महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत: मराठी अनुवाद शांता ज. शेळके
#मेघदूत
#मराठी_मेघदूत
#कविकुलगुरू_कालिदास
#शांता_शेळके
#rediscovering_the_Classics
(पोस्ट थोडी मोठी असणार आहे,
वेळ काढून मन लावून वाचा!)
महाकवी श्री कालिदासाचे मेघदूत:
मराठी अनुवाद शांता ज. शेळके
- अभिजात संस्कृत साहित्याला मराठीची अजरामर मानवंदना!
"That praises are without reason lavished on the dead, and that the honours due only to excellence are paid to antiquity, is a complaint likely to be always continued by those, who, being able to add nothing to truth, hope for eminence from the heresies of paradox; or those, who, being forced by disappointment upon consolatory expedients, are willing to hope from posterity what the present age refuses, and flatter themselves that the regard which is yet denied by envy, will be at last bestowed by time..."
Preface to Shakespeare या आपल्या टीकात्मक निबंधात डॉ. सॅम्युएल जॉन्सन यांनी सुरुवातीलाच ," हॅ , काय ते जुनं पुराणं outdated साहित्य वाचता?" , या कुत्सित शेऱ्याला दिलेलं हे सणसणीत प्रतिउत्तर आहे. शेक्सपिअरच्या साहित्याइतकीच अजरामर अशी त्याच्या साहित्याची प्रिफेस किंवा चिकित्सा लिहिताना जॉन्सन यांनी जुन्या साहित्याच्या लोकमान्यता आणि लोकप्रियतेवर आक्षेप घेणाऱ्या "मॉडर्न" प्रवृत्तीचा समाचार घेताना, "जे आज किंवा भविष्यात स्वतःचं असं काही निर्माण करू शकत नाहीत, जे आज नाही तरी किमान भविष्यात तरी आपल्या लिखाणाला कोणीतरी विचारेल ही भाबडी आशा मनी बाळगतात, असेच लोक खूपदा अभिजात साहित्यावर टीका करायला आघाडीवर असतात", असं म्हटलं आहे. पुढे याच प्रीफेसमधे चांगल्या साहित्याची परीक्षा घेण्याकरता त्यांच्यामते सर्वोत्तम निकष हा की, " no other test can be applied than length of duration and continuance of esteem." म्हणजेच किती कालावधीपर्यंत आणि किती सातत्याने एखादं साहित्य नावाजलं जातं, त्यावरून त्या साहित्याच्या चांगल्या किंवा सुमार किंवा वाईट असण्याची परीक्षा होत असते.
प्रत्येक साहित्याकृतीचं आयुष्य वेगळं असतं. काही लिखाण एक दोन वर्षेच टिकतं. नव्या काळानुसार नव्याने आणि वेगाने बदलत जाणाऱ्या आयुष्याचा वेध घ्यायला ते असमर्थ ठरतं. काही लिखाण ते जेव्हा लिहिलं गेलं ते दशक किंवा शतकही गाजवतं. एका सबंध पिढीवर त्या लिखाणाचे संस्कार झालेले असतात. चांगल्या साहित्याचा मुख्य निकष हाच आहे, की ते स्थळ, काळ, भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती हे सारे टप्पे पार करत कोणत्याही काळात तितकंच सतेज आणि प्रस्तुत राहतं. उदाहरणार्थ, जगभरात ज्याच्या नावाचा डंका आजही तितक्याच जोशाने वाजतो, तो शेक्सपियर! सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात त्याने जे लिहून ठेवलं आहे, ते आज एकविसाव्या शतकातही तितक्याच ओढीने आणि चवीने वाचलं जात आहे. माझ्यासारख्या लिटरेचर स्टूडंटचा तर तो जिवलग लेखक, पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. पण तो तिकडचा आहे, म्हणजे दुसरीकडचा आहे, मग आपल्याकडे काय कोणी लिहिलंच नाही का? असा वितंडवाद घालणारे अनेक माथेफिरू स्वतःला वाचक म्हणवून घेत असतात. याला उत्तरदाखल इतकंच सांगेन, की लिहिणारा कोणीही असला, तरी त्या साहित्याच्या वाचनातून, सहवासातून उत्पन्न होणारा आनंद ही कोण्या एका भाषेची अगर भाषिकाची मक्तेदारी नसते. आपल्याकडेही अजरामर साहित्य निर्माण झालं आहेच, पण इतरत्र नावाजलं गेलेलं, नावाजलं जाणारं हे साहित्य सुंदर आहे, कालातीत आहे, हेही तितक्याच खुलेपणाने मानता आलंच पाहिजे. कारण आपले विंदाही सांगून गेले आहेत,
" उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा
श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा!"
तर "तिकडचा" शेक्सपिअर जसा शतकोत्तरही टिकून आहे तर मग "इकडचा" कोण, अशी चर्चा तरीही पुढे रेटायची असेल, तर बरीच नावं सांगता येतील. मराठी साहित्यात अगदी निर्विवाद असं संत साहित्य आहे, जे पिढ्याच काय शतकं ओलांडूनही सहज पार होईल, झालं आहे. संस्कृत साहित्य तर रत्नांची खाण आहे. भारतीयांना एकवेळ नसेल इतकी या साहित्याची गोडी आज परदेशातल्या लोकांना आहे. आणि या संस्कृत साहित्याच्या आकाशगंगेतला 'तेजोनिधी लोहगोल ' जर कोणी असेल तर तो आहे, कवीकुलगुरु श्री कालिदास!
चौथ्या किंवा पाचव्या शतकातील उज्जैन नगरीच्या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबाराचा हा राजकवी. शेक्सपिअर आणि कालिदास या दोघांमध्ये त्यांच्या कालातीत साहित्याबरोबरच तशा बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत, उदाहरणार्थ ही एकच व्यक्ती आहे की अनेक, पूर्वायुष्य, वैयक्तिक आयुष्याबद्दल असणारे वादविवाद. कालिदासाची एक रंजक दंतकथा इथे सांगायचा मोह आवरत नाही. एका हुषार, विद्वान अशा विद्योत्तमा नावाच्या राजकन्येला स्वतःसाठी अनुरूप वर शोधायचा होता. पण तो तिला तिच्या राज्यात कुठेच सापडला नाही. अनेक तरुणांची तीने परीक्षा घेतली, पण त्या सर्वांनाच नापसंत केलं, मंत्र्यांचाही अपमान केला. या सगळ्याचा सूड म्हणून लोक त्याच राज्यातल्या एका सामान्य पण अगदीच अजागळ, मूर्ख आणि बावळट असणाऱ्या मेंढपाळाला तिच्यापुढे घेऊन गेले. काही गोष्टींनुसार याच भेटीत तर काहींच्या मते त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी राजकन्येला हा माणूस वास्तविक किती बिनडोक ध्यान आहे, ते लक्षात आलं आणि तिने त्याचा अगदी जिव्हारी लागेल इतका सणसणीत अपमान केला. आणि याच अपमानाने पेटून उठून तो तडक कालिमातेच्या मंदिरात पोहोचला, आणि देवीच्या साक्षीने त्याने अध्ययनाला सुरुवात केली. शास्त्रं, पुराणं, इतर संस्कृत साहित्याचा त्याने खच्चून अभ्यास केला आणि त्यानंतर त्याच्या काव्यवेलीवर अनंत काळासाठी वसंताचा बहार आला! असा हा कवी पुन्हा त्या राजकन्येच्या भेटीला गेला. तिला तो येत असल्याची पूर्वसूचना मिळाली असल्याने तिने बंद दाराआडूनच त्याला विचारलं, " अस्ति कश्चित् वाग्विशेष:?" ( तुुझ्या वाणीत काही सुधारणा आहे का? / बोलण्यासारखं काही विशेष आहे का?) याला उत्तर म्हणून त्याने या तीन शब्दांपासून सुरु होणारी तीन काव्यं तिथल्या तिथे रचून तिला ऐकवून दाखवली. अस्ति पासून सुरु झालं ते "अस्त्य् उत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज:..." म्हणजेच कुमारसंभवम, वाग्विशेष: पासून सुरु झालं ते "वागार्थविव..." अशी सुरुवात असलेलं रघुवंश, आणि मधल्या कश्चित् शब्दाने "कश्चित्कांताविरह..." या ओळीने सुरु होणारं अजरामर दूतकाव्य म्हणजे मेघदूत आणि हा कवी म्हणजे कालिदास!
बाकी तुलना करताना या दोघांनी रचलेल्या साहित्याची एकूण संख्या हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. आपल्या शेक्सपिअर सरांनी एकूण कॉमेडी आणि ट्रॅजेडी धरून ३९ नाटकं आणि डार्क लेडी आणि फेअर युथला उद्देशून लिहिलेली अशी मिळून १५४ साॉनेट्स लिहीली आहेत. आणि पुन्हा आपल्याच कालिदासांचं सध्या उपलब्ध असलेले साहित्य म्हणजे- रघुवंश, कुमारसंभवम ही दोन महाकाव्यं, ऋतुसंहार आणि त्याने स्वतः निर्माण केलेला काव्याचा नवा प्रकार म्हणजे मेघदूत नावाचं दूतकाव्य अशी दोन खंडकाव्यं, आणि अभिज्ञान शाकुंतलम, विक्रमोर्वशीय, आणि मालविकाअग्निमित्रम ही तीन नाटकं! या तीन नाटकांतलं शाकुंतलम अर्थात् दुष्यंत आणि शकुंतलेची गोष्ट आज जगभरातल्या सर्व प्रमुख भाषांत अनुवादित झाली आहे. हेच शाकुंतल डोक्यावर घेऊन पुन्हा आमचाच (weil Ich lerne Deutsch!), मराठीत ज्याला गटे म्हणतात, ज्याचा उच्चारात ग्योथे होतो आणि ज्याचं खरं नाव ग्योट्टं असं आहे, तो नाचला होता आणि त्यानेच पुढे शाकुंतल जर्मन भाषेत अनुवादित केलं.
कालिदासाच्या नाटकांत शाकुंतल आणि काव्यांत मेघदूत सर्वाधिक वाचलं गेलेलं, नावाजलं गेलेलं आणि अनुवादित झालेलं काव्य आहे. अगदी सर्व प्रमुख भारतीय भाषांत त्या त्या भाषेतील विद्वान कवींनी मेघदूताचा अनुवाद केलेला आहे. उदाहरणार्थ, जोगिंदरनाथ मुजुमदार(बंगाली), आचार्य धर्मानंद जमलोकी (गढवाली), मोतीलाल उपाध्याय (भोजपुरी), कंदरप पटेल (गुजराती), नागार्जुन ( हिंदी) इत्यादी. मराठीचा विचार करता अभिमान वाटावा इतकी नेत्रदीपक आणि सुखद कामगिरी आपल्याकडे काव्याच्या क्षेत्रातल्या अनेक रथी-महारथींनी करून ठेवली आहे.
कृष्णशास्त्री चिपळुणकरांनी 'मेघदूत' प्रथम मराठीत आणले. चिंतामणराव उर्फ सी. डी. देशमुखांसारख्या आधुनिक विद्यावेत्त्यांबरोबरच बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, वसंत बापट आणि शांता शेळके या श्रेष्ठ कवींनीही 'मेघदूता'चा अनुवाद करत मराठीचं काव्यावैभव कैक पटीने वाढवून ठेवलं आहे.
जगभरात शतकानुशतकं सगळ्यांना वेड लावणाऱ्या मेघदूत म्हणजे नक्की आहे तरी काय, ते आधी पाहूया. हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन भागांत विभागलेलं आहे. मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलकानगरीत राहणारा यक्ष कुबेराचा एक सेवक आहे. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. ब्रम्हवैवर्त पुराणात यक्ष आणि यक्षिणीची हेममाली आणि विशालाक्षी अशी नावं आलेली आहेत. हद्दपारीचे ठिकाण अलकानगरीपासून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरी' पर्वत हे आहे. त्या ठिकाणी बरेच महिने यक्ष(बहुतेक आठ) पत्नीपासून दूर राहिला आहे. या यक्षाच्या सर्व सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. अशातच वर्षाऋतू सुरू झाला आणि या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या. अशा परिस्थितीत आषाढातील एखाद्या हत्तीसारख्या भव्य मेघाला पाहून यक्ष त्यालाच आपला संदेश वाहक करतो. यक्षाने मेघाला दूर हिमालयातील आपल्या प्रिय पत्नीकडे आपला संदेश घेऊन जाण्यासाठी सांगितलेला आपल्या घराचा पत्ता असेच मेघदूताचे स्वरूप आहे. प्रथम रामगिरीपासून अलकानगरीपर्यंत जाणार्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात आली आहे.
मराठीत याचा अनुवाद करताना शांता शेळके यांनी प्रस्तावनेत त्यांचं मेघदूत प्रेम प्रकट केलं आहे. शाळा आणि कॉलेज जीवनात हे काव्य पुन्हा पुन्हा त्यांच्या वाचनात आलं असल्याने ते सतत मनात घोळत राहिलं, आणि त्यांनी हळूहळू एक एक श्लोकाचा मराठी अनुवाद करायला सुरुवात केली. केवळ संस्कृत साहित्याची आवड आणि श्री कालिदासाबद्दल वाटणाऱ्या पराकोटीच्या कौतुकातून त्यांनी हा अनुवाद केला आहे. त्यात त्यांनी आपल्या या लिखाणाचा हेतू स्पष्ट करताना दिलेला उतारा इथे मुद्दाम देत आहे. " अनुवाद करणं हा माझा आनंद आणि छंद आहे. अनुवाद करून बघणे हा मूळ कलाकृतीचा अधिक उत्कटपणे रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे. निदान मला तरी अनुवादाच्या निमित्ताने आवडत्या ' मेघदूता'शी जास्त जवळीक साधता आली, असे वाटते. माझा अनुवाद सरळ, साधा, ' पादाकुलका' सारख्या प्रवाही छंदात केलेला आहे. तो करताना मुळातील आशयाला, रसवत्तेला हानी पोहोचू नये, याची मी शक्य तेवढी काळजी घेतली आहे. मुख्य म्हणजे, माझ्या पदरचे त्यात काहीही, कुठेही घालण्याचे धार्ष्ट्य मी केले नाही. ' मेघदूता' चे दर्शन न घेतलेल्या वाचकांना या अनुवादामुळे मुळच्या संस्कृत काव्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, एवढीच माझी नम्र अपेक्षा आहे. तसे झाले, तर मला अतिशय आनंद होईल."
पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, मूळचं काव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असं दोन भागांत विभागलेलं आहे. पूर्वमेघाची सुरुवातच,
कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:
शापेनास्तड्ग़मितमहिमा वर्षभोग्येण भर्तु: ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।।
या श्लोकाने झाली आहे. यक्षाला का आणि कसा शाप मिळाला आणि तो सध्या कुठे आहे, इतकीच मोजकी माहिती काव्यात सुरूवातीला दिलेली आहे. याचा शांता शेळके यांनी केलेला अनुवाद असा,
कुबेरसेवक यक्ष एक कुणि सेवेमाजी आपुल्या चुकला
प्रियावियोगे अधिकच दु:सह वर्षाचा त्या शाप मिळाला
जनकसुतेच्या स्नानांयोगे पावन झाले जिथे जलाशय
घनच्छाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय
अशा अवस्थेत दिवस कंठत असताना तो आपल्या पत्नीच्या आठवणीत इतका कृश झाला आहे, की त्याच्या हातातील सुवर्ण कंकणही गळून पडले आहे! आणि अशातच आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी त्याला पर्वतशिखरावर एक मेघ दिसला. या मेघाकरवीच किमान आपल्या प्रियेसाठी आपलं कुशल सांगणारा एखादा संदेश पाठवावा, असं यक्षाच्या मनात येतं. मुळात मेघ म्हणजे ढग ही निर्जीव, अचेतन गोष्ट आहे, त्याला दूत करण्याची कल्पना यक्षाच्या मनात आली, यावरूच त्याची मानसिक स्थिती किती दोलायमान झाली असेल, याचा अंदाज करता येईल. इथे शांताबाईंनी रचलेला श्लोक असा,
धूर, वीज अन् पाणी,वारा यांही बनला मेघ कुठे तो?
संदेशाते वाहून नेइल सजीव मानव आणि कुठें तो?
अवगणुनी हे आतुरतेने यक्ष घनातें करी याचना,
सजीवनिर्जिव विवेक यांतिल कुठून रहावा प्रणयार्तांना?
नंतर मेघाचं यथोचित स्वागत करून यक्ष त्याला आपला संदेश आपल्या पत्नीपर्यंत पोहोचवण्याची विनंती करतो. पुढे पूर्वमेघ या भागात वाटेत मेघाला काय काय पहायला मिळेल, त्याने कोणत्या दिशेने मार्गक्रमण करावे, हे यक्ष अगदी विस्ताराने आणि सगळ्या बारकाव्यांसकट सांगतो. उत्तरमेघ हा भाग मेघाला प्रत्यक्ष अलकानगरीत काय पहायला मिळेल, त्याने यक्षयक्षिणीचं घर कसं ओळखावं, त्यासाठी आठवतील तितक्या सगळ्या खाणाखुणा यक्ष मेघाला सांगतो आहे. यक्षाची पत्नी दिसल्यावर मेघाने काय करावं, कशा प्रकारे आणि काय स्वरूपात संदेश द्यावा, हेही तो अगदी सखोल विचार करून सांगतो. हे सारं सांगून झाल्यावर शेवटी तो मेघाला त्याने अशी याचना करणंच मुळात चूक आहे, याची त्यालाही पुरती जाणीव असूनही तो आपली हतबलता पुन्हा एकदा मेघापुढे
प्रकट करतो आणि मेघाला निरोप देतो.
मेघदूतमधे अत्युच्च पातळीवरची भावनिक संवेदना आणि वास्तवाचं भान याचा उत्तम परिपाक यक्षाच्या व्यक्तिमत्त्वात म्हणजेच कालिदासाच्या काव्याशैलीत मुख्यत्वे दिसून येतो. आपल्या प्रिय पत्नीच्या आठवणीत आसवं गाळणारा, खंगलेला यक्ष एका निर्जीव मेघाशी संवाद साधतो, त्याला आपला दूत बनवतो. आपल्या पत्नीबद्दल बोलत असताना तर त्याला काय बोलू आणि किती बोलू असं होतं आहे. असं असलं तरीही तो मार्ग सांगताना मात्र पूर्ण भानावर आहे. मेघाने कोणत्या वाटेने जावं, त्या मार्गात त्याला काय पहायला मिळेल, त्याने प्रवास करत असताना काय काय करावं, जाता जाता कुणा कुणाला मदत करावी, कुठे कुठे विश्रांती घ्यावी, हे तो न चुकता काळजीपूर्वक सांगतो आहे. पुन्हा उत्तरमेघातही अलकानगरीचं मनोहर वर्णन करताना त्याचं घर नेमकं कुठल्या दिशेला आहे, ते ओळखण्यासाठीची खूण, आजूबाजूचा परिसर याचं आठवून नीट वर्णन सांगतो आहे. पण मेघाला आपली पत्नी दिसल्यावर त्याने काय करावं हे सांगताना मात्र तो किती हळवं आणि व्याकूळ होऊन तीची आठवण काढतो आहे, हेही जाणवल्यावाचून राहत नाही. तिचं वर्णन करताना तर त्याने कोणताही सौंदर्यवाचक शब्द शिल्लक ठेवलेला नाही!
तनु सडपातळ, दांत रेखिले, ओठ सुरेख जणुं पिकें तोंडले,
बारिक कंबर, सखोल नाभी, भ्याल्या हरिणीसमान डोळें,
पृथुलनितंबा मंदगामिनी, स्तनभारानें किंचित लवली,
स्त्रीरुपाची पहिली प्रतिमा काय विधीनें गमे घडविली!
स्त्रीचं इतकं सुंदर वर्णन मी तरी याआधी कधीच वाचलेलं नाही ! बाकी इतर सगळ्या साहित्यातून आपण प्रियकराच्या आठवणींत रमणाऱ्या प्रिया खूप पाहिल्या असतील, पण आपल्या प्रियेच्या विरहात खंगलेला यक्षासारखा नायक विरळाच! कालिदासाच्या प्रतिभेने जन्माला घातलेल्या या यक्षाच्या ठायी वसणारं हे अमोल सौंदर्य शांताबाईंनी अचूक हेरून ते अजूनच खुलवलं आहे.
इथे कालिदासाच्या काव्यातले दोन विशेष मला ठळकपणे जाणवले. पहिला विशेष गुण म्हणजे भावना आणि वास्तवाचं समीकरण उत्तम साधलं आहे. मुळात लोकं प्रेमात फार फार तर कबुतरं, दमयंतीसारखं कुणी राजहंस वगैरे मंडळींना उडायला लावतात. कालिदासाने तर चक्क एका ढगाला उडवलं आहे! या काव्याला अद्भुततेचा असा एक रंग याचमुळे चढला आहे. पण भौगोलिक, नैसर्गिक तथ्यांशी मात्र कुठेही छेडछाड केलेली नाही, उलट या बाबतीत त्याला किती निर्दोष आणि सुसंगत माहिती होती, हेच त्याने प्रकट केलं आहे. मालप्रदेश, दशार्ण, विदिशा, अवंती, उज्जैन, दशपुर, ब्रम्हावर्त, कुरुक्षेत्र, कनखल या प्रदेशांचं दिशा वगैरे विचारात घेऊन उत्तम वर्णन केलं आहे. त्याचबरोबर रामगिरी, आम्रकूट, विंध्याचल, देवगिरी, हिमालय, क्रौंच, कैलास हे पर्वत तसेच रेवा, वेत्रवती, निर्विंध्या, सिंधू, क्षिप्रा, गंधवती, सरस्वती, चर्मण्वती, गंभीरा, गंगा या नद्यांचंही वर्णन आलं आहे. कुडीची फुलं, हिरवी पिंगट नीप फुलं, रानकर्दळ, कदंब, केवडा, जुई, कमळ, जास्वंद, कुंद, लोध्र, कोरांटी, शिरीष, अशोक, केसरतरू, जाती अशी रामगिरी ते हिमालय प्रदेशात पाहायला मिळणारी फुलं ; रानकावळे, मोर ,बलाक, राजहंस, सारस, चक्रवाकी ,मैना हे पक्षी; हत्ती, हरणं,पाण्यातल्या मासोळ्या, साप, घोडे हे प्राणी; आंबा, जांभूळ, वेळू, रानउंबर, कल्पतरू,मंदार हे वृक्ष, रतिफल नावाची मदिरा, वैभ्राज नावाचे उपवन अशा असंख्य नैसर्गिक घटकांचा उल्लेख या काव्यात आढळतो. इंग्लिश कवितांमध्ये जॉन डनच्या मेटाफिझिकल कन्सीट्स शिकताना आम्ही " हा डन मनात आणेल तर दोन्ही hemisphere ही इकडचे तिकडे करून टाकेल," असं म्हणायचो! तसा वास्तवापासून दूर जाणाऱ्या अलौकिक रुपकांचा वापर मात्र कालिदासाच्या या लिखाणात चुकूनही सापडायचा नाही. कालिदासाने भलेही मेघाला संदेश घेऊन जायला लावलं असेल, पण जमिनीवरच्या वास्तवाचं पूर्ण भान त्याने कायम बाळगलं आहे.
उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम
दन्डिन: पदलालित्यम माघे सन्ति त्रयो गुणा:
संस्कृत साहित्यिकांचे विशेष गुण सांगताना नेहमी हा श्लोक सांगितला जातो. यात कालिदासाची खासियत म्हणून उपमा ( simile) चा उल्लेख आवर्जून केला जातो. मलाही मेघदूत वाचताना त्याचा जाणवलेला दुसरा विशेष गुण म्हणजे त्याने वापरलेल्या उपमा आणि त्याच्या शब्दांचं सामर्थ्य. मेघासाठी आणि यक्षपत्नीसाठी वापरलेल्या उपमा भाषासौंदर्याची वेगळीच प्रचिती देतात. सिंधू नदीचे कमी झालेले पाणी= बारीक वेणी, नदीवर झुकलेला मेघ= वसुधेच्या गळ्यातील इंद्रनील मण्याचा एकेरी सर, शुभ्र आकाशातील एकाकी मेघ- बळीचे नियमन करायला उचललेलं वामनरूपी विष्णूचं सावळं पाऊल, कैलास शिखरावरील बर्फ= सदाशिव शंकराचं निर्मळ हास्य, मेघ हिमालयातून पुढे जात असताना दिसणारा हिमालय= काळी कांबळ खांद्यावर घेतलेला गोरा बलराम, कृश झालेली यक्षाची निजलेली पत्नी= प्राचीवरती धूसर झालेली शशीची कोर, सखीचा लवलेला डोळा= मासळी पाण्यातून फिरताना विचलित झालेलं नीलकमल या उपमा म्हणजे शुध्द सोन्यासारख्या सुंदर आहेत. पण त्यातूनही कौस्तुभ मण्यासारखी झळकणारी, आणि मला प्रचंड आवडलेली उपमा ही:
आशातुर सोत्कंठ निरखिते पवनसुताते जशी जानकी
भरल्या ह्रदयें तशीच तुजला पाहिल माझी सखी लाडकी !
किंबहुना, श्रीरामांचा संदेश घेऊन लंकेकडे सीतामाईच्या दिशेने हनुमंताने केलेले उड्डाण यावरुच कालिदासाला मेघदूतची कल्पना स्फुरली असावी, असं म्हणायला पुष्कळ वाव आहे.
शब्दांचं सामर्थ्य यातून मला काय अभिप्रेत आहे, तेही आता सांगते. आषाढस्य प्रथमदिवसे ही ओळ आपण कालिदासाच्या संदर्भात कधीनाकधीतरी नक्की वाचली किंवा ऐकली असेलच. ती ओळ नक्की काय आहे, तेही आता पाहू.
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीय ददर्शं ।।
(आषाढाच्या पाहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वांकला
टक्कर देण्या तट भिंतीवर क्रीडातुर गज जणू ठाकला)
पूर्वमेघात दुसऱ्या श्लोकात ही ओळ आली आहे. नंतर पुढच्या काव्यात आषाढाचा असा थेट संदर्भ पुन्हा आलेला नाही. तरीही या शब्दांची जादू इतकी अमर आहे, की यामुळेच आषाढ मासाचा पहिला दिवस आज आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. एका ओळीत एका महिन्यावर अनंत काळासाठी आपली मोहोर उमटवणं, याला शब्दसामर्थ्य म्हणायचं नाहीतर काय? याच ओळीवरून प्रेरणा घेतलेलं कालिदासाच्या जीवनावर आधारित आषाढ का एक दिन या नावाचं मोहन राकेश यांचं १९५८ सालचं नाटक हे प्रथम आधुनिक हिंदी नाटक म्हणून सुप्रसिद्ध आहे. याचाच One Day in the Season of Rain हा अपर्णा धारवाडकर यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मला गेल्या वर्षी एमएला होता.
कालिदासाचं साहित्य आजही इतक्या शतकांनंतर आपल्या साहित्यातून नव्या साहित्यिकांना सृजनाची प्रेरणा कशी देत आलं आहे, याची अजून काही खास उदाहरण आता सांगते. वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी माहीत नाही, असा मराठी वाचक शोधूनही सापडणं कठीण आहे. पण खांडेकरांनीही ययातीची प्रेरणा कालिदासाच्या शाकुंतलमधून घेतली आहे, हे मात्र काही जणांनाच ठाऊक असेल. त्यांनीच प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे, दुष्यंताकडे चाललेल्या शकुंतलेला कण्व ऋषींनी "ययातिरेवशर्मिष्ठा भर्तुरबहुमता भव" असा आशीर्वाद दिला आहे. विद्यार्थी जीवनात हे नाटक बसवताना या एका आशीर्वादाच्या ओळीने खांडेकरांच्या मनात घर केलं आणि त्यातूनच ययाती या अजरामर कादंबरीचा जन्म झाला!
खास मेघदूतबद्दल बोलायचं झालं तर माधव ज्युलियन यांची ही कविता,
मेघांनी हे, गगन भरता, गाढ आषाढमासि
होई पर्युत्सुक विकल तो, कांत एकांतवासी
तन्नि:श्वास, श्रवुनि रिझवी, कोण त्याच्या जिवासी
मंदाक्रांता, सरस कविता, कालिदासी विलासी
हरिवंशराय बच्चन यांचं मेघ के प्रति हे काव्य:
मेघ' जिस-जिस काल पढ़ता
मैं स्वयं बन मेघ जाता !
हो धरणि चाहे शरद की
चाँदनी में स्नान करती,
वायु ऋतु हेमन्त की चाहे
गगन में हो विचरती,
हो शिशिर चाहे गिराता
पीत-जर्जर पत्र तरु के,
कोकिला चाहे वनों में
हो वसन्ती राग भरती,
ग्रीष्म का मार्तण्ड चाहे
हो तपाता भूमि-तल को,
दिन प्रथम आषाढ़ का मैं
'मेघ-चर' द्वारा बुलाता।
'मेघ' जिस-जिस काल पढ़ता
मैं स्वयं बन मेघ जाता!
अशी अनेक उदाहरणं देता देतील. मरावे परि कीर्तिरुपी उरावे, असा हा कवीकुलगुरू कालिदास आणि त्याचं मेघदूत!
पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्किधिष्ठित कालिदासा।
अद्यापि ततुल्य कवेरभावादनामिका सार्थवती बभूव॥
( In ancient times, when all the poets were counted, Kalidasa was assigned a little finger. But, no poet of the genius comparable with him has existed till today; hence, the finger next to the little finger is significantly named as 'Anamika ')
असं म्हणतात ते काही उगाच नव्हे!
शांताबाई शेळकेंनी मेघदूतचा अनुवाद करून एक खूप मोठंच दिव्य पार पाडलं आहे, हे अगदी निर्विवाद सत्य आहे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याखाली मराठी रूपांतर वाचायला मिळत असल्याने दोन्ही भाषांचं सौष्ठव उठून दिसलं आहे. प्रस्तावनेत नमुद केल्याप्रमाणे, त्यांनी आपल्याकडून अधिक काहीही घातलेलं नसलं, तरी अनुवाद सरळसोट न होता चैतन्याने परिपूर्ण राहील, याची काळजी घेतली आहे. काव्यात कुठेही क्लिष्टता येणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देऊन मूळच्या काव्याच्या तोडीस तोड अनुवाद करून शांताबाईंनी आपली काव्यप्रतिभा सिद्ध करून दाखविली आहे. या अनुवादाबद्दल मराठी रसिक काव्यप्रेमी त्यांचे कायम ऋणी राहतील 🙏
आता पुन्हा एक प्रश्न... मेघदूत आजच्या काळात relevant आहे का? आणि कधीपर्यंत राहील?
याचं मला कळलेलं उत्तर आता सांगते. ज्या काळात आणि जोवर पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि परस्परांविषयी ओढ, न टाळता येणारा विरह आहे, माणसाची इच्छा आणि नियती यामध्ये अविरत संघर्ष चालू आहे, तोवर मेघदूत अमर आहे! मेघदूत वाचताना त्या यक्षाबद्दल कौतुक, कणव, सहानुभूती वाटते, मेघाविषयी कृतज्ञता वाटते, आणि यक्षपत्निविषयी कमालीची ओढ आणि थोडीशी असुयाही वाटते ती यामुळेच! पुस्तक आवर्जून वाचाच, पण विकत घेऊन संग्रहीसुद्धा ठेवा, कुणा वाचनप्रेमीला भेट दया ( मला दिलंत तरी चालेल), काय आहे निर्जीव वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा खऱ्या शब्दसौंदर्याचा संग्रह केलेला काय वाईट?
© नेहा ज्योती प्रदीप जोशी
२२ नोव्हेंबर, २०२०.
Comments
Post a Comment