गोल्डा: एक अशांत वादळ. (लेखिका: वीणा गवाणकर)

#पुस्तकांच्या_पानांवरून

"...घड्याळाचा काटा चारवर आला. बेन गुरियाॅन यांनी हातातला लाकडी हातोडा टेबलावर आपटला. खाली बसायला जागा नसल्याने वरच्या मजल्यावर सज्ज असणाऱ्या फिलहार्मोनिक वाद्यवृंदाला तो इशारा नव्या राष्ट्रगीताला सुरुवात करण्याचा होता, हे समजलंच नाही. उपस्थित लोकांनी मात्र कशाचीही वाट न बघता राष्ट्रगीत हाटिक्वा म्हणायला सुरुवात केली. राष्ट्रगीत होताच बेन गुरियाॅन यांनी राष्ट्र स्थापनेची घोषणा केली. ' Medinat Yisrael' इस्रायल देश. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते... बेन गुरियाॅन यांचं घोषणापत्र वाचून झाल्यावर त्यावर स्वाक्षरी करणारे एक एक सही करत गेले... अमेरिकेत असताना तिने शाळेत अमेरिकन स्वातंत्र्याच्या घोषणापत्रावर सह्या करणाऱ्यांच्या कहाण्या वाचल्या होत्या. असा अभूतपूर्व क्षण आपल्या आयुष्यात उगवेल अशी कल्पना तिने कधी केली नव्हती. ती घटना सत्यात अवतरली होती..."
१४ मे १९४८, एका वस्तुसंग्रहालयाच्या दालनात, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, ज्यूंच्या स्वतःच्या हक्काच्या देशाच्या स्थापनेची घोषणा झाली, तो दिवस. आणि या देशाच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर ज्यांनी ज्यांनी सही केली, त्यातली एकमेव स्त्री म्हणजे गोल्डा मायरसन उर्फ गोल्डा मेयर! 

कितीही वेळ लागला तरी चालेल, पण विकत घेऊनच वाचायचं अशा पुस्तकांच्या यादीत कित्येक दिवस या पुस्तकाचं नाव होतं. अखेर दिवाळीची खरेदी झाली, आणि शेवटी म्हणजे अगदी finally हे पुस्तक माझ्या संग्रहात दाखल झालं. पाश्चात्य देशांच्या कौतुकाचा ऑपेरा गाणाऱ्या लोकांनी एका बाबतीत मात्र विसाव्या शतकात स्वातंत्र्य मिळवलेल्या, वसाहतवादावर शेवटचा वार करून स्वातंत्र्य काबीज केलेल्या पूर्वेकडच्या देशांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे ( दिली नाही तरी आमचं काही बिघडत नाही, हा भाग वेगळा), ती म्हणजे स्त्रियांना अगदी सुरुवातीपासूनच कसलेही आढेवेढे न घेता नेतृत्व करण्याची दिलेली संधी, मग त्यात मतदानाच्या अधिकारापासून ते देशाच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत सारंच येतं! श्रीलंकेच्या सिरीमाओ बंदरनायके, भारताच्या इंदिरा गांधी, इस्राएलच्या गोल्डा मेयर अशी काही ठळक उदाहरणं आपल्या सर्वांनाच ठाऊक आहेत. या तिघींचा विचार करताना लक्षात घ्यायची एक बाब म्हणजे त्यांची पार्श्वभूमी. जगातल्या पहिल्या non-hereditory महिला पंतप्रधान सिरीमाओ यांना आपल्या पतीकडून, तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या वडिलांकडून राजकीय वारसा लाभला होता. अर्थात् त्यामुळे त्यांचं स्वतःचं कर्तृत्त्व कमी ठरत नाही. मात्र गोल्डा मेयर यांचं उदाहरण सर्वार्थाने लक्षवेधी आहे, कारण त्यांना असा कुठलाच राजकीय वारसा लाभला नव्हता.

 एका सामान्य रशियन ज्यू मजूर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी. तिच्या बालपणीच वडील अमेरिकेत नशीब आजमावयला एकटे पुढे निघून गेले, आणि काही वर्षांनी आई आणि बहिणीसह गोल्डा अमेरिकावासी झाली. तिथेच शिक्षण पूर्ण करता करता लहान वयातच ती शेयना या तिच्या मोठ्या बहिणीसह झायाॅनवाद अर्थात ज्यूंना स्वतःची अशी स्वतंत्र हक्काची भूमी हवी, हा मुख्य विचार असणाऱ्या चळवळीशी जोडली गेली. तिची धडाकेबाज भाषणं, या कार्यात संपूर्णपणे स्वतःला झोकून देण्याची वृत्ती, स्पष्ट आणि निर्भीड विचार यांमुळे अल्पावधीत ती अमेरिकेच्या झायाॅनवादी श्रमिक संघटनेची एक महत्त्वाची नेता आणि स्त्री प्रतिनिधी ठरली. १९१७ नंतर ज्यू लोकांची राष्ट्र भूमी निर्माण होण्याच्या दृष्टीने वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली. विचार आणि कृती दोन्हींमध्ये बेधडक आणि बेडर असणाऱ्या गोल्डाने पॅलेस्टाईनला कायमचं स्थलांतर करण्याचा पक्का निर्धार केला. आता आपल्या भूमीवर जाऊन आपला देश आपणच उभा करायचा, या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक लोकांनी पूर्वी असं स्थलांतर केलं होतं, ज्याला आलीया असं म्हणतात. गोल्डा या दुसऱ्या आलीया लाटेशी संलग्न होती. तशातच तिचं नुकतच लग्न झालेलं, पण माझ्याबरोबर राहायचं असेल तर पॅलेस्टाईनला यावं लागेल, हे ती तिच्या नवऱ्यालाही ठामपणे सांगत राहिली. आणि काही दिवसांत गोल्डा, शेयना आपापल्या नवऱ्यांसह कायमच्या पॅलेस्टाईनकडे रवाना झाल्या. तिथल्या किबुत्झ म्हणजे सर्वांनी एकत्र काम करा, सर्वांत समान वाटून घ्या अशा समाजवादी तत्वाने चालणाऱ्या जीवनसरणीचा तिने मनपूर्वक स्वीकार केला. कुक्कुटपालनापासून ते अध्यापन करणं, पैशांची निकड भागवण्यासाठी त्याच बालवाडीतल्या मुलांचे कपडे धुवून देऊन घरखर्च भागवत होती. मुलं, संसार सांभाळत होती. त्याचबरोबर Ahdut Haavoda या कामगार पक्षाची सदस्य म्हणून तिची राजकीय कारकीर्द बहरास येत होती. सामान्य सदस्य ते एक प्रमुख नेता, ज्युईश एजन्सीच्या राजकीय विभागाची प्रभारी प्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या लीलया पार पाडतानाच तिच्या नव्या राष्ट्राचा जन्म होत होता. ज्यू वंशियांचं इतक्या वर्षांचं नव्हे शतकांचं स्वप्न पूर्ण होत होतं. नव्या राष्ट्रासमोर सगळ्यात पहिली महत्त्वाची समस्या होती, ती पैशांची. मग अमेरिकेत जाऊन झंझावाती दौरे करून नव्या राष्ट्रासाठी निधी गोळा करण्याचे प्रयत्न तिने केले. आपल्या या नव्या राष्ट्राची जगाला ओळख करून देऊन सर्वाधिक निधी जमवल्याचा विक्रमही तिच्या नावे झाला. इकडे पक्षांतर्गत तिचं महत्त्व दिवसागणिक वाढत चाललं होतं. त्यातूनच ती पुढे सोव्हिएत रशियात इस्राएलची Minister of Plenipotentiary म्हणून सहा महिने काम करुन १९४९ पासून इस्राएलची सलग दोन टर्म श्रम आणि रोजगार मंत्री , त्यानंतर दोन टर्म जगातली पहिली महिला परराष्ट्र मंत्री म्हणून पद भूषवल्यानंतर निवृत्तीचा विचार करत असताना पक्षातल्या लोकांच्या आग्रहाखातर वयाच्या सत्त्तराव्या वर्षी देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेली ही स्त्री! एकीकडे कॅन्सर सारख्या रोगाचा शरीर सामना करत होतं आणि दुसरीकडे त्या पाच वर्षांच्या काळात युद्ध, धाडसी कारवाया, दैदिप्यमान विजय, पराभव, तह, कौतुक, अपमान, निंदा असं सारं काही तिने अनुभवलं. आणि १९७४ ला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजकारणातून ती निवृत्त झाली. त्याहीनंतर देशी विदेशी निधी संकलन, इस्राएलची प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर तिची उपस्थिती कायम होतीच. आणि अवघ्या चार वर्षांतच म्हणजे सन १९७८ ला तिने अखेरची विश्रांती घेतली आणि हे अशांत वादळ कायमचं शांत झालं! 

गोल्डा मेयर यांच्याबद्दल जाणवलेले काही खास गुण म्हणजे त्यांचा समाजवादावर किंबहुना ज्या चळवळीतून त्या पुढे आल्या, त्या तत्वप्रणालीवर असलेला अढळ विश्वास, धडाकेबाज वृत्ती, कमालीची साधी राहणी, सगळ्यांचं सगळं ऐकूनच स्वतःचं मत बनवणं आणि त्या मतावर सदैव कायम राहण्याची वृत्ती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी होलोकॉस्टमधून बाहेर पडलेल्या ज्यूंना काळजीपूर्वक मुख्य प्रवाहात सामावून घेतलं.जगातून कुठूनही एखादा ज्यू इस्राएलला येत असेल, तर तो विनासायास येथवर पोहोचून इथे रुळला पाहिजे; तसेच सर्वांच्या राहणीमान, रोजगार, शिक्षण, आरोग्य या गरजा पूर्ण होतील इकडे त्यांचा शेवटपर्यंत कटाक्ष होता. तितकंच अरब मजुरांच्या समस्यांबाबतही त्या संवेदनशील होत्या. पण हा देश ज्यूंचा आहे, आणि ज्यूंची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सर्वतोपरी हे धोरणही त्यांचं पहिलं आणि अंतिम धोरण होतं. स्त्री म्हणून कोणतीही चाकोरी मान्य न करणाऱ्या मेयरबाई स्वतःला स्त्रीवादी मात्र अजिबातच म्हणवून घेत नसत, हेही विशेष!  एखादी गोष्ट मिळवण्यासाठी माझं स्त्रीत्व नव्हे, तर माझं कर्तृत्व हा एकमेव निकष असावा, हा त्यामागचा विचार. एकीकडे मोसादसारख्या प्रचंड धाडसी संघटनेवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकणाऱ्या मेयरबाईंना बुद्धिवादी लोकांचा मात्र मनापासून तिटकारा होता. त्यांच्या सडेतोड वाणीचा प्रत्यय त्यांनी वेळोवेळी लोकांना दिला होता.युद्ध नको शांततेची बोलणी करा अशा आशयाच्या प्राध्यापक समूहाच्या एका पत्राला " हस्तिदंती मनोऱ्यात बसून शिकवणाऱ्या या प्राध्यापकांना देश कसा चालवायचा हे कूठे माहीत आहे?" हे जाहीर उत्तर त्यांनी दिलं होतं. स्त्रियांवर होणारे अत्याचार टाळण्यासाठी स्त्रियांनी उशिरा घराबाहेर पडू नये, अशी सूचना काही पुरुषांनी मांडताच , " अत्याचार करणारे पुरुषच असतात, मग अशी बंदी त्यांच्यावर घालायला हवी" , किंवा जगतली पहिली महिला परराष्ट्रमंत्री झाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय, या प्रश्नाला " मी कधीच पुरुष नव्हते, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही" हे उत्तर अशी अनेक उदाहरणं देता येतील. सहज त्यांच्या quotes जरी गूगलवर पाहिल्यात, तरी या आजीसारख्या दिसणाऱ्या बाई किती unfiltered होत्या, त्याचा प्रत्यय येईल. 

पुस्तकाबद्दल बोलायचं झालं, तर सर्वात आधी या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर मॅडमचे आणि त्यांना हे पुस्तक लिहिण्याची सुचना ज्यांनी केली त्या मनोज आचार्यांचे मनापासून आभार मानावे, तितके थोडे आहेत. त्यांच्यामुळे मराठी वाचकांना हे इतकं अभ्यासपूर्ण आणि balanced चरित्र वाचायला मिळालं आहे. balanced असं मी का म्हणते आहे, ते सांगते. ज्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं, त्याचा अभ्यास करताना लेखकाला तो चरित्र नायक किंवा नायिका व्यापून टाकत असतो. त्यात हे एका अभ्यासू स्त्रीने लिहिलेलं दुसऱ्या एका कर्तृत्ववान स्त्रीचं चरित्र.त्या प्रभावाने भारावून जाणं हे अनिवार्य आणि अटळ असलं, तरी त्या प्रवाहात वाहवत जाण्याचा अगर तटस्थ राहण्याचा निर्णय मात्र लेखकाचा असतो. वाहवत जाणं कधीही सोपं, पण तटस्थ राहणं केव्हाही अवघड असतं. ती किमया वीणाताईंनी साधली आहे, याचं कौतुक करावं तेवढं थोडं! उदात्तीकरण नाही पण कमी लेखणंही नाही, अंगभूत गुणांचं कौतुक करताना स्वभावातील दोषांकडे डोळेझाक नाही, चरित्र नायक मोठा म्हणून त्याच्या बरोबरीचे क: पदार्थ असंही लेखनात कुठेच जाणवत नाही. अशा तऱ्हेची चरित्रं मराठीत किती आहेत, हा प्रश्न ज्या त्या वाचकाने स्वतःला विचारून पहावा. त्यामुळेच गोल्डा बाई सच्च्या आणि धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या, पण मुत्सद्दी नव्हत्या, हे लेखिका दाखवू शकल्या आहेत. मेयरबाईंचा स्पष्टवक्तेपणा, नमतं न घेण्याची वृत्ती नेता म्हणून त्यांना वेगळं ठरवत असले, तरी हेच गुण परराष्ट्र मंत्री असताना त्यांचा एक weak point ठरले, हेही वाचताना जाणवतं. म्हणजे मुत्सद्देगिरी करून आपल्याला हवं ते पदरात पाडून घेण्यापेक्षा समोरच्याला धारेवर धरुन, आपल्या न्याय्य मागण्यांचा सातत्याने समोरच्यावर भडिमार करून ती मागणी मान्य करूनच घ्यायची, हा त्यांचा एकंदर शिरस्ता वाचकांना लक्षात येईल अशा रीतीने हे लिखाण आहे. त्यामुळे हे चरित्र रुक्ष, टीकात्मक न होता माहितीपूर्ण आणि वाचनीय झालं आहे.इस्राएलची कोणतीही माहिती नसलेला वाचकसुद्धा हे लिखाण तितक्याच सहजतेने वाचू शकेल, अशा रीतीने योग्य ते संदर्भ देऊन या चरित्राची मांडणी केली आहे. गोल्डांच्या वैयक्तीक आयुष्यातील चढउतार, होलोकॉस्ट, हिटलर, योम किपूरचं युद्ध अशा अनेक टप्प्यांवर हे लिखाण काहीसं भावनिक होऊ शकलं असलं, पण वीणाताईंनी नायिकेच्या भावविश्वापेक्षा तिच्या कर्तृत्वाला अधिक महत्त्व दिलं आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हे लिखाण चरित्र म्हणून वाचनीय झालं आहे. 

चूल आणि मूल हीच स्त्रीची दोन आघाडीची क्षेत्रे, असं नेहमी म्हणतात. स्त्रीवादी चळवळ हे कितीही नाकारत असली, तरी यातून स्त्रीची सुटका नाही आणि तशी ती व्हावी असं प्रत्येक स्त्रीला वाटेलच, असंही नाही. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणाऱ्या पण स्त्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेल्या गोल्डाही याला अपवाद नाहीत. जेव्हा त्या केबिनमध्ये नसत, तेव्हा किचन मधे स्वतःच्या हाताने नवे नवे पदार्थ करुन मुलांना, स्टाफला, ड्युटीवरच्या गार्डसना इतकंच नाही तर कॅबिनेट मधले मंत्री, परदेशातून आलेले राजदूत अशा सर्वांना ते रांधायला त्यांना मनापासून आवडत असे. फक्त महत्त्वाचा फरक हाच, की त्यांच्या या किचनमधे जसे वेगवेगळे पदार्थ शिजत, तशीच इस्राएलच्या सुरक्षेपासून परराष्ट्र धोरणापर्यंतची राजकारणंही शिजत होती. खऱ्या अर्थाने त्या किचन कॅबिनेट चालवत होत्या. "Make the most of yourself by fanning the tiny, inner sparks of possibility into flames of achievement" हा महत्त्वाचा संदेश देणाऱ्या गोल्डा एक कणखर नेता आणि कर्तृत्ववान स्त्री म्हणून कायमच सर्वांच्य स्मरणात राहतील. अशा स्त्रीचं इतकं सुंदर चरित्र मराठीत आणून वीणाताईंनी खऱ्या अर्थाने त्यांना ही आदरांजली वाहिली आहे, असं मी म्हणेन. वीणाताईंच्या इतर पुस्तकांप्रमाणेच हेही पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय आहे, हे नक्की. पुस्तकात सुरूवातीला दिलेली संदर्भ यादीतली पुस्तकं आणि मेयर यांचं My Life आता reading list मधे आहे! 

© नेहा ज्योती प्रदीप जोशी
  (१५.१२.२०२०)

गोल्डा: एक अशांत वादळ
लेखिका: वीणा गवाणकर
प्रकाशक: इंडस सोर्स बुक्स
पृष्ठ संख्या: ३१४
मूल्य : ४९९ /- 

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार