सुमा करंदीकर लिखित रास ( पुस्तक ओळख )
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते… स्त्रीची महती, थोरवी गायची झाली की वापरायला साधी, सोपी असणारी ही ओळ ! पण या वाक्यात दडलेलं एक सोप्पं सत्य मला आता कळू लागलं आहे. यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, म्हणूनच कदाचित तो पुढे जाऊ शकतो, जेणेकरून ती मागील सगळी आघाडी सांभाळू शकेल. अशाच एका स्त्रीची जीवनकहाणी आत्ता काही दिवसांपूर्वी वाचनात आली. विंदा करंदीकर यांच्या पत्नी सुमा करंदीकर यांचे आत्मचरित्र "रास"!
सगळ्यात आधी तर माझी डॉक्टर मैत्रीण अपर्णाताई हीचे मनापासून आभार, जिने हे पुस्तक मला सुचवलं. आता विंदा करंदीकर यांची ज्याला नव्याने ओळख करून लागणार असेल, त्याने त्वरित आपल्या मराठीपणाची पुन्हा एकदा खात्री करून घेतलेली बरी! आपल्या कवितांतून मराठी भाषेला नानाविध सुरेख शब्दालंकर वाहून नवे सौंदर्य बहाल करणारे शब्दप्रभू म्हणजे विंदा ! आता कवी म्हटलं, की त्यांचं व्यक्तिमत्त्व कायम चारचौघांपेक्षा वेगळं, काहीसं गूढ असंच असतं. अशा सुंदर सुंदर कविता लिहिणाऱ्या कवीच्या कवितांमागे ती कोणती ' प्रेरणा ' असेल, याची उत्सुकता आपल्याला असतेच. अशा काही प्रश्नांची उत्तरं देणारं, हे पुस्तक !
मी काही कोणी मोठी अभ्यासक नव्हे, पण एक हौशी वाचक आहे. माझं एक निरीक्षण असं, की जेव्हा जेव्हा विवाहित स्त्रिया आपलं आत्मचरित्र लिहीत असतात, तेव्हा त्यातला पाऊण नाहीतर अर्धा भाग तरी आपल्या पतीबद्दल असतो. पण पुरुषांच्या चरित्रात आपल्या पत्नीच्या माहेरची, बालपणीची माहिती असतेच असं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सुनीताबाई देशपांडे यांचे आहे मनोहर तरी, रमाबाई रानडे यांचे माझ्या आयुष्यातील काही आठवणी आणि आता हे रास. पुस्तकं लिहिलेल्या ओळींपेक्षाही खूप काही सांगून जातात, between the lines म्हणतात ना तसं ! बाई मग ती साधी असो नाहीतर कोणी महान लोकोत्तार स्त्री असो, तिचं आयुष्य आपल्या घराभोवती, पतिभोवती कसं फिरत असतं, याचा एक समक्ष पुरावा म्हणजे ही आत्मचरित्रे !
विंदांच्या पत्नी सुमा करंदीकर यांचे हे आत्मचरित्र मला एकूणच खूप विशेष वाटलं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या माझ्या आयुष्यातील काही आठवणी यामध्ये कुठेतरी क्वचित आपल्या पतीच्या चुकीच्या सवयी सांगतानाही अगदी शब्द तोलून, मापून अदबशीर लिखाण करणाऱ्या रमाबाई एक टोक, तर आपल्या नवऱ्याबद्दल ,"भाई मला खूपदा absend minded आहे असं वाटतं", असं लिहिणाऱ्या सुनीताबाई देशपांडे हे दुसरं टोक वाटतं. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा विचार करायचा झाला, तर स्त्रीजीवनात काळानुरूप घडून आलेले स्थित्यंतर अशा लिखाणातून प्रकर्षाने जाणवतं. सुमाबाई आणि सुनीताबाई यात एका गटाच्या. प्रचंड कर्तृत्ववान, लोकप्रिय पतीच्या छायेत ज्यांचं आयुष्य गेलं, अशा स्त्रिया.
सामाजिक सुधारणा, स्त्रीशिक्षण या स्त्री जीवनासाठी विधायक सुधारणांचा फायदा मिळालेल्या तरुण मुलींच्या पहिल्या वहिल्या पिढीच्या प्रतिनिधी म्हणजे सुमाबाई. मूळच्या कुसुम दामले, लग्नानंतर सौ. ज्योत्स्ना साने आणि मग सौ. सुमा करंदीकर. शिक्षण, नोकरी, लग्न, संसार अशा टप्प्यांतून गेलेलं आयुष्य जगलेल्या सुमाबाई. घरची परिस्थिती बेताचीच, पण मुलगी आवश्यक तितकं शिकलीच पाहिजे, छोटी का होईना पण तिला नोकरी हवी, तिच्या स्वभावाला अनुरूप असाच मनपसंत नवरा तिला मिळाला पाहिजे, याचा साक्षात्कार झालेल्या पालकांच्या पहिल्या पिढीतले सुमाबाईंचे आईवडील. आईवडिलांचा ओढगस्तीचा संसार, पण सगळ्या भावंडांबरोबर सुखाचं बालपण जगतानाच वडिलांचं छत्र हरपले आणि मग आजोळी खऱ्या आयुष्याचा अनुभव घेत सुमाबाई शिकल्यामोठ्या झाल्या. वयाच्या १६- १७ व्या वर्षी लग्न करून नवं आयुष्य सुरु करताना, शिक्षण सुरू ठेवत असतानाच नशिबाचे फासे उलटे पडून वयाच्या केवळ विसाव्या वर्षी वैधव्य आल्याने पुन्हा आजोळी आलेल्या सुमाबाई , जड अंतःकरणाने का होईना ,पुढे जात राहिल्या. इथे आपल्या सासरच्या मंडळींनी आपल्या पतीच्या निधनानंतरही आपल्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिलेली प्रेरणाही त्यांनी कृज्ञतापूर्वक नमूद केली आहे.
अशातच विंदा करंदीकर यांचे स्थळ एका मैत्रिणीने सुमाबाईंना सुचवलं. विंदांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ विधवेशीच पुनर्विवाह करण्याचा केलेला निश्चय या विवाहाला उपकारक ठरला. मोठी माणसं तीच, ज्यांच्या कृतीही शंभर शब्दांपेक्षा अधिक बोलक्या असतात ! मग महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत या दोघांनी केलेली शिक्षकाची नोकरी, जोडीने बहरलेला संसार आणि नानाविध जबाबदाऱ्या ! यातच विंदांच्या कविजीवनाची स्वेदगंगा या काव्यसंग्रहाने झालेली सुरुवात! हेच पुस्तक छापून यावं म्हणून सुमाबाईंनी आपले साठवलेले पैसे खर्ची घालून हे पुस्तक प्रकाशित केले. म्हणूनच " त्यांच्या पहिल्या पुस्तकाचं स्वेदगंगा हे नाव समर्पक आहे, कारण मी माझा घामाचा पैसा त्यासाठी खर्ची घातला!" , असा मजेशीर उल्लेखही त्यांनी केला आहे.
आपली नोकरी, नवऱ्याचे बालपण, पूर्वायुष्य, मुलांचं बालपण, शिक्षण यासह विंदांचा कवी म्हणून होत गेलेला उत्कर्ष या पुस्तकात अगदी सहज सोप्या भाषेत सुमाबाइंनी मांडला आहे. विंदांचे चांगले वाईट दोन्ही गुण उघड सांगणाऱ्या, भरभरून दाद देणाऱ्या आणि वेळ पडेल तिथे टोमणे मारणाऱ्या, टीका करणाऱ्या सुमाबाई या आपल्याला आपलंच प्रतिबिंब वाटू लागतात. आयुष्यभर खंबीरपणे पतीच्या सोबत उभ्या असलेल्या सुमाबाई आपल्या नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाचं असं काही खुमासदार शैलीत वर्णन करतात, की वाचताना नकळत ओठांवर हसू येतं. उदाहणादाखल पुस्तकाच्या या शेवटच्या ओळी,
" तेव्हा करंदीकरांच्या सारख्या प्रतिभावंत, बुद्धिवान आणि थोर विद्वान असा नवरा मला मिळाला हे माझं साता जन्माचे भाग्य. मी एक सामान्य बाई; एका जन्मीचे नव्हे, आपल्या जुन्या धर्माकल्पनेप्रमाणे सात जन्माचे माझे पूर्वसुकृत. हे सर्व अगदी खरं; पण करंदीकरांना माझ्यासारखी शांत, समजूतदार (माझ्या मते), त्यांना समजून घेणारी आणि त्यांच्या अरेरावीने नाउमेद न होणारी विवेकी बायको मिळाली हे करंदीकरांचेही भाग्यच. दुसरी एखादी कर्तबगार, हुशार बायको मिळती तर एव्हाना चारदा घटस्फोट झाला असता !"
एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला जितक्या सहजपणे आपल्या आयुष्यातील गुजगोष्टी सांगाव्या, तशा सहज, सोप्या, अकृत्रिम भाषेत आणि शैलीत लिहिलेलं हे छोटेखानी पण एक छान पुस्तक, सुमा करंदीकर लिखित रास !

- नेहा प्रदीप जोशी.
(११.१२.२०१९)
उत्कृष्ट परीक्षण. रास बद्दल आणि सुमा ताईबद्दल खूप चयन माहिती दिलीय.
ReplyDelete