माणूस आणि नॉट गॉन विथ द विंड
#पुस्तकांच्या_पानांवरुन मला दोन ते तीन तास रिकामा वेळ मिळाला, तर मी काय करेन, याचं उत्तर ठरलेलं आहे. एखादं छानसं पुस्तक घेईन आणि वाचायला लागेन. अगदीच टाळणं शक्य नसेल तर आणि तरच माझ्याकडून movies बघितल्या जातात. म्हणजे आवडत नाही असं नाही, पण priority त्यालाच असेल असं होत नाही. मी चित्रपट या गोष्टीवर प्रेमाने बोलणं म्हणजे टकल्यांच्या गावात कंगव्याचा खप होण्याइतकं अनपेक्षित आहे. पण नुकत्याच वाचलेल्या दोन पुस्तकांनी मला चित्रपट या माध्यमाशी जुळवून घ्यायला हवं, असा काहीसा धडा देऊ केला आहे. चित्रपटसृष्टी हीच मुळात उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची मांदियाळी आहे. इथे अनेक चेहरे येतात, काही चमकून जातात. उदंड तारे तारका आणि अगदी थोडकेच ध्रुव! अशा या कीर्ती, संधी, यश यातल्या कोणत्याच बाबतीत कसलीच शाश्वती नसणाऱ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणे, अधिराज्य गाजवणे हेही दिग्विजय केल्यासारखं आहे. पण अशा होऊन गेलेल्या तरीही अविनाशी असणाऱ्या दिग्विजयी कलाकार आणि कलाकृतींचा आढावा घेणारं पुस्तक म्हणजे फ्लॅशबॅक: चंदेरी दुनियेत माणूस . संस्थापक संपादक श्री ग माजगावकर यांच्...