तुका 'राम' दास

तुका ‘राम’ दास

नावाचा महिमा किती मोठा हे काही पुस्तकांकडे बघूनच कळतं. वरती तुका मधे राम खाली दास तुका ‘राम’ दास असं चमत्कृतीपूर्ण नावाचं पुस्तक मला वाचायला मिळालं, याबद्दल माझं मलाच खूप कौतुक आहे. तसे आपले संत परंपरेतील सगळेच संत वंदनीय आहेत, पण माझा personal लोभ ज्यांच्यावर आहेत ते दोघे तुकाराम महाराज आणि समर्थ. यांचं, यांच्यावर लिहिलेलं कितीही साहित्य वाचावं, तरी ते कमीच. ‘ सिंधू न मावे रांजणी’ तसा प्रकार. या संतांनी आपल्या आयुष्यभराची साधना खर्ची घालून आपल्यासारख्या “पामरांच्या” दृष्टीला पुरेल इतकं बोधांजन तयार करुन ठेवलं आहे. आपण फक्त तिथवर पोहोचलं पाहिजे. पण आपण आधुनिक एकविसाव्या शतकात राहणाऱ्या so called साक्षर आणि प्रगत लोकांनी या संतांना विशिष्ठ जाती, समजुतींच्या चौकटीत अडकवून ठेवलं आहे. यातून बाहेर पडून खरा नीरक्षीर विवेक दाखवून बुद्धीच्या कसोटीवर जोवर आपण हे साहित्य पडताळून पाहत नाही, तोवर आपण फक्त साक्षरच असू, सुशिक्षीत नव्हे. हे साध्य करण्यासाठी या संतांच्या लोकप्रिय असणाऱ्या प्रतिमेपलीकडे जाऊन त्या व्यक्तीचं साहित्य, वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका उलगडून सांगेल, असं काहीतरी म्हणजे हे पुस्तक. यात त्या संतांच्या जीवनाचा नव्हे तर विचारविश्वाचा पट उलगडून दाखवणारे लेख एकत्र केले आहेत. 

तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांच्यावर दोन वेगळ्या विभागात अनुक्रमे तुलसी आंबिले आणि समर्थ साधक या दोन नावांनी लेखन केलं आहे. अर्थातच ही pen names आहेत, ज्यामुळे लेखक जे जसं लिहायचं तसं स्पष्ट आणि निश्चिंत होऊन लिहू शकेल. तुका लोकी निराळा या विभागात एकूण २६, तर रामदास विनवी या विभागात २२ लेख आहेत. एकंदर त्या संतांनी त्या काळानुरूप आवश्यक कोणत्या विषयावर काय लिहून ठेवलं आहे, असे काही प्रमुख विषय निवडून निवडक ओळी, त्या लिखाणामागची सामजिक - राजकीय- सांस्कृतिक- धार्मिक- अध्यात्मिक अशा सगळ्या बाजूंचा विचार करुन अर्थ विषद केला आहे. 

तुका लोकी निराळा मधे जाणवतात ते तुकाराम महाराज साधारण प्रपंची पण विठ्ठलाचा छंद जीवा लागलेले, वृत्तीने श्रद्धाळू आणि अभ्यासू, असेल ती भूमिका रोकठोक घेणारे, अप्रिय वाटल्या तरी समाजात चुकीच्या दिसणाऱ्या गोष्टींवर अचूकपणे बोट ठेवणारे, काहीसे धाडसी, तितकेच बंडखोर वा विद्रोही आहेत. वेदप्रामाण्य, गुरु- बुवा- महंतबाजी, वेगवेगळ्या देवीदैवतांचा- उपासना पद्धतींचा सुळसुळाट यावर दणदणीत प्रहार करणारे तुकाराम महाराज भोळेसांब, अति कोमल वृत्तीचे निश्चितच वाटत नाहीत. त्यांच्या शब्दाशब्दांतून विठ्ठलाविषयी गाढ श्रद्धा जाणवते. कुणी माझी मान कापली तरी विठ्ठलाऐवजी अन्य कोणाचंही नाव माझ्या मुखी येऊ नये, असं ते लिहू शकले ते त्यामुळेच. अन्य धर्माच्या उपासना पद्धतींचा अविचारी स्वीकार, अस्मानी सुलतानी संकटानी भरडलेला समाज, त्यातून आलेली विरक्तीची भावना, छोट्या मोठ्या अनेक दैवतांचा आणि बुवांचा सुळसुळाट, वेदप्रमाण्याचा जाचक कर्मठपणा, वेळोवेळी सहन करायला लागलेला निषेध, त्यातून तावून सुलाखून निघाल्याचे अनुभव, तुकाराम शिष्या बहिणाबाई यांनी रेखाटलेले आपल्या गुरुंचं शब्दचित्र आणि आपले अनुभव सांगता सांगता उभं केलेलं त्या काळच्या स्त्रीचं भावविश्व, चुकीला चूक आणि बरोबर तेच बोलण्याचा ठाम निश्चय, लोकप्रिय होत असतानाही कटाक्षाने निःस्पृह राहण्याची कसोशी, देवाचं स्वरुप, तत्कालीन राजकीय स्थिती, त्यांना अंतःकाळी लागलेली विठ्ठलाची अनावर ओढ, त्यांच्या मृत्यनंतर इतरांच्या प्रतिक्रिया असे विषय घेवून त्यावर आधारित अभंग आणि विवेचन या विभागात वाचायला मिळतं. वाचता वाचता तुकाराम महाराज एक व्यक्ती ते तुकाराम महाराज एक विचार अशी लख्ख ओळख पटत जाते. 

दुसरा विभाग रामदास विनवी मधील २२ लेखांत रामदास स्वामींच्या दासबोध, मनाचे श्लोक या माहितीच्या आणि त्यापेक्षा वेगळ्या काहीशा अज्ञात असणाऱ्या साहित्याचा आणि विचारविश्वाचा मागोवा घेतला आहे. यातून जाणवतात ते रामदास स्वामी विवेकी, खूपसे no nonsense आणि rational, शब्दप्रभू, निसर्गप्रेमी, अनेक विषयांची सखोल जाण असणारे सौंदर्य दृष्टी असणारे रसिक, स्वतःच्या मर्यादा उमदेपणाने मान्य करणारे विचारी, त्यांच्या रामरायासाठी तितकेच हळवे असणारे असे आहेत. सन्यासी असूनही प्रपंच करावा नेटका असा आपल्या शिष्यांना दिलेला सल्ला, मराठी भाषेवरचं त्यांचं विलक्षण प्रभुत्व, अनुभवांनी आणि अंतरीच्या प्रचीतिने सिद्ध असणारं साहित्य, माणसाने शहाणं असणं आणि तसच शहाणं होऊन वावरणं यावर त्यांचा असणारा भर, मनाच्या विकारांचं आणि साधकाच्या आयुष्याचं स्वरुप, श्लोक - अध्याय- स्तोत्रं- आरत्या याचबरोबर त्यांनी लिहिलले अभंग- छंद-पोवाडे- लावण्या-भारुडं-पदं, भीमरूपी सारखी अजून १३ हनुमानस्तोत्रे, भोवतालच्या निसर्गावर त्यांचं मनापासून असणारं प्रेम, अगदी जेवणाच्या आवडीनिवडी ते दैनंदिन जीवनात आवश्यक असणारं व्यवस्थापन अशा विषयांवर त्यांनी काय काय लिहून ठेवलं आहे आणि त्यामागे त्यांचा असणारा नेमका विचार या लेखांतून स्पष्ट होतो. 

हे पुस्तक एकंदरीतच या दोन्ही समकालीन संतांचं वेगळेपण आणि संतपण समजेल अशा सहजसोप्या शैलीत समजावून सांगतं, म्हणून हे एकदा आवर्जून वाचावंच आणि अवश्य संग्रही ठेवावं! 

तुका ‘राम’ दास
तुलसी आंबिले & समर्थ साधक
डायमंड पब्लिकेशन्स
पृष्ठ संख्या: २०६
मूल्य: २५०

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार