लेखकाची गोष्ट

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुस्तकांच्या उंच भिंतीवर बसलेला एक माणूस दिसतोय. त्याच्या उंचीला आधार त्याने वाचलेल्या पुस्तकांचा आहे. भविष्यात मला माझं असं एक चित्र काढून घ्यायला नक्कीच आवडेल! 

" लेखक म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक म्हणजे सुहास्य वदनानं साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वंदन करणं नाही. लेखक होणं म्हणजे भोळ्या भाबड्या वाचकांमध्ये मिरवणं तर अजिबातच नाही..." मग लेखक म्हणजे काय ते सांगतायत स्वतः एक लेखक! 
लेखकाची गोष्ट:  अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स 
या नावातच अशी काही जादू आहे, की कुठलाही क्युरियस वाचक हे नक्की हातात घेईल. पुस्तकाच्या नावाचं आणि मुखपृष्ठाचं महत्त्व पटवून देईल, असं हे पुस्तक. लेखक विश्राम गुप्ते वाचकांच्या कोर्टात एक लेखक म्हणून आपली बाजू मांडायची रीतसर परमिशन घेतात. या कोर्टातले जज म्हणजे सगळे वाचक, म्हणून त्यांना युवर ऑनर असं संबोधून सुरु होतं हे एक हटके अपील! 

फर्स्ट ऑफ ऑल, मला या पुस्तकाच्या टायटलबद्दल थोडं सांगावंसं वाटतं. विश्राम गुप्ते चरित्र तर सांगू पाहतात, पण एक लेखक म्हणून आपलं चरित्र ते सांगू पाहतात. प्रत्येक चरित्रानुसार यातही नायक, त्याच्या आयुष्यातील चढउतार, आयुष्याला कलाटणी देणारा क्षण, पराभवाचे अँड त्यानंतरच्या यशाचे दिवस, बदलत गेलेली आयडिऑलॉजी असं सगळंच आहे, पण ही जर्नी एका लेखकाची आहे. खूपदा आपली अशी समजूत असते, की बाकीच्या कलांना खूप मेहनत करावी लागते, वेळ द्यावा लागतो, त्या तुलनेत रायटिंग अगदीच सोप्पं! एक स्टोरी मनात रचली, पेपर घेतला, थोडी स्टोरी थोडा ड्रामा असं परफेक्ट कॉकटेल बनवलं, की झालं लिहून! ( हल्ली "पॉप्युलर" होणारी बरीच पुस्तकं वाचून हे काही अर्थी खरंही आहे, असं वाटतं, ही पण एक रिॲलिटी आहे!) लेखक म्हणून त्यांनी स्वतः काय मेहनत घेतली, सातत्याने कशी तयारी करत राहिले ( लेखनाचा रियाज), ही आजवर फारशी कुणी न सांगितलेली आणि त्यामुळे वाचायला न मिळालेली बॅकस्टोरी इथे वाचायला मिळते. मुळात लेखकाकडे एक सेन्सिटिव्हीटी असावी लागते. जसा आपल्यावर वेगवेगळ्या विचारांचा,   व्यक्तींचा पगडा असतो, त्याने इन्फ्लूएंस होऊन आपणही बदलून जातो, तसंच याही गोष्टीत आहे. कुठलाही ग्रेट लेखक आधी एक पुस्तकांसाठी वेडा असा वाचक असतो. वाचक ते लेखक या दोन रोल्सबद्दलही त्यांनी डिटेल्ड माहिती दिली आहे. उत्तम वाचक व्हायचं असेल, तर मराठीबरोबरच इंग्लिश लिटरेचर वाचणं का महत्त्वाचं आहे, तेही इथे समजतं. इंग्रजी भाषेचं जगव्यापी स्वरूप, विषयांमधलं वेगळेपण, लेखनातले वेगवेगळे प्रयोग अशी बरीच कारणं त्यामागे आहेत. लिहायचं ठरवलं, मग काय झालं, प्रत्येक लिखाणाच्या आधी आणि नंतर काय घडलं, एखादं लिखाण यशस्वी झालं, जमून आलं याचा नेमका क्राइटेरिया काय असं सगळं यात आहे. पडद्यामागची गोष्ट कायमच फॅसिनेटिंग असते, ही तर लेखनमागची लेखकाची स्वतःचीच स्टोरी आहे. 

खूपदा जी नव्याने किंवा पहिल्यांदा वाचायला ऑर लिहायला सुरुवात करणार आहेत, ती आम्ही काय तयार करू असं विचारतात. त्या प्रश्नाला हे पुस्तक परफेक्ट आन्सर आहे. एस्पेशियली मराठीतून इंग्लिशकडे जाताना खूप जणांना नेमकं चांगलं काय वाचू, मग ते मला समजेल का, असं कन्फ्युजन असतं. ते सॉल्व्ह करायला सुरुवातीचे चॅप्टर खूपच उपयोगी आहेत. वाचक म्हणून सुद्धा आपण अडखळतो, भरकटतो. मुळात हे नॉर्मल आहे, असं सांगणारं कुणीतरी आपल्याला हवं असतं, आणि असाच माणूस आपल्याला योग्य डायरेक्शन देऊ शकतो. त्यामुळे  सबटायटल ' अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स' हेही एकदम जस्टीफाईड आहे. बरं हे स्वतः एक मराठी लेखक सांगत असल्यामुळे सध्याच्या, पूर्वीच्या या क्षेत्रातल्या आणि संबंधित नावाजलेल्या अनेकांबद्दलही ते बरंच काही सांगतात. तेही मुळातूनच वाचण्यासारखं आहे. 

या पुस्तकाबद्दल एक विशेष मेन्शन करावी अशी गोष्ट म्हणजे, यातली भाषा. हे परीक्षण लिहिताना मी जी मिंग्लीश किंवा इंग्रठी भाषा वापरली आहे, तश्या भाषेत हे पुस्तक आहे. मला ही एक महत्त्वाची आणि आवर्जून उल्लेख करावी अशी गोष्ट वाटते. बोलताना सर्रास आपण इंग्लिश वर्ड्स वापरत असतो. कितीही प्रतिशब्द द्यायचा प्रयत्न केला, तरी खूपदा तो शब्द जसा त्या वेळी त्या जागी त्या संदर्भात बरोबर वाटतो, ते आपण नाकारू शकत नाही. याला मराठीचा कमीपणा किंवा इंग्रजीचा उदोउदो यातलं काहीच लेबल आपण लावू शकत नाही. मराठी मायमाऊली आहेच, पण इंग्रजीलासुद्धा एक कूल आंटी म्हणून स्वीकारायला काही हरकत नसावी! तशा किती नव्या गोष्टी आपण स्वीकारल्या आहेतच की! वाचताना कुठेही मला एखादा शब्द खटकला, कळला नाही, असं झालं नाही. उलट खूप झरझर वाचत पुढे गेले, असा माझा अनुभव आहे. तरुण वाचक यामुळेही या पुस्तकाशी रीलेट करु शकतील, हे नक्की. 

एका लेखकाची लेखक होत असतानाची धडपड हीच एक थीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक वाचक म्हणून आपल्या मनाचा ताबा घेते. बुक्स ऑन बुक्स आणि चरित्र असे दोन्ही साहित्यप्रकार यांचा संगम या पुस्तकात दिसतो. "एका लेखकाने वाचकाला व एका वाचकाने लेखकाला कसे घडवले याची अद्भुत कहाणी ", म्हणून आवर्जून वाचावं असं पुस्तक लेखकाची गोष्ट: अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स  ! 

लेखकाची गोष्ट: अ सर्व्हायवल गाईड फॉर मराठी रायटर्स 
विश्राम गुप्ते
देशमुख आणि कंपनी प्रकाशन
पहिली आवृत्ती: २०१९ 
पृष्ठ संख्या: ३२४
मूल्य: ४०० ₹

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार