शिष्टाईचे इंद्रधनू
कधी कधी बातम्यांत आपले विदेश सेवेतले अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्यातरी occasion ला भारताकडे बोट दाखवणाऱ्या, विनाकारण डिवचू पाहणाऱ्या अन्य देशांच्या प्रतिनिधींची सविनय खरडपट्टी काढताना दिसतात. त्यांचं एखादं विधान, कृती पुढचे अनेक दिवस चर्चेत राहते. आपले सर्वोच्च नेतेही अशा अधिकाऱ्यांचं नीट मन लावून ऐकताना दिसतात, तेव्हा शिष्टाई ( diplomacy) या शब्दाची व्याप्ती लक्षात येते. तसं अगदीं जुन्या काळापासून रामायणातील अंगद शिष्टाई, महाभारतातील श्रीकृष्ण शिष्टाई ते अफझलखान भेटीदरम्यानची बोकील पंतांची शिष्टाई किती आणि काय काय साधून गेली, ते सर्वश्रुत आहे. आपली एक समजूत असते, की हे लोक चिक्कार पगार घेतात आणि त्यांना परदेशात निवांत राहायला मिळतं, मानसन्मान मिळतो. पण त्याच जोडीला त्यांना अहर्निश आपल्या देशाची त्या देशात असणारी प्रतिमा आणि स्थान बुलंद राखणं हेच त्यांचं मुख्य काम असतं. यांची एक चूक थेट दिल्लीपर्यंत हादरे पोचवू शकते. अनिवासी भारतीयांच्या बाबतीतले सगळे प्रश्न हाताळणं, कित्येक आंतरराष्ट्रीय करार प्रत्यक्षात राबवणं अशा नानाविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात तेही कायम पडद्यामागे राहून!म्हणूनच त्यांचं हे जग आपल्यासाठी कायमच एक गूढ, आकर्षणाचा विषय बनून राहिलं आहे. या जगाची सफर आपल्याला घडवून आणतं, ते विजय नाईक लिखीत शिष्टाईचे इंद्रधनू.
शिष्टाई या विषयावर सातत्याने लिखाण, परराष्ट्र धोरण या या विषयावर सातत्याने अध्ययन, लेखन, आणि वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉनडन्टस् या संस्थेचे प्रमुख म्हणून काम केलेलं असल्यामुळे लेखक त्यांच्या साऊथ ब्लॉक दिल्ली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी अशा पुस्तकांतून हे गूढ विश्व आपल्यापुढे प्रस्तुत करतात. या पुस्तकात काही आजवर अज्ञात असलेली पडद्यामागची माहिती, काही घटना, खुमासदार किस्से त्यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. दुसऱ्या देशातला नेता इकडे येतो आणि जातो हेच आपल्याला दिसतं, पण त्यामागचं टेन्शन, मानापमान, रुसवे फुगवे, फजिती आपल्यापर्यंत कधीच पोचत नाही. तसंच आपले प्रतिनिधी दुसऱ्या देशात गेल्यावर त्यांनी एखादी परिस्थिती कशी हाताळली, कुणाची कशी फजिती झाली हे वाचणं हा एक गमतीचा विषय आहे. उदा. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील परदेश दौऱ्यावर गेल्या असताना त्या देशाच्या संसदेत त्यांना भाषण करु न दिल्याने त्या माघारी फिरल्या, वाजपेयी आणि मुशर्रफ यांची भेट, मार्गारेट थॅचर यांच्या हँडबॅगची दहशत, भारताच्या राजदूतांची नीट बडदास्त न ठेवली गेल्याने त्यांनी तुला शिकवीन चांगलाच धडा असा घेतलेला पवित्रा इतपासून सदैव ज्यांचं वागणं बोलणंही कडक इस्त्री केल्यासारखं असतं अशा डिप्लोमॅटनी आहेत दुसऱ्या देशांत केलेला बेशिस्तपणा, धिंगाणा असे अनेक किस्से वाचणं हा एक वेगळा अनुभव आहे. मोठमोठ्या नेत्यांचे परस्पर जिव्हाळ्याचे संबंध, राजदूतांच्या प्रसंगावधानाने पलटवलेली बाजी, गंभीर परिस्थितीचा सामना ही या विश्वाची कायम अंधारात असणारी बाजूही आपल्या पुढे आली आहे.
वेगळा विषय, ज्ञानेश्वर मुळे यांची समर्पक प्रस्तावना, योग्य अभ्यास आणि उत्तम मांडणी यासाठी एकदातरी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक शिष्टाईचे इंद्रधनू!
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
(१६/०४/२०२३)
शिष्टाईचे इंद्रधनू
विजय नाईक
रोहन प्रकाशन
पृष्ठ संख्या: १८८
मूल्य: २२५ ₹
Comments
Post a Comment