रत्नप्रतिमा: शशी भागवत
"इतिहासपुरुष पृथ्वीवरील जल- स्थळाला व्यापून सुंदरपणे पसरला आहे. ढोसल्या- टोचल्यावाचून त्या निद्रिस्थ महापुरुषाच्या मुखातून साधा हुंकारही बाहेर पडत नाही. घडत्या घटना आणि अनंतकाळ उदरस्थ करीत हा क्षुधेने झपाटलेला दैत्य असाच रवंथ करीत शतकानुशतके पडून राहिला आहे, राहणार आहे.
अशाच कधी काळी काळाने लवंडल्या- सांडलेल्या आणि इतिहासाने शोधून घेऊन उदरस्थ केलेल्या व्यक्तींची, त्यांच्या भोवतीच्या घडलेल्या अद्भुत, रहस्यमय आणि रोमांचकारी घटनांची ही कथा सत्यासत्याचा कस लावण्याचा उपद्व्याप कोणी करु पाहील, त्या इतिहासपुरुषाला ओरबाडून जागे करू पाहील, तर त्याचीच नखे रक्तबंबाळ झाल्यावाचून राहणार नाहीत. कारण सत्याचा एक कणही इतिहासाने लेखकाला दिला नाही. कल्पनेच्या तीक्ष्ण नखांनी इतिहासपुरुषाच्या कुशीत गुदगुल्या केल्यावर तो विराट पुरुष क्षणभरच गदगदून हसला आणि त्यातून साकार झाली ही विलक्षण ' रत्न- प्रतिमा !'..."
अशी भारदस्त सुरूवात आपल्याला एका अनोळखी गूढ वातावरणात सहज घेऊन जाते.नात्यांची विलक्षण गुंतागुंत, ताणलेले -दुरावलेले नातेसंबंध, विलक्षण साहस, राज्यांतर्गत कुरबुरी, कट कारस्थानं, गुप्त मोहिमा याचबरोबर एका मूर्तीचा शोध, त्यातून होणारा रक्तपात, योग - मंत्रविद्या, विषकन्या, चोर- हेरांची ऐयारांची अद्भुत कामगिरी अशा अनेक रहस्योत्पादक घटकांची जमलेली भट्टी म्हणजे शशी भागवत लिखीत रत्नप्रतिमा.
मर्मभेद या प्रचंड लोकप्रिय आणि सर्व स्तरांतून नावाजल्या गेलेल्या रहस्यपूर्ण कादंबरीच्या यशानंतर तब्बल दहा वर्षांनंतर वाचकांच्या भेटीला आलेली ही दुसरी रहस्यमय कादंबरी. एका राज्यातील मान्यवर सामंत घराण्यांमधे आणि सरदारांमध्ये चाललेल्या संघर्षाची ही गोष्ट आहे. आणि या संघर्षाचं कारण राज्यलालसा नाही. कारण आहे ती अष्टभुजा देवीची एक रत्नजडीत मूर्ती. सामंत कनकधर यांच्या घरातील पिढीजात पूजली गेलेली ही मूर्ती. ही मूर्ती घरात असेतोवर या सामंत घराण्याची प्रचंड भरभराट झाली होती. पण पुढच्या काळात घरच्या कर्त्या पुरूषाच्याच हातून ही मूर्ती या घरातून बाहेर गेली. तेव्हापासूनचा इतिहास असा, की सामंत घराण्याव्यतिरिक्त ज्या ज्या व्यक्तीकडे ती मूर्ती गेली, त्यांची वाताहत होऊन पुढे त्या माणसांचा भीषण अंतही झाला आहे. हा सगळा इतिहास राज्यात प्रत्येकाला माहीत असूनही राज्यातल्या प्रत्येक मान्यवर व्यक्तीला ती मूर्ती काहीही मिळवायची आहे. त्यातून पुढे अनेक कट रचले जातात, अनेकांचा या सगळ्यात अंत होतो. मग शेवटी ही मूर्ती तिच्या मूळ स्थानी जाते की अजूनच काही होतं, ते कादंबरी वाचूनच समजेल.
महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक गोनीदांनी या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे. या छोटेखानी प्रस्तावनेत त्यांनी मराठी साहित्यातील अशा प्रकारच्या पूर्वी लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांचा आढावा घेऊन या कादंबरीचं वेगळं स्थान अधोरेखित केलं आहे. एक प्रस्थापित लेखक एका नवोदित लेखकाचं कौतुक किती मनापासून करु शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही प्रस्तावना! रत्नगुप्त, कालशृंग, अनंगपाल, कात्यायन, भद्रंभद्र, कनकधर- स्वरूपलक्ष्मी, काल कन्या, सामंत चंद्र चूड, लुब्धक- विघ्नांत, सम्राट अजयप्रताप, प्रतिमागौरी, विलंची ही नामावली आणि भागवतांची भाषाशैली आपल्याला सहजगत्या त्या कालखंडात घेऊन जाते. काही शब्द फार क्लिष्ट तर कथेच्या ओघात आलेले घटना आणि नातेसंबंध इतके गुंतागंतीचे आहेत, की ते समजून घेताना वाचकाला पूर्ण लक्ष एकाग्र करावं लागेल. पण कथा आपल्या मनाचा ताबा घेण्यात यशस्वी ठरते, हे निःसंशय!
विलंची आणि अनंगपाल ही या कादंबरीतील दोन विलक्षण पात्रं मला सगळ्यांत जास्त आवडली. खरं तर ही मुख्य पात्रं नाहीतच, पण हे दोघे इतके प्रभावी आणि अवली आहेत, की यांच्या आज्ञा आणि कृती मुख्य पात्रांनाही नियंत्रित करु शकतात. याही कादंबरीत अनेक अद्भुत कामगिऱ्या पार पाडणारे ऐयार अर्थात हेर इथेही आहेत.दुय्यम पात्रांमधून मुख्य पात्रांची ओळख अशी शैली यावेळी लेखकांनी वापरली आहे. त्यामुळे मुख्य पात्रं थेट आपल्यासमोर फारच कमी वेळा येतात. इतर पात्रं जे पाहतात, जे करू पाहतात, त्यातूनच मुख्य पात्रांबद्द्ल आपल्याला माहिती मिळत जाते. त्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही, यातून कथेचं गूढ वाढत जातं. Story within the story अशीही कथासूत्रं आहेत. मराठीतल्या मोजक्या पण दर्जेदार रहस्य कादंबऱ्यांमधे या कादंबरीचा समावेश नक्कीच करावा लागेल. रहस्य कथा वाचायला आवडत असतील किंवा तसं काही वाचायची इच्छा असेल, तर आवर्जून वाचावी, अशी ही कादंबरी- रत्नप्रतिमा !
वाचकांसाठी टीप: जर मर्मभेद आणि रत्नप्रतिमा अशा दोन्ही कादंबऱ्या उपलब्ध झाल्या, आणि दोन्ही वाचून झाल्या नसतील, तर आधी रत्नप्रतिमा आधी वाचून मग मर्मभेद वाचणं, केव्हाही उत्तम. कारण रत्नप्रतिमा ही एका राज्यात चाललेल्या अंतर्गत राजकारणाविषयी आहे. तर मर्मभेद दोन राज्यांमध्ये चाललेल्या सत्ता संघर्षावर आधारीत आहे. चढत्या भाजणीने उत्कंठा वाढवणारा वाचनानुभव घ्यायचा असेल, तर रत्नप्रतिमा आणि मग मर्मभेद हा क्रम योग्य आहे. आणि तुलनेत मर्मभेद केव्हाही अव्वल दर्जाची आहे.
रत्नप्रतिमा
लेखक: शशी भागवत
प्रकाशक: सायली प्रकाशन
पृष्ठ संख्या: ४६४
किंमत: ४६० /-
© नेहा ज्योती प्रदीप जोशी
( २८.१२.२०२०)
Comments
Post a Comment