गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा भाग २
#पुस्तकांच्या_पानांवरून
२०२१: पर्ण दुसरे
गारंबीची राधा
...एका कादंबरीतील पात्र दुसऱ्या कादंबरीत मुख्य पात्र होऊन कथासूत्र पुढे घेऊन जातं, अशा प्रकारचं लिखाण मराठीत फारच दुर्मिळ आहे. English literature मधे Tom Sawyer आणि Huckleberry Finn हे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. तशाही अर्थाने ही कादंबरी मला वेगळी वाटते. गारंबीचा बापू या कथेचं continuation म्हणून जरूर वाचावी, अशी ही कादंबरी आयुष्याकडे पाहण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचावी अशी आहे...
(मागच्या भागात गारंबीचा बापू या कादंबरीचा अल्पसा परिचय करुन घेतल्यावर हा भाग गारंबीच्या राधाला समर्पित...)
श्रीनांनी प्रस्तावनेत या राधाबद्दल बरंच काही सांगितलं आहे. बापू बरोबरच राधाची गोष्टही त्यांना सुचली होती. पुढे बापू खरोखरीच अफाट लोकप्रिय झाला, इतका की खुद्द पेंडसेना त्याचं हे यश पाहून अचंबा वाटत होता. अशा पार्श्वभूमीवर राधा लिहायला घेणं, हे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. एक तर बापूची हवा इतकी, की त्याला दुय्यम स्थान दिल्यावर वाचकांची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल निश्चित काही सांगता येत नव्हते, आणि दुसरं म्हणजे राधाची प्रतिमाही तशीच ठेवायची शिकस्त करावी लागणार होती. पण लेखक स्वतः म्हणतात, तसं ही राधा त्यांची मानसकन्या असल्यामुळे तिच्याविषयी यांना खात्री वाटत होती. बापू कादंबरी(१९५२), यशोदा कादंबरी ( १९५७), यशोदा नाटक ( १९६५), बापू नाटक ( १९६५), बापू चित्रपट (१९८०) या एवढ्या साहित्यात सगळीकडे राधा आहेच. अशा व्यक्तिरेखेवर पुन्हा लिखाण करायचं, तेही १९९३ साली. हे खरोखरच एक धाडस आणि त्यांच्या लेखनाचं कसब होतं, हे मान्यच करावे लागेल.
गारंबीचा बापू मधली राधा ही एक अभागी मुलगी, एका अपात्र नवऱ्याची बायको आणि नंतर बापूची जीवनसंगिनी असा तिच्या आयुष्यातली पहिली ३०-३५ वर्षे एवढा भाग या कादंबरीत आलेला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणजे तिच्या उर्वरित जीवनाची गोष्ट गारंबीची राधा या भागात वाचायला मिळाली. राधा आणि बापू यांचं दांपत्यजीवन रावजीच्या मृत्यूनंतर सुरू झालं. भलेही विवाहाचा कोणताही विधी झालेला नसला, तरी मनाने त्या दोघांनी एकमेकांना आपलंसं केलं आहे.पण त्यांचं हे नातं गावाच्या दृष्टीने एक कुचेष्टेचा विषय आहे. त्यांच्या या नात्याला एक निश्चित ओळख आणि सन्मान मिळवून द्यायला एक दुसरीच व्यक्ती कारणीभूत ठरते, ती व्यक्ती म्हणजे अप्पा दामले.
अप्पा दामले आणि बागुलबुवा या दोन व्यक्तींचा ओझरता उल्लेख मागच्या कादंबरीत आलेला आहे. या भागात मात्र त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. हे अप्पा दामले एक मनस्वी कलावंत, गारंबीतल्या कुणाही प्रतिष्ठिताबद्दल त्यांचं चांगलं मत नाही, पण या अशा गावंढ्या गावात प्रेमासाठी साऱ्या गावाशी पंगा घेणाऱ्या बापूविषयी त्यांना विलक्षण आकर्षण आहे. यांनीच फारशी ओळख नसताना एक दिवस आपल्याकडे बोलवून बापूला राधेशी रीतसर रजिस्टर पद्धतीने लग्न करायचा सल्ला दिला. बापू-राधा आणि अप्पांचे ऋणानुबंध जुळले, ते या क्षणापासून. अप्पा दामले आपल्या तबल्याच्या तालाच्या दुनियेत असतात, आणि दुसरे बागुलबुवा नावाचे गृहस्थ तप, ध्यानधारणा यात मग्न असतात. कादंबरीच्या मध्यातून पुढे कथेला एक विलक्षण कलाटणी मिळाली आहे. कारण बापू हा या बागुलबुवांच्या मार्गाने पुढे जायचा प्रयत्न करु लागतो. घरदार, कष्टाने उभा केलेला व्यवसाय हे सगळं त्याच्या दृष्टीने गौण ठरतं. बापू ते बापूबुवा असा प्रवास करत बुवांच्या मठात कायमस्वरूपी वास्तव्य, विरक्त जीवन, ध्यानधारणा, उपास, दुग्धाहार हाच त्याचा दिनक्रम ठरुन जातो. इकडे राधा त्याच्या आठवणीत त्याच्या काळजीने पुरती कोलमडून पडायच्या अवस्थेला आली आहे. पण तिचा मुलगा बाळ, त्याचा मित्र शरद तिला सावरतात आणि स्वतःला कामात गुंतवून घ्यायचा सल्ला देतात. राधा रावजीचं हॉटेल पुन्हा सुरु करुन स्वतः पूर्वीसारखी तिथे भजी तळायला सुरुवात करते. अल्पावधीतच एका 'लक्षाधीशाची पत्नी जिथे भजी विकते, ते हॉटेल' म्हणून रावजीचं हॉटेल नावारूपास येतं. यातून मिळणाऱ्या नफ्यातून राधा गावातल्या गोरगरिबांसाठी सवलतीच्या दरात साऱ्या सोयी देणारं रुग्णालय सुरु करते. बापूला त्याच्या तपाचं फळ मिळतं की नाही, ते कादंबरी वाचून समजेलच पण राधाला श्रमसाफल्याचा आनंद मिळतो, एवढं नक्की. मग पुढे या दोघांचं काय होतं, बापू परत येतो का, राधा त्याला पुन्हा स्वीकारते का या प्रश्नांची उत्तरं मात्र वाचकांनी स्वतः मिळवावित, असं मला वाटतं.
आता या कादंबरीतील मला सगळ्यांत जास्त आवडलेली ओळ, प्रसंग आणि व्यक्ती यांबद्दल
ओळी: राधानेे तिला तप, समाधी, साक्षात्कार या बाबतीत नेमकं काय वाटतं, ते बाळ बरोबरच्या संवादात सांगितलं आहे. कधीतरी वाचलेल्याा या ओळींचे तिच्या मनावर संस्कार झाले असल्याने शेवटी ती समाधान प्राप्त करून घेऊ शकली.
" ह्या बाबतीत रामकृष्ण परमहंस व्यवहारी दिसतात. त्यांनी विवेकानंदांना बजावलं होतं. ' निर्विकल्प समाधीत तू कधीही जाता कामा नाही. तुझी समाधी सविकल्पच असली पाहिजे. तू लोकांकरिता आहेस. तुला होणा-या साक्षात्काराचा लोकांना उपयोग होणार नसेल तर त्याला शून्य अर्थ आहे.' मला परमहंसांची भाषा समजते, पटते. "
आवडता प्रसंग: एक मावशी सोडल्यास नातेेेेेेेेवाईकांंपैकी कुुुुुुणावर बापूचं जीवापाड प्रेम असेल, तर तो विठोबा. त्याचा पैशाने आणि स्वभावाने तितकाच गरीब असलेला, भोळा पण प्रेमळ बाप. विठोबा पौर्णिमेला साकवावरून पडून गेला, तेव्हापासून बापू- राधा पौर्णिमेला उपास करतात, त्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेऊन त्याच्या खोपट्यात जावून त्याच्या कळशीचं दर्शन घेतात. विठोबा हा आपला पालनकर्ता पिता, पण आपले खरे वडील अण्णा खोतच आहेत हे कळल्यावरही बापूची विठोबावरची श्रध्दा आणि खोतांबद्दल वाटणारा तिरस्कार यात केवळ वाढ होते. काही वर्षांनी अशाच एका पौर्णिमेला अण्णा त्याच पुलावरून तसेच पडून गतप्राण होतात. ही बातमी ऐकून माञ बापूला जबरदस्त धक्का बसतो, इतका की त्याला वेड लागेल की काय अशी धास्ती सर्वांना वाटायला लागते. हे आपल्या जन्मदात्याबद्दल अचानक उफाळून आलेल्या प्रेमामुळे नाही, तर 'त्या हरामखोराने मरतानासुद्धा माझ्या विठोबाची पुण्यतिथी नासवली', या रागातून ! पुढे दिनकर विठोबा गेला ती तिथी प्रतिपदा होती, हे शोधून काढतो आणि आपल्या विठोबाच्या पुण्यस्मृतीला कोणतीही बाधा आलेली नाही, हे कळल्यावरच बापू पूर्ववत होतो. बापूची विठोबाबद्दलची माया, जिव्हाळा किती अकृत्रिम आहे, हे दाखवणारा हा प्रसंग.
आवडलेली व्यक्ती: Pride and Prejudice मधला Darcy, अमृतवेल मधला देवदत्त यांनंतर मला आवडलेला साहित्यातला तरुण म्हणजे राधा बापूचा सुपुत्र बाळ. या कादंबरीत एक भाव खाऊन गेलेली व्यक्ती. याचं सगळं शिक्षण पाचगणीला झालं आहे. बापाकडून कर्तृत्त्व, हुशारी आणि आईकडून सौंदर्य आणि समंजसपणा याचं तो deadly combination आहे. गारंबीबद्दल त्याला राग आहे, कारण या लोकांच्या कर्मदरिद्रीपणामुळे आपल्या वडिलांच्या गुणांचं व्हावं, तसं कौतुक झालं नाही, हे त्याचं कारण आहे. वडिलांचा त्याला अभिमान वाटतो, आईशी त्याची मैत्री आहे. ते दोघे भरपूर वाचन करतात, त्यावर चर्चा करतात. तो किनई खूप छान, लक्षात राहील असं बोलतो, हे सगळया तरुणींचं मत आहे. काव्य, संगीत या बाबतीत रसिक असला तरी प्रेम ही त्याला अवघड भानगड वाटते. राधा त्याला बापू आणि तिच्या प्रेमाची गोष्ट सांगायचं ठरवते, तेव्हा हा शहरातून शिकून आलेला बाळ ते कसं स्वीकारेल, याची तिला धास्ती वाटत असते. पण बाळला त्यांची ही प्रेमकहाणी ऐकून त्या दोघांचा विलक्षण अभिमान वाटतो. त्याने गावी येऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करुन अल्पावधीत यशस्वी करुन दाखवला, आपल्या आईला जसं सावरलं,ज्या परिस्थितीत आणि जसं लग्न केलं, त्यावरुन हा तरुण नुसता साक्षर नाही, तर सुशिक्षितही आहे, हे सिद्ध होतं.
राधा ही बापूसारखी एक बंडखोर व्यक्ती आहे. तिनेही जगाचा अगदी लहान वयातच पुरेपूर अनुभव घेतला आहे. या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी यशस्वी होऊन दाखवीन, हा बाणा तिने गरिबीतून श्रीमंतीत गेल्यावरही शेवटपर्यंत अबाधित ठेवला आहे. ती डोळस माया करणारी विचारी आई आहे. बापूच्या भावविश्वात तिला सर्वोच्च स्थान आहे. बापूच्या रंगात ती पूर्णपणे रंगून गेली असली, तरी स्वतःचा रंग तिने अबाधित ठेवला आहे. ती बेडर आहे, विचार आणि कृतीत सडेतोड आणि प्रगल्भ आहे. म्हणूनच अफाट बापूला शोभेल अशी नायिका आणि तितकीच एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिची ओळख कायम राहील. बाकी एका कादंबरीतील पात्र दुसऱ्या कादंबरीत मुख्य पात्र होऊन कथासूत्र पुढे घेऊन जातं, अशा प्रकारचं लिखाण मराठीत फारच दुर्मिळ आहे. English literature मधे Tom Sawyer आणि Huckleberry Finn हे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. तशाही अर्थाने ही कादंबरी मला वेगळी वाटते. गारंबीचा बापू या कथेचं continuation म्हणून जरूर वाचावी, अशी ही कादंबरी आयुष्याकडे पाहण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनासाठी वाचावी अशी आहे.
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
०५.०२.२०२१
अतिशय ओघवत्या आणि सुस्पष्ट भाषेत पुस्तकपरिचय लिहिला आहे. अप्रतिम.����
ReplyDelete