बोर्डरुम आणि नादवेध

आजचा जमाना स्टार्टअपचा आहे. प्रत्येक जण आपली नवी कल्पना घेऊन बाजारात उतरु पाहतो आहे. एखादी संस्था अगर कंपनी कशी सुरु होते, वेगवेगळे चढउतार पार करत कशी नावारुपाला येते, याची आपल्याला कायमच उत्सुकता असते. जगभरात हजारो लाखोंनी सुरु होणाऱ्या उद्योगांत फक्त काहीच टिकतात, काही वाढतात, काही जगभरात आपलं नाव "brand value" निर्माण करतात. हे शक्य होण्यामागे कारण ठरते ती त्या त्या कंपनीची ध्येयधोरणं अमलात आणणारी Management अर्थात व्यवस्थापन! आजच्या काळात सेल्फ मॅनेजमेंट, ऑपरेशन मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट सारख्या सर्रास वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांची थियरी सांगणारे " मॅनेजमेंट गुरु" शेकड्याने आहेत, पण ससंदर्भ स्पष्टीकरण देणारे विरळच! हा प्रश्न अच्युत गोडबोलेंनी या पुस्तकात सोडवला आहे. त्यांचा स्वतःचा या क्षेत्रातला अनुभव,  या विषयासंबंधी त्यांनी केलेलं चौफेर वाचन याच्या आधारे त्यांनी या पुस्तकात व्यवस्थापन या विषयाचा/ शास्त्राचा इतिहास यासह जगभरात नावाजलेल्या कंपन्या, त्यांची मॅनेजमेंट याबद्दल मुद्देसूद माहिती पुरवली आहे. आर्य चाणक्य- निकोलो मॅकियावेली- ॲडम स्मिथ- रॉबर्ट ओवेन- टेलर- थॉमस वॉटसन- ली आयकोका- पीटर ड्रकर आदींचे व्यवस्थापन विषयातले विचार,जगाला भुरळ पाडणारी जपानी व्यवस्थापन पद्धत याबद्दल ते विस्ताराने माहिती देतात. आणि फोर्ड, मॅकडोनाल्ड, जीलेट, केलाॅग, बोईंग, गुडइयर, जनरल मोटर्स, लिव्हाय, harsheys, वॉर्नर, डिस्ने, कोकाकोला, नाईके, इंटेल, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, ओराॅकल, गूगल, इबे, अमेझॉन, पेपॅल, नोकिया या जगात भारी ब्रँड्सचं मार्केटिंग आणि मॅनेजमेंट कसं घडत- बिघडत घेतलं, त्याची रोमहर्षक सफरही घडवतात. एखादी कंपनी नुसतीच कंपनी न राहता ब्रँड बनते ती त्या त्या उद्योजकाच्या काळाच्या पुढचा विचार करुन जोखीम स्विकारण्याच्या वृत्तीमुळे! अमेरिकन किंवा एकूणच पाश्चात्य संस्कृतीत एखाद्या नव्या कल्पनेसाठी स्वतःला झोकून द्यायचं वेड उपजतच आहे. वर दिलेल्या यादीकडे बघून तर ते सिद्धच होतं. ज्यांचा अंदाज आणि कल्पना ताकदीची असते ते रंकाचे राव होतात तर फासा उलटा पडला तर रावाचे रंक! कुणा एकाची बाजू न घेता त्या त्या व्यवस्थापनातील गुण दोष दोन्ही सांगून, कौतुक- टीका याचा उत्तम balance साधला आहे. वेगळा विषय म्हणून तर आहेच, पण एखाद्या स्वतःचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तीला भेट देण्यासाठी किंवा अशा व्यावसायिकाने आपणहून वाचावं असं पुस्तक आहे. 

बोर्डरुम
अच्युत गोडबोले आणि अतुल कहाते
राजहंस प्रकाशन
किंमत: २५० रुपये
                      *****

शास्त्रीय संगीत ही गोष्टच अशी आहे, जीच्याबाबतीत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. काहींना ते आधीपासून ऐकल्यामुळे आवडतं असतं, तर हळूहळू ऐकणारा कान तयार होता होता शास्त्रीय संगीतावर प्रेम जडून जातं. आजच्या " हाय मेरा दिल मैने फेका, तुने पकडा" किँवा उगाचच ढिंचॅक गाणी ऐकणाऱ्या तरुणाईला शास्त्रीय संगीताचं वावडं असतं, असं मुळीच नाही. पण शास्त्रीय ऐका म्हणजे नक्की काय ऐका, ते नीट सांगितलं जात नाही. आधी तर मला "काय ते विव्हळणं कान देऊन ऐकतात हे लोक!" असं वाटायचं! जरा अक्कल आल्यावर Personally मी जेव्हा प्रत्येक राग ऐकायला सुरुवात केली, तेव्हा पहिल्या फटक्यातच ३०-४० मिनिट नुसतंच दोन ओळी आणि नुसतीच अ ची बाराखडी या प्रकाराचा मला विलक्षण कंटाळा आली, आणि मी तो नाद सोडूनच दिला. मग विचार केला, आपण आधी सगळ्या मातब्बर लोकांची जुनी गाणी ऐकून बघू! तेव्हापासून मंगेशकर कुटुंब, किशोरीताई, द वि पलुस्कर, अजय-कौशिकी चक्रवर्ती, शुभा मुद्गल, शोभा गुर्टू हे माझे सध्याचे लाडके सोबती आहेत. तरीही ती रागांची नावं, त्यांचं स्वतःचं असं कॅलेंडर, नियम याबद्दलची उत्सुकता कायम होती. कुणी रागांच्या बाबतीत काही टेक्निकल बोलायला लागलं, की मला एखाद्या सुंदर मुलीने तुमच्याकडे बघून छान smile द्यावी, आणि नेमका तुमचा नंबरचा चष्मा घरी राहिल्याने तुम्हाला काहीच दिसत नसावं,असं वाटायचं! अशा माझ्यासारख्या अल्पमती पामरांसाठी हे पुस्तक म्हणजे नवनीतच्या गाईडसारखं आहे. साठपेक्षा जास्त रागांची माहिती देताना तो प्रत्येक राग, त्याचा दक्षिणी संगीतातला भाऊबंद, त्या रागाची वेळ, निर्मितीमागची कहाणी‌ इतकंच सांगून लेखक थांबत नाहीत, तर या प्रत्येक रागात निर्मिलेल्या काही लोकप्रिय गाण्यांची यादीच पुस्तकात दिली आहे. त्यामुळे थियरीबरोबर प्रॅक्टिकलही पक्कं होऊन जाईल. दविंच्या आवाजातला श्री राग मी त्या रागाच्या टाइमटेबलनुसार संध्याकाळी ऐकला, तेव्हा मला जे वाटलं ते शब्दांत मांडता येणार नाही इतकं सुखावह होतं! तुम्हाला तुमच्याशी आणि प्रकृतीशी जोडणारं हे संगीत हे अथांग महासागरासारखं आहे. शास्त्रीय संगीताच्या या अनोळखी प्रदेशात प्रवास सोपा आणि सुखाचा व्हावा, म्हणून मला मिळालेलं हे GPS आहे. अभिजात संगीत- गायन & वादन करणाऱ्या, करु इच्छिणाऱ्यांना आवर्जून भेट म्हणून द्यावं, किंवा माझ्यासारख्या नुसत्याच कानसेन असणाऱ्या रसिकांसाठी हे पुस्तक वाचनाची एक पर्वणी आणि एक readymade playlist आहे. वाचून संपवायचं नाही, तर कायम वाचत राहायचं अशा प्रकारचं हे पुस्तक, नादवेध! 
नादवेध
लेखक: अच्युत गोडबोले & सुलभा पिशवीकर
राजहंस प्रकाशन
मूल्य: तीनशे रुपये

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार