गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा (भाग १)

#पुस्तकांच्या_पानांवरून
२०२१: पर्ण पहिले

पुस्तकं निर्जीव नसतात. उलट ती चांगलीच सजीव, रसरशीत असतात. फक्त त्यांचं हे मर्म जाणून त्यांच्याकडे पाहणारा वाचक असावा लागतो. मग वाचन हीसुद्धा एक निर्जीव, शब्द वाचण्याची प्रक्रिया राहत नाही. तो एक संवाद होऊन जातो. लायब्ररीतली पुस्तकं मला खाणाखुणा करतात, असा माझा तरी अनुभव आहे. लायब्ररीत गेले की माझी नजर मोजक्या सात आठ पुस्तकांवर जातेच. त्यात पहिलं म्हणजे गीतारहस्य, पण ते वाचण्याइतकी माझी अजून तयारी नाही. तुकाराम गाथा,स्वामी, मैत्रेयी, मोगरा फुलला, मर्मभेद आणि बरीच मनात घर केलेली पुस्तकं पाहिली, की मला आवडते नातेवाईक भेटल्यावर वाटतं तसं होतं. गेले काही दिवस एक बाई मला अशा खाणाखुणा करत होत्या. दर वेळी समोरचा शेल्फ उघडला की गारंबीची राधा समोर दिसायची. एका बैठकीवर बसलेली सालंकृत लेकुरवाळी बाई असं मुखपृष्ठावर चित्र आहे. गारंबीचा बापू माहीत नाही, असा मराठी वाचक मिळणं दुर्मिळ आहे. अगदी वाचून माहीत नसला तरी ऐकून, कुणाला तरी घाणेकरांचा पिक्चर पाहून गारंबीचा बापू ओळखीचा झालेला असतोच. मलाही ती ओळख काही वर्षांपूर्वी झालेली होतीच. म्हणजे गोष्ट नक्की आठवत होती. पण तरी त्यांच्या या मिसेस म्हणजेच गारंबीची राधा दिसायला लागल्यापासून एकदा या बापूशेठांची भेट घ्यायला हवी, मग राधाबाईंची विचारपूस करावी, असा बेत केला. अक्षरशः एक दीड महिना हे बापूशेठ नुसत्या हुलकावण्या देत होते. कधीही विचारा, ते पुस्तक नसायचंच. सगळया प्रती कायम कुणा ना कुणाकडे गेलेल्याच असायच्या. एक दिवस मात्र काउंटरपाशी जाताच, " तुमचे बापू आलेत हो शेवटी", असं तिथल्या मॅडम म्हणाल्या. अर्थात् त्यावर दोन क्षण मीही त्यांच्याकडे बघतच बसले. मग उलगडा झाला. आणि मग गारंबीचा बापू आणि गारंबीची राधा दोघांनाही एकत्र घरी घेऊन आले. 


गारंबीचा बापू पुन्हा वाचल्याशिवाय राधा वाचायचं नाही, हा मी माझ्या आजवरच्या वाचनाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयांपैकी एक अतिशय योग्य निर्णय ठरला. त्याची कारणं दोन, एक म्हणजे राधा हा एका अर्थी गारंबीचा बापू याचा पुढचा भाग आहे, त्यामुळे पहिला भाग चांगला पक्का असल्याशिवाय दुसरा तितका प्रभावीपणे जाणवणार नाही. म्हणजे राधा लिहिताना श्रीनांनी जागोजागी जुने संदर्भ दिले आहेत, त्यामुळे बापू वाचलं नसेल तर अडणार नाही पण वाचलं असेल तर अजून चांगलं समजेल. दुसरं कारण म्हणजे बापूचा अफाटपणा डोक्यात पक्का असल्याशिवाय राधाची थोरवी समजणं खरंच कठीण आहे. म्हणून आधी गारंबीचा बापू आणि मग गारंबीची राधा असं सलग वाचून काढलं. 

गारंबीचा बापू या कादंबरीची गोष्ट एका वाक्यात सांगायची झाली, तर ती अशी," ही एका चारचौघांपेक्षा शतपटीने वेगळ्या असणाऱ्या, कुठल्याही समाजमान्य चौकटीत बंदिस्त करता न येणाऱ्या शून्यापासून सुरुवात होऊन वैभवाचं शिखर गाठणाऱ्या एका कर्तबगार, लोकविलक्षण पण बंडखोर पुरुषाची यशोगाथा आहे." गारंबी या एका टिपिकल कोकणातल्या खेडेगावात एका गरीब ब्राह्मण पाणक्याच्या घरी जन्मलेला बापू दांडगा, स्वाभिमानी बाणा असलेला. विनाकारण कुणाचा अपमान नाही, आणि सन्मानही नाही, ही त्याची रोकठोक भूमिका. आईशी त्याचे सूर कधीच जुळले नाहीत, पण बापावर अपार माया. आपल्या गरीब भोळ्या बापाला गुरासारखं राबवून वर त्याच्यावर उपकार केल्याचा आव आणणाऱ्या लोकांचा विशेषतः अण्णा खोतांचा त्याला भयंकर तिटकारा यायचा. हाच राग उरात बाळगत, या सगळ्यांना पुरता जोखत बापू लहानाचा मोठा होत होता. या गरिबाच्या पोराला कशाला हवा एवढा तोरा, असं वाटून गावातल्या लोकांनी एक वाया गेलेला पोरगा म्हणत त्याची संभावना केली. आपल्या अंगाशी आलेली पापं त्याच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला. अचानक आलेल्या या लोकापवादामुळे बापूही सुरूवातीला बिथरला खरा, पण इथून त्याने इतकं मोठं व्हायचं की पुन्हा कुणीच आपल्या वाटेला जाणार नाही, हा चंग बांधला. पुढे हॉटेलवाला रावजी, त्याची बायको राधा त्याच्या आयुष्यात आले. सुरूवातीला केवळ वेळ घालवण्याचं, टवाळक्या करण्याचं एक ठिकाण असलेलं हेच हॉटेल बापूसाठी व्यवसायाच्या दृष्टीने ' अनुभवांची कार्यशाळा' ठरली. उपजतच लाभलेली हुशारी, माणसं आपलीशी करण्याची अवगत असलेली कला आणि योग्य दिशेने केलेले कष्ट यामुळे रावजीचं हॉटेल बापूच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं. खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते जनरीतीपर्यंत कसलीच बंधनं न चुकता नाकारणारा हा इसम! पुढे रावजी गेल्यावर लोकांचे कुत्सित शेरे, चेष्टा, बदनामी कशाचीच पर्वा न करता बापूने हॉटेल आणि राधा दोघांनाही आपलंसं केलं. मनात आणलं असतं तर हॉटेल मिळाल्यावर तो सगळं मिळवल्याच्या आनंदात राहू शकला असता. पण ही त्याच्या यशाची पहिली पायरी ठरली. पुढे एकाहून एक विलक्षण कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवायला सुरूवात केली, ऐन तारुण्यात वैभवाचं शिखर गाठलं. आणि तो नुसता बापू राहिला नाही, तर त्याला अफाट बापू हे नावच पडलं. 

गारंबीने या भूमिपुत्राला उपेक्षा आणि अपकिर्ती यापलीकडे काही दिलं नसलं, तरी अफाट बापूने मात्र गारंबीला बरंच काही दिलं. ज्या तकलादू साकवावरुन पडून त्याचा बाप विठोबा मेला, तो साकव त्याने पुन्हा बांधून काढला आणि त्याला विठोबाचा पूल हे नाव दिलं. गावात शाळा, विहीर, सिमेंटचा पक्का पाट अशा अनेक गोष्टी केल्या. गारंबी मात्र हा हिरा पारखण्यात चुकली,ती शेवटपर्यंत. कारण बापू यांच्या कुठल्याच समाजमान्य चौकटीत मावणारा नव्हता. या अशा बंडखोर नायकाची नायिकाही तितकीच विलक्षण असणार, याचा अंदाज न वाचताही वाचकांना येऊ शकतो. राधाला समाजाने, विशेषतः गारंबीने कायम हीन दर्जाची वागणूक दिली आहे. बालपणी अल्लडपणे हातून घडून गेलेली एक चूक तिला वाईट चालीची मुलगी ही अपकिर्ती देऊन गेली. ज्या माणसाला तिने नोकर म्हणूनही कामावर ठेवलं नसतं, तो तिच्यापेक्षा दुप्पट वयाचा व्यसनी रावजी तिचा नवरा झाला आणि ती गारंबीत आली. आणि इथे तिच्या आयुष्यात आला, तो तिचा पुढील आयुष्यातील खरा जोडीदार बापू. तिच्या सगळया इतिहासासह राजरोसपणे तिचा हात हातात घेऊन बापूने याही क्षेत्रातली आपली बंडखोरी दाखवून दिली. तिला कोणी रखेल म्हणलं, त्यांच्या मुलाला गाव अक्करमाशा म्हणालं.‌ पण ही दोघं सगळ्यांना पुरून उरली. बाकी या राधाबद्दल पुढे लिहीनच. पण तिच्याबद्दल एवढंच सांगेन, की बापू हिरा तर ही राधा त्याचं कोंदण आहे. 

गारंबीचा बापू या कादंबरीने मराठी साहित्याला कधीही न विसरता येईल, अशा तयारीचा एक बंडखोर नायक दिला आहे. प्रचंड कर्तृत्त्व, तडफ आणि बेडरपणा याचं अफाट रसायन म्हणजे बापू. कादंबरीत तो, राधा याजोडीला बापूची आई यशोदा, बाप विठोबा, अण्णा खोत, बापूची मावशी, मित्र दिनकर अशी मोजकीच पण लक्षात राहणारी पात्रं आहेत. ही कादंबरी त्या कथेसाठी वाचण्यापेक्षा बापू या पात्रासाठी आवर्जून वाचण्यासारखी आहे. जुन्या काळचं कोकण, इथलं समाजजीवन, वाडी-वाडीत चालणारं जातीपातीचं राजकारण, सरपंच पदासाठी होणारे राडे, पुलं म्हणतात तसं, ' नारळीसारखा कल्पवृक्ष देवाने दिलेला. पण इथेही नारळापेक्षा करवंटीशी सलगी करायची वृत्ती' हे सगळं चित्रण लक्षात राहण्यासारखं झालं आहे.

आमच्या तीर्थरूपांची आणि मातोश्रींची as a कोकणचे भूमिपुत्र या नात्याने श्रीनांबद्दल एक तक्रार अशी, की हे लोक कोकणाबद्दल लिहिताना इथलं दळीद्रच अधिक दाखवतात, तेही वाजवीपेक्षा अधिक. अर्थात् त्यांचं हे मत पेंडसेंचं सगळं साहित्य वाचून झाल्यावर तयार झालेलं आहे. आणि मी फक्त एक बापू आणि आता दुसरी राधा या पलीकडे काही वाचलेलं नाही. यावेळी बापू वाचताना मी त्यांच्या या मतावर विचार केला. इथे माणसं वर्षानुवर्षे मान मोडून काम करतात, पण कुठल्याही नव्या गोष्टीचा, कल्पनेचा तितक्याच नेटाने विरोध करतात, हा या मातीचा एक महत्त्वाचा दुर्गुण श्रीनांनी दाखवून दिला आहे. हा दुर्गुण त्यांनी गरजेपेक्षा जास्त दाखवला आहे, असं कदाचित माझ्या आईबाबांना वाटत असावं. त्यामुळे त्यांच्या तक्रारीत शेकड्यातला एक टक्का का होईना, पण अर्थ आहे.  या सगळया गोतावळ्यात वेगळा विचार करू शकला, लोकांची पर्वा न करता तो विचार कृतीत उतरवू शकला म्हणून बापू नायक ठरतो, तोही असा तसा नव्हे, तर बंडखोर नायक. पिक्चर मी पाहिला नाही, पण काशिनाथ घाणेकर हा एकच कलाकार बापूच्या अफाट ' असण्याला ' योग्य न्याय देऊ शकला असता, याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. 

बाकी मग पुढे बापूचं काय होतं, राधाला गारंबी आणि गारंबीला राधा स्वीकारते का, ज्या अण्णा खोताचा आयुष्यभर तिरस्कार केला तोच आपला बाप आहे हे कळल्यावर बापूची प्रतिक्रिया काय असते, राधा बापूचा मुलगा बाळ त्याचं पुढे काय होतं, तो आईबापासारखा बंडखोर उपजतो की वेगळंच काही घडतं, बापू आणि दिनकरची मैत्री पुढेही टिकते का, राधा ही व्यक्तीबद्दल श्रीनांना काय वाटतं या आणि अशा अनेक प्रश्नांनी उत्तरं श्रीनांनी गारंबीची राधा या कादंबरीत दिली आहेत. मराठीत एकाच कथेचा पुढचा भाग त्याच कथेतलं दुसरं पात्र पुढे घेऊन जातं, अशा प्रकारचं लिखाण अगदीच दुर्मिळ आहे. त्याही अनुषंगाने गारंबीची राधा ही कादंबरी वेगळी ठरते. आता बापूबद्दल इतकं लिहिल्यावर राधाची भेट घ्यायला काहीच हरकत नाही. पण ती भेट पुढच्या भागात... 

- नेहा ज्योती प्रदीप जोशी
( २६.१.०१.२०२१)

गारंबीचा बापू कादंबरी ( १९५२)
गारंबीची राधा कादंबरी ( १९९३)
प्रकाशक: मौज प्रकाशन
गारंबीचा बापू  चित्रपट ( १९८०)




Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार