कुणा एकाची भ्रमणगाथा- वेदनेचा सन्मानसोहळा


" ही खुशीची फकिरी फार अजब असते. लौकिकार्थाने घर संसाराला पारख्या असणाऱ्या अमीराची फकिरी, जमाखर्चाच्या वह्या वाचता येणाऱ्यांना नाही कळायची!" रावसाहेब हरीहरांबद्दल पुलं जे म्हणतात, तशाच माटाचं एका भन्नाट आयुष्य जगलेल्या अवलियाची, गोपाळ नीलकंठ दांडेकर अर्थात् गोनीदा यांची गोष्ट म्हणजे कुणा एकाची भ्रमणगाथा! 
आजवर गोनीदांचं जे काही साहित्य वाचलं आहे, त्यावरून मला अगदी मनापासून जाणवलेल्या आणि भावलेल्या गोष्टी अनेक आहेत. पहिली म्हणजे त्यांच्या लिखाणातून सदोदित जाणवत राहणारी unmatched संवेदनशीलता. दुसरी म्हणजे निसर्गाची उत्कट ओढ, जी त्यांच्या प्रत्येक निसर्गवर्णनात प्रकर्षाने जाणवत राहते. किंबहूना गोनीदांच्या लेखनात निसर्ग आपसूक डोकावतच असतो. एरव्ही बाकीच्या लिखाणात आलेली निसर्गवर्णनं उगाच लांबड म्हणून गाळून आपण पुढे वाचू लागतो, पण गोनीदांच्या साहित्यात निसर्ग अगदी रसरशीत, जीवंत रुपात आपल्यासमोर येतो. आणि तिसरी म्हणजे 'स्व'च्या किंवा 'मी' पणाच्या सगळया चौकटी भेदून जायची अनावर ओढ. आजवर हे साहित्य वाचताना गोनीदांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला अजिबात काहीच माहिती नव्हती. पण ते फारच unconventional आयुष्य जगले असणार, याची मला मनोमन खात्री वाटत होती. अनुभवांतून आलेल्या शहाणपणाची झालर असलेलं लिखाण शब्दांच्या मनोऱ्यांपेक्षा अधिक देखणं असतं, ते उगाच नाही. 

हा त्यांच्या आयुष्याच्या graph मात्र अगदी थक्क करणारा आहे. आई वडील आणि बहिणी अशा छोट्या पण सुखी मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. वयाच्या बारा-तेराव्या वर्षी देशाच्या श्रेष्ठ नेत्याचं शाळा कॉलेज सोडून देऊन स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हायचं आवाहन त्यांनी मनावर घेतलं आणि घराबाहेर पडले आणि एकटे मुंबईला दाखल झाले. त्या त्यांच्या वयात त्यांनी इतका कल्पनेच्या पलीकडचा निर्णय घ्यायचं धाडस दाखवलं, यातूनच त्यांचं वेगळेपण सहज लक्षात येईल. 

पण इथून खरी त्यांची भ्रमणगाथा सुरू झाली. तिकडे आंदोलन संपलं, दिल्लीत तह देखील झाला. पण इकडे एक कपड्याचा जोड, काही पुस्तकं आणि साडे तीन आणे एवढंच साहित्य हाताशी असलेले गोनीदा त्या वयात मुंबई सारख्या महानगरात स्वतःच्या जबाबदारीवर ( on his own) अगदी एकटे पडले. वय फक्त तेरा वर्षे, पण वडिलांच्या तापट स्वभावाचा पुरता अंदाज असल्याने परतीची वाट त्यांना मोकळी नव्हती. म्हणजे घरच्यांनी परत घरी घेतलं नसतं, असं नाही. त्यांचा शोध चालूच होता. पण एकदा ज्या घराकडे पाठ फिरवली, ती कायमची ,असा त्यांचा पक्का निश्चय!

मग त्या मुंबईत जगण्याची आणि टिकण्याची धडपड सुरू झाली. रस्त्यावर, दुकानाच्या फळीवर, झोपडीत जिथे जागा मिळेल तिथे राहिले. देवळं, स्मशानं, कोल्हाट्याची पालं, महारवाडे, ढोरवाडे, वेश्यांच्या माड्या सगळीकडे अन्न आणि आसऱ्यासाठी वणवण केली. अंगावर फक्त लंगोटी, शरीराची पुरती दुर्दशा झालेली असतानाही वृत्तपत्रे विकणं, विड्यांच्या कारखान्यात पानं कापणं, हमाली, चोरी, मवालीगिरी आणि बरंच काही केलं! उद्देश एकच - अन्न आणि आसरा.

तऱ्हेतऱ्हेचे अनुभव घेऊन आयुष्याची ओळख पटत होती. मग वेगवेगळ्या ठिकाणी फिरता फिरता साधूंच्या संगतीत आले. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, भागवत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर थेट गुरुगृही राहून वेदांताचं अध्ययन केलं. आणि मग गुरुआज्ञा प्रमाण मानून नर्मदा परिक्रमेसाठी महाराष्ट्राबाहेर भ्रमंती सुरू झाली. पुरते एकटे असलेले गोनिदा निसर्गाच्या प्रेमात पडले, ते या काळात. आपण अभयारण्यात वाघ बघतो, त्यांनी प्रत्यक्ष कित्येकदा डोळ्यांसमोर चाल करून येणारा वाघ पाहिला होता! 

ही परिक्रमाच खऱ्या अर्थाने त्यांच्या चित्तशुद्धीचं एक कारण बनली. प्रवास, भिक्षा मागून राहणे अशी मजल दरमजल करत एका निश्चलपुरींच्या श्रीमंत आणि संपन्न मठात जाऊन पोहोचले. वय आता उणपुरं बावीस वर्षे, पण मनात सगळ्या विचारांची पुरती उलथापालथ सुरू झाली. आपल्याच वर्तन आणि विचारांमधली विसंगती त्यांना स्पष्ट जाणवत होती. कुठलाच मुखवटा कधीच मान्य न केल्याने ते स्वतःशी कायम प्रामाणिक राहू शकले. संन्याशांच्या त्या मठात आयुष्याचं वेगळंच सत्य त्यांना उमगलं, आणि त्या सत्याचा त्यांनी प्रामाणिकपणे स्वीकारही केला. आयुष्याच्या या वळणावर त्यांना एक अशी व्यक्ती भेटली, की त्यांचं आजवरच्या आणि पुढच्या आयुष्याचं सगळं समीकरणच बदलून गेलं.या सगळ्याची साक्षीदार शेवटपर्यंत साक्षात नर्मदा आहे. तिची वळणं आणि ही वळणं सारख्याच धाटणीची, दिलखेच,!

हे पुस्तकच त्यांनी " युगा अठ्ठावीसाची वेदना- तिला" समर्पित केलं आहे. तिचं नाव यशोदा, जी या एकल्या भ्रमंतीत एक भावनिक वळण घेऊन आली. ती कोण, कुठली, कशी याचा तपशील महत्त्वाचा नाही. पण त्यांच्यावर गुदरलेल्या कठीण प्रसंगात तिने केलेली  सोबत, तो सहवास त्यांना एक वेगळी दिशा देऊन गेला. जसं मी सुरुवातीला म्हटलं आहे, त्याप्रमाणे हा वेदनेचा सन्मानसोहळा आहे. त्यामुळे त्या दोघांची त्यांच्यापुरतीच असणारी गोष्ट आणि तिचा शेवट काही आनंद देणारा नाही. एवढंच म्हणेन, की हे दुःख राधा- कृष्णाच्या गोष्टीच्या दर्जाचं आहे. मुळात हे आत्मचरित्रसुद्धा नाहीच. कारण यानंतर तर त्यांचं खरं आयुष्य सुरू झालं असणार. पण हा टप्पा खऱ्या अर्थाने त्यांचं आयुष्य नव्या प्रकाशाने उजळून गेला, नव्या संवेदनेने सुगंधी करून गेला, म्हणून महत्त्वाचा आहे. ललित साहित्याचे, प्रेमकथेचे, चरित्र लेखनाचे कुठलेच निकष न लावता वाचायची, अशी ही भ्रमणगाथा आहे.

नेहमीप्रमाणे भाषा, निसर्गवर्णनं अगदी जीवंत आणि अस्सल आहेत. एकामागून एक अशी घटनांची मालिका आहे. फ्लॅशबॅक्स आहेत. जे घडलं आहे, जे लिहिलंय, ते उत्कटपणे त्यांनी स्वतः अनुभवल्याशिवाय हा अनुभव ते वाचकांपर्यंत नक्कीच पोहोचवू शकले नसते. ती तरल भावना, मनाची विचित्र कोंडी, ती मानसिक द्वंद्वं त्यांनी स्वतः मान्य केली, म्हणून त्याची कबुली इतक्या प्रकट आणि स्पष्ट शब्दांत त्यांना देता आली आहे. 

जगावेगळ्या अनुभवांनी नटलेला आपल्या आयुष्याचा पट प्रामाणिकपणे उलगडून दाखवू पाहणाऱ्या एका हळव्या मनाच्या माणसाचं हे मनोगत आहे. "आज तुला मनातलं सगळं सगळं सांगणार आहे", असं म्हणून तुमच्याशी बोलायला आलेली तुमची जवळची व्यक्ती जेव्हा बोलू लागते, तेव्हा ते बोल आपण त्याच्या वक्तृत्वाच्या शैलीसाठी नाही, तर भावनेच्या खोलीसाठी ऐकतो. त्या दर्जाची ही गोष्ट आहे. तो मुखपृष्ठावरचा पावलाचा ठसा या शब्दातीत, पवित्र भावनेच्या प्रवासाचा खोलवर उमटलेला, बाहेर ठळकपणे दिसत नसला तरी आतपर्यंत सदोदित जाणवत राहणारा ठसा आहे. एखादा आवडीचा, खूप सुंदर आरसा फुटला, की त्याची एखादी काच आपण सांभाळून ठेवतो. हे त्या तुकड्यातून पाहिलेलं स्वतःचं प्रतिबिंब आहे. पूर्ण नसलं, चकचकीत नसलं, डोळे दिपवणारं नसलं, तरीही स्वतःपुरतं खरं! ही मर्मबंधातली ठेव त्यांनी शब्दांचे अलंकार घालून आपल्यापुढे ठेवली आहे,ती तितक्याच हळुवारपणे ज्याने त्याने स्वीकारावी, एवढंच शेवटी सांगावंसं वाटतं. त्या दोघांची ही जगावेगळी गोष्ट वाचल्यावर मला चटकन आठवली, ती कुसुमाग्रजांची कविता,
"नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही,
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही"...

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार