श्रीगीता आणि गीतांबरी
#पुस्तकांच्या_पानांवरुन
दोन्ही बाजूंचा विशाल सैन्यसागर समोर उभा असताना युद्धाच्या भीषण परिणामांची कल्पना येऊन अर्जुनाने आपलं विजयी धनुष्य खाली ठेवलं. आणि मग या किंकर्तव्याविमुढ वीराला आणि भक्ताला त्याच्या विहीत मार्गावर पुनः आणण्यासाठी सांगितलं गेलं ते अजरामर तत्वज्ञान म्हणजे श्रीम्भगवद्गीता!
नववर्षाच्या वाचनसंकल्पात श्रीम्भगवद्गीता आणि संबंधित वाचन हा एक प्रमुख संकल्प केला होता. आणि मी अतिशय समाधानाने हे सांगू शकते, की नववर्षाचे पहिले पंधरा दिवस माझे गीता वाचण्यात गेले आहेत. या वाचनाने झालेली अनुभूती शब्दांत वर्णन न करता येण्यासारखी आहे. भारतीय तत्त्वज्ञानाच्या विश्वात गीता ध्रुवताऱ्यासारखं अढळपद प्राप्त करून आहे. वास्तविक गीता ही रणांगणावर सांगितली गेली असली, तरी ते युद्धाला उद्युक्त करण्यासाठी रचलेलं काव्य नाही. आयुष्याच्या ऐन निर्णायक टप्प्यावर पाप-पुण्याच्या कल्पनांविषयी विलक्षण गोंधळाची स्थिती निर्माण झाली असता साक्षात परमनियंत्यानेच " या सगळ्याचा कर्ता करविता साक्षात मी असून तू केवळ कर्म करण्यासाठीच निवडला गेला आहेस. तुझं विहीत कर्म तू पार पाड. तुझ्या योगक्षेमाची चिंता वाहायलाच मी आहे," असं सांगत कर्मयोगाचं अंजन डोळ्यात घातलं आणि सर्वांनाच सर्वकाळ पुरेल अशी तत्वज्ञानाची ठेव गीतेच्या रुपात निर्माण करुन ठेवली आहे.
वास्तविक मी राजेन्द्र खेर यांचं गीतांबरी वाचायला सुरुवात केली होती. मला लहानपणी कायम असं वाटायचं, की देवाने एवढे अठरा अध्याय सांगितले खरे, पण हे सगळं होईपर्यंत बाकीच्यांना काय statue करुन ठेवलं होतं का? पण रणांगणावर दोन्हीं बाजूंची व्यूहरचना आखली जात असताना युद्ध सुरु होण्यापूर्वी अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अर्जुन- श्रीकृष्णात झालेला संवाद असं गीतेचं स्वरुप आहे. मी वाचत पुढे पुढे गेले, आणि अर्ध्यात येऊन मूळ गीता आणि गीतांबरी असं वाचलं तर अधिक चांगलं समजेल असं वाटायला लागलं. मग श्री कृ ना आठल्ये संपादित ॐ प्रकाशनची सार्थ गीता यातला एक एक अध्याय आणि गीतांबरी यातलं एक एक प्रकरण असं परत पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. प्रत्यक्ष गीता वाचतांना शब्दाशब्दावर ठेचेवर ठेच लागण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण वाचतांना समोर दिसतो तो नुसताच शब्द नाही, तर सर्वव्यापी अजरामर तत्वज्ञानाचा एक एक हुंकार आहे. वाचतांना सतत मागेपुढे जाऊन आपल्याला या शब्दांचा खरोखर अर्थ लागतोय का, ते पडताळून पाहावं लागतं.
गीतांबरी तिच्या दोन गुणांमुळे महत्वाची ठरते- एक म्हणजे, गीतेत आलेला प्रत्येक शब्द यात विचारात घेतला आहे, तरीही एक भाषांतर ही मर्यादा या लिखाणाला नाही. अनेक महत्त्वाच्या संज्ञा जसं की परा- अपरा, धृती, सत्- असत्, ब्रह्म, परब्रह्म, आत्मा, परमात्मा, साक्षी, सकाम- अकाम कर्म, सत्व- रज- तम इतपासून ज्या संकल्पनांबद्दल बरेच मतप्रवाह निर्माण झाले आहेत उदा. हिंसा, धर्म, यज्ञ, योगसाधना, निष्काम कर्मयोग, उपासना पद्धती, उपवास, ब्रह्मचर्य, संन्यास, चातुर्वण्य अशा संकल्पना स्पष्ट करतांना अनेक रुपकं, उदाहरणं देऊन समजून घ्यायला सोपं होईल, याची काळजी घेतली आहे. आणि हे स्पष्टीकरण मूळ गीता समोर ठेऊन वाचलं, तर तंतोतंत लागू पडतं, हे विशेष! दुसरं म्हणजे, गीता सांगितली गेली तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती, याचा अंदाज यावा या दृष्टीने विदुर- संजय- धृतराष्ट्र, गांधारी- कुंती, मंदाकिनी- कुंती, दुर्योधन- भीष्म, द्रौपदी- कुंती, ऋषी लोमहर्षण- द्रौपदी, दु: शला- विदुर, प्रजाजन- विदुर असे अनेक संवादही यात आहेत. त्यामुळे त्या काळाची अनुभूती होतेच, पण मूळ विषयापासून वाचक दूर जाणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. फक्त ३२० पृष्ठांत साध्या सरळ भाषेत इतका संवेदनशील विषय समर्थपणे हाताळणं, हे खेरांच्या लेखनाचं कसब आहे.
गीता वाचतांना कसं वाटलं, याला उत्तर 'संवादमिममद्भुतं केशवार्जुनयो: पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहु:' एवढंच उत्तर मी देऊ शकते! ती अक्षरे नव्हती देखा | ब्रह्मसाम्राज्यदीपिका | अर्जुनालागी चित्कळिका | उजळिल्या श्रीकृष्णे असं साक्षात माऊली म्हणतात, ती गीता मला एका वाचनात कळली, असं म्हणेल तो येक मूर्ख! मुळातच हा ग्रंथ तुमच्या आयुष्याला लावून पाहायचा ग्रंथ आहे, वाचून संपवायचा नाही! माणसाच्या जन्माची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास व्हावी, म्हणून सिलॅबसला लावलेलं रेफरन्स बुक आहे ते! देवाच्या विश्वरूप दर्शनाचा विशेषत: दहावा आणि अकरावा अध्याय वाचतांना माऊलींनी लिहिलेलं किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेलं ' जाणे अज मी अजर' सतत आठवत होतं. 'माझा असा जो भक्त आहे, तो कधीही नाश पावणार नाही', अशी नि:संदेह हमी देणारा, छातीठोकपणे 'सगळ्याचा कर्ता करविता तो मीच, तुम्ही फक्त कार्य करण्यासाठी निवडले गेले आहात, तेवढं सचोटीने पार पाडा,बाकी तुमच्या योगक्षेमाची जबाबदारी माझीच', असं सांगणारा श्रीकृष्ण हा जसा अर्जुनाचा friend, philosopher, guide झाला तसा आपलाही होऊ शकतो. श्रीकृष्णमय होणं एकवेळ जमेल, पण त्याच्यासारखं देवत्व अंगी बाणणं आपल्याला शक्य नाही ! देव नाही, किमान अर्जुनसारखं भक्त तरी होऊया ! तेवढं जरी झालं, तरी लाईफ सेट आहे ! जन्माला आलेल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी गीता वाचावीच! का ते वाचूनच तुम्हाला समजू शकेल. सकारात्मकतेचा, कार्यरत राहण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणेचा अक्षय्य स्त्रोत म्हणजे गीता! अशी ही गीता वाचायला समजून घ्यायला अजून सोपी जावी, म्हणून केलेला स्तुत्य आणि वाचनीय प्रयत्न म्हणजे गीतांबरी. त्यामुळे गीता समजून घेताना वाचावं, संग्रही ठेवावं, वाचत राहावं, असं हे पुस्तक गीतांबरी!
© नेहा ज्योती प्रदीप जोशी (१६.०१.२०२२)
सार्थ श्रीमद्भगवद्गीता
कृ. ना आठल्ये ( ॐ पब्लिकेशन्स)
गीतांबरी
लेखक:राजेन्द्र खेर
विहंग प्रकाशन
पृष्ठ संख्या: ३२०
किंमत: रु. २५०
English Translation: The Song of Salvation
Comments
Post a Comment