एका खेळियाने

एका खेळियाने कितीदा आपुले जाळे विणीयेले उंच जागी ! 


दिलीप प्रभावळकर यांचं एका खेळियाने वाचतेय. असे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके नट आहेत, की ज्यांच्याबद्दल तुम्हाला निखळ कौतुक आणि अभिमान वाटतो. त्या नटाने केलेल्या त्या भूमिकेत तुम्ही अन्य कोणाला imagine करूच शकत नाही. या लोकांकडे स्वतःचा कसदार, मेहनतीने अंगात मुरवलेला अभिनय असतो. 2 मिनिट्स instant magggi सारख्या झटपट acting च्या आणि actors च्या गर्दीत ही अशी मंडळी विरळच. त्यातले दिलीप प्रभावळकर. खूप सहज, मनमोकळेपणाने त्यांनी आपले अनुभव सांगितले आहेत. शिवाय ते एक अभिनेते आहेत, याची त्यांनाही पूर्ण जाणीव असल्याने आपली अभिनयाची कारकीर्द डोळ्यापुढे ठेवून त्यांनी हे अनुभव documented केले आहेत. घरातली एखादी आदरणीय बुजुर्ग व्यक्ती जशा सुरुवातीपासूनच्या आठवणी सांगते, तसा फील वाचताना येतो. 
प्रत्येक वेळी नवी भूमिका  नवं आव्हान म्हणून त्यांनी स्वीकारली. त्यांच्या कितीतरी भूमिका प्रचंड लोकप्रिय अक्षरशः cult level पर्यंत पोहोचल्या तरी जात्यावर पीठ  काढल्यासारखं त्या भूमिकेने दिलेल्या लोकप्रियतेचं पीठ काढून ती encash करायचं कटाक्षाने टाळून त्यांनी आपल्यातला अभिनेता चंद्रकलेसारखा वाढत जाईल, याची काळजी अधिक घेतली. चिमणराव, अलबत्या मधली चेटकीण तुफान प्रतिसाद मिळवून देत असताना त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या इतर भूमिका या गुणाची साक्ष देतात. कुठल्याही कलाकाराला अक्षरशः हेवा वाटेल असा त्यांचा acting span आहे. उदा. बाराव्या प्रकरणात ते त्यांच्यातल्या नटाचा आणि भूतयोनीचा काहीतरी विशेष संबंध असावा, असं म्हणतात आणि तशा कुठल्या भूमिका केल्या, ते सांगतात. तिथे कंसात एक वाक्य आहे ( आता महेश कोठारेंच्या एका आगामी चित्रपटात तर एका भूताचंच काम करतोय!) असं ते नमूद करतात. हे पुस्तक २००५ मधलं आणि माझ्या माहितीप्रमाणे ती भूमिका म्हणजे २००६ मधे आलेल्या पछाडलेला मधली सूड दुर्गे सूड, डोळे बघ डोळे बघ म्हणणाऱ्या इनामदाराची ही भूमिका, जिची जादू अजूनही चांगलीच टिकून आहे. चौकट राजामधल्या नंदूची ऐनवेळी करायला लागलेली भूमिकाही रसिकांच्या कायम स्मरणात राहील अशी झाली. 
मला हे पुस्तक अभिनय क्षेत्राची आवड असणाऱ्या कुणालाही सुचवायला नक्की आवडेल, कारण यात दिलीप प्रभावळकरांनी ती ती भूमिका करताना आवाज, देहबोली, नेपथ्य अशा सगळ्या बाबतीत आपण कशी तयारी केली, काय काय बदल केले, कुठल्या tricks वापरल्या, ती भूमिका केल्यावर काय जाणवलं, काय शिकायला मिळालं, एक अभिनेता म्हणून ती भूमिकेच्या वेगवेगळ्या छटा आपण कशा शोधल्या आणि रंगवत नेल्या हे अधिक विस्ताराने सांगितलं आहे. काही ठिकाणी अभिनयाची थियरीसुद्धा स्पष्ट केली आहे. याचा वाचणाऱ्याला नक्कीच फायदा होईल. कुठली भूमिका फसली, कुठली चांगली वठली पण म्हणावी तितकी नावाजली गेली नाही, हेही ते मनापासून कबूल करतात. त्यामागची कारणं शोधतात. मालिका लोकप्रियता मिळवून देतात, पण अभिनयात एकसुरीपणा येण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना television हे माध्यम जास्त आवडत नाही, असंही ते म्हणतात. त्यामुळे जमेल तिथे जमेल तेवढं झळकायची संधी शोधणाऱ्या कलाकारांपेक्षा ते नक्कीच वेगळे वाटतात. थिएटरची background असणारा माणूस कुठेही कसाही जमवून घेऊ शकतो, पण कोणीही सहजच थिएटरशी जमवून घेवू शकत नाही, असं का म्हणतात ते हे अनुभव वाचताना लक्षात आलं.

 एकंदर आपलीच एवढी दैदिप्यमान कारकीर्द उलगडून सांगताना त्यांनी जी तटस्थ भूमिका घेतली आहे, ती मला मनापासून आवडली. माझ्या हातात पडली ती दुसरी आवृत्ती. पुस्तकात ते २००५-०६  साली आलेलं असल्याने त्यानंतरच्या त्यांच्या तितक्याच गाजलेल्या मुन्नाभाई मधली गांधीजी, मी शिवाजी पार्क अशा बऱ्याच भूमिकांचा उल्लेख नाही. या पुस्तकाच्या त्यांना आत्तापर्यंत ७-८ सुधारित updated आवृत्त्या काढाव्या लागल्या. हे अभिनेता म्हणून त्यांचं खूप मोठं यश आहे, असं मला वाटतं.कारण साधारण चरित्र अशाच टप्प्यावर लिहितात जिथे कर्तृत्व गाजवून नाव कमावून झालेलं असतं, नवं काही होण्याची शक्यता जवळपास नसतेच. आपल्याच चरित्रात आपल्या चांगल्या गोष्टी सांगायला जागा कमी पडणे, दरवेळी त्यात नवी भर पडत जाणं याइतकं excellent अजून काय असेल? आपला अभिनय सोडून इतर कशाचाही उल्लेख उदाहरणार्थ त्यांनी लिहिलेली २८ पुस्तकं- बोक्या सातबंडेबद्दलसुद्धा साधा उल्लेखही यात नाही. दिलीप प्रभावळकरांची आपल्या कारकिर्दीची घडण सांगणारी इतरही पुस्तकं आहेत. त्यांनी भरपूर ललित लेखनही केलेलं आहे. त्यांच्या versatility ची चुणूक त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीत दिसत राहते, ती अशी. बाकीची पुस्तकं सवडीने वाचेनच. चित्रपट रसिकांनी, अभिनय क्षेत्राची आवड असणाऱ्या प्रत्येकाने हे  पुस्तक एकदातरी नक्की वाचावंच. 
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
(१९-०८-२०२३) 

एका खेळियाने
दिलिप प्रभावळकर
अक्षर प्रकाशन
पृष्ठ संख्या: २२४
मूल्य: ३५०₹

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार