता, हळुहळू हळुहळू होते, पावते सुखसंगती!'
उत्तम साहित्याचा एक गुणविशेष म्हणजे multilayered meaning अर्थात् बहुस्तरीय अर्थ. प्रत्येक वाचनात एक नवा अर्थ देणारं लिखाण कायमच उच्च दर्जाचं मानलं जातं. या पुस्तकाचं वर्गीकरण याच जातकुळीच्या साहित्यात होतं. अजून एका वर्षाने, दहा वर्षांनी, किंवा चाळीस वर्षांनी कधीही वाचलं तरी मला दरवेळी नवा अर्थ देईल, असं हे पुस्तक माझ्या सगळ्या वाचक मित्र मैत्रिणींनी एकदातरी आवर्जून वाचावं!
अज्ञात झऱ्यावर रात्री
लेखिका: अरुणा ढेरे
प्रकाशन: नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठ संख्या: २००
मूल्य: २६० रुपये ( माझ्यासाठी तर अमूल्य असा ठेवा!)
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
( ०५.०१.२०२२)
छान लिहिलस नेहा. हे पुस्तक वाचलेलं नाहीये. वाचेन मिळालं की.
ReplyDeleteआवर्जून वाचा
Delete