द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले
द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध गुप्तहेरांच्या महान कारवायांची आणि मराठा साम्राज्याच्या उदयाची कहाणी
सन १६६३. शिवाजी राजांच्या चिमुकल्या स्वतंत्र स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी उत्तर दक्षिणेकडे शत्रू सरसावून बसले आहेत. नुकताच मुघल सुभेदार शाहिस्तेखान पुण्यात त्याच्या सर्व सैन्यानिशी तळ ठोकून बसला आहे. स्वराज्यासाठी तन मन धन अर्पण करायला सज्ज मावळ्यांच्या नशिबी ‘ रात्रंदिन युद्धाचा प्रसंग’ आहे. यांना ही लढाई किती वेळ चालणार ठाऊक नाही. पण आहे तो शिवाजीराजेंवर असणारा ठाम विश्वास. राजे आपण उभं केलेल्या स्वराज्याची वाताहात होत असताना पाहत आहेत. ते दुःख आणि जोडीला मात्र वेगळ्याच विवंचना आहेत. सततच्या लढायांनी त्रस्त सरदार आता मुघलांशी तह करायचा सल्ला देत आहेत. तर स्वराज्याची आर्थिक स्थिती इतकी ढासळली आहे, की सैन्याला वेतन देण्याइतकेही पैसै शिल्लक राहिलेले नाहीत. अशा डळमळीत परिस्थितीत राजांनी जातीने छापा घालून शाहिस्तेखानाला शास्त केली. पण अजूनही समस्या संपल्या नव्हत्या. स्वराज्य पुन्हा उभं करायचं होतं, त्यासाठी लागणारं प्रचंड आर्थिक पाठबळ मिळवायचं कुठून? आणि इथे राजांच्या मदतीला धावून आले त्यांचे तृतीय नेत्र- त्यांचे हरहुन्नरी गुप्तहेर! आणि इथूनच सुरु होतो सूरतेच्या लुटीचा थरार!
मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या अनेक घटनापैकी एक म्हणजे सुरतेची स्वारी. छत्रपती शिवाजीराजेंसारख्या नरकेसरीलाच शोभू शकेल, अशा अद्भुत साहसाची गोष्ट म्हणजे सुरतेची स्वारी. ही लूट राजांच्या वैयक्तिक छानछौकीसाठी नव्हती, तर स्वराज्याचं सोनेरी तोरण महाराष्ट्राच्या उंबऱ्यावर पुन्हा एकदा डौलाने झळकावं, यासाठी केलेली ती तजवीज होती. ही मोहीम ना सोपी होती, ना शक्य होती. पण या सगळ्या शक्याशक्यतेपलिकडे पोहोचलेल्या स्वराज्याच्या शिलेदारांनी ते करुन दाखवलं.
बहिर्जी नाईक माहित नाहीत, असा मराठी माणूस शोधून सापडणं कठीण. या स्वारीच्या कथानकात हा जगातील सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असणारच, पण वेगळ्याच रुपात. हे यश आहे लेखकाच्या व्हिजनचं. बहिर्जी नाईक यांच्या कारकिर्दीतले चार ठळक महत्त्वाचे विजय म्हणजे पन्हाळगड सुटका, लगेच झालेली उंबरखिंडीतली लढाई, सुरतेची स्वारी आणि कळस म्हणजे आग्र्याहून सुटका. या चारही प्रसंगांतून महाराज सहिसलामत सुटले, हे त्यांचं निर्विवाद यश आहे, ज्याला या श्रेष्ठ गुप्तहेराच्या चोख कामगिरीचं भक्कम पाठबळ होतं. अपारंपरिक पोवाड्यांतून, कथांतून, कादंबऱ्यांतून बहिर्जी आपल्याला भेटले आहेत, पण ऐतिहासिक संदर्भांचा मागोवा घेतला तर मात्र निराशा पदरी पडते. कारण त्यांचे उल्लेख कुठेच सापडत नाहीत. याचाच उपयोग करुन घेत लेखकाने बहिर्जी नाईक अशी एकच आभाळाएव्हढी गूढ, अचाट व्यक्ती उभी न करता बहिर्जी बांदल आणि सदाशिव नाईक अशी जुळी व्यक्तिमत्वे उभी करुन त्या जोडीला नाव दिलं आहे बहिर्जी - नाईक. हे दोघे आणि एक सामान्य गुराखी असणारा मुलगा, जो रायगडावर गुप्तहेर होण्याचं प्रशिक्षण घेतो, त्या तिघांनी केलेलं स्वारीचं अनेक महिने आधीपासून चालू केलेलं रोमांचक नियोजन आणि प्रत्यक्ष स्वारीचा थरार असं या पुस्तकाचं स्वरुप आहे.
ही सगळी गोष्ट ऐतिहासिक तथ्यांच्या जास्तीत जास्त सुसंगत राहावी, यासाठी ‘ सतराव्या शतकातील सुरत’ ( लेखक बाळकृष्ण गोखले), ‘ ट्रेड हिस्ट्री ऑफ सुरत’ ( शगुफ्तापरवीन), ‘ इंग्लिश फॅक्टरीज इन सुरत’ ( चार्ल्स फॉवसेट लिखीत डायरी) या मूळ संदर्भांचा आणि सुरत शहराला प्रत्यक्ष भेट देऊन तिथे केलेल्या निरीक्षणाच्या आधारे तिथली राजकीय- मुलकी व्यवस्था, विरजी वोहरासारखे स्थानिक धनाढ्य व्यापारी असे सगळे details नीट वापरुन काही खरी तर काही काल्पनिक पात्रं निर्माण करुन त्यावेळचं सुरत शहर आपल्यासमोर आणलं आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत,तर मराठीत अनुवाद आहे. हा अनुवाद जेवढा करता येईल तितका अकृत्रिम, मूळ लिखाणाइतका जीवंत वाटावा याचा प्रयत्न केलेला दिसतो. लोकांच्या मनाचा ठाव घेईल असा ऐतिहासिक विषय मूळ तथ्यांशी कोणतीही जडजोड न करता जबाबदारीने हाताळल्याबद्दल लेखकांचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. प्रिन्स ऑफ पाटलीपुत्र, स्टॉर्म फ्रॉम तक्षिला, नेमेसिस ऑफ कलिंग ही सम्राट अशोकाच्या आयुष्यावर आधारित ट्रायोलॉजी आणि नेताजी सुभाषचंद्र यांच्यावर आधारित प्रिझनर ऑफ युकुत्सक ही पुस्तकं या पुस्तकाच्या आधी प्रकाशित झाली असून शिवरायांच्या गुप्तहेरांच्या मालिकेतील पुढील पुस्तक सिज ऑफ पन्हाळासुद्धा प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक तर इतिहासप्रेमींनी आवर्जून वाचावं असंच आहे.
द लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक ( सुरतेवर छापा - पुस्तक पहिले)
मूळ लेखक: श्रेयस भावे
अनुवाद: योगिता रिसबूड
संपादन: डॉ. मृणाल धोंगडे
दिलीपराज प्रकाशन
पृष्ठ संख्या: ३३२
मूल्य: ४५० ₹
Comments
Post a Comment