पृथ्वीचे प्रेमगीत ( कुसुमाग्रज)
#eternal_व्हॅलेंटाईन_भाग_१
#platonic_love
#मराठी_प्रेमगीत
#रसग्रहण
(लाईक नाही केलं तरी चालेल, पण शेवटपर्यंत वाचा)
वेगवेगळया hypothesis चा आधार घेऊन इतकं खात्रीशीर सांगता येईल, की आपली पृथ्वी, सूर्य आणि इतर ग्रहांची उत्पत्ती एकाच स्त्रोतापासून झाली आहे. ४.५ बिलियन वर्षांपूर्वी सूर्यापासून वेगळी होऊन पृथ्वी आकारास आली. त्यानंतर तिचा उपग्रह चंद्र आणि इतर ग्रह अस्तित्वास आले. सूर्य, बुध (Mercury), शुक्र( Venus), पृथ्वी आणि तिचा उपग्रह चंद्र ( Earth &Moon), मंगळ( Mars), गुरु (Jupiter), शनी (Saturn), युरेनस ,नेपच्यून अशा क्रमाने आपली सूर्यमाला आकारास आली. आपली पृथ्वी साडेतेवीस अंशात सूर्याच्या बाजूने कललेली असून ती एकाच वेळी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. सूर्य आणि पृथ्वी हे पूर्वी एकच असल्यामुळे पृथ्वी सुरुवातीला प्रचंड उष्ण होती, नंतरच्या काळात तिचं वातावरण मानवांना राहण्यायोग्य झालं. तरी अजूनही तिचं अंतरंग प्रचंड उष्ण आणि अस्थिर आहे, हे ज्वालामुखी, भूकंप या घटनांतून स्पष्ट होतं. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो,आणि त्याचा प्रकाश म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरुन प्रवर्तित होणारी सुर्यकिरणं आहेत. इतर सगळे ग्रह पृथ्वीपासून विशिष्ट अंतरावर आहेत. पृथ्वी पाण्यामुळे निळी दिसते, तर मंगळ iron oxide मुळे लाल रंगाचा दिसतो. घन तमी शुक्र बघ राज्य करी असं म्हणतात, कारण सूर्योदयापूर्वी आपण उघड्या डोळ्यांनी शुक्राची चांदणी पाहू शकतो. बाकी ग्रहांबरोबर चित्रविचित्र आकाराचे धूमकेतू , shooting stars अर्थात् उल्का, Ursa Major constellations अर्थात सप्तर्षी नक्षत्रे उदा. उत्तरेला असणारा ध्रुव तारा. हेही सूर्यमालेत आहेत. सूर्य इतका मोठा आहे, की तो आपल्या पृथ्वीइतक्या १,३00,000 पृथ्वी त्याच्या आकारात सामावून घेऊ शकतो.
ही झाली आपल्या सूर्यमालेची माहिती. ही सगळी खगोलशास्त्रीय तथ्यं आहेत, जी शाळेत आपण शिकलो आहोत. आता या विषयावर तुम्हाला कुणी कविता करायला सांगितली तर करु शकाल? अर्थातच अशक्यप्राय गोष्ट आहे. पण खरंच या सूर्यमालेतील या घटकांना माणसांसारख्या भावभावना असत्या तर? आपली पृथ्वी केव्हाची सूर्याभोवती फिरते आहे, तिला सुर्याबद्दल, इतर ग्रहांबद्दल, इतर ग्रहांना तिच्याबद्दल काय वाटतं, हा काव्याचा विषय होऊ शकेल? पृथ्वी आपले इतक्या युगांपासूनचे अनुभव सांगू लागली तर?
हे विचार शब्दबद्ध करायला अत्युच्च दर्जाची काव्यप्रतिभा, नैसर्गिक तथ्यांचा अभ्यास आणि तेवढीच संवेदशीलता हवी. Poetry is a spontaneous overflow of powerful feelings असं वर्ड्सवर्थ म्हणतो. पण त्या फ्लो मधेही सत्याशी प्रामाणिक राहायचं, म्हणजे तगडं आव्हान आहे. एका कवीने मात्र हे आव्हान लीलया पेललं असून मराठी रसिकांना एक फार मोठी शब्दरूप ठेव देऊ केली आहे. ते कवी म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विजेते कुसुमाग्रज आणि त्यांचं हे अजरामर प्रेमकाव्य म्हणजेच विशाखा या काव्यसंग्रहातील 'पृथ्वीचे प्रेमगीत '!
कवितेच्या ओळी वाचताना वर सांगितलेली सगळी माहिती पडताळून पाहा, प्रतिभा कशाला म्हणतात त्याचा पुरावा तुम्हाला आपसूकच मिळेल. सध्या हवेत व्हॅलेंटाईनचा गंध मिसळलेला असल्यामुळे मौका भी है और दस्तुर भी म्हणून माझी ही खूप आवडती कविता शेअर करावीशी वाटली.
#पृथ्वीचे_प्रेमगीत *
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना
नव्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे
परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले
तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारूनी दारुण
निराशेत संन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला धृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव
पिसारा प्रभेचा उभारुन दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ
परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे
तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर
गमे की तुझ्या रुद्र रुपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा
अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलि:कण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण
- कुसुमाग्रज
कुसुमाग्रजांच्या या थोर काव्याला माझा पुन्हा पुन्हा सलाम! आता जाता जाता दुसराही धक्का देऊन जाते. या काव्याला अर्थात् पृथ्वीच्या प्रेमभावनेला सूर्याने खरोखर प्रतिसाद दिला तर? त्याच्या भावनेचं शब्दरुप कसं असेल, ते पुढच्या भागात. सस्पेन्स वगैरे काही नाही, मराठीत टाईप करायला वेळ लागतो.
https://youtu.be/4glThs9QJfM
या कवितेचं पान या कार्यक्रमाच्या लिंकवर सगळ्यांत शेवटी ही कविता ऐकायला मिळेल.
Comments
Post a Comment