गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर

#पुस्तकांच्या_पानांवरून 
२०२१:पर्ण सातवे
गानयोगी :पं. द. वि. पलुस्कर

कट्यार काळजात घुसली नाटक पहिल्यांदा टीव्हीवर पहिलं, तेव्हापासून अभिजात संगीताची वेगवेगळी घराणी, त्यांची शैली याविषयी मला आकर्षण आहे. पुढे Bandish Bandits आणि Darbarfestival चॅनेलवरचे व्हिडिओ पहिल्यापासून या आकर्षणात अजूनच भर पडली. पूर्वी मोठमोठ्या राजे रजवाड्यांच्या,संस्थानिकांच्या पदरी अनेक गुणी कलावंत असत. राजाश्रय मिळत असल्यामुळे इतर भौतिक गोष्टींची चिंता न करता ते सूरसाधना करू शकत. मग हे राजमहालातलं गाणं लोकाभिमुख कसं झालं, कुणी केलं, अनेक पिढ्यांच्या योगदानामुळे ही घराणी कशी निर्माण होत गेली, राजाश्रय ते लोकाश्रय हा विलक्षण प्रवास कसा काय घडला ही माहिती मला हवी होती. आणि माझ्या सुदैवाने माझ्या असंख्य प्रश्नांचं उत्तर मला दिलं ते अंजली कीर्तने लिखीत गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर या पुस्तकाने! 

'जब जानकीनाथ सहाय करे तब' याचे गायक यापलीकडे मला बापूराव यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पण आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व वाचल्यापासून अंजली कीर्तने यांच्या लिखाणाबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला असल्याने मी हे पुस्तक हाती घेतलं. मुळात मागच्या पिढीतील व्यक्तीचं चरित्र लिहिताना लक्षात घ्यायचा असतो, तो त्या व्यक्तीचा काळ, तेव्हाची परिस्थिती आणि पार्श्वभूमी, कारण त्याशिवाय त्या चरित्रनायकाचं कर्तृत्व उठून दिसत नाही. शिवाय भारतीय शास्त्रीय संगीत ही अनेक पिढ्यांच्या सक्षम योगदानाने घडवलेली एक तेजोमय परंपरा आहे. बापूराव याच परंपरेचे निष्ठावंत पाईक होते. तेव्हा त्यांना समजून घेण्यासाठी आधी या सांगीतिक परंपरेची तोंडओळख असायला हवी. या हेतूने हा चरित्रग्रंथ दोन भागांत विभागला आहे: विभाग एक *पार्श्वभूमी: संगीताचं सुवर्णयुग आणि विभाग दोन: जीवनकहाणी संगीताच्या अग्रदूताची. 

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्धात, म्हणजे बापूरावांच्या जन्मापूर्वी काही दशकं ग्वाल्हेरला मराठा संस्थानिकांच्या दरबारी संगीत शिकायला मिळतं, या ओढीने अनेक ध्येयवेडे उदयोन्मुख गायक महाराष्ट्रातून घरदार सोडून सुरांच्या मागोवा घेत उत्तरेला पळून जात. त्यातलेच एक सूरसाधक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनी महाराष्ट्रात उत्तर हिंदुस्थानी ख्याल गायकीचा पाया घातला, आणि सुरांची गंगा उलट्या दिशेने वाहू लागली.अनेक घराण्यांचे अर्ध्वर्यू गायक या पर्वात उत्तरेकडून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. काळानुरूप ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, भेंडीबाजार ही ख्याल गायनाची घराणी उदयाला आली. आग्रा घराण्याचे उस्ताद नथ्थनखाॅं, फैयाजखाॅं, विलायत हुसेनखाॅं, गोखले घराण्याचे महादेवबुवा गोखले, किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीमखाँ, जयपूर घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, भेंडीबझार घराण्याचे उस्ताद नजीरखाॅं या संस्थापक पुरुषांपासून ती परंपरा शिष्यांपर्यंत कशी पोहोचली, हे त्या शिष्यांची उदाहरणं देऊन लेखिकेने स्पष्ट केले आहे. पूर्वीच्या काळी आधुनिक उपकरणं, लिखीत साधनं याअभावी हे शिक्षण सर्वस्वी गुरूच्या लहरीवर अवलंबून असायचं. त्या सगळ्या प्रकाराशी जुळवून घेऊन गुरू शिष्य परंपरा कशी निर्माण झाली, वाढत गेली, हा इतिहास थक्क करणारा आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना स्त्रियांना अनिवार्य संघर्ष करावा लागला आहे. हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर, हिराबाई दादरकर, इंदिराबाई खाडिलकर, अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायिकांनी 'गाणारी बाई' या कल्पनेभोवती चढलेली कुतर्कांची पुटं बाजूला सारून या कलेचं शुध्द स्वरुप लोकांपर्यंत पोहचवलं. शास्त्रीय संगीताचं शास्त्र शब्दबद्ध करणारे संगीतपाणिनी विष्णू नारायण भातखंडे; बापूरावांचे वडील, अनेक शिष्योत्तम घडवणारे, संगीत प्रसाराला वाहून घेतलेले, स्त्रियांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारे, लाहोर संगीत विद्यालयाचे संस्थापक विष्णू दिगंबर पलुस्कर यांची कारकीर्द अशी बापूरावांच्या जीवनाची आणि त्यांच्या गायन परंपरेची सोनेरी पार्श्वभूमी पहिल्या विभागात आहे. 

दत्तात्रय विष्णु पलुस्कर अर्थात बापूरावांचा जन्म १९२१ साली कुरुंदवाडला झाला. अकरा अपत्यांच्या अकाली मृत्यूनंतर उतारवयात लाभलेलं एकमेव अपत्य म्हणजे बापूराव. पण त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचं निधन झालं. संगीतोद्धारक विष्णु दिगंबर यांचा पुत्र म्हणून बालवयीन अजाण बापूरावांकडे घराण्याचा भावी खलिफा म्हणून पाहिलं जात होतं. मुलाच्या भविष्यासाठी रमाबाईंनी पुण्याला आपला मुक्काम हलवला. कर्त्या पुरुषाअभावी आलेलं दैन्य, एका नामवंत कलाकाराचा वारस म्हणून लहानपणीच खांद्यावर आलेली जबाबदारी यातून बापूराव घडत होते. बालपणीचा सुखाचा काळ काही फारसा त्यांच्या वाट्याला आला नाही, कारण सकाळी रियाज, दुपारी शाळा, संध्याकाळी इतरांच्या संगीत शिकवण्या आणि त्यातच स्वत:चं संगीत शिक्षण असा त्यांचा अनेक वर्षांचा दिनक्रम होता. १९३५ साली वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रतिष्ठित असा जालंधरचा बाबा हरिवल्लभ संगीत महोत्सव आपल्या वडिलांच्या असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत बापूरावांनी गाजवला. पुढे पुणे, बंगळूर, म्हैसूर, मद्रास, अलाहाबाद, कलकत्ता प्रांतात अनेक मैफिलीतून ते प्रसिध्द झाले. पुढे गुरूंशी झालेला तात्विक मतभेद, संपूर्ण भारतभर त्यांच्या होऊ लागलेल्या मैफिली, त्यातून त्यांची सर्वदूर पसरलेली कीर्ती यावर चढलेला कळस म्हणजे १९५२ ला बैजू बावरा या चित्रपटाच्या संगीतासाठी तानसेनाला आवाज देणाऱ्या उस्ताद अमीरखाॅं यांनी बैजूच्या आवाजाकरता ' पूना मे जो हैं, वो शेर का बच्चा डी. व्ही. पलुस्कर' अशी स्वतः बापूरावांची केलेली शिफारस! या चित्रपटामुळे, 'आज गावत मन मेरे झूमके' मुळे तर जनसामान्यांपर्यंत बापूरावांचं नाव पोचलं. १९५३-५५ या दोन वर्षांत उत्तर आणि दक्षिण भारतात त्यांच्या अगणित मैफिली चाहत्यांकडून आणि समिक्षकांकडून नावाजल्या गेल्या. तेव्हाच भारताच्या सांस्कृतिक प्रतिनिधींचे चीनला निघालेल्या शिष्टमंडळात त्यांची निवड झाली. आपल्या अपार, अविश्रांत कष्टांमुळे वयाच्या पस्तीशितच गायकीची परिणत, परिपक्व अवस्था त्यांनी प्राप्त केली. कर्तृत्वाचा आलेख असा चढता होत असताना एक बाजू मात्र कलेकलेने ढासळत होती, ती म्हणजे बापूरावांची प्रकृती. आधीच मैफिली, सततचा प्रवास यामुळे कमजोर झालेल्या बापुरावांना चीनला एन्सेफिलिटीस अर्थात मेंदूदाहाची लागण झाली. यातच उपचारांच्या अभावी या गुणी कलावंताचा वयाच्या केवळ चौतीसाव्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मातोश्री रमाबाईंना आपल्या बाराव्या आणि जगलेल्या, अल्पावधीत कर्तृत्व सिद्ध केलेल्या तरुण मुलाचाही मृत्यू पाहावा लागला. 

बापुराव यांनी लिहिलेली रोजनिशी, त्यांच्या अभ्यासाच्या वह्यांत त्यांनी प्रत्येक राग, चीजांसाठी केलेली टिपणं, पलुस्करांशी संबंधित शंभरेक व्यक्तींच्या मुलाखती यातून बापूरावांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्प्याचा मागोवा लेखिकेने घेतला आहे. ग्रंथाच्या शेवटी प्रकरणागणिक वापरलेल्या संदर्भांची यादी, इतर निवडक संदर्भग्रंथ यांची विस्तृत यादी लेखिकेने घेतलेले प्रामाणिक परिश्रम अधोरेखित करतात. बापूरावांसारख्या कर्तृत्ववान कलावंताचा अकाली मृत्यू नक्कीच चटका लावून जातो. त्यांचं निधन ही शास्त्रीय संगीत परंपरेची मोठीच हानी मानावी लागेल, कारण शास्त्रीय संगीतसाम्राज्याच्या कर्तबगार युवराजाचा अकाली मृत्यू असं मत अनेकांनी त्यावेळी व्यक्त केलं आहे. ते अजून जगते, तर आमच्या आजच्या पिढीसाठी शास्त्रीय संगीत अजून जवळचं झालं असतं. त्यासंबंधित मोहन नाडकर्णी यांनी द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियामधे लिहिलेल्या या ओळी लक्षात घेण्यासारख्या आहेत.
" The sudden death at 34, of Dattatrey Vishnu Paluskar is truely a national loss, coming as it did at time when the older generation of giants in music is gradually dying out. Paluskar was an acknowledged pioneer in post independence renaissance of Indian music and represented the new race of young musicians who were worthy of wearing the mantles of the old masters." 

बापूरावांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचं हे चरित्र वाचायला मिळालं, हा एक सुदैवी योगायोग आहे. एका प्रतिभावान कलावंताची जीवनगाथा, एक उत्तम चरित्र, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील सांगीतिक परंपरेचा इतिहास म्हणून हा चरित्रग्रंथ वाचनप्रेमी आणि संगीतप्रेमींनी आवर्जून वाचावा! 

गानयोगी: पं. द. वि. पलुस्कर
लेखिका: अंजली कीर्तने
मूल्य: रू.६५०/-
पृष्ठांक: ५०१
प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन
© नेहा ज्योती प्रदीप जोशी
३०.०५.२०२१

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार