उपसंहार

 #पुस्तकांच्या_पानांवरून

#उपसंहार


हैं कथा संग्राम की विश्व के कल्याण की...


अ व्यक्ती: काय हो, तुम्हाला महाभारत म्हणजे काय ते ठाऊक आहे?

ब व्यक्ती: हा काय प्रश्न आहे? हा आपला इतिहास आहे. अर्थातच मला ठाऊक आहे.

अ व्यक्ती: तरी किती पुस्तकं वाचली असतील महाभारतावर?

ब व्यक्ती: कथा कादंबऱ्या धरून किमान १० तरी

अ व्यक्ती: मग महाभारत कधी इसवी सन पूर्व कोणत्या काळी लिहिलं गेलं?

ब व्यक्ती: अंऽऽऽ , तसं नक्की नाही हो सांगता यायचं

अ व्यक्ती: बरं मग भारती युद्ध नक्की कधी झालं?

ब व्यक्ती: ते कशाला माहिती असायला हवं?

अ व्यक्ती: बरं जाऊदे, ते अक्षौहिणी ही काय भानगड आहे? 

ब व्यक्ती: मला तरी कुठे ठाऊक आहे?

अ व्यक्ती: त्या काळचे लोक कसे राहायचे हो? त्यांचे कपडे, घरं कशी असायची? त्यांचे आदर्श काय होते?

ब व्यक्ती: अहो, मला महाभारताची गोष्ट माहिती आहे हो!

अ व्यक्ती: आणि महाभारताचा इतिहास?

ब व्यक्ती: ऑ ! 

( या संवादात आपली उत्तरं ब व्यक्तीसारखी नाहीत ना? याची खात्री सवडीने करून घ्या.)


आज या घडीला आणि यापूर्वी होऊन गेलेल्या सीरियलस् मधे सर्वाधिक TRP मिळवणाऱ्या सीरियल कोणत्या आहेत, याचं उत्तर तुम्हाला मला सर्वांना चांगलंच ठाऊक आहे. अगदी आत्ता lockdown मधेही रामायण, महाभारत, कृष्णाला जो प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे, तो लक्षणीय आहे. आता हे असं का? याचा विचार करून बघू. उत्तर अगदीच सोपं आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनावर रामायण महाभारताचे संस्कार अगदी बालपणीपासून झालेले असतात. म्हणजे देवभोळं, किंवा परंपराभिमानी वगैरे असण्याची काही आवश्यकता नाही. पण समाजमनावर या दोन प्राचीन इतिहास ग्रंथांचा विलक्षण पगडा आहे, हे निर्विवाद सत्य आहे. 


मी जाणीवपूर्वक रामायण, महाभारताचा उल्लेख इतिहास ग्रंथ असा केला आहे. एरव्ही आपण महाकाव्य वगैरे म्हणतो. पण इथे एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे, तो असा की ही महाकाव्यं म्हणजे केवळ कविकल्पना नाही. काव्यात्मक शैलीत सांगितला असला, तरी तो इतिहास आहे. आणि इतिहास हा कल्पनेपेक्षा तथ्यांवर अधिक आधारलेला असतो. आजवर एक वाचक म्हणून मराठीत मी महाभारतासंबंधी जे काही वाचलं आहे, त्यात महाभारत ही कौरव आणि पांडवांची आणि त्यांच्यातील युद्धाची गोष्ट इतकाच त्या लेखनाचा आवाका आहे. असंख्य कथा, कादंबऱ्या, नाटकं, काव्य ही महाभारतावर बेतलेली आहेत. त्यामुळेच असेल कदाचित, पण म्हणून आपल्याला महाभारताची गोष्ट सांगता येते, पण इतिहास सांगता येत नाही. 


वर्षानुवर्षे महाभारत ऐकून सुद्धा त्या काळच्या समाजजीवन, तत्वज्ञान, राजकीय स्थिती याबद्दल खात्रीशीर माहिती फारच कमी जणांना सांगता येईल. पण मुळात महाभारत हा एका प्रगत आणि संपन्न संस्कृतीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर झालेला निर्णायक महासंग्राम आहे. अशा बाजूने महाभारताची चिकित्सा करणारं लिखाण एक तर फारच कमी प्रमाणात झालं आहे, आणि ते फारच कमी वाचकांपर्यंत पोहोचलं आहे. असं लिखाण करणं मुळातच कठीण आहे, कारण यासाठी अर्वाचीन संस्कृतीची पाळंमुळं शोधायची चिकाटी, आणि प्रचंड अभ्यास आवश्यक आहे. असं एखादं अभ्यासपूर्ण लेखन हाती लागणं, ही त्या वाचकासाठी फार मोठी पर्वणी असते. माझ्या वाचन प्रवासात आलेली ती पर्वणी म्हणजे चिंतामण विनायक वैद्य लिखित उपसंहार


आधी या पुस्तकाविषयी थोडंसं. या पुस्तकाचं पूर्ण नाव श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर या ग्रंथाचा उपसंहार असं आहे. गणेश विष्णू चिपळूणकर आणि मंडळी या प्रकाशन संस्थेने सुमारे शंभर वर्षांपूर्वी १९०४ ते १९१२ या काळात महाभारत या ग्रंथाचं नऊ खंडात विभागलेलं मराठी भाषांतर प्रकाशित केलं. या उपक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी , " या महाभारतरुपी महोदधींत निमज्जन केले असता, आपणांस काय काय रत्नें प्राप्त होतील याचा विचार पुष्कळ विस्तारें करून उपसंहार रूप अंतिम भागांत केला जाईल," अशा शब्दांत म्हणजे आपल्या साध्या मराठीत ते स्वतः हा उपसंहार भविष्यात लिहिणार असल्याचं त्यांनी नमूद केले होते. कारणपरत्वे ते शक्य न झाल्यामुळे खुद्द लोकमान्य टिळकांनी संक्षिप्त महाभारत, एपिक इंडिया, महाभारत: ए क्रिटीसिझम, श्रीकृष्णचरित्र या पुस्तकांचे कर्ते असणाऱ्या चिंतामण विनायक वैद्य यांच्या नावाची उपसंहाराच्या लेखनासाठी शिफारस केली. चिं. वि वैद्यांनी लोकमान्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत एकट्याने अवघ्या चार वर्षांत संपूर्ण महाभारताचा आढावा घेणारा उपसंहार हा ग्रंथ शंभर वर्षांपूर्वी लिहून पूर्ण केला. या ग्रंथाचा हा इतिहासच अगदी थक्क करणारा आहे. 

डॉ. सुचेता परांजपे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत नमुद केल्यानुसार, उपसंहार म्हणजे संपूर्ण ग्रंथाचं वाचन आणि आकलन झालं की शेवटी नेमकं हाती काय लागतं, त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भातील अर्थ सांगणारा संकलनात्मक आणि विश्लेषणात्मक भाग. म्हणजे आपल्या आजच्या मराठीत epitomization किंवा summarisation असं म्हणू. अगदी स्पष्ट भाषेत मी हे जाहीर करते, की या पुस्तकाचं परीक्षण करण्याइतकी माझी बौद्धिक कुवत नाही. फार पुढचं कशाला, या ग्रंथाची अनुक्रमणिकाच या ग्रंथाचं महत्त्व पटवून घ्यायला आणि पटवून द्यायला पुरेशी आहे. भगवतगीता, महाभारतासारखा हा ग्रंथही अठरा भागांत विभागलेला आहे. महाभारताचे कर्ते ( श्रीव्यास, वैशंपायन, सौती ), महाभारताचा काळ( इसवी सन पूर्व ३०००-३००), भारतीय युद्ध काल्पनिक आहे का?, भारती युद्धाचा काळ, इतिहास कोणत्या लोकांचा या महत्वाच्या मुद्द्यांसह वर्णव्यवस्था- आश्रमव्यवस्था - शिक्षण, विवाहसंस्था, सामाजिक, राजकीय परिस्थिती, सैन्य व युद्ध, व्यवहार व उद्योगधंदे, भुगोलिक माहिती, ज्योतिर्विषयक ज्ञान, वाड्म़य शास्त्रे, धर्म, तत्वज्ञान, भिन्न मतांचा इतिहास असा सर्वांगीण विचार करून ग्रंथाचा शेवट भगवद्गीता विचार या प्रकरणाने केला आहे. 

पुलं म्हणतात तसं, " द्रौपदीला जर पाच नवरे होते, तर ती कपाळावर पाच कुंकवाचे ठिपके लावायची का?" यातला विनोदाचा भाग सोडला, तर यासारखे असंख्य प्रश्न आपल्याही मनात नक्की येऊन गेलेले असतात. उदाहणार्थ, श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर गीतेचा उपदेश कसा काय दिला? म्हणजे बाकीच्या सगळ्यांना time please किंवा statue म्हणून ते दोघेच बोलत होते का? याचं उत्तर शोधायला आधी त्या काळी धर्मयुद्ध कसं लढलं गेलं, ते माहिती असणं आवश्यक आहे. लोक राहत कसे होते, स्त्रिया आणि पुरुष कोणते कपडे, दागिने घालत होते, वाहनं कोणती होती, उद्योग कोणते, करपद्धती, लोकांचा दिनक्रम काय असायचा इथपासून न्यायनिवाडा कसा व्हायचा, त्या काळची तीर्थे कोणती होती, भारतीय तत्त्वज्ञान, वेगवेगळी उपास्य दैवतं आणि उपासना पद्धती, स्वर्ग नरक याबद्दलच्या कल्पना हे सगळं कसं विकसित होत गेलं या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ग्रंथात मिळतील. 

लिखाणाचं वैशिष्ट्य असं, की महाभारत संबंधी भारतीय आणि परदेशीय अशा दोन्ही प्रकारच्या संदर्भांचा आधार घेऊन हे लिखाण केलं आहे. जिथे दुसऱ्या लिखाणात चुकीची समजूत झाली आहे, तिथे ती ससंदर्भ खोडून काढली आहे. काही ठिकाणी काही अंदाज वर्तवले आहेत, पण हा अंदाज चुकीचा असू शकतो, हे प्रांजळपणे आधीच कबूल केलं आहे. उदाहरणार्थ अक्षौहिणी हे सैन्यदलाच्या संख्येचं परिमाण म्हणजे नक्की किती याचा हिशोब त्यांनी दिला आहे. 

१ गज+ १ रथ+ ३ अश्व+५ पदाती= १ पत्ती

३ पत्ती= १ सेनाप्रख, ३ मुखांचं १ गुल्म, ३ गुल्मांचा १ गण, ३ गणांची १ वाहिनी, ३ वाहिनींची १ पृतना, ३ पृतनांची १ चमू, ३ चमू म्हणजे १ अनीकिनी व १० अनिकिनी म्हणजे १ अक्षौहिणी. चक्रव्यूह म्हणजे आक्रमण नव्हे तर स्वसंरक्षणासाठी निर्माण केलेलं structure, ते कसं तेही वाचण्यासारखं आहे. काही ठिकाणी या माहितीबाबत दुमत असू शकतं, हे त्यांनीच कबूल केलं आहे. माझंच बरोबर हा हट्ट खरा अभ्यासक कधीच करत नाही, सगळया शक्यता तो विचारात घेत असतो, हा गुण इथे नक्की पहायला मिळतो. 

सकल मराठी जनांना नक्की आवडेल, अशी महाराष्ट्र या नावाच्या उत्पत्तीची माहितीही इथे आवर्जून दिली आहे. महाभारत काळी महाराष्ट्र हे नाव जरी नसलं, तरी भोजांची वस्ती असलेले रुपवाहित, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र हे भाग आजच्या महाराष्ट्राच्या जागी होते. भोजांचे पुढे महाभोज झाले, तर पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र यांचेच पुढे महाराष्ट्र झाले. 

मला स्वतःला strike झालेली माहिती म्हणजे महाभारतातील राजदंडाचं शांतीपर्वात एका कूटश्लोकाच्या स्वरूपात आलेलं वर्णन. ते इतकं विचित्र किंवा अगम्य आहे की, नुसतंच भाषांतर वाचून जे स्वरूप समोर येतं त्याने काहीच बोध होत नाही, उलट मनात गोंधळ नाहीतर भीतीच निर्माण होईल. मला ते प्रचंड आवडलं आहे, म्हणून महाभारतातील राजदंड या विषयावर मी विस्तृतपणे लिहिणार आहे. तेव्हा मी हे असं का म्हटलं आहे, ते लक्षात येईल. पण तेही स्वरूप या चिकित्सात्मक लिखाणामुळे स्पष्ट झालं आहे.

श्रीकृष्णाची भगवद्गीता कळायला पूर्ण आयुष्य जावं लागेल, इतकी ती व्यापक आहे. पण त्या गीतेबाबत असलेले मतप्रवाह, अपवाद याबद्दल सखोल विवेचन करून शेवटी जुन्या भारतवर्षाचा नकाशा दिला आहे. अजून गीता पूर्ण वाचून झालेली नाही, तरीही भविष्यात कधीतरी लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य वाचायची पात्रता म्हणजे शुद्ध मराठीत लायकी मला प्राप्त होईल, असं माझं स्वप्न आहे. ते होईल तेव्हा होईल ( होईलच), पण किमान आहे त्या माहितीत मोलाची भर पडली याचा आनंदही आहे.

एकंदरच महाभारतावर वर्षानुवर्षे कथा, काव्य, कादंबऱ्या, नाटकं अशा विविध साहित्यप्रकारांनी, मालिकांनी कल्पनेची, संकुचिततेची, काव्यात्मकतेची, अद्भुततेची जी काही पुटं चढवली आहेत, ती बाजूला काढून महाभारत अर्थात जय नावाच्या इतिहासाची समग्र माहिती देणारं असं हे पुस्तक मराठीत १०० वर्षांपूर्वी लिहिलं गेलं, आणि आजही ते उपलब्ध आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. लहान थोर सर्वांनी आयुष्यात एकदातरी हे पुस्तक Tracing your own roots हा अनुभव घेण्यासाठी आवर्जून वाचावं. एकदा वाचून बाजूला ठेवण्याचं नव्हे, तर पुन्हा पुन्हा वाचत रहावं, असं हे पुस्तक (भारदस्त भाषेत म्हणायचं तर ग्रंथ) उपसंहार. 


लेखक: चिंतामण विनायक वैद्य

पहिली आवृत्ती: १९१८

पुनर्मुद्रण: २०१६

प्रकाशक: श्रीपाद सकपाळ , प्रफुल्लता प्रकाशन

मूल्य: ९५० /-


© नेहा ज्योती प्रदीप जोशी

( १३.१०.२०२०)

                        ********

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार