आषाढस्य प्रथमदिने: भाग २

मागच्या भागात अभिजात साहित्याचे निकष, उदाहरणं, कालिदास- काळ, दंतकथा, साहित्य, मेघदूताचं स्वरुप, आषाढस्य प्रथमदिने बद्दल जाणून घेतल्यावर आता मराठीतल्या मेघदूतविषयी काही खास असं...

मराठीत या अजरामर काव्याचा अनुवाद करताना सिद्धहस्त कवियत्री शांता शेळके यांनी प्रस्तावनेत त्यांचं शालेय- महाविद्यालयीन अवस्थेपासून सदाजागृत असलेलं मेघदूत प्रेम प्रकट केलं आहे. त्या म्हणतात," माझा अनुवाद सरळ, साधा, ' पादाकुलका' सारख्या प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोहोचू नये, याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे, माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धार्ष्ट्य मी केले नाही. ' मेघदूता'चे दर्शन न घेतलेल्या वाचकांना या अनुवादामुळे मुळच्या संस्कृत काव्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, एवढीच माझी नम्र अपेक्षा आहे. तसे झाले, तर मला अतिशय आनंद होईल." 

पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, मूळचं काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असं दोन भागांत विभागलेलं आहे. पूर्वमेघाची सुरुवातच, 
 कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त: 
शापेनास्तड्ग़मितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु  स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।।

या श्लोकाने झाली आहे. यक्षाला का आणि कसा शाप मिळाला आणि तो सध्या कुठे आहे, इतकीच मोजकी माहिती काव्यात सुरूवातीला दिलेली आहे. याचा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद असा,
कुबेरसेवक यक्ष एक कुणि सेवेमाजी आपुल्या चुकला

प्रियावियोगे अधिकच दु:सह वर्षाचा त्या शाप मिळाला

जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथे जलाशय

घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय

अशा अवस्थेत दिवस कंठत असताना तो आपल्या पत्नीच्या आठवणीत इतका कृश झाला आहे, की त्याच्या हातातील सुवर्ण कंकणही गळून पडले आहे! आणि अशातच आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी त्याला पर्वतशिखरावर एक मेघ दिसला. या मेघाकरवीच किमान आपल्या प्रियेसाठी आपलं कुशल सांगणारा एखादा संदेश पाठवावा, असं यक्षाच्या मनात येतं. मुळात मेघ म्हणजे ढग ही निर्जीव, अचेतन गोष्ट आहे, त्याला दूत करण्याची कल्पना यक्षाच्या मनात आली, यावरूच त्याची मानसिक स्थिती किती दोलायमान झाली असेल, याचा अंदाज करता येईल. इथे शांताबाईंनी रचलेला श्लोक असा, 
धूर, वीज अन् पाणी,वारा यांही बनला मेघ कुठे तो?
संदेशाते वाहून नेइल सजीव मानव आणि कुठें तो?
अवगणुनी हे आतुरतेने यक्ष घनातें करी याचना,
सजीवनिर्जिव विवेक यांतिल कुठून रहावा प्रणयार्तांना? 

 नंतर मेघाचं यथोचित स्वागत करून यक्ष त्याला आपला संदेश आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याची विनंती करतो. पुढे पूर्वमेघ या भागात वाटेत मेघाला काय काय पहायला मिळेल, त्याने कोणत्या दिशेने मार्गक्रमण करावे, हे यक्ष अगदी विस्ताराने आणि सगळ्या बारकाव्यांसकट सांगतो. उत्तरमेघ हा भाग मेघाला प्रत्यक्ष अलकानगरीत काय पहायला मिळेल, त्याने यक्षयक्षिणीचं घर कसं ओळखावं, यक्षाची पत्नी दिसल्यावर मेघाने काय करावं, कशा प्रकारे आणि काय स्वरूपात संदेश द्यावा, हेही तो अगदी सखोल विचार करून सांगतो. शेवटी मेघाची पुन्हा एकदा क्षमा मागून त्याला निरोप देतो. मेघदूतमधे सौंदर्यदृष्टी आणि वास्तवाचे भान याचा उत्तम परिपाक यक्षाच्या व्यक्तिमत्त्वात म्हणजेच कालिदासाच्या काव्यशैलीत दिसून येतो. यक्षाने आपल्या प्रिय पत्नीचं वर्णन करताना तर कोणताही सौंदर्यवाचक शब्द शिल्लक ठेवलेला नाही! 
तनु सडपातळ, दांत रेखिले, ओठ सुरेख जणुं पिकें तोंडले, 
बारिक कंबर, सखोल नाभी, भ्याल्या हरिणीसमान डोळें,
पृथुलनितंबा मंदगामिनी, स्तनभारानें किंचित लवली,
स्त्रीरुपाची पहिली प्रतिमा काय विधीनें गमे घडविली!

स्त्रीचं इतकं सुंदर वर्णन, आपल्या प्रियेच्या विरहात खंगलेला यक्षासारखा नायक सारंच अतुलनीय आहे. कालिदासाच्या प्रतिभेने जन्माला घातलेल्या या यक्षाच्या ठायी वसणारं हे अमोल सौंदर्य शांताबाईंनी अचूक हेरून ते अजूनच खुलवलं आहे. 

इथे कालिदासाच्या काव्यातले दोन विशेष मला ठळकपणे जाणवले. पहिला विशेष गुण म्हणजे भावना आणि वास्तवाचं समीकरण उत्तम साधलं आहे. या काव्यातला अद्भुतरस मोहवून टाकणारा असला तरी भौगोलिक, नैसर्गिक तथ्यांशी मात्र कुठेही छेडछाड केलेली नाही, उलट या बाबतीत त्याला किती निर्दोष आणि सुसंगत माहिती होती, हेच त्याने प्रकट केलं आहे. मालप्रदेश, दशार्ण, विदिशा, अवंती, उज्जैन, दशपुर, ब्रम्हावर्त, कुरुक्षेत्र, कनखल या प्रदेशांचं दिशा वगैरे विचारात घेऊन उत्तम वर्णन केलं आहे. त्याचबरोबर रामगिरी, आम्रकूट, विंध्याचल, देवगिरी, हिमालय, क्रौंच, कैलास हे पर्वत तसेच रेवा, वेत्रवती, निर्विंध्या, सिंधू, क्षिप्रा, गंधवती, सरस्वती, चर्मण्वती, गंभीरा, गंगा या नद्यांचंही वर्णन आलं आहे. कुडीची फुलं, हिरवी पिंगट नीप फुलं, रानकर्दळ, कदंब, केवडा, जुई, कमळ, जास्वंद, कुंद, लोध्र, कोरांटी, शिरीष, अशोक, केसरतरू, जाती अशी रामगिरी ते हिमालय प्रदेशात पाहायला मिळणारी फुलं ; रानकावळे, मोर ,बलाक, राजहंस, सारस, चक्रवाकी ,मैना हे पक्षी; हत्ती, हरणं,पाण्यातल्या मासोळ्या, साप, घोडे हे प्राणी; आंबा, जांभूळ, वेळू, रानउंबर, कल्पतरू,मंदार हे वृक्ष, रतिफल नावाची मदिरा, वैभ्राज नावाचे उपवन अशा असंख्य नैसर्गिक घटकांचा उल्लेख या काव्यात आढळतो. इंग्लिश कवितांमध्ये जॉन डनच्या मेटाफिझिकल कन्सीट्स शिकताना आम्ही " हा डन मनात आणेल तर दोन्ही hemisphere ही इकडचे तिकडे करून टाकेल," असं म्हणायचो! तसा वास्तवापासून दूर जाणाऱ्या अलौकिक रुपकांचा वापर मात्र कालिदासाच्या या लिखाणात चुकूनही सापडायचा नाही. कालिदासाने भलेही मेघाला संदेश घेऊन जायला लावलं असेल, पण जमिनीवरच्या वास्तवाचं पूर्ण भान त्याने कायम बाळगलं आहे.

उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम
दन्डिन: पदलालित्यम माघे सन्ति त्रयो गुणा:

संस्कृत साहित्यिकांचे विशेष गुण सांगणाऱ्या य श्लोकात कालिदासाची खासियत म्हणून उपमा ( simile) चा उल्लेख आवर्जून केला जातो. मलाही मेघदूत वाचताना त्याचा जाणवलेला दुसरा विशेष गुण म्हणजे त्याने मेघ आणि यक्षपत्नीसाठी वापरलेल्या उपमा आणि त्याच्या शब्दांचं सामर्थ्य. नदीवर झुकलेला मेघ= वसुधेच्या गळ्यातील इंद्रनील मण्याचा एकेरी सर, शुभ्र आकाशातील एकाकी मेघ- बळीचे नियमन करायला उचललेलं वामनरूपी विष्णूचं सावळं पाऊल, कैलास शिखरावरील बर्फ= सदाशिव शंकराचं निर्मळ हास्य, मेघ हिमालयातून पुढे जात असताना दिसणारा हिमालय= काळी कांबळ खांद्यावर घेतलेला गोरा बलराम, कृश झालेली यक्षाची निजलेली पत्नी= प्राचीवरती धूसर झालेली शशीची कोर या उपमा म्हणजे शुध्द सोन्यासारख्या सुंदर आहेत.मला प्रचंड आवडलेली उपमा ही:

आशातुर सोत्कंठ निरखिते पवनसुताते जशी जानकी
भरल्या ह्रदयें तशीच तुजला पाहिल माझी सखी लाडकी !
किंबहुना, श्रीरामांचा संदेश घेऊन लंकेकडे सीतामाईच्या दिशेने हनुमंताने केलेले उड्डाण यावरुच कालिदासाला मेघदूतची कल्पना स्फुरली असावी, असं म्हणायला पुष्कळ वाव आहे. 

कालिदासाचं साहित्य आजही इतक्या शतकांनंतर आपल्या साहित्यातून नव्या साहित्यिकांना सृजनाची प्रेरणा कशी देत आलं आहे, याची अजून काही खास उदाहरण आता सांगते. वि स खांडेकर यांची वाचकांच्या सदैव पसंतीस उतरलेल्या ययाती कादंबरीची प्रेरणा खांडेकरांनी कालिदासाच्या शाकुंतलमधून घेतली आहे, हे मात्र काही जणांनाच ठाऊक असेल. त्यांनीच प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे, दुष्यंताकडे चाललेल्या शकुंतलेला कण्व ऋषींनी "ययातिरेवशर्मिष्ठा भर्तुर्बहुमता भव" असा आशीर्वाद दिला आहे. विद्यार्थी जीवनात हे नाटक बसवताना या एका आशीर्वादाच्या ओळीने खांडेकरांच्या मनात घर केलं आणि त्यातूनच ययाती या अजरामर कादंबरीचा जन्म झाला! माधव ज्युलियन यांची ' मेघांनी हे गगन भरता, गाढ आषाढामासि' ही कविता, हरिवंशराय बच्चन यांची ' मेघ के प्रति' ही कविता अशी अनेक उदाहरणं देता येतील. 

पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्किधिष्ठित कालिदासा।
अद्यापि ततुल्य कवेरभावादनामिका सार्थवती बभूव॥
( In ancient times, when all the poets were counted, Kalidasa was assigned a little finger. But, no poet of the genius comparable with him has existed till today; hence, the finger next to the little finger is significantly named as 'Anamika ')
असं म्हणतात ते काही उगाच नव्हे! 

शांताबाई शेळकेंनी मेघदूतचा अनुवाद करून एक खूप मोठंच दिव्य पार पाडलं आहे, हे अगदी निर्विवाद सत्य आहे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याखाली मराठी रूपांतर वाचायला मिळत असल्याने दोन्ही भाषांचं सौष्ठव उठून दिसलं आहे. प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे, त्यांनी आपल्याकडून अधिक काहीही घातलेलं नसलं, तरी अनुवाद सरळसोट न होता चैतन्याने परिपूर्ण राहील, याची काळजी घेतली आहे. काव्यात कुठेही क्लिष्टता येणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देऊन मूळच्या काव्याच्या तोडीस तोड अनुवाद करून शांताबाईंनी आपली काव्यप्रतिभा सिद्ध करून दाखविली आहे. या अनुवादाबद्दल मराठी रसिक काव्यप्रेमी त्यांचे कायम ऋणी राहतील 🙏

आता पुन्हा एक प्रश्न... मेघदूत आजच्या काळात relevant आहे का? आणि कधीपर्यंत राहील?
याचं मला कळलेलं उत्तर आता सांगते. ज्या काळात आणि जोवर पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि परस्परांविषयी ओढ, न टाळता येणारा विरह आहे, माणसाची इच्छा आणि नियती यामध्ये अविरत संघर्ष चालू आहे, तोवर मेघदूत अमर आहे! मेघदूत वाचताना त्या यक्षाबद्दल कौतुक, कणव, सहानुभूती वाटते, मेघाविषयी कृतज्ञता वाटते, आणि यक्षपत्निविषयी कमालीची ओढ आणि थोडीशी असुयाही वाटते ती यामुळेच! पुस्तक आवर्जून वाचाच, पण विकत घेऊन संग्रहीसुद्धा ठेवा, कुणा वाचनप्रेमीला भेट दया ( मला दिलंत तरी चालेल), काय आहे निर्जीव वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा खऱ्या शब्दसौंदर्याचा संग्रह केलेला काय वाईट? 
© नेहा ज्योती प्रदीप जोशी

Comments

  1. अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचनात.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार