प्रेरणा आणि अंधारातले दिवे

   तुम्ही वाचक असल्यामुळे "एखादं पुस्तक suggest करना' या प्रश्नाचा तुम्हाला कायमच सामना करावा लागतो. त्यातलं कुठलंही पुस्तक सांग, किंवा तुझं सगळ्यात आवडतं पुस्तक सांग असं कुणी म्हटलं तर त्याला उत्तर कसं आणि काय द्यायचं ते ठरवणं एक कसोटीच असते. त्यातही कॉलेजच्या मुलांना किंवा त्यापेक्षाही लहान असणाऱ्या मुलांना वाचायला आवडेल आणि त्यांना काही inspiring मिळू शकेल अशी पुस्तकं असणं आणि ती आपल्याला माहीत असणं या दोन्ही गोष्टी मला खरंच खूप मोलाच्या वाटतात. यावेळी वाचलेली दोन्ही पुस्तकं याच गटात शोभतील अशी आहेत. पहिलं - प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखीत प्रेरणा आणि दुसरं अरुणा ढेरे लिखीत अंधारातले दिवे

      काही नावांची आपल्याला इतकी खात्री पटलेली असते, की यांनी लिहिलेली ओळ न ओळ वाचण्यासारखी आहे, असं आपण ठामपणे सांगू शकतो. मी दहावीच्या सुट्टीत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं दीपस्तंभ आणि जागर वाचलं होतं. 'जीवन त्यांना कळले हो' या बा भ बोरकरांच्या पंक्ती खऱ्या अर्थानं जगलेल्या माणसांची ओळख झाली, यांच्यासारखं जगता आलं पाहिजे याची जाणीव झाली. तेव्हापासून प्राचार्य भोसले या नावावर जो विश्वास बसला आहे, तो आजवर कायम आहे. आत्ता वाचलेल्या प्रेरणा या पुस्तकाबद्दल त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, "मुलांच्या डोळ्यांपुढे विविध क्षेत्रातील परक्रमांची शिखरे दिसली तर त्यांना त्या दिशेने धाव घेण्याची बुद्धी होईल. 'प्रेरणा' हे अशा शिखरांचे दर्शन आहे." स्वातंत्र्य संग्राम, समाजकारण, राजकारण, विज्ञान, अध्यात्म, कला, साहित्य अशा क्षेत्रांत भरीव कामगिरी करुन दिगंत कीर्तीचे स्वामी झालेल्या एकूण ४८ व्यक्तिमत्त्वांची ओळख करुन दिलेली आहे. यात डेमॉस्थेनिस पासून आइन्स्टाईन, लुई पाश्चर, मेरी क्युरी, चार्ल्स डार्विन, इतिहास घडवलेल्या अहिल्याबाई, स्वामी विवेकानंद, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंह, सयाजीराव गायकवाड अशी मांदियाळी आहे. खूपदा या सगळ्यांचं चरित्र घेऊन आपण किंवा विदयार्थीदशेतली मुलं वाचतील याची शक्यता कमी, पण हा पुस्तकाने किमान या आदर्शांची ओळख होईल. दहावी बारावीच्या मुलांना काय भेट द्यावी असा प्रश्न पडला असेल, तर हे एक perfect उत्तर आहे. 
      अरुणाताई ढेरे त्यांच्या आशयगर्भ, संवेदनशील लिखाणासाठी सुपरिचित आहेत. त्यांचं ललित लिखाण समजायला तुम्हालाही तितकंच अंतर्मुख व्हावं लागतं. पण त्यांचं अंधारातले दिवे हे पुस्तक प्रेरणा या पुस्तकासारखं आहे. काही वर्षांपूर्वी दैनिक सकाळमधे लिहिलेल्या सदराचं हे पुस्तकरूप आहे. संगीतकार, अभिनेते, नाटककार, लेखक कवी, सामजिक राजकीय कार्यकर्ते, लोकनेते, संशोधक, धर्मासुधारक यांच्याशी संबंधित घटना आणि काही साधुतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या गुणवैशिष्ट्यांचं ओझरतं दर्शन या लेखांतून त्या घडवतात.औंधचे पंतप्रतिनिधी, सुधाताई जोशी, दिवाण शेषाद्री अय्यर,बाबुराव जगताप, बापूसाहेब माटे,विष्णुदास भावे, दत्तोपंत हल्याळकर, केशवराव भोसले, कृष्णराव गोरे, भास्करबुवा बखले, बालगंधर्व, गडकरी, नानासाहेब-जयमाला शिलेदार, श्री कृ कोल्हटकर, आनंदराव पेंटर, सुलोचनाताई, वसंतराव देशपांडे, सर रिचर्ड बर्टन,डॉ कुर्तकोटी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे किस्सेही वाचायला मिळतील. अशा पुस्तकाचं अंधारातले दिवे हे शीर्षक मला सार्थ वाटतं, कारण अंधारात लावलेला दिवा सगळा अंधार नाहीसा करु शकला नाही, तरी हा अंधार अविनाशी नाही याची जाणीव करुन देतो. अशी अंतरीची ज्योत तेवती असणारे लोक आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळवून टाकतात आणि इतरांसाठी दिशादर्शक ठरतात. असे आदर्श डोळ्यांपुढे ठेवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावं. 
       हे वरकरणी छोटे दिसणारे लेखही खूप चांगला परिणाम साधू शकतात. Small things often make a big difference असं म्हणतो आपण ते काही उगीच नव्हे! 

नेहा ज्योती प्रदीप जोशी
(०२/०४/२०२३)

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार