लीळा पुस्तकांच्या

#पुस्तकांच्या_पानांवरुन
वर्ष २०२१: पर्ण अकरावे
लीळा पुस्तकांच्या: नितीन रिंढे

वाचनवेडाचा सोहळा साजरा करणारं पुस्तक

" पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या ' मूलभूत शोधां' पैकी आहे. अशा शोधात पुढे बदतल्या काळानुसार फेरफार होत राहिले तरी त्यातली मूळ संकल्पना कायम राहते." 
पुस्तक वाचून होताना मलपृष्ठावर उद्धृत केलेलं उम्बर्तो इकोचं हे वाक्य वाचल्यावर एक वाचक म्हणून जाणवतं, ते पुस्तकांकडे बघण्याचा एक नवाच आणि हटके दृष्टिकोन मिळाल्याचं समाधान. कथा, कादंबरी, चरित्रे, कविता, वैचारिक असं अनेक प्रकारचं लिखाण म्हणजे पुस्तक अशीच सरळसाधी कल्पना डोक्यात असणारे आपण पुस्तक एक 'वस्तू' म्हणून फार कमी वेळा विचारात घेतो. या विषयावर केलेलं लिखाण, म्हणजे पुस्तक एक वस्तू म्हणून विचारात घेऊन केलेलं लिखाण म्हणजे पुस्तकावरील पुस्तक. या विषयावर काय लिखाण होऊ शकतं, तर पुस्तकं जमावण्याच्या- गमावण्याच्या आठवणी, पुस्तक केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली चरित्रे, पुस्तकाभोवती आशय गुंफलेल्या कादंबऱ्या, पुस्तकांचे इतिहास; मुद्रण- बांधणी- मांडणी - संग्रह- वितरण याविषयी कल्पना आणि अनुभव अशी बरीच मोठी यादी देता येईल. या पुस्तकावरील पुस्तक या प्रकारचं मराठीतलं एक दर्जेदार पुस्तक म्हणजे नितीन रिंढे लिखीत हे ' लीळा पुस्तकांच्या'. 

मुळात हे पुस्तक म्हणजे लेखकांनी दैनिक प्रहार मधल्या बुकमार्क या पुरवणीत वेळोवेळी या विषयाला धरून लिहिलेल्या एकूण २३ लेखांचा संग्रह आहे. हे लेखही एका हटके प्रकारच्या लिखाणाला लक्षात घेऊन त्याचा वाचकांना सहज परिचय करुन देता येतील, अशा स्वरुपाचे आहेत. पण ही लेखमाला सुरु करण्याआधी लेखकांनी विषयांतर अशा शीर्षकाखाली महाराष्ट्रीय पुस्तकसंस्कृतीचा एक आढावा घेतला आहे. इंग्रजीत जितकी Books on Books लिहिली गेली आहेत, त्यातुलनेत मराठी साहित्यात हा लिखाणाचा प्रकार कमी हाताळला गेला, त्याची कारणं लेखक स्पष्ट करतात. एक तर मुद्रित पुस्तकांशी आपला फार उशिरा झालेला परिचय ( कारण पूर्वीचं लिखाण हे मुख्यत्वे पोथ्या, वह्या, पत्रे या माध्यमात होतं.), सुरुवातीच्या काळात पुस्तकं वाचण्याचा हेतू शिक्षण घेणे- नोकरी मिळवणे इतकाच असणे, शिवाय वाचन संस्कृतीचा समाजात प्रसार होत असताना वर्गवार राहिलेली विषमता. यामुळे पुस्तकात लिहिलेल्या साहित्यप्रकाराची, वाचन एक छंद म्हणून जोपासण्याची सवय उशिराने का होईना, सुरु झाली पण पुस्तक एक वस्तू म्हणून आपण लक्षात घेतलं नाही. तुलनेने पाश्चिमात्य देशांत मुद्रण तंत्राचा तुलनेने लवकर झालेला प्रसार, मुद्रित पुस्तकांशी दीर्घकाळ असलेला संबंध यातून Books on Books म्हणजेच पुस्तकावरील पुस्तक हा लेखनप्रकार तिथे अधिक विकसीत झाला.

Books on Books यात जे जे विषय येऊ शकतात, ते ते एकेका लेखातून उदाहरणं देत लेखक आपल्यापुढे आणतात. Unpacking My Library या भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या वॉल्टर बेंजामिनसारख्या हाडाच्या पुस्तकवेड्या तत्वज्ञाची गोष्ट सांगणारा लेख, किंवा जगाच्या पाठीवर कुठेही जी पुस्तकं मिळणार नाहीत, त्याची यादीच देणारं स्टुअर्ट केली याचं The Book of Lost Books यावरचा लेख; पुस्तकं लिहिणे- विकणे-वाचणे, वाचक- लेखक यांच्या हटके आठवणी सांगणाऱ्या पुस्तकावरचा लेख, जगभरातल्या ग्रंथालयांचं चरित्र सांगणाऱ्या Library At Night वरचा लेख, पुस्तक - वाचक हेच एक प्रमुख पात्र असणाऱ्या पुस्तकांवर लिहिलेला लेख, पुस्तकं या विषयावर आधारित fiction असणाऱ्या पुस्तकांवरील लेख असे अनेक विषय यात वाचायला मिळतात. याचबरोबरच पुस्तक या वस्तुशी संबंधित काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि विषयावर लेखही यात आहेत. पुस्तक संग्राहक, विक्रेते, पुस्तकचोर यांच्या भन्नाट गोष्टी- आठवणी,लेखकाने आपल्याच लिखाणाविषयी केलेलं लिखाण, एखादया लेखकाने त्याच्या आयुष्यात काय काय प्रकारचं वाचन केलं यावरुन त्याचं वैचारिक चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करणारं लिखाण हेही या पुस्तकात समाविष्ट आहे. मला सगळयात जास्त भावला, तो समासातल्या नोंदींवर लिहिलेल्या पुस्तकावरील लेख आणि हिटलरच्या वैयक्तिक ग्रंथालयात कधी कोणत्या प्रकारची पुस्तकं होती, त्याचं आयुष्यभरातलं वाचन कशा प्रकारचं होतं,याचा आढावा घेणाऱ्या पुस्तकावरील लेख. 

पूर्वीच्या काळी वाचत असताना आपल्याला काय वाटतं, त्याची नोंद पुस्तकाच्या समासात लिहायची पद्धत जास्त प्रचलित होती. मोठमोठ्या लेखकांनी वाचलेली पुस्तकं, त्यात केलेल्या नोंदी शोधून त्याआधारे त्यांच्या वैचारिक विश्वाचा वेध घेणाऱ्या Marginalia नावाच्या पुस्तकावर असलेला लेख अतिशय सुंदर आहे. Bookshelf, वैयक्तिक पुस्तक संग्रह करण्याच्या पद्धती, शब्दकोशकर्त्या डॉ. जॉन्सन याविषयी माहिती पुरवणाऱ्या पुस्तकावरील लेखइतकंच का तर एखादं पुस्तक वाचलेलं नसताना त्यावर कसं बोलावं हे सांगणाऱ्या पुस्तकावरचा लेख असाही विषय ईथे वाचता येईल. 

वैचारिक किंवा अभ्यासपूर्ण लिखाणाचा दर्जा ठरवायचा एक निकष म्हणजे त्या लिखाणात दिले गेलेले विविध संदर्भ. वरकरणी छोटया वाटणाऱ्या पूर्ण पुस्तकात जवळपास ७०-८० पुस्तकांविषयी कमी अधिक विस्ताराने चर्चा केली आहे. भाषा सोपी, तर दिलेली माहिती कंटाळवाणी न वाटता वाचकाला मूळ पुस्तक वाचण्याची प्रेरणा देईल अशा प्रकारे आहे. एकूणच आजवर पुस्तकांची काहीशी दुर्लक्षिलेली बाजू प्रकाशात आणण्याचा हा एक सफल प्रयत्न आहे, असंच म्हणावं लागेल. पुस्तकांवरील पुस्तकं या काहीशा हटके विषयाचा परिचय करुन देणारं हे पुस्तक खऱ्या वाचनप्रेमीसाठी एक pleasing treat आहे, एवढं नक्की! 

लीळा पुस्तकांच्या
लेखक: नितीन रिंढे
प्रकाशक: लोकवाङ् मय गृह ( आवृत्ती २०१७)
पृष्ठ संख्या: १८९
मूल्य: ₹२५० /-

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार