नवी पिढी नव्या वाटा
पुस्तकांच्या पानांवरुन
आत्ता डिसेंबरमधे Pune Book Festival च्या निमित्ताने माझी पुस्तक दिवाळी साजरी करुन झाली. त्यातलं एक पुस्तक वाचायला मी स्वतः खूप उत्सुक होते ते म्हणजे नवी पिढी नव्या वाटा हे डॉ. प्रकाश आमटे यांचं पुस्तक, ज्याचं शब्दांकन गौरी कानेटकर आणि प्रीती छत्रे यांनी केलं आहे. कुष्ठरोगी बांधवांच्या जीवनात आनंद फुलवणारे महान समाजसेवक म्हणून बाबा आमटे सर्वांना परिचीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पुढच्या पिढीने समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. डॉ. विकास व भारती आमटे आनंदवनचा प्रकल्प उत्तमपणे सांभाळत आहेत. तर डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी गडचिरोली येथील भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी लोकबिरादरी प्रकल्पामार्फत भरीव काम केलं आहे. या कामाची दखल घेऊन या उभयतांना २००८ साली आशियातील नोबेल मानले जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली बाबा आमटेंनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एकाच घरातील दोन पिढ्यांना समाजकार्यासाठी सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार मिळणे, ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी लिहिलेल्या ' प्रकाशवाटा' या पुस्तकामुळे आणि २०१४ साली आलेल्या ' डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटामुळे या दांपत्याचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचायला मदत झाली. अशा उत्तुंग कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या घराण्याची पुढची पिढी हे समाजकार्य कसं पुढे नेते आहे, त्याचा लेखाजोगा मांडणारं हे पुस्तक ' नवी पिढी नव्या वाटा'
आमटे दांपत्याने हेमलकसा भागात कामाला सुरुवात करताना त्यांचा उद्देश तिथल्या आदिवासी लोकांचा आरोग्य- शिक्षण- ग्रामविकास अशा सगळ्या पातळ्यांवर विकास करणे हा होता. पण मुळातच तिथे कुपोषण आणि दारिद्र्यामुळे सतत उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. पुस्तक आणि चित्रपटातून त्यांच्या या कार्याची माहिती मिळते. आरोग्याच्या समस्या दूर करण्यात पुरेसं यश आल्यावर डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची पुढची पिढी म्हणजे डॉ. दिगंत- डॉ अनघा आमटे व अनिकेत- समीक्षा आमटे लोकबिरादरी प्रकल्पाचं काम कसं पुढे नेत आहेत, ते वाचताना आश्चर्य, कौतुक, अभिमान अशा सगळ्या भावना मनात दाटून येतात. डॉक्टर साहेबांचा मुलगा म्हणून काम सुरु करताना स्थानिक आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन करण्याचे प्रयत्न, प्रकाश आमटेंच्या काळात असणाऱ्या दवाखान्याचं सुसज्ज multi speciality hospital होण्याचा प्रवास, तिथल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन भरवली जाणारी आरोग्य शिबीरं, लोकांना किरकोळ उपचारासाठी हॉस्पिटलला यावं लागू नये यासाठी आदिवासी पाड्यांवर सुरु केलेलले दवाखाने अशा अनेक उपक्रमांतून डॉ. दिगंत आमटेंचं काम आपल्याला समजतं. डॉ. दिगंत स्वतः सर्जन तर त्यांच्या पत्नी डॉ. अनघा गायनॅकाॅलॉजिस्ट असल्यामुळे प्रकल्पातली आरोग्य व्यवस्था योग्य पद्धतीने सांभाळीत आहेत. त्यांच्या जोडीला असणारे इतर डॉक्टर्स, तंत्रज्ञ, शिबिरांसाठी बाहेरुन नियमीत येणारे डॉक्टर्स या सर्वांबद्दल माहिती दिली आहे.
आमटे दांपत्याचे दुसरे चिरंजीव पेशाने इंजिनीयर असणारे श्री. अनिकेत लोकबिरादरी प्रकल्पाचे व्यवस्थापन बघतात. प्रकल्पांसाठी निधी गोळा करणे, शाळा- हॉस्टेलची व्यवस्था, शिक्षक नियुक्त्या, सरकारी ग्रँट्स या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत श्री. अनिकेत तिथल्या गावांमधील पाणी नियोजनासाठीसुद्धा भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या पत्नी सौ. अनघा प्रकल्पातली शाळा चालवत आहेत. मुळात तिथल्या आदिवासी लोकांना औपचारिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे, मुलांना प्रत्यक्ष शाळेत आणणे, आदिवासी मुलांना शिकवताना साचेबद्ध शिक्षणप्रणाली भाषा, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील फरक अशा अनेक कारणांमुळे अपुरी पडत असताना वेगवेगळे प्रयोग करत एक स्वतंत्र शिक्षणपद्धत निर्माण करणे हेही एक दिव्यच आहे. या सगळ्या उपक्रमांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे. पुस्तक informative आहे, पण सहज ओघवत्या भाषेत लिहीलं आहे. डॉक्टर दांपत्याने काम सुरु करताना असणारी परिस्थिती, त्यांचे प्रयत्न याची माहिती देऊन मग पुढच्या सुधारणा कशा केल्या जात आहेत, ते सांगितलं असल्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची अगदी मुळापासून माहिती मिळते.
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी यांनी प्रकल्पाची सूत्रं पुढच्या पिढीच्या हातात सुपूर्द केली असून ते आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. कोणत्याही पालकांना आपल्या मुलांचं कौतुक असतंच, मुलं जर अशी असतील तर ते अगदीच असायला हवं. डॉक्टरांना आपल्या पुढच्या पिढीबद्दल वाटणारं कौतुक हे पुस्तक वाचताना नक्की जाणवतं. नव्या पिढीची काम करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे पण ती त्यांनी आपणहून निर्माण केली आहे. स्वतःकडे उगाचच व्हेटो पॉवर न ठेवता मुलांना निर्णय घ्यायचं पूर्ण स्वातंत्र्य डॉक्टरांनी दिलं आहे. आपण सुरु केलेल्या समाजसेवेच्या कामाचं baton आपल्या मुलांच्या हाती सहजपणे सोपवणारे, मुलांच्या कर्तृत्वाचं दिलखुलास कौतुक करणारे डॉक्टरही ग्रेट आणि अशा आईवडीलांना अभिमान वाटेल असं काम करणारी त्यांची मुलं आणि सुनाही ग्रेट!
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातून सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
हे पुस्तक वाचताना मला अगदी प्रकर्षाने आठवल्या त्या बा भ बोरकरांच्या लावण्यरेखा कवितेतल्या या ओळी. हे संपूर्ण कुटूंबच या ओळींचं मानकरी आहे. खरं तर समाजसेवकाच्या मुलाने समाजसेवाच केली पाहिजे असा नियम नाहीये. तीही तुमच्या आमच्यासारखं “नॉर्मल” आयुष्य नक्कीच जगू शकतात. Charity साठी १०० रुपये दिले तर दहा फोटो काढून घेण्याच्या आणि आपल्या टिचभराच्या कामाची आभाळभर जाहिरात करण्याच्या काळात सगळी प्रलोभनं बाजूला सारुन रोज नव्या आव्हानांना सामोरं जात समाजसेवेच्या ध्येयाला समर्पित आणि समाजासाठी आदर्शवत आयुष्य by choice जगणाऱ्या या डॉ. आमटेंच्या पुढच्या पिढीला माझा मनापासून सलाम!
- नेहा जोशी गोडबोले
नवी पिढी नव्या वाटा
डॉ. प्रकाश आमटे
समकालीन प्रकाशन
पृष्ठसंख्या - १३६
मूल्य - २०० ₹
Comments
Post a Comment