गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास) पुस्तक ओळख

गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास)
लेखक : अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते.

वाचनाच्या प्रवासात काही लेखक असे असतात, ती त्यांचं फक्त नाव दिसायचा अवकाश, की ते पुस्तक लगेच उचलून वाचायला घेतलंच पाहिजे, इतका विश्वास त्यांनी संपादन केलेला असतो. अर्थात हे लेखक कोण असतील, हे प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार ठरत असतं. मला खूप आवडणारा एखादा लेखक वा लेखक दुसऱ्याला आवडेलच असं नाही. पण काही मात्र निर्विवाद ग्रेटच असतात. माझ्यासाठी असं एक नाव म्हणजे अच्युत गोडबोले! झपूर्झा मुळे या लेखकाने मन जिंकून घेतलं कारण English literature हा खूप मोठा weak point ! त्यानंतर ओळीने त्यांची सगळीच पुस्तकं वाचली. किमयागार, मुसाफिर, मनात, कॅनव्हास आणि आता अतुल कहाते आणि अच्युत गोडबोले यांनी लिहिलेलं गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास) !

American literature साधारण दोन वर्षांपासून शिकत असल्यामुळे गुलामगिरी हा विषय बराच प्रकर्षाने समोर आला होता. शतकानुशतके, जगाच्या वेगवेगळ्या खंडांमध्ये माणसांनी माणसांचीच केलेली जगजाहीर घृणास्पद विटंबना म्हणजे गुलामगिरी. माणसाने माणसाशी माणसासारखं न वागणे, म्हणजे गुलामगिरी. अमर्याद सत्ता आणि धन शक्तीच्या जोरावर काही मूठभर लोकांनी बहुसंख्य लोकांची केलेली जीवघेणी पिळवणूक म्हणजे गुलामगिरी !

अमेरिकन लोकांनी आफ्रिकेतल्या काळ्या लोकांना विविध प्रकारची आमिषं दाखवून, भुलवून अमेरिकचं स्वप्नं दाखवलं, आणि अमेरिकेत आणून त्यांना गुलाम बनवून त्यांचं शोषण केलं,नंतर तिथे युद्ध झाली, अब्राहम लिंकन या राष्ट्राध्यक्षांनी गुलामगिरी नष्ट केली आणि मग अनेक वर्षांनी बराक ओबामा या पहिला कृष्णवर्णीय जगातल्या सर्वोच्च सिंहासनावर सलग आठ वर्षे विराजमान झाला, ही साधारण आपल्याला गुलामगिरी या विषयाची असणारी माहिती. पण या प्रकाराशी जोडलेले असंख्य घटनाक्रम, त्यांचे कंगोरे मात्र आपल्याला माहीत नसतात. एखादी चळवळ किंवा लढा का उभा राहतो, यामागे अनेक वर्ष जुनी करणं असतात. ती समजून न घेताच त्या चळवळीकडे पाहिलं, तर त्याची तीव्रता लक्षात येत नाही आणि परदुःख शीतल असा प्रकार होऊन जातो. आणि एवढी कारणमीमांसा करायला ना कोणाला वेळ असतो, ना त्याची कोणाला गरज भासते, आणि परिणामी आपलं आहे ते अज्ञान तसच राहतं. या पुस्तकाद्वारे मात्र गुलामगिरी संबंधी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात.

 ग्रीक, रोमन संस्कृतीपासून चालत आलेली गुलामगिरी काळाच्या ओघात कशी बदलत गेली, आणि अजूनच अमानुष होत गेली, ते या पुस्तकातून आपल्यापुढे येतं. ज्या पाश्चात्य संस्कृतीचे सद्ध्या भारतात आणि इतरत्र एवढं अंधानुकरण चालू आहे, ती आतून किती सदोष आणि पोखरलेली आहे, तेही समजून घेता येईल. अमेरिकेचं जे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं किंबहुना केलं जातं, ती नाण्याची केवळ एकच बाजू आहे. दुर्लक्षिलेली किंवा मुद्दाम झाकून ठेवलेली  दुसरी बाजू हे पुस्तक आपल्यापुढे आणतं. शतकानुशकं झालेलं शोषण आणि त्याचा प्रतिकार म्हणून या आफ्रिकन गुलामांनी केलेले यशस्वी- अयशस्वी प्रयत्न, मोठमोठ्या महान राष्ट्रांचे, राष्ट्राध्यक्षांचे, विचारवंतांचे गुलामगिरी बद्दल असणारे विचार, भूमिका लक्षात येतात. केवळ या पुस्तकातून कळू शकलेले Gladiators, स्पार्टाकस, ते अगदी मार्टिन ल्यूथर किंग पर्यंत अनेक लोक माणसाच्या जिद्दीची एक निराळी मिसाल आहेत. अनेक लेखक, कवी, राजकारणी, समाजसुधारक आणि अनेक लोकोत्तर व्यक्तींनी दिलेला लढा आणि या सगळ्याचा सर्वोच्च मानबिंदू म्हणजे बराक ओबामा यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आजवर कोणालाही मिळाली नाहीत इतकी रेकॉर्ड ब्रेक मतं मिळून सलग दोनदा लागलेली वर्णी !

एकूणच हे पुस्तक माझ्यासाठी एक eye opener ठरलं आहे. ज्ञानात भर पडणे, हाही पुस्तक वाचनाचा एक महत्त्वाचा हेतू असतो. तो या पुस्तकामुळे पूर्ण झाला. ज्या वाचकांना गुलामगिरी बद्दल काहीही जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांनी आवर्जून वाचावं असं खात्रीशीर पुस्तक म्हणजे गुलाम : स्पार्टाकस ते ओबामा ( गुलामगिरीचा जीवघेणा चित्तथरारक प्रवास) !

- नेहा प्रदीप जोशी
(३१.१२.२०१९)

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार