कुणा एकाची भ्रमणगाथा- वेदनेचा सन्मानसोहळा
" ही खुशीची फकिरी फार अजब असते. लौकिकार्थाने घर संसाराला पारख्या असणाऱ्या अमीराची फकिरी, जमाखर्चाच्या वह्या वाचता येणाऱ्यांना नाही कळायची!" रावसाहेब हरीहरांबद्दल पुलं जे म्हणतात, तशाच माटाचं एका भन्नाट आयुष्य जगलेल्या अवलियाची, गोपाळ नीलकंठ दांडेकर अर्थात् गोनीदा यांची गोष्ट म्हणजे कुणा एकाची भ्रमणगाथा! आजवर गोनीदांचं जे काही साहित्य वाचलं आहे, त्यावरून मला अगदी मनापासून जाणवलेल्या आणि भावलेल्या गोष्टी अनेक आहेत. पहिली म्हणजे त्यांच्या लिखाणातून सदोदित जाणवत राहणारी unmatched संवेदनशीलता. दुसरी म्हणजे निसर्गाची उत्कट ओढ, जी त्यांच्या प्रत्येक निसर्गवर्णनात प्रकर्षाने जाणवत राहते. किंबहूना गोनीदांच्या लेखनात निसर्ग आपसूक डोकावतच असतो. एरव्ही बाकीच्या लिखाणात आलेली निसर्गवर्णनं उगाच लांबड म्हणून गाळून आपण पुढे वाचू लागतो, पण गोनीदांच्या साहित्यात निसर्ग अगदी रसरशीत, जीवंत रुपात आपल्यासमोर येतो. आणि तिसरी म्हणजे 'स्व'च्या किंवा 'मी' पणाच्या सगळया चौकटी भेदून जायची अनावर ओढ. आजवर हे साहित्य वाचताना गोनीदांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला अजिबात काहीच मा...