मर्मभेद- शशी भागवत

 #पुस्तकांच्या_पानांवरून

पॉलिटीकल सस्पेन्स थ्रिलरच्या शाळेत बाहुबली जर दहावी शिकत असेल, तर आपली शोध कादंबरी त्याची गुरु आहे, आणि मर्मभेद तर त्या शाळेची ट्रस्टी आहे ट्रस्टी! 


फार पूर्वी भारतात सुर्यप्रस्थ नावाचं एक महान साम्राज्य होतं. सत्यजित नावाच्या सम्राटांनी त्या साम्राज्याची कीर्ती सबंध भारतभर पोचवली होती. पण महापुरुषांच्या घरात सगळे महापुरुषच जन्माला येतात, असं थोडीच आहे? सत्यजितांचेच पुढच्या पिढीतील वंशज महाराज चंद्रकेतू हे शूर, पण विलासी. काही काळानंतर तर त्यांच्या इतर समर्थ आणि लायक अधिकाऱ्यांनी सम्राटांच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडायला सुरुवात केली, आणि सम्राट मदनिकांच्या संगतीत मश्गूल होत गेले. राजाचं आपल्या राज्याकडे जितकं जातीनं लक्ष असायला हवं, ते नसल्यावर आणि हाताखालील अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाला आणि महत्त्वाकांक्षेला रोज नवे अंकुर फुटत असताना त्या राज्याचं भविष्य यादवीच्या कृष्णच्छायेत झाकोळलं जाणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसते. एकीकडे सम्राटांच्या चरणावर आपली राजनिष्ठा वाहिली आहे, असं भासवून राजसिंहासनावर अधिष्ठित होण्याची महत्त्वाकांक्षा उरी बाळगणारा कृष्णांत हा पराक्रमी, मुत्सद्दी पण तितकाच कावेबाज आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची तयारी असणारा सरदार आहे. पण हा गरम रक्ताचा, एक घाव दोन तुकडे करणारा खलनायक नव्हे; हा सापळा रचून सावजाला आपल्या टप्प्यात आणून , त्याला हवं तितकं, हवं तसं खेळवून मग शांतपणे त्याचा गळा चिरणारा खलनायक आहे. सम्राटांभोवती आपल्या गोड आणि मायावी शब्दांचं जाळं त्याने मोठ्या खुबीनं उभं केलं आहे. पण एक दोन सरदार फितूर झाले, म्हणून उभं राज्य डळमळीत व्हायला सम्राट सत्यजित आणि समस्त सूर्यप्रस्थाची पुण्याई खचित वांझोटी नव्हती.( हे वाक्य काही जणांना कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल, तर बरोबर आहे!) . 


दुसरीकडे ' सेवके करावे सांगितले काम ' या तत्वाने आपल्या धन्याच्या ठायी अजोड निष्ठा असलेले सरदार रुंडकेतू, सरदार सत्यपाल आहेत. सरदार रूंडकेतू तर स्वामिनिष्ठांचे शिरोमणी, त्यांची स्वामिनिष्ठा केवळ अतुलनीय. एकनिष्ठ असले तरी सम्राटांच्या अवतीभोवती सतत घोटाळणारा कृष्णांत हा शिवशंकरांच्या पिंडीवरचा नाग नसून, तो उभा चंदनवृक्ष कवटाळू पाहणारा सर्प आहे, हे त्यांनी आपल्या डोळस वावर आणि चौकस बुद्धीने केव्हाच ताडलं आहे. आपल्या ऐयारांच्या मदतीने ते कृष्णांतावर लक्ष ठेवून आहेत. ऐयार म्हणजे रहस्यभेद करणारे, बेमालूम वेषांतर करणारे, इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या रसायनांचा, औषधींचा उत्तम अभ्यास असणारे, आपल्या मालकाशी आजन्म इमानदार राहणारे हेर. आणि नेमकी हीच गोष्ट कृष्णांताला असह्य झाली आहे. 


फितूरांना सर्वात मोठा धोका हा अशा स्वामिनिष्ठ सेवकांकडूनच होत असतो. म्हणूनच सरदार रुंडकेतू कृष्णांताच्या डोळ्यात खुपत आहेत. उघडपणे त्यांच्याशी पंगा घेणं कृष्णांताच्या आवाक्याबाहेर आहे, तर कृष्णांताविरोधात एकही सबळ पुरावा हाती लागत नसल्याने रुंडकेतू थेट कृष्णांताशी भिडू शकत नाहीत. मग रुंडकेतूंनी अतिशय सावधगिरीने कृष्णांतापासून सूर्यप्रस्थ आणि महाराजांना वाचवण्यासाठी तयारी चालू केली. इकडे कृष्णांताने रुंडकेतूंच्या रूपाने त्याच्या राजसोपानाच्या पायऱ्या चढून जायचा मार्ग दुष्कर करू पाहणारा अडथळा कायमचा दूर करायचा चंग बांधला. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, हा एका घावात शत्रूला गारद करणारा योद्धा नव्हे, हा खेळवून मारू पाहणारा खलनायक आहे. रुंडकेतूंसारख्या प्रतिष्ठित, नीती अनितीची चाड असणाऱ्या पापभीरू माणसावर त्याने असा काही डाव टाकला, की त्या धीरगंभीर पुरुषाला आपल्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास व्हावा! रुंडकेतूंच्या पत्नी सुलसादेवीच कृष्णांताला सामील झाल्या होत्या! 

कृष्णांताचा हा डाव इतका धक्कादायक आहे, की ती बातमी घेऊन आलेला ऐयार हरिहर ही वार्ता रूंडकेतूंना सांगून स्वतःच आत्महत्या करतो, कारण आपल्या तोंडून ही बातमी अन्य कुणाला कळून आपल्या धन्याची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून! आपला दुसरा विश्वासू ऐयार शिरोमणी वीरभद्र आणि विश्वंभर रमलशास्त्री यांच्याकडे आपल्या गुप्त कार्याची धुरा सोपवून रुंडकेतू ते अज्ञातवासात जात असल्याचं सांगून अश्मदुर्गातून‍ कायमचे बाहेर पडतात. मोडकळीस आलेल्या काळदुर्गावर सरदार रुंडकेतू, कृष्णांत आणि रुंडकेतूंची पत्नी सुलसादेवी यांची समोरासमोर गाठ पडते. कोणी कुणाला जाब विचारण्यापूर्वीच मागच्या बाजूचा एक दगडी भाग उन्मळून पडल्याने सरदार रुंडकेतू आपल्या पत्नीसह त्या ढिगाऱ्याखाली गाडले जातात,पण कृष्णांत बचावतो. हा अपघात त्याने घडवून आणला नसला, तरी इथून त्याच्या कारवायांना खरी गती प्राप्त होते.

'एका रात्रीत सरदार रुंडकेतू आपल्या कुटुंबासह, साऱ्या महसुलासह लंकेस राजा उग्रसेन याच्याकडे पोहोचले असून सूर्यप्रस्थाविरोधात त्यांनी उग्रसेनाशी हातमिळवणी केली आहे', अशी अफवा उठवण्यात आली. सामान्य प्रजाच नव्हे, तर सम्राट चंद्रकेतूंनासुध्दा या बातमीमुळे फार मोठा धक्का बसतो. इतका की हाय खाऊन महिन्याभरातच सम्राट चंद्रकेतू स्वर्गवासी होतात. मात्र त्यांचे अंतिमसंस्कार चालू असताना काही अमानवी शक्तींचा वावर तिथे होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं असतं. सम्राट अकाली निधन पावल्याने, व युवराज अल्पवयीन असल्याने राज्याची सारी सूत्रं आपसूकच कृष्णांताच्या हाती लागतात. 


आता युवराज कुणाल अगदीच लहानगे असल्यापासून कृष्णांताच्या तावडीत सापडतात. सम्राटांचा हा पुत्र कर्तृत्ववान उपजावा, असं तर कृष्णांताला कदापि वाटलं नसतंच. जाणीवपूर्वक युवराज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल व्हावेत, याकडे कृष्णांत जातीने लक्ष ठेवून असतो. कायम वेताच्या छडीच्या धाकात ठेवून युवराज कुणालांना कमकुवत बनवलं जातं. त्यांच्या सोबत केवळ दोनच विदूषक त्यांचं मन रिझवण्यासाठी ठेवलेले असतात. हे सारं कृष्णकृत्य जवळपास वीस वर्षे चालू असताना 'आगामी वसंतोत्सवात युवराज कुणाल आपल्या प्रजेला प्रथमच दर्शन देणार असून शत्रविद्येतलं आपलं पटुत्वही दाखवणार आहेत', अशी दवंडी साऱ्या सूर्यप्रस्थात दिली जाते. आत्मविश्वासाने दोन पावलंही न टाकू शकणाऱ्या युवराजांची समस्त प्रजेसमोर फजिती उडवून देऊन आपलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी टाकलेला हा डाव असतो.हे सारं पहायला एक गावंढळ दिसणारी पण तेजस्वी अशी कन्या आपल्या दोन साथीदारांसह आलेली असते. कृष्णांतपुत्र शार्दुलसिंह तिच्याकडे आकृष्ट होतो खरा, पण तिचं लक्ष मात्र युवराजांकडे असतं. त्या ओंगळवाण्या दिसणाऱ्या, पाय लटपटणाऱ्या युवराज कुणालांसमोर बलदंड असा कृष्णांतपुत्र शार्दुलसिंह आव्हान म्हणून उभा राहतो. एक दोन वारांतच युवराजांची तलवार हवेत भिरकावली जाते आणि ते तोल जाऊन खाली पडतात. हा अपमान, ही फजिती सहन न होऊन बिचारे युवराज रडत भेकत त्या समुदायासमोरून दूर धावत जातात. इकडे शार्दुलसिंहाचा गौरव करायला सुरुवात होते ना होते, तोच एक सर्वांग कवचधारी योद्धा घोड्यावर स्वार होऊन तिथे येतो. क्षणार्धात धिप्पाड आणि महापराक्रमी असणाऱ्या शार्दुल सिंहाचा पराभव करतो, कृष्णांताचं आसन भाला फेकून विद्ध करतो. एवढं करून तो थांबत नाही, तर कृष्णांताच्या साऱ्या पापकर्मांचा पाढा प्रजेपुढे वाचून दाखवतो. आतून हादरलेला असूनही बाहेरून गंभीर असल्याचा आव आणत कृष्णांत पुराव्याची मागणी करतो. तेव्हा तो तेजस्वी योद्धा मोठ्या बाणेदारपणे उत्तर देतो, की ' पुढच्या वेळी सर्व तयारीनिशी मी येईन, तो तुझा मर्मभेद करायलाच !' आणि या महानाट्याचा पुढील अंक सुरू होतो. 


आता इथून पुढची गोष्ट ज्याने त्याने आपली आपण वाचायची आहे. कारण कादंबरीचं नाव मर्मभेद असं आहे, त्यामुळे यापेक्षा जास्त काही लिहिलं तर सगळा सस्पेन्स स्पॉइल होणार आहे. या कादंबरीमुळे गेले काही दिवस मला इतकं वेड लावलं आहे, की काय सांगू? फेसबुकवर मागे गणेशप्रसाद देशपांडे आणि रवींद्र चव्हाण या दोन वाचनप्रेमींच्या‌ पोस्टमध्ये मर्मभेद या कादंबरीचा उल्लेख माझ्या वाचनात आला होता. वाचनसंबंधी दुसऱ्या कोणी लिहिलेल्या पोस्ट वाचताना माझा मेंदू blotting paper सारखा काम करतो. नवं, माहीत नसलेलं नाव दिसलं रे दिसलं की मी ते टिपून घेतलंच पाहिजे, अशी सिस्टम आता तयार झाली आहे. बहोत बडी तपस्या से मैने अपने आप को इस काबिल बनाया हैं! Jokes apart, पण या दोन व्यक्तींचे शताधिक सहस्त्रवेळा मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही सांगितलं नसतं, तर मला हे अफलातून पुस्तक सापडलंच नसतं. शिवाय माझ्या जन्माच्या आधी ३१ वर्ष प्रकाशित झालेली कादंबरी अगदी अद्भुत आहे, वाचायलाच हवी, हे मला सांगायची जबाबदारी माझ्या आधी जन्मलेल्या ज्येष्ठ वाचकांची आहे, नाही का? नुसतंच आमच्या काळी कसलं superior साहित्य होतं, वगैरे हवेत बार न उडवता अगदी नावानिशी सांगून याच्या तोडीचं अजूनही काही लिहिलं गेलं नाही, हे महत्त्व सांगणारे विरळेच! देशपांडे सरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, की ते मागच्या पिढीच्या पुस्तकांची नव्या वाचकांना ओळख व्हावी, म्हणून #मागच्या_पिढीची_पुस्तकं हा hashtag वापरून खूप छान माहिती पुरवत असतात. ज्यांना खरोखर आवड आहे, त्यांनी नक्की सरांच्या पोस्ट वाचाव्या. 


अगदी प्रेमात पाडेल, अशी ही कादंबरी. ज्याने ही कादंबरी वाचली, तो स्तुतीशिवाय दुसरं काही करूच शकणार नाही. कादंबरीचं पहिलं पान वाचून होईपर्यंतच ती वाचकाचा पूर्ण ताबाच घेते. काय नाही या कादंबरीत? पतीला फसवणारी सुलसादेवी आहे, तर दुसरीकडे ज्या पतीने चुकूनसुद्धा कधी जीचा मान ठेवला नाही, अशा पतीचा अन्य कोणी केलेला अपमान सहन न करणारी गजगौरी आहे. प्रत्यक्ष आपल्या मुलीचं शरीर न सोडणारं तिच्या आईचं पिशाच्च आहे, तर स्वामीकार्यासाठी आपल्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूची आवई उठवून त्याला गुप्त कामगिरीवर पाठवणारे सरदार सत्यपाल आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत राज्याची सेवा करण्यासाठी सर्वस्वाचा होम पेटवायलाही तत्पर असणारे चंडप्रतापी सरदार रुंडकेतू आहेत, आपल्या दिवंगत पित्याचं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आपलं तारुण्य पणाला लावणारी तेजस्विनी, वृषल हेही आहेत. राजकारण, कुरघोडी, रहस्य, अमानवी, अघोरी शक्ती, प्रेतात्मे, खजिन्याचा शोध, मती गुंग करणारे नातेसंबंध आणि बरंच काही! प्रेम, ममता, निष्ठा, कर्तव्यपरायणता, समर्पण, दुर्दम्य साहस याच्या जोडीला पराकोटीचा स्वार्थ, माणसाला एखाद्या बाहुल्यासारखं खेळवायची विकृती, उन्माद, वासनांधता, सूड या परस्परविरोधी गुणांचा हा परिपाक म्हणजे ही कादंबरी आहे. It is not an act of adulation. I think, I do not have enough words to appreciate this beautiful literary masterpiece! 


रहस्य निर्माण करण्यासाठी लेखकांनी possibly at his disposal असणाऱ्या सगळ्या कल्पनांचा अगदी मुक्तहस्ताने वापर केला आहे. दरबारी राजकारण, खजिन्याचा शोध हे माणसाच्या आवाक्यातले मुद्दे आहेतच, पण जोडीला अमानवी जीवसृष्टी, प्रेतात्मे, पिशाच्चं, रमलविद्या, अघोरी विद्या, ऐयारी कसब, अद्भुत रसायनविद्या याही कल्पना विलक्षण ताकदीने हाताळल्या आहेत. रहस्य इतकं सुंदर निर्माण केलं आहे, की त्या अनुषंगाने वाचक कथेत पुढे पुढे सरकत जातो. रहस्यकथेचं हे एक वैशिष्टय असतं, की काही गोष्टी कळू नयेत अशाच पद्धतीने सांगायच्या असतात. सगळंच जर एकदाच वाचून कळलं, तर ती रहस्यकथा कशी काय ठरेल?


यातली तेजस्विनी ही warrior princess सारखी आहे. वाट्टेल तो धोका ती सहज स्वीकारून पार करू शकते. एक तर प्रेमात वगैरे पडण्याइतका रिकामा वेळ तिच्याकडे नाही. आणि त्यातूनच शूर पुरुषाच्या प्रेमात पडलीच, तरी प्रियकराच्या वर्तनात स्वार्थाचा एक उणा अंश जरी सापडला, तरी त्याला कायमचं मनातून हुसकावून लावण्याइतकी ती कठोर आहे. या कथाभागात तिची आणि त्याची मोजकी चार पाच वेळाच भेट झाली असेल, पण तिने प्रत्येक भेटीत त्याच्या बऱ्यावाईट प्रत्येक गोष्टीचा त्याला त्याच्याच तोंडावर थेट जाब विचारला आहे. "ऐकलं का गडे मी काय म्हणते", असा लाडीकपणा दाखवणारी ही प्रेयसी नाही. तिने तिची स्वतंत्र ओळख आणि जीवनध्येय कायमच सर्वतोपरी राखलं आहे. She is not a red rose that anybody can pick, she is fire! Just like her name, she is lit 🔥


तेजस्विनी सारखेच रुंडकेतूही मी कधीच विसरू शकणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत राज्याची सेवा करून ते थांबले नाहीत, तर मेल्यावर पिशाच्च बनून काळदुर्गाच्या strategic location वर त्यांनी असा काही जम बसवला आहे, की शत्रू सूर्यप्रस्थाच्या विरोधात एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही. ज्या दगाबाज कृष्णांताच्या काव्याने त्यांना जीव गमवावा लागला, तोच कृष्णांत सूर्यप्रस्थाच्या शत्रुविरोधात लढतोय, हे पाहून ते स्वतः त्याची भेट घेतात आणि आपल्या सगळ्या शक्तींनिशी त्याला सहाय्य करायचं आश्वासन देतात. इतकंच नाही, तर त्याच्याच सैन्यातले फितूर त्याला दाखवून देतात, पुढची रणनीती कशी असायला हवी याबाबत ते कृष्णांताला, प्रत्यक्ष त्यांच्या खुन्यालाच मदत करतात. राष्ट्रप्रेमाने भारलेली माणसं वेळप्रसंगी वैयक्तिक हाडवैरही क्षणात विसरू शकतात. या स्वार्थत्यागाला सलाम! 


काही काही प्रसंग अगदी कातावून टाकणारे आहेत. तिथे purgation of pity and fear होतंच. एक दुसरं young couple आहे. नावं मुद्दाम सांगत नाही. ही मुलगी लहानपणीच अनाथ झालेली आहे, आणि जन्मापासून तिला पिशाच्चांनी ग्रासलं आहे. त्यामुळे तिची मानसिक स्थिती दोलायमान झाली आहे. तारुण्यात ती एका शूर वीराच्या प्रेमात पडते, पण पूर्णपणे त्याची व्हायला मात्र ती कचरते आहे. तिच्यासारखी अमानवी शक्तीने ग्रासलेली मुलगी बायको किंवा आई कशी होणार, ही भीती तिला छळत असते. तिचा प्रियकर सगळं जाणून आहे, पण तरीही तो तिची साथ सोडत नाही. त्याच्याखातर ती शत्रूच्या मुलखात हेर बनून रहस्यभेद करायलाही तयार होते. एक दिवस मात्र ती त्याला लवकर कामगिरी उरकून यायला सांगते, कारण आज ती त्याला आपण त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे, याची कबुली देणार असते. त्यालाही ती नेमकं काय सांगणार आहे, याचा अंदाज असतोच. तिच्या कोमल आवाजात आज प्रेमाची कबुली ऐकायला मिळणार, या ओढीने त्यांच्या गुहेशी येणाऱ्या त्याच्या कानाला ऐकू येतात, त्या तिने असहाय्य अवस्थेत त्याला मारलेल्या हाका आणि किंकाळ्या. तोही वायूच्या वेगाने तिला वाचवायला धावत राहतो, पण तो तिथे पोहोचेपर्यंत फार उशीर झालेला असतो. एका नरपशूच्या वासनेची ती शिकार झालेली असते. हा शारीरिक आणि त्यापेक्षा मानसिक धक्का सहन न होऊन जवळच्याच एका मोठया खडकावर डोकं आपटून ती गतप्राण होते. त्याला दिसतं ते तिचं अपमानित झालेलं मृत शरीर! त्यावेळची ओळ " हिरण्यगर्भा मेदिनी अचानक नाहीशी झाली होती. आता उरला होता केवळ अक्षांश रेखांशाचा मोकळा पिंजरा. त्यावर अश्रू ढाळण्याने आता कोणता लाभ पदरी पडणार होता? " इतकी अस्वस्थ करून गेली, की काही क्षण अगदी स्तब्ध व्हायला झालं. 


सर्वकाळ आवडत्या पुस्तकांच्या मेरिट लिस्टमध्ये add केलेलं हे नवं पुस्तक. फक्त कथाच नाही, तर त्यातली पात्रंही खूप काळापर्यंत माझ्याबरोबर राहतील! आता या पुस्तकाला निरोप द्यायची घटिका समीप आली आहे, लायब्ररितून घेतलेलं हे पुस्तक मूळ मालकाकडे सुपूर्द करायचं आहे. नाही म्हणायला, " जाऊदे ना, ठेवून घेऊ, दुप्पट दराने दंड भरू" , असा अविचार already मनात येऊन गेलेला आहे. पण मी तसं करणार नाहीये. अमेझॉन वरून घे ना, असा आगाऊपणा कमेंटमधे कुणीही करू नये, हे पुस्तक वर्षातले २५० दिवस तरी out of print असतं! लायब्ररीची पुस्तकं मी चोरत नाही,पण कुणाच्या वैयक्तिक संग्रहात मात्र हे पुस्तक पडीक असल्यास आवर्जून सांगावे, मी जातीने धाड टाकायला येईन! 

© नेहा ज्योती प्रदीप जोशी.

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार