एम टी आयवा मारू: अनंत सामंत
#पुस्तकांच्या_पानांवरून
२०२१: पर्ण सहावे
#एम_टी_आयवा_मारू :
समुद्राच्या लहरीवर चाललेल्या मानवी आयुष्याचा थरार!
नावात काय आहे या उक्तीला खोटं ठरवणारी कादंबरी असंच या कादंबरीचं वर्णन मी सुरूवातीला करेन. मी कधीच आपणहून ज्या विषयावरचं लिखाण वाचलं नसतं, ते या चमत्कारिक नावामुळे या कादंबरीकडे आकर्षित होऊन वाचलं. लॉर्ड जीम, हार्ट ऑफ डार्कनेस, मॉबी डिक, ओल्ड मॅन अँड द सी, रायडर्स टू द सी अशा समुद्र आणि माणसांच्या आंतरसंघर्षाचं चित्र रेखाटणाऱ्या अतिशय लोकप्रिय कादंबऱ्या, नाटकांच्या पंक्तीत शोभून दिसेल अशी ही कादंबरी आहे. एम टी आयवा मारू या काहीशा चमत्कारिक नावाचा अर्थ तसा हटकेच आहे. एम टी म्हणजे मोटर टँकर, मारू म्हणजे जहाज पण एम टी आयवा मारू या जपानी शब्दांचा एकत्रित अर्थ प्रेम आणि एकरूपता यांच्या भावूक चेतनेचे जहाज!
सुरुवातीलाच नावाइतकीच मनात घर करून गेली, ती या कादंबरीची अर्पणपत्रिका आणि प्रस्तावना. या दोन्हींतून खलाशांच्या संघर्षाला, समुद्राला जी काही भावोत्कट मानवंदना दिली आहे, त्याला खरंच तोड नाही ! मी आजवर वाचलेली सगळ्यात सुंदर अर्पणपत्रिका आणि प्रस्तावना आयवा मारूची आहे. कथानक सुरू होतं १९७५ साली हाँगकाँग येथून. अनंत हा कादंबरीचा नायक सेकंड मेटची परीक्षा देऊन रिझल्टची वाट बघत बसलेला असतानाच त्याला त्याच्या कॉर्डस शिपिंग मॅनेजमेन्टकडून कंपनीची नवीन शीप 'आयवा मारू' जॉईन करायची विनंतीवजा ऑर्डर मिळते. नवकोरं शीप हाताळायला मिळणार म्हणून उत्साहाने आनंद ही ऑर्डर स्वीकारतो. लगोलग कॉन्ट्रॅक्ट साइन करून आपलं शीप पाहायला जातो. आणि तिथे त्याला दिसते ती त्याने पूर्वी जिच्यावर काम केलं होतं ती दोन वर्षांपूर्वीच स्क्रॅप केलेली एम टी ओरायन म्हणजे नुसतं नाव आणि रंग बदलून पेश केलेली आयवा मारू! तुटक्या गंजक्या पोलादाचा ढिगारा, गंजका जायरो, सडकी पंपरूम आणि डेक, भोकं पडलेली बल्कहेड, काम न करणारं मग्नेटिक अशा अवस्थेत असलेली आयवा मारू पुन्हा समुद्रात लोटायची होती, कारण तिच्या मालकाला ही शीप खूप लकी असल्याची खात्री आहे. खरं तर कोणताही शहाणा माणूस अशा परिस्थितीत या अशा जहाजावर काम करायला तयार झाला नसता; पण आश्चर्य म्हणजे एकामागून एक माणसं जहाजावर रुजू होतात. कॅप्टन रॉस या वयाने म्हाताऱ्या पण अनुभवाने बाप माणसाच्या नेतृत्वाखाली आयवा मारू पुन्हा एकदा नव्या प्रवासाकरता सज्ज होते. मग एन्ट्री होते ती उज्ज्वलाची. अनंतचा मित्र, जहाजावरचा सेकंड इंजिनिअर दीपक उपाध्यायची देखणी नवविवाहिता पत्नी. कधीही बेफाम होऊ शकणारा समुद्र, कधीही हेलकावे खाईल अशी आयवा मारू, तिच्यावर काम करणारे सगळे पुरुष खलाशी आणि त्यांच्या बरोबर प्रवास करणारी आयवा आणि समुद्राइतकीच unpredictable होत गेलेली उज्ज्वला यांच्या संघर्षमय समुद्रप्रवासाची ही गोष्ट आहे. स्त्रीची कहाणी, धाडशी खलाशांची साहसकथा, हिंस्त्र निसर्गाच्या सर्वविध्वंसक तांडवाची भयकथा, स्त्री पुरुषांच्या भाव वासनेची संघर्षमय प्रणयकथा, मानव आणि पंचमहाभूतांच्या एकरूपतेची आणि मानवी संस्कृतींमधील भिन्नतेमुळे उत्पन्न होणाऱ्या अपरिहार्य संघर्षाची कहाणी, संस्कृती आणि प्रवृत्तीतील दांभिकता आणि भेकडपणा मांडणारी साहित्यकृती म्हणणे एम टी आयवा मारू!
नेहमी वाचतो ऐकतो त्यापेक्षा खूप वेगळा विषय असल्यामुळे बरीच वेगळी माहिती या कादंबरीतून वाचायला मिळते. जहाजावर काम करताना गरजेचं असणारं टीमवर्क, अनुभवी आणि निर्णय घेऊ शकणारं नेतृत्व, दिलं काम चोख पार पाडणारे क्रू मेंबर यांच्यामुळेच हा प्रवास शक्य होत असतो. आपल्याला सहसा माहिती नसणाऱ्या जहाजावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हुद्देवार उतरंड, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि परस्परसंबंध, खलाशांच्या काहीशा असुरक्षित आणि एकलकोंड्या समुद्री आयुष्यात क्वचित डोकावणारी समलैंगिकतेची भावना अशा मानवी तर सी बरियल, डेकखालचे तेलवाहू टँक्स साफ करायची प्रोसेस, जहाज जिथे आहे तिथलं लोकेशन, पुढचा मार्ग निश्चित करणे, अचानक मार्गात वादळ निर्माण झाल्यास त्यानुसार मार्ग बदलण्याची प्रक्रिया अशा बऱ्याच technical गोष्टी लेखकांनी खूप सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. त्यामुळे माहितीत भर पडतेच पण त्या सफरीचा अनुभव अधिक जीवंत होतो.
कादंबरीतील मुख्य, सहाय्यक सगळीच पात्रं उत्तम वठली आहेत. अनंत हा कथेचा नायक म्हणण्यापेक्षा निवेदक अधिक आहे. आपल्या गावातून आलेल्या बायकोला टॉप मॉडेल बनवण्यासाठी तिच्यावर जोरजबरदस्ती करून पाश्चात्य संस्कृतीचे धडे देऊ पाहणारा दीपक उपाध्याय मला फक्त आणि फक्त त्याच्या professional skills साठीच आवडला. तो आणि अनंत यांनी भारतीय कामगारांचं कौशल्य आणि कर्मयोग भर समुद्रात सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या दुर्दैवी घटनांबद्दल मात्र मला तिळमात्रही सहानुभूती नाही. असं का हे कादंबरी ज्यांनी वाचली आहे त्यांना समजू शकेल. उज्ज्वला आणि दीपक म्हणजे स्वतःबद्दल आणि दुसऱ्याबद्दल अवास्तव अपेक्षा असल्यास काय होतं आणि आयुष्यात कुठे थांबायचं याची जाणीव नाहीशी झाली तर काय होतं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. समीर सेनगुप्ता सारखा दुर्दैवी जीव मनाला चटका लावून जातो. पण मला या सगळ्यांपेक्षा आवडला तो कॅप्टन रॉस. वयाने म्हातारा पण अनुभवाने बाप माणूस! सेव्हन सीज हे त्याने कमांड घेतलेलं पहिलं जहाज. त्याचच पुढे ओरायन आणि नंतर आयवा मारू हे नाव झालं. रॉस मला ओल्ड मॅन अँड द सी मधल्या सॅन्टिआगो सारखा वाटतो. कुसुमाग्रजांच्या 'अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत आशा अन् किनारा तुला पामराला' या ओळी जगलेला हा माणूस आहे. कितीही संकटं आली तरी लढायला न विसरणारा, समुद्रावर- आपल्या बोटीवर जीवापाड प्रेम करणारा, रिटायर व्हायच्या वयात पुन्हा सागराकडे झेपावू पाहणारा दर्यावर्दी ! याच प्रेमामुळे आणि आयुष्यभर कमावलेल्या अनुभवाच्या बळावर त्याने शेवटी नॅविगेशनची कोणतीही आधुनिक साधनं उपलब्ध नसतानाही भर वादळातून आपलं जहाज किनाऱ्यापर्यंत पोहोचवलं. हा प्रसंग हाताळताना त्यानं दाखवलेलं धैर्य, कौशल्य; चिनी अधिकाऱ्यांपासून ते आपल्या कंपनी ऑफिसर्सपर्यंत प्रत्येकाला उत्तरं देताना दाखवलेला बाणेदारपणा यामुळे मला तोच हिरो वाटतो.
खटकलेली गोष्ट म्हणजे कथेचा शेवट. एका प्रवासाची सुरुवात ते नव्या प्रवासाची सुरुवात असं वर्तुळ पूर्ण झालं असलं, तरी त्यातला escapism मला तितका रुचला नाही. कॅप्टन रॉस जसा शेवटी आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सामोरा गेला, तसा कणखरपणा अनंतच्या बाबतीत जाणवत नाही. मनात खूप गोष्टी साचून राहिल्याचा तो परिणाम असावा. काही प्रसंग वाचताना Titanic आणि 2012 चित्रपटाच्या क्लायमॅक्स सारखा थरारक अनुभव येतो. एकंदरच, नेहमीच्या चौकटीच्या बाहेरचा विषय, ओघवती शैली, उत्तम मांडणी, हातचं काही न राखता केलेलं निवेदन हे एम टी आयवा मारूच्या यशाचं खरं गमक आहे. काहीतरी हटके पण तितकंच दर्जेदार वाचायची इच्छा असेल, तर आयवा मारू आवर्जून वाचाच!
©नेहा ज्योती प्रदीप जोशी
०६.०५.२०२१
एम टी आयवा मारू
लेखक: अनंत सामंत
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
पृष्ठ संख्या: ३८५
मूल्य: ₹३५०
Comments
Post a Comment