शांताराम :एका इंग्रजी भाषिकाच्या मराठी नावाच्या इंग्रजी गोष्टीचा मराठी अनुवाद!
शांताराम- एका इंग्रजी भाषिकाच्या मराठी नावाच्या इंग्रजी गोष्टीचा मराठी अनुवाद!)
लेखक: ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
मराठी अनुवाद: अपर्णा वेलणकर
#पुस्तकांच्या_पानांवरुन
पुस्तक वाचताना आणि ते वाचून झाल्यावर येणारा अनुभव हा प्रत्येक वेळी वेगळाच असतो. काही वेळा ' झालं बुवा एकदाचं पुरं' ही भावना असते. काही वेळा 'इतक्यात का संपलं, अजून थोडं लिहिलं असतं तर काय बिघडलं असतं' अशी चुटपुट लागून राहते. कधीतरी आपण काहीशा अनिच्छेने एखादं भलंमोठं पुस्तक वाचायला घेतो, रटाळ निघालं तर लगेच वाचन बंद करायचं हे आधी ठरवून! पुढे तर ' माझी इच्छा आहे हे पुस्तक अर्ध्यात वाचून सोडायची, पण पुस्तकाची तयारी आहे का मला सोडायची?' अशी फिरकीही काही पुस्तकं घेत असतात. ती वाचून झाली की काहीवेळ स्थब्ध, स्तिमित व्हायला होतं. इतके दिवस ते पुस्तक पानागाणिक तुम्हाला वळणा वळणांनी हिंडव हिंडव हिंडवत असतं. आणि आता एकाएकी तो प्रवास संपून तुम्ही खऱ्या जगात आलेले असता.हा अनुभव देणारं हे पुस्तक... शांताराम!
ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स या ऑस्ट्रेलियातील मॅग्झिमम सेक्युरिटी प्रिझन मधून फरार झालेल्या पूर्वाश्रमीच्या एका हेरॉईन ॲडिक्ट, गुन्हेगाराची ही गोष्ट. डॉन का इंतजार तो ग्याराह मुलखों की पुलिस कर रही हैं, असा हा या कथेचा नायक लिंडसे हे नकली नाव आणि नकली पासपोर्ट घेऊन भारतात आला, आणि त्याचा भारतीय होण्याचा जगावेगळा प्रवास सुरू झाला. न्यूझीलंड, आशिया, आफ्रिका आणि युरोप अशा अनेक टप्प्यांत पार पडलेल्या प्रवासाची ही चित्तथरारक गोष्ट! जवळपास साऱ्या खंडांत तो फिरला, पण त्याचं प्रेम बसलं ते भारतावर, मुंबईवर आणि मराठीवर! या मुंबईने त्याला प्रभाकर नावाचा जीवाभावाचा मित्र दिला. या प्रभाकर बरोबर तो सुंदर नावाच्या गावी चांगले सहा महिने राहिला, मराठी शिकला, शेतात राबला. " प्रेमाचा उगम भारतात झाला की नाही, हे ठाऊक नाही. पण एखाद्यावर प्रेम करायच्या कलेत भारतीयांना कोणीच टक्कर देऊ शकत नाही! ", हेही तो मोठ्या कौतुकाने मान्य करतो. इथेच प्रभाकरच्या आईने लीनला दत्तक घेऊन मराठमोळं नाव दिलं - शांताराम किसनराव खाडे!
याच इरसाल मराठी मित्राने ' प्रभूने' लीनबाबाला त्याची मुंबई दाखवली. ही मुंबई झगमगाट, वैभवाच्या शेकडो कोस दूर आहे. इथे झोपडपट्टी आहे, रस्त्यावरची हाणामारी आहे, अमली पदार्थांची तस्करी आहे, खडे बाबा आहेत,माणसांचा व्यापार आहे, वेश्याव्यवसाय आहे आणि बरंच काही ! पूर्वग्रहाचा कोणताही चष्मा डोळ्यांवर लावलेला नसल्याने, " superiority complex" ने ग्रासलेला नसल्याने तो भारताला कमीही लेखत नाही, आणि डोळ्यांना दिसणाऱ्या आणि संवेदनांना जाणवणाऱ्या कोणत्याही दोषांकडे तो डोळेझाकही करत नाही. एका फॉरीनरच्या नजरेतून दिसणारं मुंबईचं हे चित्र आपल्यालाही चकित करणारं आहे. लवकरच लीन झोपडपट्टीवासी होतं. प्रत्यक्ष तिथे काही महिने राहून त्या आधारे त्याने जे झोपडपट्टीचं शब्दचित्र निर्माण केलं आहे, ते कोणत्याही डॉक्युमेंटरी, बॉलिवूड मूव्हीपेक्षा शतपटीने वेगळं आहे, तरीही अस्सल आहे. एकीकडे आपल्यालाही शिसारी येईल असा बकालपणा, तर दुसरीकडे आपणही ज्यांचा हेवा करू अशी श्रीमंत मनाची कामसू माणसं हे वास्तववादी चित्रण केवळ प्रामाणिक लेखणीतूनच येऊ शकतं. तिथल्या लोकांबरोबर त्याने गुडघाभर घाणीत उतरून गटारं साफ केली आहेत, पावसापूर्वी प्रत्येक झोपडीची डागडुजी केली आहे, कॉलराच्या साथीत रात्रीचा दिवस करून त्याने वस्तीतल्या लोकांची शुश्रुषा केली आहे. त्याच्या याच आपलेपणा आणि निरपेक्ष सेवावृत्तीमुळे तो वस्तीतल्या लोकांचा हिरो आहे. कोणत्याही छोट्या मोठ्या आनंदाच्या प्रसंगी त्याला आग्रहाचं आमंत्रण असतंच!
पण इतक्या सरळ रेषेत चालणं हे बहुधा त्याच्या नशिबाला मानवणारं नाही. एका हिरव्या डोळ्यांच्या सुंदर तरुणीमुळे त्याचा लवकरच अंडरवर्ल्डशीही जवळचा संबंध येतो. एका हौशी घरमालकाने नव्या घराचा कोपरा न कोपरा जितक्या निगुतीने आणि बारकाईने दाखवावा, त्या थाटात मुंबई अंडरवर्ल्ड चा एक एक कोपरा तो आपल्याला दाखवतो. नकली कागदपत्रं, बनावट पासपोर्ट, अमली पदार्थांची तस्करी, वेश्याव्यवसाय, मानव तस्करी, औषध तस्करी, चित्रपट व्यवसाय आणि अंडरवर्ल्ड यांचे सहसंबंध असं बहुरंगी, बहुढंगी रूपडं त्याच्या नजरेतून पाहणं हाही एक विस्मयचकित करणारा अनुभव आहे. मुळातच हे सगळं लिखाण वास्तवदर्शी असण्यामागचं खरं कारण म्हणजे हे tried and tested चित्र आहे, जे त्याच्या निरीक्षणांतून आणि प्रत्यक्ष अनुभव आणि सहभागातून तयार झालं आहे. सुरुवातीला तो या वर्तुळाच्या अगदी बाहेरच्या बाजूला आहे. पण हळूहळू तो त्यांच्यातला एक कसा होत गेला, तेही तो मोकळ्या मनाने सांगतो आहे. एकीकडे सगळ्या प्रकारचे अवैध धंदे करणार्या या " भाईलोकांच्या" तात्विक चर्चा कोणत्याही विचारवंतांच्या चर्चेसारख्या धीरगंभीर आणि विचार करायला लावतील अशा आहेत. मधल्या काळात तो स्वतः नशेच्या आहारी जातो, आणि पुन्हा त्या गर्तेतून प्रयत्नपूर्वक बाहेरही पडतो. सुरुवातीला नकली पासपोर्ट, अमली पदार्थांची तस्करी अशी "छोटीमोठी अवैध" कामं करणारा लीन जेव्हा त्याच्या बॉस कादरभाईसोबत अफगाणिस्तानात रशियन्स विरुद्ध चाललेल्या धर्मयुद्धात ( होली वॉर) सहभागी व्हायला जातो, तेव्हा ही त्याच्या आयुष्याची निराळ्या धाटणीची वळणं वाचकांना थक्क करतात. भारतातून पाकिस्तान आणि तिथून काबूल कंदाहार पर्यंतचा प्रवास करताना तिथल्या लोकजीवनाच्या विविध पैलूंवर, युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याने प्रकाश टाकला आहे. जीव धोक्यात घालून परदेशात केलेली ही भटकंती त्याचं सगळं भावविश्व पुरतं अस्थिर करून टाकते. ज्या लोकांवर जीवापाड प्रेम केलं, विश्वास टाकला त्यांनीच आपल्याला केवळ एक प्यादं म्हणून वापरलं, हा विश्वासघाताचा वार आणि पराभवाचं शल्य घेऊन लीन भारतात परत येतो. त्यानंतर नव्या काळानुसार बदलत जाणारं मुंबई अंडरवर्ल्ड, स्थानिक आणि देश पातळीवरचं राजकारणाचे संदर्भ अभ्यासू वाचनप्रेमींच्या लक्षात येण्यासारखे आहेत. यथावकाश त्याच्या वस्तीतल्या लोकांशी तो पुन्हा जोडला जातो, खऱ्या अर्थानं माणसांत येतो.
त्याच्या पूर्ण लिखाणात ज्याचं मनापासून कौतुक करावसं वाटतं, ते म्हणजे त्याने कव्हर केलेले डिटेल्स आणि वर्णनं. मुंबईतल्या अवैध धंद्यांचा धावता उल्लेख करून लेखक थांबत नाही, तर त्या धंद्यांमधल्या सगळ्या खाचाखोचा त्याने अगदी सखोलपणे नमूद केल्या आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तातलं राजकीय, ऐतिहासीक आणि भौगोलिक वास्तवही त्याने खुबीनं टिपलं आहे. मुंबईच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या तुरुंगातले, तिथल्या अंतर्गत राजकारणाचे अनुभव अंगावर काटा आणणारे आणि एकंदरच कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल आणि तिथल्या व्यवस्थेबद्दल मनात प्रश्न निर्माण करणारे आहेत. आवाका प्रचंड असला तरी प्रत्येक मुद्द्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जाणवल्यावाचून राहत नाही. काही संदर्भ, वर्णनं टाळता आली असती, हे खरं पण लेखकाला दिसलेलं संपूर्ण चित्र पुन्हा उभं करण्याच्या जिद्दीपुढे १४०० पेक्षाही अधिक पृष्ठसंख्या हा मुद्दा गौण ठरतो. अफगाणिस्तानातून भारतात आल्यावर त्यांना अटक झाली, शिक्षा पूर्ण होऊन बाहेर आल्यावर लिहिलेली ही कादंबरी आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींची उजळणी होणं स्वाभाविक आहे. सत्य आणि कल्पना दोन्हींचा आधार घेऊन केलेलं हे लिखाण आहे. पृष्ठसंख्या हा लेखकासाठी कमी महत्त्वाचा मुद्दा असला, तरी ज्या वाचकाला ती तेवढी पानं वाचायची आहेत, त्याच्यासाठी हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो.
दुसरं म्हणजे चिक्कार पात्रं, काहीवेळा ती तेवढी पात्रं लक्षात ठेवणं कठीण जात असलं तरी ती पात्रं mostly जेव्हाची तेव्हा आलेली आहेत. कानो अस्वलाची अगदीच वेगळी, जशी इतरत्र कुठेही आपल्याला वाचायला मिळणार नाही, अशी गोष्टही लक्ष वेधून घेतल्याविना राहत नाही. प्रभाकर, कार्ला, लिझा, अब्दुल्ला, कादरभाई ही व्यक्तिचित्रं अगदी ठळकपणे लक्षात राहण्याइतकी सुबक झाली आहेत.
मुळात हे पुस्तक इंग्लिशमधे लिहिलं आहे, आणि मी वाचला तो अपर्णा वेलणकर यांनी केलेला मराठी अनुवाद. मला इंग्रजीचा मराठी अनुवाद शक्यतो वाचायला आवडत नाही, कारण अनुवादात फक्त भाषेचे नाही तर एकंदरच आयुष्याच्या अनेक बाजूंचे संदर्भ बदलावे लागतात. ते जमलं तर ठीक, अन्यथा मूळ लिखाणात असणारा जोर क्षीण होतो. पण मला सहज उपलब्ध झाला, म्हणून हा अनुवाद वाचायला घेतला. अनुवाद ही फक्त शब्दाला शब्द शोधण्याची क्रिया नसून अर्थाला अर्थ आणि संस्कृतीनुसार संदर्भाला संदर्भ जोडण्याची क्रिया आहे. लिखाणाचा मुळ गाभा शोधून त्याला अपेक्षित भाषेतले शब्दालंकार चढवून दोन्ही भाषांशी प्रामाणिक राहणं आणि मूळ लिखाणाचं सौंदर्य जपणं, हे एक शिवधनुष्य असतं. ते समर्थपणे पेलू शकलेल्या अनुवादिकेचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाने शब्दांचे सामर्थ्य सांगणारा जो write up दिला आहे, त्यावरून अनुवादाकडून त्यांना किती अपेक्षा असतील, त्याचा अंदाज बांधता येईल. अनुवाद करताना अपर्णा ताईंनी मुळ इंग्रजी लिखाणाला जो मराठी तडका दिला आहे, तो लाजवाब आहे. दोन मित्रांमधला सुखसंवाद लिहिताना मकारापासून भकारापर्यंत सगळी सगळी मराठी "शब्दरत्नं" मुक्त हस्ताने वापरली आहेत, हेही एक विशेष! मी मूळ इंग्रजी कादंबरीही मिळवून वाचायला सुरुवात केली आहे, त्यामुळे एक भाषा बदलल्यावर किती गोष्टी बदलाव्या लागल्या असतील आणि बदलल्या गेल्या, याचा मला माझ्यापुरता चांगलाच अंदाज आला आहे. एकंदरच अनुवाद किती सशक्त, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी असू शकतो, याचा आदर्श नमुना म्हणून या अनुवादाची आवर्जून नोंद घ्यावी लागेल.
माझ्या नेहमीच्या reading circle बाहेरचं हे पुस्तक आहे.माझ्यासारख्या आदर्शांचा कीडा चावलेल्या व्यक्तीसाठी तर नक्कीच! पण तीर्थरूपांच्या सल्ल्यामुळे एकाच पठडीचं खूप साहित्य वाचण्यापेक्षा चौफेर वाचन असावं, असा माझा हल्ली प्रयत्न असतो. तेव्हा थोडं out of the box लिखाण वाचायचं असेल, आणि भरपूर वाचायला वेळ आणि patience असेल, तर मी हे पुस्तक नक्कीच recommend करेन. यात सगळ्यांत सुंदर आहे तो त्याचा भारतीय होत जाण्याचा प्रवास! तो आता अनोळखी मिरवणुकीत बेधडक नाचू शकतो, त्यालाही अचकट विचकट असली तरी हिंदी पिक्चरची गाणी आवडू लागली आहेत, सणसणीत मराठी शिव्या हासडून तो रस्त्यांवर लोकांशी भांडू लागला आहे! एकंदरच लक्षात राहतील अशी वाक्यं, प्रभावी व्यक्तिरेखा, चित्तथरारक घटनांची मालिका, मुंबई मधलं जनसामान्यांचं आयुष्य हा मराठी वाचकांसाठी कायमच औत्सुक्याचा विषय अशा नानाविध गोष्टींची सुरेख सांगड म्हणजे ही महाकादंबरी, शांताराम!
( या ग्रेगरी डेव्हिड यांचे बरेच व्हिडिओ YouTube वर उपलब्ध आहेत, तेही आवर्जून पाहण्यासारखे आहेत. भारताच्या, खासकरून मुंबईच्या प्रेमात असलेला फॉरेनर पाहायचा असेल, शांताराम ची गोष्ट कशी आकाराला आली, हे जाणून घेण्यासाठी तर नक्की बघण्यासारखे आहेत.
https://youtu.be/ktpAWjLqvwI)
लेखक - ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
मराठी अनुवाद- अपर्णा वेलणकर
पृष्ठ संख्या- १४१०
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस
इंग्रजी आवृत्ती (२००३), मराठी आवृत्ती (२०१०)
मूल्य- ९९०
© नेहा ज्योती प्रदीप जोशी
०४.११.२०२०
Comments
Post a Comment