देवबाभळी: प्राजक्त देशमुख

"एक देवाची बायको, एक भक्ताची बायको. मुळात त्यांची ओळख म्हणजे ' त्या कुणाच्या तरी बायका आहेत ' इथेच त्यांचं अधांतरी असणं दिसून येतं आणि खटकतं. त्यांचं स्वतंत्र म्हणणं काय असेल? त्या कुणावर चिडत असतील तर त्यांचा आवाज कसा असेल? त्यांचे कामानंतरचे सुस्कारे किती दीर्घ असतील? हे सगळं सगळं कुणी का मांडलं नाही की कुणाला दिसलंच नाही? ग्रंथच्या ग्रंथ तुकोबा आणि पांडुरंगावर लिहिलेले असताना त्यांच्या पाठीशी पाठ लावलेल्या आकृत्यांकडे कुणाचंच लक्ष कधी का गेलं नाही? निदान प्रदक्षिणा मारताना तरी? " 

      विठू माउली ये हाची वर देई संचारोनी राही हृदयामाजी हीच विनवणी वारंवार करणारे, संसाराचं मोहजाल भेदून परम चैतन्यरुपाशी एकरुप व्हायला निघालेले तुकोबा; घरादारावर, मुलाबाळांवर जीवापाड माया करणारी, आपल्या नवऱ्याला भक्तीचं वेड लावणाऱ्या देवाचा सतत पाणउतारा करणारी, पण अशा जगावेगळ्या नवऱ्याचा जगावेगळा संसार मनोभावे करणारी आवली ही एक अद्भुत जोडी. देवाचं नाव घेत भंडाऱ्याच्या डोंगरावर किंवा इतर कुठेही जरी गेले असले, तरी त्यांना शोधून पोटभर भाकरी खाऊ घातल्याशिवाय आवली स्वस्थ बसायची नाही. अशीच एक दिवस बुवांना शोधत डोंगराची वाट चढणाऱ्या गर्भारपणाने अशक्त झालेल्या आवलीच्या पायी देवबाभळीचा काटा रुतला. तो काटा काढून द्यायला लगबगीने आला तो परमात्मा पांडुरंग! देवाने लखुबाईला (रुसून वनात जाऊन बसलेल्या रुक्मिणीला) आवलीची सेवा करायला तिच्या घरी पाठवलं. तुकोबांनीही लखुबाईला पाहताच आई अशी साद घातली आणि या दोघी एकाच छताखाली नांदू लागल्या. दोघीही आपापल्या नवऱ्यांवर चिडलेल्या, यांचं मुळी माझ्याकडे लक्षच नाही हीच तक्रार, दोघींच्या उरात सारख्याच देवबाभळीच्या काट्याचे सल. या दोघींचा एकमेकींशी एक बाई म्हणून काय काय बोलल्या असत्या तो संवाद म्हणजे देवबाभळी

   यातली आवली म्हणजे संत तुकाराम म्हणजे पागनीस बुवांच्या चित्रपटात दाखवली आहे तशी, आपल्या डोळ्यांसमोर येते तशी आवली आहे. "तुमाला काय त्या काळ्याचा टाळ कुटायचा तो कुटा पण सांजच्याला घरी येत जावा" हीच तिची तुकोबांकडे विनवणी. तिनं कधीही विठ्ठलाला विठ्ठल अशी हाक मारलेली नाही. काळया, इख याशिवाय त्याचा उल्लेख नाही. बरं आपल्या नवऱ्याचा हा असा तिन्ही त्रिकाळ चाललेला उद्धार लखुबाईलाही सहन होत नाही. दोघीही मनात चरफडत, पण उघड बोलायची चोरी! बायको देवाची असो किंवा भक्ताची, हे सल दोन्हीकडे सारखे. लखुबाई आवलीची ही पराकोटीची चरफड पाहून 'सोडून निघून का जात नाहीस अशा नवऱ्याला' असं विचारते, तेव्हा " रुसायचं काम रखुमाईचं. देवी हाय ती. आपण कुठं देवबिव? आन म्या रुसून कुट जाऊ? आनि मी गेले की यांचं काय?" असा रोकडा सवाल आवली विचारते. तीही एका अर्थी विरोधी भक्तीच करते आहे. एक दिवस तिच्या या शिव्यांनी बेजार होऊन तरी देव या खोपटात येईल, आणि त्याला हाताला धरून ती त्याला तिचा हा ओढगस्तीचा संसार दाखवेल आणि विचारेल की काय भलं केलंस तू आमचं ही तिची जिद्द आहे. हा अल्पावधीचा सहवास दोघींनाही बरंच सांगून शिकवून जातो.

    प्रत्यक्ष दिसत नसला तरी तुकोबा, आवली, लखूबाई यांचं सारं भावविश्व व्यापून राहिलेला विठ्ठल तुकोबांच्या अभंगांमधून सतत डोकावत राहतो. आवलीने पाहिलेलं तुकोबांच्या अभंगांच्या पावसाचं स्वप्न, आवली आणि लखु बाई पावसात भिजतानाचा प्रसंग, लखूबाईसमोर आवली रुक्मिणी कृष्ण आणि राधेचं गाणं गात असताना लखुबाईची प्रतिक्रिया हे प्रसंग परत परत वाचण्याचे आहेत.आवलीचं बोलणं आणि संसार सांभाळणं दोन्ही ठसकेबाज पण रोकठोख. ते आपल्या मनात घर करुन राहतं. शेवटी तिलाच ' मानलं गं बाई तुला ' असं म्हणत नमस्कार घालावासा वाटतो. अगदीं अस्सल ग्रामीण भाषा, दोघींच्या तोंडी असलेल्या ओव्या आणि गाणी, तुकोबांचे त्या त्या प्रसंगाला अनुरूप असे अभंग, याच्या जोडीलाच ही एकेक गुंतागुंत एखाद्या गाठीसारखी उकलताना दाखवलेली तरलता या लेखनाला समृध्द करते. बाईचं बाईपण इतकं अचूक दाखवताना कुठेही अतिशयोक्ती, मेलोड्रामा न करता हे सगळं इतकं सहज मांडल्याबद्दल लेखकाचं कितीही वेळा कौतुक केलं तरी कमीच पडेल. प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेली अर्पण पत्रिका आणि प्रस्तावनासुध्दा दहावेळा वाचावी इतकी सुंदर आहे. संपूर्ण लिखाणातील वारकरी संप्रदायाचा ठसा अगदीं सुस्पष्टपणे जाणवतो. 

      प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, 'त्या दोघींचा एकमेकांचा संवाद हा काल्पनिक असला तरी त्याला आजच्या प्रत्येकीच्या जगण्याचा पदर आहे. त्यांचा हा संवाद उलगडत जाणं हे एखाद्या उमलणाऱ्या ब्रह्मकमळासारखं आहे'. हे पुस्तक म्हणजे खरं तर नाटकाचं पुस्तक माझ्यासाठी चंदनासारखं आहे. चंदन जसं ठीपक्याइतकं इवलुसं असलं, तरी तुमची सगळी चित्तवृत्ती सुगंधाने भरुन टाकतं, त्या जातकुळीचं हे पुस्तक आहे. हा सुगंध परत परत अगदी आपल्या आतपर्यंत भरून घ्यायचा असा आहे. वाचावं, परत वाचावं, अनुभवावं असं between the lines बरच काही सुचवणारं हे पुस्तक! वाचताना जर मी इतकी मोहून गेले तर ते नाटक कधी प्रत्यक्ष बघताना मी शंभरदा डोळ्यांच्या कडा ओल्या करीन याची मला खात्री आहे.वाचून झाल्यावर स्तब्ध करणारं, प्राजक्ताच्या फुलासारखं कोमल पण विठ्ठलाच्या नावासारखंच शाश्वत असं काही मांडणारं हे पुस्तक एकदातरी आवर्जून वाचा, अगदीच नशीबवान असाल तर प्रत्यक्ष नाटक पाहा. कुठल्याही रुपात समोर आलं तरी अजिबात चुकवू नका, एवढं नक्की! 
नेहा ज्योती प्रदीप जोशी

देवबाभळी
प्राजक्त देशमुख 
पॉप्युलर प्रकाशन 
मूल्य: १३५ ₹ 


Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार