जगाच्या पाठीवर (सुधीर फडके)

#पुस्तकांच्या_पानांवरून
पुस्तक परिचय: जगाच्या पाठीवर
लेखक: सुधीर फडके (आत्मचरित्र)
प्रकाशक: राजहंस प्रकाशन

स्वयें श्री राम प्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती||

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, 
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा|| 

लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची,
स्वामिनी निरंतर माझी सीता ही खरेचि|| 

या आणि अशा अनेक गाण्यांनी आपली सुरेल सोबत करणारे रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके अर्थात् आपले लाडके बाबूजी यांचं जगाच्या पाठीवर हे अपूर्ण आत्मचरित्र आत्ताच काही दिवसांपूर्वी वाचलं. मुळात हे काही पूर्ण आत्मचरित्र नाही, अर्ध देखील नाही. बाबूजींच्या जन्मापासून ते त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंतच्या आठवणी बाबूजींनी या चरित्रात शब्दांकित केल्या आहेत. यात त्यांनी आपलं बालपण, एकेकाळी वैभव पाहिलेल्या प्रतिथयश वकील असणाऱ्या वडिलांना सोसावे लागलेले दारिद्र्याचे चटके, आईचा अकाली मृत्यू, त्यानंतरची या भावंडांची हलाखीची परिस्थिती आणि त्यानंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बालपणापासून ते तारुण्यापर्यंत निरंतर न चुकलेला संघर्ष असा घटनाक्रम या पुस्तकात दिलेला आहे. बाकी गोष्ट काय ते आपली आपण वाचून समजण्यात जी मजा आहे, ती मला घालवायची नाही. पण पूर्ण पुस्तकात मला आवडलेली गोष्ट म्हणजे या हलाखीच्या दिवसातही बाबूजींनी आपल्या संस्कारांशी, स्वाभिमानाशी कधीही न केलेली तडजोड! त्यातले काही काही प्रसंग वाचताना डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. एका दिवसात घरून ' पुन्हा तुझं तोंड दाखवू नको' अशा आशयाचं पत्र येणं, त्याच दिवशी ज्या संघटनेच्या तत्वांचा नितांत आदर बाळगत, त्या संघ कार्यालयातील काही लोकांनी असूयेपोटी त्यांची हकालपट्टी करणं, तेव्हाच घरमालकाने घराबाहेर काढणं, रेकॉर्डिंगचं एकही काम हातात नसणं अशा आपत्ती अक्षरशः शिरावर कोसळत असताना केवळ बाबूजीच होते, म्हणून आपलं मन शांत ठेवू शकले. हाच प्रसंग सांगताना बाबूजी लिहितात, त्या वेळी फुटपाथवर बसून रडताना, डोकं गच्च आवळून, मी स्वतःलाच आपल्याला वेडं व्हायचं नाही आहे, असं पुन्हा पुन्हा बजावून सांगत होतो!

 मित्राच्या छोट्या खोलीत मोठ्या मनाच्या माणसांच्या संगतीत घालवलेले क्षण त्यांच्या या श्रीमंतीचा हेवा वाटायला भाग पाडतात. कधी हॉटेलात कामाला लागलेला मित्र चोरून एखादा पाव खायला आणायचा, तर कधी बाबूजींना रस्त्यावरच्या गाड्यापुढे हात पसरून उभं रहायची वेळ आली, कधी रात्री फुटपाथवर नाहीतर बागेत खाली पेपर अंथरूण झोपायची वेळ आली, तर कधी सार्वजनिक उद्यानातल्या नळाच्या पाण्याने अंघोळ करायची वेळ आली. महिनो न महिने उत्तर भारतात गाण्याचे कार्यक्रम करून मिळवलेले पैसे रेल्वे स्टेशन वर चोरीला गेले, तर क्षयाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या बाबूजींनी मृत्यूच्या अकाली पडलेल्या सावलीशीही सामना केला. कधी आत्महत्या करायचा प्रयत्नही केला ,पण 'मला गाणं जमतं आणि मला चांगलं गाणं करायचं आहे', हा ध्यास काही त्यांनी सोडला नाही. एक नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाबूजींनी दादरा नगर हवेलीला पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी लढ्यात घेतलेला सशस्त्र सहभाग, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ठायी असणारी अजोड श्रध्दा हाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फारसा माहीत नसलेला पैलू आपल्याला कळतो. एका अपयशाने कणा मोडून पडणाऱ्या आजच्या पिढीतल्या लोकांसाठी बाबूजी म्हणजे बाहुबलीसारखे मोठे हीरोच! हे सगळं वाचत असताना, ही एवढी ताकद आली कुठून, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आणि उत्तर एकच, संस्कारांची आणि तत्वांची भलीमोठी अविनाशी शिदोरी! 
लहानपणापासून अनेक गुरूंनी केलेले संस्कार, त्यातून आकाराला आलेलं आणि बहरलेलं गाणं , कधी कौतुक तर कधी उपेक्षा, कधी यश कधी अपयश असा ऊनसावलीचा खेळ ते गीतरामायण असा प्रवास बाबूजीच करू जाणोत! 

मुळात प्रस्तावनेत श्रीधर फडके यांनी नमूद केल्याप्रमाणे, हे चरित्र अपूर्ण आहे. दादरा नगर हवेलीच्या उठावातला सहभाग हीच बाबूजींनी लिहून ठेवलेली शेवटची आठवण आहे. यापुढे त्यांच्या पत्नी ललिता फडके यांनी लिहिलेल्या काही आठवणी आहेत. पण मग बाबूजींच्या आयुष्याला स्थैर्य कधी प्राप्त झालं, वैवाहिक आयुष्य, किंवा गदिमा आणि गीतरामायण हा आयुष्य व्यापून टाकणारा टप्पा, त्यानंतरचं उत्तुंग यश ते मात्र या पुस्तकात नाही. ही केवळ त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट आहे. कदाचित गदिमांच्या चरित्रात त्याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. आज एकीकडे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे कलाकार ( किंवा कल्लाकार?) , एक दोन ढिन्च्याक गाणी घालून youth icon झालेले एकीकडे, आणि वर्षांनुवर्षे केलेल्या संगीत साधनेच्या जोरावर रसिकांच्या मनावर निरंतर अधिराज्य गाजवू शकणाऱ्या गीतांची निर्मिती करणारे बाबूजी दुसरीकडे. पुस्तक वाचत असताना हरिवंश राय बच्चन यांची ' कोशिश करनेवालोंकी कभी हार नहीं होती' ही कविता गद्यात लिहिली तर अशीच असेल, असं वाटावं इतका प्रेरणादायी संघर्ष ज्या बाबूजींनी केला त्यांना खरंच सलाम! त्यांची गाणी अजोड आहेतच, पण त्यांच्या या एकाहून एक बलवत्तर आपत्तींचा सामना करताना अढळ राहिलेल्या positivity साठी बाबूजींना माझा शिरसाष्टांग दंडवत! 'काही inspiring वाचायचं आहे, काय वाचू' या प्रश्नाला मला सापडलेलं उत्तर म्हणजे, हे पुस्तक- जगाच्या पाठीवर! 

- नेहा ज्योती प्रदीप जोशी
 ( २५.०२.२०२०)

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार