मनाचिये द्वारी
मनाचे श्लोक लहानपणी कानावर पडलेले. शाळेत एकसुरात श्लोक म्हटल्याचं आठवतं. पुढे psychology चा अभ्यास करताना मनाचे श्लोक वेगळ्या अर्थी समजत गेले. कधीही जरा relax व्हावंसं वाटलं, तर रविंद्र साठेंच्या घनगंभीर तरीही थेट काळजापर्यंत पोहोचणाऱ्या आवाजातले मनाचे श्लोक ऐकणं हा एक उत्तम पर्याय माझ्याकडे असतो. का माहीत नाही, पण हे श्लोक मनाला भावतात. त्यांची ओळख पटते. आत्ताच ग्रंथालयात सच्चिदानंद शेवडे लिखीत मनाचिये द्वारी हे पुस्तक मिळालं. एकूण २०५ मनाच्या श्लोकांचं एकेक करुन सुंदर निरुपण केलेलं आहे. त्यामुळे हे compulsorily वाचलंच पाहिजे, असं पुस्तक आहे.
या पुस्तकात मूळ श्लोक, त्याचा अर्थ आणि विवेचन असा क्रम ठेवला आहे. हे पुस्तक पूर्वी महाराष्ट्र टाईम्स आणि नवशक्ती वृत्तपत्रांतून आलेल्या सदराचं पुस्तकी रूप आहे. लिहीत असताना त्या काळी लिहिलेले श्लोक आजच्या चंगळवादी, भौतिक पातळीवरच अधिक जगणाऱ्या, स्वमग्न माणसाच्या आयुष्यातही कसे लागू पडतात, यावर भर दिलेला आहे. विवेचन करताना स्वामी वरदानंद भारती लिखीत ‘ मनोबोध’, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, प्राचीन ग्रंथ- स्तोत्र - कथा यांचे संदर्भ दिले आहेत. पापी अजामेळ, गजेंद्रमोक्ष हे उल्लेख मी गोंदवलेकर महाराजांच्या भजनातही ऐकले होते.पण त्याची नेमकी गोष्ट हे पुस्तक वाचल्यावर समजली. रोज एक श्लोक आणि निरुपण असं वाचू शकतो, किंवा एका बैठकीतही पूर्ण करू शकतो, असं पुस्तक. ज्याला मनाचे श्लोक, समर्थांचे साहित्य याविषयी जिज्ञासा आहे, त्यांनी हे पुस्तक वाचावं. घरी मुलं श्लोक शिकत असतील, तर त्यांना वडील व्यक्तींनी वाचून दाखवावं किंवा त्यांचं त्यांना वाचायला द्यावं, असं पुस्तक आहे. सोप्या, सुटसुटीत भाषेत बोजड अती उपदेशपर न वाटता वाचावसं वाटणारं पुस्तक, मनाचिये द्वारी.
मनाचिये द्वारी
डॉ. सच्चिदानंद शेवडे
लाखे प्रकाशन
पृष्ठ संख्या: ४१६
मूल्य: ४६० रुपये
Comments
Post a Comment