भारतीय मातृकथा ( खंड १,२,३,४)
नास्ति मातृसमा छाया नास्ति मातृसमा गति:
नास्ति मातृसमं त्राणं नास्ति मातृसमा प्रिया ||
महाभारतातल्या शांतीपर्वात गौतम ऋषींचे पुत्र चिरकारी यांनी मातेचे गुणवर्णन करताना उद्धृत केलेला हा श्लोक म्हणजे आपल्या संस्कृतीत स्त्रीच्या प्रत्येक रुपाला दिलेली एक मानवंदना आहे. भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक धार्मिक पंथात स्त्रीला कायमच बरोबरीचा दर्जा देऊन तिच्या योगदानाची दखल घेतलेली दिसते. एक कन्या, भगिनी, पत्नी, माता, गृहस्वामिनी या पारंपरिक भूमिका बजावणाऱ्या स्त्रियांबरोबरच एक तपस्विनी,भक्त, विदुषी, वीरांगना, राज्ञी,नागरिक, समाजसेवक, सुधारक अशा अनेक भूमिकांत वावरत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियांच्या अगणित कथा आपण आजवर ऐकल्या आहेत. लक्ष्मी- पार्वती- सरस्वती, पंचसती, महाकाव्यांतल्या अगणित स्त्रिया, ऋषीपत्नींच्या गोष्टी हा एका प्रकारे मूल्यसंस्कारच आहे. अशा अनेक मातांच्या गोष्टींचा हा संग्रह- भारतीय मातृकथा.
कृष्णराव पंढरीनाथ देशपांडे आणि सुलभा देशपांडे लिखीत चार खंडांत विभागलेला हा स्त्रीशक्तीला समर्पित असलेला कथासंग्रह वेद-उपनिषद काळापासून ते आजपर्यंतच्या काळाला गवसणी घालतो. अर्वाचीन, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळातल्या आपल्या अनेक विलक्षण गुणांनी नावाजल्या गेलेल्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खास महत्त्वाचा पैलू गोष्टीच्या रुपात सांगितला आहे. वैदिक काळात स्त्रीला असणारा समानतेचा दर्जा बदलत्या काळानुसार कसा बदलत, खालावत गेला त्याचाही ससंदर्भ मागोवा प्रस्तावनेत घेतला आहे. पहिल्या खंडाची प्रस्तावना तर आवर्जून वाचावी अशी आहे. अर्वाचीन, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक या चार कालखंडांतील आदर्श स्त्रियांच्या कर्तृत्वाचा परिचय या चार खंडांत करून दिला आहे.
हे पुस्तक का वाचावे?
१. सहज भाषाशैली आणि विषयमांडणी: अगदी बोजड नाही, आणि " छान छान गोष्टी" अशा स्वरूपाचं लिखाण नसल्यामुळे कोणत्याही वयोगटातील वाचकाला हे लिखाण आवडू शकेल. पालकांनी, आजीआजोबांनी स्वतः वाचून मग यातल्या गोष्टी मुलांना सांगाव्या, असा काहीसा मूल्यसंस्काराचा हेतू यामागे आहे.
२. सर्वसमावेशक: वेद-उपनिषद काळापासून ते सद्यकाळापर्यंतच्या मातृकथा निवडताना हिंदू, बौद्ध, जैन धर्मातल्या थोर स्त्रियांचा विचार केलेला आहे. सुप्रिया, सुजाता, आम्रपाली, धर्मदिन्ना, विशाखा, भद्रा कुंडलकेशा, पटाचारा या बौद्ध तर मृगावती, राजीमती, चंदनबाला (दिक्षाग्रहण केलेली सर्वप्रथम स्त्री), रुपसुंदरी अशा जैन धर्मात वंदनीय मानल्या गेलेल्या साध्वींबद्दल सुंदर माहिती दिली आहे, जी अन्यत्र सहज उपलब्ध होत नाही. धर्माबरोबर वेगवेगळया प्रांतातल्या स्त्रिया उदा. कन्नगी ( सिलप्पादिकारमची नायिका), कन्याकुमारी, देवस्मिता, शिवादेवी याही आजवर किमान मराठीत तरी तितक्याश्या न चर्चिल्या गेलेल्या स्त्रियांचा यात समावेश आहे. मध्ययुगीन काळातल्या राज्यकर्त्या, प्रत्यक्ष रणांगणात उतरलेल्या राजस्त्रिया, आधुनिक काळातल्या प्रत्येक क्षेत्रात चाकोरी मोडून वेगळं विश्व उभ्या करु शकलेल्या स्त्रियांचा यात उल्लेख आहे.
३. गुणांवर भर: एखादी स्त्री तिच्या कोणत्या गुणामुळे लोकविलक्षण ठरली, त्या गुणावर अधिक भर दिला आहे. नेहमीच्या माहिती असणाऱ्या सीता, द्रौपदी, यशोदा, कुंती, सुभद्रा या नायिकांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळाच पैलू उलगडून दाखवला आहे. उदा. क्षात्रधर्माचं पालन करण्यासाठी खुद्द भगवान श्रीकृष्णाविरोधात उभी राहिलेली सुभद्रा किंवा द्रोणाचार्यांच्या निधनानंतर केवळ मुलासाठी सहगमन न केलेल्या कृपीमातेचा विचार करुन द्रौपदी आपल्या पाची मुलांच्या खुन्याला अश्वत्थाम्याला अभय देते, अर्जुनाची पत्नी चित्रांगदा अर्जुन आणि पुत्र बभ्रूवाहन यांच्यात समेट घडवून आणते. याच नायिकांच्या पूर्वजन्मीच्या कथा उदा. धरा- यशोदा, केतकी- द्रौपदी किंवा अरुंधती, अनसूया, लोपामुद्रा, सुकन्या, धर्मव्रता, जरत्कारु या ऋषीपत्नींच्या गोष्टी यात आहेत. मध्ययुगीन वीरांगना- भक्ती संप्रदायातील स्त्रिया,आधुनिक काळात सशस्त्र क्रांतीला - एका क्षेत्राला अगर समाजघटकाला वाहून घेतलेल्या स्त्रियांची बरीच माहिती यात मिळते.
४. नवी माहिती: यात उल्लेखलेल्या काही स्त्रिया आपल्याला अजिबातच माहिती नाहीत, पण कर्तृत्वाने या तितक्याच असामान्य आहेत.
उदा. दिल्लीपती पृथ्वीराज आणि राणी संयोगिता यांची गोष्ट सर्वांना अतिपरिचीत आहे. पण पृथ्वीराजांच्या अच्छनदेवी नावाच्या राणीला शेवटच्या युद्धात रणांगणात वीरमरण प्राप्त झालं, हे आपल्याला ठाऊक नसेल. दाहीर राजाच्या सुरजदेवी- परिमलदेवी या राजकन्या, महाराष्ट्रातली वीरमती, गड कटंगाची राणी दुर्गावती, आसामची राणी जोयमती, केळदी आणि कित्तुरच्या चन्नम्मा, स्त्री संतांमध्ये अंदाल, अक्कमहादेवी, लल्लेश्वरी, महादाईसा; आधुनिक काळातल्या अनेक क्रांतिकारक- समाजसेवा आणि सुधारणा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या स्त्रिया, हिराबाई बडोदेकर, एम.सुब्बालक्ष्मी, रुक्मिणीदेवी अरुंडेल, कल्पना चावला इ. या चाकोरीबाहेरचं कार्य लोकमान्य करु शकलेल्या स्त्रिया आहेत.
एकूणच या चार खंडांतून एकूण १६२ स्त्रियांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्याला करून दिला आहे. प्रस्तावनेत त्या काळची परिस्थिती ससंदर्भ विषद केली आहे. आधी सांगितलं तसं, घरातल्या मोठ्या माणसाने वाचून लहान मुलांपर्यंत पोहोचवायच्या या गोष्टी आहे. प्रत्येक गोष्ट हा एक प्रकारचा मूल्यसंस्कारच आहे. तशा प्रकारचं लिखाण वाचायचं असेल किंवा प्रत्येक काळातल्या स्त्री कर्तृत्वाची माहिती मिळवायची असेल, तर अवश्य वाचावी, अशीच ही पुस्तकं आहेत.
भारतीय मातृकथा
लेखक: कृ. प. देशपांडे, शुभदा देशपांडे
प्रकाशक: गंधर्ववेद प्रकाशन
चार खंडाची एकूण किंमत : 2500 रुपये
Comments
Post a Comment