पुरुषः अस्वस्थ रहस्याचा शोध


पुरुषः अस्वस्थ रहस्याचा शोध

मराठी वाचकाला निखळ अभिमान वाटावा अशी एक सातत्यपूर्ण साहित्यीक परंपरा म्हणजे दरवर्षी प्रकाशित होणारे वेगवेगळ्या विषयांवर आधारित दिवाळी अंक. रसिक वाचकांसाठी विचारांची आणि मनोरंजनाची पर्वणी हे दिवाळी अंक गेले काही वर्षे उपलब्ध करुन देत आहेत. यावेळी प्रथमच एक दिवाळी अंक अखंड अगदीं अथ ते इती वाचून काढला. कारण त्याचा विषय आणि मांडणी. लोकमतचा २०२३ सालचा दीपोत्सव अंक. विषय पुरुष- ‘अस्वस्थ’ रहस्याचा शोध. संपादक अपर्णा वेलणकर यांची मुद्देसूद आणि संवेदनशील प्रस्तावनाच या विषयाची व्याप्ती समजून घ्यायला उपयोगी पडते. त्या म्हणतात, “ पुरुष हा प्राणी सध्या एकूणच ‘ आरोपीच्या पिंजऱ्या’त उभा आहे आणि त्याला सबळ कारणेही आहेत. पण तरीही त्याच्या खांद्यावर हात टाकून ‘ मित्रा, तू कसा आहेस?’ असा एक साधा, प्रांजळ प्रश्न आपण विचारु शकतो का, आणि त्या प्रश्नाला जी खरी उत्तरे मिळतील, ती तशीच्या तशी ऐकण्याची, समजून घेण्याची आपली तयारी असेल का?...” हाच विचार या अंकाची जुळवणी करताना त्यांनाही पडला होता. पुढे तर त्यांनी पुरुषांची एक वर्गवारीच दिली आहे. स्त्री पुरुष समानतेचे सूत्र समजून उमजून आपल्या आयुष्यात राबवणारे पुरुष २०%, त्याउलट बाईची जागा अजूनही चपलेच्या ठिकाणीच आहे असे मनातून वाटणारे २०% पुरुष. आणि उरले ते ६० % म्हणजे मध्यममार्गी, आपल्या वाट्याला आलेल्या बाईशी होता होईतो जुळवून घेणारे जुळवून घेणारे, कधी आवाज चढला हात उठला तर त्याबद्दल अपराधी वाटणारे, संसार चालवण्यासाठी खस्ता खाणारे, हातातल्या स्वस्त स्क्रीनवर पॉर्न पाहणारे आणि तसली मजा आपल्या वाट्याला नाही याबद्दल मनातून खंतावणारे, कधीच पुऱ्या न पडणाऱ्या पैशाच्या तकतकीने सदा वैतागलेले, मुलाबाळांच्या काळजीने खंगलेले, ‘ पुरुष’ म्हणून आपण नेमके कसे वागावे हे न उमजून भांबावलेले पुरुष! यात करीयरच्या शिड्या चढण्यासाठी झुंबड उडालेले शहरी पुरुष आले, शेतीभातीत राबण्यावाचून पर्याय नसलेले खेड्यातील पुरुष आले, याच्या मध्ये लटकून ‘ पर्याय’ शोधण्याच्या लगबगीतले पुरुष आले, सगळेच आले! त्यांच्या सुखाची साधने आणि दुःखाची कारणे शोधणं हा या अंकाचा उद्देश आहे. 


सुरुवातीला आलेली इट्स ऑलवेज गुड टू बी इन प्रेसेंट ही कुमार मंगलम बिर्ला यांची मुलाखत प्रत्येक कॉमर्स स्टूडंटने, start up aspirant ने आवर्जून वाचावी. अपनी ष्टोरी अपून बेचेगा( मेघना ढोके) या लेखात मालेगावच्या छोटूदादा उर्फ शफीक शेख, वासिम अंजुम, बाबू लोचा उर्फ अक्रम खान, गण्या टोपी उर्फ अजय दळवी, गुलाब औरंगाबादी, पुष्पा ठाकूर, इंद्रायणी गांगुर्डे, महेंद्र तिसगे अशा अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएन्सर्सची भन्नाट गोष्ट आपल्याला कळते. AI माणसाला खाईल? ( विश्राम ढोले) हा लेख AI आणि मानवी मेंदू यात कोण कोणाला भारी पडेल या नव्याने भेडसावू पाहणाऱ्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन भविष्यातील शक्यतांचा वेध घेतो. बकासुर ( श्रीनिवास नागे) हा लेख मुळशी, मावळ पट्ट्यातील तरण्या पुरुषांच्या बेफाम जगातल्या बदलत्या माहोलाचा शोध घेतो. आज जेवायला काय आहे ( भक्ती चपळगावकर) हा लेख या प्रश्नाला आज उपलब्ध असणारी इंटरेस्टिंग उत्तरं कशी निर्माण झाली, ते उलगडून दाखवतो. शिक्षकांनो, बदला आणि (बि) घडा! ( सचिन उषा विलास जोशी) हा लेख NEP आणि AI या दोन नव्याच प्रश्नांनी ग्रासलेल्या शिक्षक, शाळा आणि संस्थाचालकांना काही मोलाचे सल्ले देतो. शेवटची मर्दानगीची कटकट ही अनुराग कश्यपची मुलाखत भारतीय पुरुषांची विचारसरणी आणि असुरक्षितता अधोरेखित करते. 

या अंकाचं मला जाणवलेलं आणि आवडलेलं वैशिष्ट्य म्हणजे यायला प्रत्येक लेख पुरुषांच्या मानसशास्त्रातील वेगवेगळे पैलू विचारात घेतो. पुरुषपण भार रे देवा ( सतीश तांबे) हा लेख पुरुषांच्या हिंसा आणि व्यसनाधिनतेला कारणीभूत असणारी त्यांच्या उपाशी शरीराची तकतक लेखकानी लिहिलेल्या कथा, एकांकिकांचे संदर्भ घेऊन स्पष्ट करतो. दुप्पट पुरुषांचे ओझे ( रंगनाथ पठारे) हा लेख पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया तितक्याच जोशाने सर्वत्र वावरत आहेत, म्हणजे एकूण पुरुषांची संख्या दुप्पट होऊ घातली आहे का, या शक्यतेचा विचार करतो. नखे का वाढतात? ( डॉ. प्रदीप पाटकर) या लेखात पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येणाऱ्या आक्रमकतेची मानसशास्त्रीय आणि शरीरशास्त्रीय कारणमीमांसा आहे. शहरातल्या हतबल पुरुषाची गोची (मंदार भारदे) हा लेख शहरात राहणाऱ्या पुरुषांच्या वाट्याला वेगवेगळ्या तऱ्हेने येणारी असमानता आणि अस्थिरता सूचित करतो. तर पुढचाच अजगराने गिळलेला धूळमातीतला पुरुष (बालाजी सुतार) हा लेख शेती एके शेती करत असलेल्या ग्रामीण पुरुषांचा भविष्य दिसत नसलेल्या अंधारयुगासारखा पुरुष या चौकटीत अडकलेला ‘वर्तमान’ आपल्यापुढे मांडतो. 

काही लेख माझ्यासाठी खऱ्या अर्थाने eye opener ठरले. आपण आपली सुखासिनता आणि स्थैर्य इतकं गृहीत धरलेलं असतं, की याहीपेक्षा वेगळं खडतर असं काही असू शकेल, हे आपल्या गावीही नसतं. एकटे पुरुष ( रवींद्र राऊळ) लेख वेगवेगळ्या राज्यांतून लाखो एकएकटे पुरुष महानगरांच्या पोटात घुसून जागा मिळेल तिथे, जे मिळेल ते काम करत केवळ घर चालवण्यासाठी आपल्या परिवारापासून दूर राहून आपली अख्खी उमेद कशी खर्ची घालतात, ते मांडतो. स्साली जबान चलाती हैं ( समीर मराठे) हा लेख बुंदेलखंड भागातील दारिद्र्याने ग्रासलेल्या, त्यातून बेरोजगारी आणि बायकांनी आपल्या कर्तबगारीने अख्खी सत्ताच खेचून घेतल्याने हतबल झालेल्या पुरुषांची मनोवृत्ती समजून घ्यायला मदत करतो. याउलट हस्बैंड का काम क्याह होता हेई? कमाना? ( हिनाकौसर खान) हा लेख बिहारच्या खेड्यापाड्यात फिरुन एकमेकांविषयी हळुवार भावना अजिबात नसल्या तरी वर्षानुवर्षे अनेक जोडपी ठीकठाक संसार कसा काय करुन दाखवतात, या प्रश्नाची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो. “गरीबी हटाव” हा कार्यक्रम फक्त आर्थिक नव्हे तर मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक पातळ्यांवर अजूनही तितकाच महत्त्वाचा का आहे, याची नव्याने जाणीव करुन देणारे आणि आपल्या मध्यमवर्गीय सुखासीनतेतून आलेल्या बेफिकीची शरम वाटायला भाग पाडणारे लेख असं मी यांचं वर्णन करेन. 

पुढे इश्काचा विडा ( वंदना अत्रे) हा लेख लावणी आणि पुरुष हे मोठं अजब प्रकरण, पुरुषांना लावणीबद्दल वाटणारं आकर्षण या एका हटके विषयाचा मागोवा घेतो. बाईची नजर ( शर्मिला फडके) हा लेख स्त्रीच्या कुंचल्याने पुरुषाच्या नग्न शरीराचं कसं चित्रण केलं ते त्यामागच्या कारणांसकट दाखवून देतो. Thank You पेद्राम ( रेणुका खोत) हा लेख एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाकडून नेमकं काय हवं असतं, ते मांडतो. मला मनापासून आवडलेला समानता मानता मानता ( योगेश गायकवाड) हा लेख म्हणजे लेखकाच्याच शब्दांत, ‘स्त्री पुरुष समानतेच्या वाटेवरचा ‘ एकटेपणा’ सहन करत नेटाने प्रयत्न करत राहिलेल्या एका पुरुषाचं प्रांजळ आत्मकथन’ आहे. स्त्री पुरुष समानता ही संकल्पनाच मुळात किती relative आहे, ते लेख वाचताना कळतं. हा लेख तर आवर्जून वाचावा. He की She? (शर्मिष्ठा फडके) हा लेख ‘ट्रान्समॅन’ आणि ‘ ट्रान्सवुमन’ यांच्या आयुष्याची चारचौघांसारखी अजिबातच नसणारी कहाणी सांगतो. पुरूष गळून पडताना ( योजना यादव) यांचा लेख पुरुषाविना जगणं स्त्रीला कसं आणि का जमू लागलं आहे याची उत्तरं देतो. पत्नीपीडित ( गौरी पटवर्धन) हा लेख almost सगळे कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे कुटुंब न्यायालयात काम करणारे वकील, सामाजिक कार्यकर्ते, कौटुंबिक समुपदेशन केंद्रं आणि समुपदेशकांच्या जगात फिरुन हल्ली दिसणारं एक अस्वस्थ सत्य आपल्यापुढे मांडतो. 

हा परिचयच या अंकाचं वेगळेपण सांगायला पुरेसा आहे. हा अंक आणि यातले सर्व लेख कुठेही टोकाची भूमिका न घेता, आक्रस्ताळेपणा न करता एकेक विचार, भूमिका, सत्य नेमकेपणाने उलगडून दाखवतात. स्त्री आणि पुरुष यात कुठल्याही एका बाजूच्या प्रेमात न पडता जे आहे ते आणि आहे तसं मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ते जाणून घ्यायची इच्छा असणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीने हा अंक अगदीं आवर्जून मिळवून वाचावा. ही विचारांची पर्वणी दिल्याबद्दल लोकमत आणि अपर्णा वेलणकर, सर्व लेखकांचे मनपूर्वक आभार! 

लोकमत दीपोत्सव अंक
मूल्य: २९९₹

नेहा ज्योती प्रदीप जोशी 
(२०/०१/२०२३)

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार