आषाढस्य प्रथमदिने: भाग १

#पुस्तकांच्या_पानांवरुन
वर्ष २०२१: पर्ण दहावे

अभिजात साहित्य, कालिदासांची स्वतःची जीवनकहाणी, अजरामर रचना आणि आषाढस्य प्रथमदिनेची खरी कहाणी, आणि बरंच काही...
(पोस्ट थोडी मोठी असणार आहे, वेळ काढून मन लावून वाचा!)

"That praises are without reason lavished on the dead, and that the honours due only to excellence are paid to antiquity, is a complaint likely to be always continued by those, who, being able to add nothing to truth, hope for eminence from the heresies of paradox; or those, who, being forced by disappointment upon consolatory expedients, are willing to hope from posterity what the present age refuses, and flatter themselves that the regard which is yet denied by envy, will be at last bestowed by time..."

Preface to Shakespeare या आपल्या टीकात्मक निबंधात डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी सुरुवातीलाच ," हॅ , काय ते जुनं पुराणं outdated साहित्य वाचता?" , या कुत्सित शेऱ्याला दिलेलं हे सणसणीत प्रतिउत्तर आहे. शेक्सपिअरच्या साहित्याइतकीच अजरामर अशी त्याच्या साहित्याची प्रिफेस किंवा चिकित्सा लिहिताना जॉन्सन यांनी जुन्या साहित्याच्या लोकमान्यता आणि लोकप्रियतेवर आक्षेप घेणाऱ्या "मॉडर्न" प्रवृत्तीचा समाचार घेताना, "जे आज किंवा भविष्यात स्वतःचं असं काही निर्माण करू शकत नाहीत, जे आज नाही तरी किमान भविष्यात तरी आपल्या लिखाणाला कोणीतरी विचारेल ही भाबडी आशा मनी बाळगतात, असेच लोक खूपदा अभिजात साहित्यावर टीका करायला आघाडीवर असतात", असं म्हटलं आहे. पुढे याच प्रीफेसमधे  चांगल्या साहित्याची परीक्षा घेण्याकरता त्यांच्यामते सर्वोत्तम निकष हा की, " no other test can be applied than length of duration and continuance of esteem." म्हणजेच किती कालावधीपर्यंत आणि किती सातत्याने एखादं साहित्य नावाजलं जातं, त्यावरून त्या साहित्याच्या चांगल्या किंवा सुमार किंवा वाईट असण्याची परीक्षा होत असते. 

प्रत्येक साहित्याकृतीचं आयुष्य वेगळं असतं. काही लिखाण एक दोन वर्षेच टिकतं. नव्या काळानुसार नव्याने आणि वेगाने बदलत जाणाऱ्या आयुष्याचा वेध घ्यायला ते असमर्थ ठरतं. काही लिखाण ते जेव्हा लिहिलं गेलं ते दशक किंवा शतकही गाजवतं. एका सबंध पिढीवर त्या लिखाणाचे संस्कार झालेले असतात. चांगल्या साहित्याचा मुख्य निकष हाच आहे, की ते स्थळ, काळ, भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती हे सारे टप्पे पार करत कोणत्याही काळात तितकंच सतेज आणि प्रस्तुत राहतं. उदाहरणार्थ, जगभरात ज्याच्या नावाचा डंका आजही तितक्याच जोशाने वाजतो, तो शेक्सपियर! सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात त्याने जे लिहून ठेवलं आहे, ते आज एकविसाव्या शतकातही तितक्याच ओढीने आणि चवीने वाचलं जात आहे. माझ्यासारख्या लिटरेचर स्टूडंटचा तर तो जिवलग लेखक, पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. पण तो तिकडचा आहे, म्हणजे दुसरीकडचा आहे, मग आपल्याकडे काय कोणी लिहिलंच नाही का? असा वितंडवाद घालणारे अनेक माथेफिरू स्वतःला वाचक म्हणवून घेत असतात. याला उत्तरदाखल इतकंच सांगेन, की लिहिणारा कोणीही असला, तरी त्या साहित्याच्या वाचनातून, सहवासातून उत्पन्न होणारा आनंद ही कोण्या एका भाषेची अगर भाषिकाची मक्तेदारी नसते. आपल्याकडेही अजरामर साहित्य निर्माण झालं आहेच, पण इतरत्र नावाजलं गेलेलं, नावाजलं जाणारं हे साहित्य सुंदर आहे, कालातीत आहे, हेही तितक्याच खुलेपणाने मानता आलंच पाहिजे. कारण आपले विंदाही सांगून गेले आहेत, 
" उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा!"

तर "तिकडचा" शेक्सपिअर जसा शतकोत्तरही टिकून आहे तर मग "इकडचा" कोण, अशी चर्चा तरीही पुढे रेटायची असेल, तर बरीच नावं सांगता येतील. मराठी साहित्यात अगदी निर्विवाद असं संत साहित्य आहे, जे पिढ्याच काय शतकं ओलांडूनही सहज पार होईल, झालं आहे. संस्कृत साहित्य तर रत्नांची खाण आहे. भारतीयांना एकवेळ नसेल इतकी या साहित्याची गोडी आज परदेशातल्या लोकांना आहे. आणि या संस्कृत साहित्याच्या आकाशगंगेतला 'तेजोनिधी लोहगोल ' जर कोणी असेल तर तो आहे, कवीकुलगुरु श्री कालिदास! 

चौथ्या किंवा पाचव्या शतकातील उज्जैन नगरीच्या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबाराचा हा राजकवी. शेक्सपिअर आणि कालिदास या दोघांमध्ये त्यांच्या कालातीत साहित्याबरोबरच तशा बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत, उदाहरणार्थ ही एकच व्यक्ती आहे की अनेक, पूर्वायुष्य, वैयक्तिक आयुष्याबद्दल असणारे वादविवाद. कालिदासाची एक रंजक दंतकथा इथे सांगायचा मोह आवरत नाही. एका हुषार, विद्वान अशा विद्योत्तमा नावाच्या राजकन्येला स्वतःसाठी अनुरूप वर शोधायचा होता. पण तो तिला तिच्या राज्यात कुठेच सापडला नाही. अनेक तरुणांची तीने परीक्षा घेतली, पण त्या सर्वांनाच नापसंत केलं, मंत्र्यांचाही अपमान केला. या सगळ्याचा सूड म्हणून लोक त्याच राज्यातल्या एका सामान्य पण अगदीच अजागळ, मूर्ख आणि बावळट असणाऱ्या मेंढपाळाला तिच्यापुढे घेऊन गेले. काही गोष्टींनुसार याच भेटीत तर काहींच्या मते त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी राजकन्येला हा माणूस वास्तविक किती बिनडोक ध्यान आहे, ते लक्षात आलं आणि तिने त्याचा अगदी जिव्हारी लागेल इतका सणसणीत अपमान केला. आणि याच अपमानाने पेटून उठून तो तडक कालिमातेच्या मंदिरात पोहोचला, आणि देवीच्या साक्षीने त्याने अध्ययनाला सुरुवात केली. शास्त्रं, पुराणं, इतर संस्कृत साहित्याचा त्याने खच्चून अभ्यास केला आणि त्यानंतर त्याच्या काव्यवेलीवर अनंत काळासाठी वसंताचा बहार आला! असा हा कवी पुन्हा त्या राजकन्येच्या भेटीला गेला. तिला तो येत असल्याची पूर्वसूचना मिळाली असल्याने तिने बंद दाराआडूनच त्याला विचारलं, " अस्ति कश्चित् वाग्विशेष:?" ( तुुझ्या वाणीत काही सुधारणा आहे का? / बोलण्यासारखं काही विशेष आहे का?) याला उत्तर म्हणून त्याने या तीन शब्दांपासून सुरु होणारी तीन काव्यं तिथल्या तिथे रचून तिला ऐकवून दाखवली. अस्ति पासून सुरु झालं ते "अस्त्य् उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:..." म्हणजेच कुमारसंभवम, वाग्विशेष: पासून सुरु झालं ते "वागार्थविव..." अशी सुरुवात असलेलं रघुवंश, आणि मधल्या कश्चित् शब्दाने "कश्चित्कांताविरह..." या ओळीने सुरु होणारं अजरामर दूतकाव्य म्हणजे मेघदूत आणि हा कवी म्हणजे कालिदास! 

बाकी तुलना करताना या दोघांनी रचलेल्या साहित्याची एकूण संख्या हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. शेक्सपिअरने कॉमेडी आणि ट्रॅजेडी धरून एकूण ३९ नाटकं आणि डार्क लेडी आणि फेअर युथला उद्देशून लिहिलेली अशी मिळून १५४ साॉनेट्स लिहीली आहेत. आणि कालिदासांचं सध्या उपलब्ध असलेले साहित्य म्हणजे- रघुवंश, कुमारसंभवम ही दोन महाकाव्यं, ऋतुसंहार आणि त्याने स्वतः निर्माण केलेला काव्याचा नवा प्रकार म्हणजे मेघदूत नावाचं दूतकाव्य अशी दोन खंडकाव्यं, आणि अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीय, आणि मालविकाअग्निमित्रम ही तीन नाटकं! या तीन नाटकांतलं शाकुंतलम अर्थात् दुष्यंत आणि शकुंतलेची गोष्ट आज जगभरातल्या सर्व प्रमुख भाषांत अनुवादित झाली आहे. हेच शाकुंतल डोक्यावर घेऊन Goethe  नाचला होता आणि त्यानेच पुढे शाकुंतल जर्मन भाषेत अनुवादित केलं. 
शब्दांचं सामर्थ्य काय असतं, हे जाणून घ्यायला कालिदासाची ही एक ओळच पुरेशी आहे. आषाढस्य प्रथमदिवसे ही ओळ आपण कालिदासाच्या संदर्भात नेहमीच वाचतो अगर ऐकतो.ती ओळ अशी:
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीय ददर्शं ।।
(आषाढाच्या पाहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वांकला
टक्कर देण्या तट भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला) 

मेघदूतच्या पूर्वमेघात दुसऱ्या श्लोकात ही ओळ आली आहे. नंतर पुढच्या काव्यात आषाढाचा असा थेट संदर्भ पुन्हा आलेला नाही. तरीही या शब्दांची जादू इतकी अमर आहे, की यामुळेच आषाढ मासाचा पहिला दिवस आज आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. एका ओळीत एका महिन्यावर अनंत काळासाठी आपली मोहोर उमटवणं, याला शब्दसामर्थ्य म्हणायचं नाहीतर काय? याच ओळीवरून प्रेरणा घेतलेलं कालिदासाच्या जीवनावर आधारित आषाढ का एक दिन या नावाचं मोहन राकेश यांचं १९५८ सालचं नाटक हे प्रथम आधुनिक हिंदी नाटक म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याचाच One Day in the Season of Rain हा अनुवाद अपर्णा धारवाडकर यांनी केला आहे.

कालिदासाच्या नाटकांत शाकुंतल आणि काव्यांत मेघदूत सर्वाधिक वाचलं गेलेलं, नावाजलं गेलेलं आणि अनुवादित झालेलं काव्य आहे. अगदी सर्व प्रमुख भारतीय भाषांत त्या त्या भाषेतील विद्वान कवींनी मेघदूताचा अनुवाद केलेला आहे. उदाहरणार्थ, जोगिंदरनाथ मुजुमदार(बंगाली), आचार्य धर्मानंद जमलोकी (गढवाली), मोतीलाल उपाध्याय (भोजपुरी), कंदरप पटेल (गुजराती), नागार्जुन ( हिंदी) इत्यादी. मराठीचा विचार करता अभिमान वाटावा इतकी नेत्रदीपक आणि सुखद कामगिरी आपल्याकडे काव्यक्षेत्रातल्या अनेक रथी-महारथींनी करून ठेवली आहे. कृष्णशास्त्री चिपळुणकरांनी 'मेघदूत' प्रथम मराठीत आणले. चिंतामणराव उर्फ सी. डी. देशमुखांसारख्या आधुनिक विद्यावेत्त्यांबरोबरच बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट आणि शांता शेळके या श्रेष्ठ कवींनीही 'मेघदूता'चा अनुवाद करत मराठीचं काव्यावैभव कैक पटीने वाढवून ठेवलं आहे. 

जगभरात शतकानुशतकं सगळ्यांना वेड लावणारं काव्य अर्थात् मेघदूत म्हणजे नक्की आहे तरी काय, ते आधी पाहूया. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत विभागलेलं आहे. मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलकानगरीत राहणारा कुबेराचा एक सेवक आहे. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. ब्रम्हवैवर्त पुराणात यक्ष आणि यक्षिणीची हेममाली आणि विशालाक्षी अशी नावं आलेली आहेत. हद्दपारीचे ठिकाण अलकानगरीपासून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरी' पर्वत हे आहे. त्या ठिकाणी बरेच महिने यक्ष(बहुतेक आठ) पत्‍नीपासून दूर राहिला आहे.  या यक्षाच्या सर्व सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. अशातच वर्षाऋतू सुरू झाला आणि या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या. अशा परिस्थितीत आषाढातील एका हत्तीसारख्या भव्य मेघाला पाहून यक्ष त्यालाच आपला संदेशवाहक करतो. यक्षाने मेघाला दूर हिमालयातील आपल्या प्रिय पत्नीकडे आपला संदेश घेऊन जाण्यासाठी सांगितलेला रामगिरीपासून अलकानगरीपर्यंतचा आपल्या घराचा पत्ता आणि मेघाची रवानगी असेच मेघदूताचे स्वरूप आहे. 

अशा या मेघदूताचा हा अद्भुत प्रवास मराठीत कसा सांगितला गेला, ते दुसऱ्या भागात पाहूया...
© नेहा ज्योती प्रदीप जोशी

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार