उदासबोध : उदास मनाच्या जनतेचं,आणि त्यांना उदास करणाऱ्या व्यवस्थेचं विडंबन!

समर्थाचिया सेवका वक्र पाहे
ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे
त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे 
पोलिस पुढाऱ्यांचे

या सत्याचा लागता शोध
कुठून सुचता दासबोध?
लिहिला असता उदासबोध
श्रीसमर्थांनी !

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पाडगावकरांचं रामदास स्वामींच्या रुपातलं चित्र पाहून मन थोडं साशंक झालं खरं! कारण समर्थांवर असणारी आमची अपरंपार श्रद्धा. पण चित्र नीट पाहिलं की दिसतं, की एकमेकांचे पाय धरत-ओढत, कसही करुन जो खुर्चीवर बसला आहे, त्याच्या, म्हणजेच पर्यायाने खुर्चीजवळ पोहोचण्याची धडपड करणारी सगळी सारख्याच साच्याची माणसं आणि त्यांची लांबच लांब रांग मागे ; आणि तिच्या पुढे तिच्यापासून वेगळे उभे असलेले ,भव्यदिव्य दिसणारे, स्वतःचा चेहरा असणारे समर्थांच्या वेशातले पाडगांवकर! अर्पणपत्रिकेत आचार्य अत्रे यांच्या स्मृतीस अर्पण हे वाचलं, आणि विषयाची कल्पना यायला लागली. त्यापुढेच एक अतिशय बोलकं चित्र आहे. "आपले किंमती मत द्या" या फलकाच्या बाजूला काही चिलटांचा घोळका दाखवला आहे. एक एक चिलट जाळीतून आत जातं, आणि समोरच एका अदृश्य हातात एक मोठं fly swatter दाखवलं आहे. आजच्या लोकशाहीचं समर्पक चित्रण दुसरं काय असू शकेल? 

Literature is a reflection of the society, असं साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये शिकवताना सांगितलं जातं. साहित्य ज्या काळात निर्माण होतं, त्या काळचं खरं प्रतिबिंब त्यात उतरलं असेल तर ते उत्तम साहित्य मानतात. समर्थांनी दासबोध लिहिला, तो काळच मुळात छत्रपतींसारख्या आदर्श राज्यकर्त्यांचा आणि स्वातंत्र्याचं मूल्य ओळखलेल्या स्वाभिमानी जनतेचा होता. त्यानंतर काही शे वर्षांनी of the people, by the people, for the people असं जीचं वर्णन करतात, ती लोकशाही भारतात अवतरली. खरी कल्पना उदात्त, पण प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार अर्थ लावत, साधत लोकशाहीचा चेहरामोहराच पुरता बदलून टाकला आहे. लोकशाहीत आता वेगवेगळ्या छोट्यामोठ्या खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्ती, त्यांचे हात आणि त्या खुर्चीचे पाय बळकट करणारे अनेक गट यांनीच आपलं अस्तित्व इतकं अक्राळविक्राळ करून ठेवलं आहे, की त्यात बिचारा सामान्य माणूस आपलं अस्तित्व चोरून निमूटपणे एका कोपऱ्यात उभा राहून हे सारं पाहतो आहे. त्याला काही दिसत नाही, कळत नाही असं नव्हे! हे चित्र असंच राहायचं, ते बदलणं आपल्या हातात नाही, याची त्याने मनात पक्की खूणगाठ बांधली आहे, आणि डोळ्यांवर झापडं लावून तो आपली आपली वाट चालतो आहे. ही हतबलता नेमकी ओळखून त्यावर भाष्य करण्यासाठी पाडगांवकर पुढे सरसावले आहेत. नावावरुन वाटतं तसं हे दासबोधाचं विडंबन नाही, तर उदास मनाच्या जनतेचं, आणि त्यांना उदास व्हायला भाग पाडणाऱ्या व्यवस्थेचं विडंबन आहे. मुळात हा विषय निवडावासा वाटला, या एका कारणासाठीही ते कौतुकास पात्र आहेत. 

जे खटकतं, दृष्टीला चुकीचं वाटतं, त्या चुकीवर अचूक बोट ठेवणारा साहित्यप्रकार म्हणजे विडंबन. या प्रकारातलं मातब्बर नाव म्हणजे आचार्य अत्रे यांचं झेंडूची फुले! त्याच अत्रेंच्या स्मृतीला वंदन करून, दासबोधापासून प्रेरणा घेऊन पाडगांवकरांनी आपल्या निर्भीड आणि तितक्याच खुमासदार शैलीत लोकशाहीचं आणि समाजव्यवस्थेचं केलेलं विडंबन म्हणजे उदासबोध! एकूण पन्नास कवितांमधून पाडगावकरांनी एक भलामोठा आरसाच उभा केला आहे, प्रत्येक घटकानं त्यात डोकावून पहावं आणि आपलं खरं रुप पाहून घ्यावं! आपल्या राजकारण्यांचं वर्म त्यांनी अचूक ओळखलं आहे, ते या ओळीत,
 " खुर्ची असता बुडाखाली, 
पंडित गर्दभाची करी हमाली, 
खुर्ची नसता बुडाखाली, 
हमालही पुसेना!"
 मग ही खुर्ची मिलवण्यापासून टिकवण्यापर्यंत या माणसांचा प्रचार, सभा, "नेतृत्व", भाषण, पक्षकार्य, निवडणुका अशा अनेक माध्यमातून अहर्निश चालू असलेला आटापिटा त्यांनी नेमक्या शब्दांत टिपला आहे. खुर्चीवर बसलेल्याचे हात बळकट करणारे घटक- प्रत्येक पक्षातले होयबा, लक्ष्मीपुत्र, व्यापारी, सगळे अवैध धंदे करुनही नामानिराळे राहणारे "भाई", सहकार- शिक्षण क्षेत्राचं चरण्याचं कुरण करणारे वेगवेगळे "महर्षी", सत्तेपुढे घालीन लोटांगण करणारे पत्रकार, नोकरशहा, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था,  इतकंच नव्हे तर वेगळ्या नावाच्या पोथ्या आणि वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्याखाली सामान्य लोकांना पाळीव करु पाहणारे बुवा, धर्मांचे ठेकेदार या सगळ्यांचाच पाडगांवकर यथेच्छ समाचार घेतात. स्वतंत्र बुद्धी हरवून बसलेल्या लोकांचा मेंढरांसारखा कळप करुन त्यांना हाकू पाहणाऱ्या या व्यवस्थेत हतबुद्ध झालेल्या सामान्य माणसाचं मनोगत त्यांनी नेमक्या शब्दांत सांगितलं आहे, ते असं
 " जे जे होईल ते ते पहावे,
 आपुले आपण मढे वहावे,
 शिवल्या ओठांनी साक्ष राहावे,
 जितेपणी मरणाला!" 
पण मग हे वाचताना प्रश्न पडतो, की या लिखाणाचा उद्देश नुसतंच विडंबन इतकाच आहे का? आमची हतबलता अधोरेखित करून आमच्या मनावरही हा आसूड ओढलेला आहे का? 

हे लिखाण म्हणजे आसूड नव्हे! कविता ही हळुवार फुंकर असते, असं म्हणतात. पण तिचा परिणाम दरवेळी वेगळा होऊ शकतो. डोळ्यांत घातलेली फुंकर दृष्टी निर्दोष करते, इतकंच कशाला; तर निखाऱ्यावर घातलेली फुंकर त्यातला सुप्त अग्नी प्रदीप्त करते. या कवितासंग्रहाचा उद्देशही तशाच प्रकारचा आहे. या झुंडीच्या व्यवस्थेत स्वतःचं हरवलेलं सत्व आणि स्वत्व परत मिळवण्यासाठी प्रेरणा देणं, हा या काव्याचा हेतू आहे. म्हणूनच अंती पाडगांवकर तुमच्या आमच्यासारख्या जनसामान्यायांना आवाहन करत म्हणतात,
"त्यांचे निर्भय डोळ्यांतील शक्ती
हीच उदासबोधाची निष्पत्ती
येथ ही ग्रंथ समाप्ती
प्रारंभ नव्या जाणिवेचा."

मी फूल तृणातील इवले म्हणणारे पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, मी कुठे म्हणतो परी मिळावी हेही लिहू शकले, त्यातला हळुवारपणा जितका खरा; तितकाच " सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम, त्या ट्रकखाली चिरडलेल्या कुत्र्यांना, गांडूळांना सलाम..." हे म्हणत असताना त्यांना येणारा राग हा सादरीकरण करताना ओढून ताणून आणलेला अभिनिवेश नसतो, तोही तितकाच खरा असतो. हे विडंबनही तसच अस्सल आहे, कुठेतरी आहे तेच वास्तव पाहायला आणि मान्य करायला भाग पाडणारं आहे. Art for Art's sake च्या पुढे जाऊन Art for Life's Sake असणारं हे काव्य मराठीतल्या वास्तवदर्शी लिखाणाचा, विडंबन काव्याचा एक मापदंड आहे. सर्वांनी एकदातरी आवर्जून वाचावं, असं काव्य! वाचलं तर एका बैठकीत वाचून होणारं, पण कधीच न संपणारं असं हे काव्य... उदासबोध! 
© नेहा ज्योती प्रदीप जोशी (२३.०१.२०२२)

उदासबोध
मंगेश पाडगांवकर
मौज प्रकाशन गृह
पृष्ठ संख्या: १०६
मूल्य:  १५० रु.  

Comments

  1. छान लिहिलंय 👌🏻 हे आहे संग्रही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार