प्रेमातून प्रेमाकडे आणि समांतर जीवन

स्त्री-पुरुष नात्याविषयी आजवर वेगवेगळया साहित्यात वेगळ्या ढंगाने लिहिलं गेलेलं बरच काही आजवर वाचलं आहे. यावेळी या विषयावर काही छानसं वाचायला मिळालं याचं समाधान आहे.. मुळात हा एक नाजूक विषय, पण तो तितक्याच प्रेमाने हाताळू शकणाऱ्या एक लेखिका म्हणजे माझ्यासाठी तरी, अरुणा ढेरे ! त्यांच्या कविता, कृष्णकिनारा, मैत्रेयी, विस्मृतीचित्रे हे जे जे काही वाचलं, त्यात प्रकर्षाने जाणवते ती या नात्याविषयी असलेली समज आणि त्याविषयीची अकृत्रिम संवेदना! स्त्री पुरुष संबंधात काही नात्यांना नाव असतं, एक ओळख असते. पण काही नाती या बंधनाच्या पलीकडची असतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही, साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' ही कुसुमाग्रजांची कविता माझी विशेष लाडकी कविता, पण असं नाव नसलेलं नातं निर्माण होणं, त्या नात्याची गरिमा जपणं, आपल्या आणि इतरांच्या नजरेतही ते नातं तितकंच निष्पाप ठेवणं आणि शेवटपर्यंत निभावून नेणं, ही खरी कसरत आहे. ज्याच्या अगर जिच्या वाट्याला असं नातं आलं, ती व्यक्ती खरंच भाग्यवान! इतर कुठल्या नात्यात नसली, तर ती माणसं प्रेमात असतील, असं नाव द्यायला आणि नावं ठेवायला समाज हात- जीभ सरसावून तयारच असतो. त्या रेट्यापासून स्वतः अलिप्त राहून जपली गेलेल्या काही हळुवार नात्यांविषयी हे पुस्तक आहे. अरुणा ताईंनी या नात्याला खूप छान नाव दिलंय, ते आहे 'मैत्र'. पुस्तकाची अर्पणपत्रिका सुध्दा तशीच " मैत्र: जे होतं आणि आता नाही त्याला स्मरून आणि जे आहे, असण्याचं आश्वासन आहे त्याचा हात धरुन!" स्वामी विवेकानंद- भगिनी निवेदिता, गोपाळकृष्ण गोखले- भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू; गांधीजी- सरलादेवी घोषाल, मीराबेन; रविंद्रनाथ टागोर- कादंबरीदेवी, अन्नपूर्णा तर्खड, व्हिक्टोरिया ओकाम्पो; सुभाषचंद्र बोस- एमिली बोस ( माझी लाडकी जोडी), सेनापती बापट- अना, बाबासाहेब आंबेडकर- रमाबाई, फ्रान्सिस्का फिट्झेराल्ड, ॲनी बेझंट - चार्ल्स ब्रॅडलॉ, श्रीधर केतकर- नागूताई जोशी, हरी नारायण आपटे- काशीबाई कानिटकर, बाबुराव गोखले यांच्या प्रत्ययातील बोलणे मधील काही भाग असे काही ' मैत्र जीवांचे' यात आपल्याला नव्याने भेटतात. मला अरुणाताई आवडतात, ते म्हणजे कुठलाही संवेदनशील विषय हाताळताना त्या बाळगत असणारा संयम आणि संवेदशीलतेसाठी! कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई न करता, संयतपणे त्या त्या नात्याची गुंतागुंत उकलण्याचा प्रामाणिक प्रयत्न वाचताना जाणवत राहतो. शिवाय हे लिखाण पूर्णपणे उपलब्ध असणाऱ्या साधनांवर आधारित आहे, ही त्यांची कल्पना नव्हे! समाजातल्या थोरामोठ्यांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं माणूसपणही असतं, आणि त्या माणूसपणाच्या मुठीत मैत्री नावाचं मूल्य! त्या प्रेममय मैत्रीविषयी लिहीलेले हे ललितबंध. 

प्रेमातून प्रेमाकडे:अरुणा ढेरे
पद्मगंधा प्रकाशन
मूल्य : तीनशे रुपये

लग्नसंस्था ही एखादया औषधासारखी आहे. एखाद्याला संपूर्णपणे लागू होणारं औषध दुसऱ्याला कदाचित अजिबातच मानवत नाही. त्याची परिणामकारकता तुमच्या प्रकृतीवर अवलंबून असते. लग्नापूर्वी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे प्रियकर प्रेयसी गुलाबी रंगातून वास्तवाच्या राज्यात एक नवरा बायको म्हणून परततात, तेव्हा खरी कसरत सुरु होते. नात्याची नवलाई सरल्यावर किंवा अगदी अर्ध्याहून अधिक आयुष्य एकमेकांसोबत घालवलेले नवरा बायको सुखात असतीलच, याची खात्री कोण देऊ शकेल? बाहेरून अगदी picture perfect दिसणारं नातं आतून पोकळ झालं असण्याची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही. समांतर जीवन या फिलीस रोझ यांच्या पॅरलल लाईव्हज या पुस्तकावर बेतलेल्या आपल्या लिखाणात सुनीताबाई देशपांडे पाच जोडप्यांच्या माध्यमातून हेच नातं एका वेगळ्या ढंगात आपल्यापुढे आणतात. चार्ल्स डिकन्स आणि कॅथरीन होगार्थ , जेन आणि थॉमस कार्लाइल, जॉन रस्किन आणि एफी ग्रे, हॅरिएट टेलर आणि जॉन स्टुअर्ट मिल, जॉर्ज इलियट आणि जॉर्ज लुईस ही पाच जोडपी. यातले डिकन्स आणि इलियट प्रसिद्ध लेखक, तर कार्लाइल, रस्किन, मिल हे सामाजिक विचारवंत. काहींची लग्नं रुढार्थाने अगदी यशस्वी दिसणारी अशी होती, पण त्यांचा शेवट त्या काळी नक्कीच धक्कादायक ठरला. तर काहींची लग्नंच विवादास्पद, सगळ्यांच्या टीकेचा- टवाळीचा विषय झालेली; पण संसार दृष्ट लागावी इतका सुखाचा झाला. लग्न हाही एक मानवी खेळच आहे, ज्यात नियम, चौकटी, बंधनं सगळंच आहे. आपल्यासह जोडीदाराच्या वाट्याला आलेले सुखदुःखाचे, यश अपयशाचे क्षण जी सारख्याच जिव्हाळ्याने आपलीशी करते, तीच जोडी समाधानी सांगतेकडे वाटचाल करते; हाच संदेश सुनीताबाईंना या जोड्यांच्या माध्यमातून द्यायचा असावा. त्या म्हणतात, त्या काळातल्या नात्यांमधले सूक्ष्म कंगोरे जाणून घेण्यासाठी मूळ पुस्तकच वाचावं, पण ते जमत नसेल तर समांतर जीवन हाही उत्तम पर्याय आहेच!
समांतर जीवन- सुनीता देशपांडे
कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत १०० रुपये

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार