मंतरलेला इतिहास
खूपदा आपल्यासमोर इतिहासाची मांडणी एका इतिहासनायकाला केंद्रस्थानी ठेवून केलेली असते. त्यामुळे त्या नायकाच्या कर्तृत्वाला त्यात अधिक महत्त्व प्राप्त होतं. पण वि. का. राजवाडे म्हणतात, " केवळ मोठ्या माणसांची चरित्रे म्हणजे इतिहास नव्हे". अनेक लहान थोरांनी आपापल्या परीने कष्ट, हालअपेष्टा सोसून, मर्दुमकी गाजवत हा इतिहास घडवलेला असतो. शिवाय इतिहास हा केवळ स्वामीनिष्ठांचाच नसतो, जोडीला तो दगलबाज संधीसाधू सत्तापिपासूंचाही असतो.
किती भोगी उद्दाम हापापलेले
कुणी त्यागमुर्ती विरागी निराळे
महाकाल हे सर्व पोटात घेतो
तयांच्या कथांचा इतिहास होतो
हे सूत्र हर्षद सरपोतदार लिखीत मंतरलेला इतिहास या पुस्तकात ठळकपणे जाणवतं. वेगवेगळ्या काळातील विविध व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या एकूण २४ लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. अगदी संदर्भ देऊन एक एक ओळ लिहिण्याऐवजी त्यांनी आपल्या अभ्यासातून, वाचनातून जे समजलं उमजलं ते रंजकपणे ओघवत्या ललित शैलीत मांडायचा प्रयत्न केला आहे. यात अगदी chronological order मधे ते लेख आहेत, असं नाही. शिवाय फक्त मराठ्यांचा इतिहास अशीही मर्यादा त्याला नाही. पूर्ण चरित्र किंवा एखादा प्रसिद्ध नायक विचारात घेण्यासाठी इतिहासाला कलाटणी देणारी घटना, त्यात साधक बाधक योगदान दिलेल्या व्यक्ती, एखाद्या इतिहास नायकाचा त्याला वेगळं ठरवणारा एखादा विशेष गुण हा criteria ठेवला आहे. त्यामुळे वाचताना तो मजकूर तुमचं लक्ष वेधून घेतो.
हे पुस्तक म्हणजे काही संदर्भ साधन नव्हे. Like a tempting side dish for your taste! पण वाचताना मजा येते. त्या काळची सैर घडल्यासारखं वाटतं. यात मराठ्यांचा इतिहासकार ग्रँड डफ आहे, मनुची आहे, रशियाचा पीटर द ग्रेट आहे, थिबासारखा शापित राजा आहे. अजोड स्वामिनिष्ठा दाखवलेले छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्या न्याय्य हक्कासाठी थेट लंडनमधे पोहोचून अनेक वर्षे त्यांची बाजू मांडणारे रंगो बापूजी, वेळप्रसंगी वतनाचा त्याग करुन स्वराज्य वाचवण्याची धडपड करणारे खंडो बल्लाळ आहेत. मंगल पांडे, घोरपडीच्या साहाय्याने किल्ला सर करण्याची आयडियाची कल्पना पहिल्यांदा implement केलेला घोरपड्यांचा मूळ पुरुष कर्णसिंग आहे, इंग्रजांना पाणी पाजणारे आरमार प्रमुख आनंद धुळप आहेत, दोन राक्षसी पुरुष आणि काही भयंकर स्त्रिया- देशद्रोह्यांची शिफारस पत्रे अशीही प्रकरणं आहेत. मस्तानीचे वंशज, झाशीच्या राणीचे वंशज यांचीही आजवर फारशी न चर्चिली गेलेली माहिती आहे. पोर्तुगिज, मोगलांचा इतिहास, औरंगजेब याच्या व्यक्तिमत्त्वातल्या काही अपरिचीत गोष्टी ते ब्रह्मेंद्रस्वामी, सातारा- कोल्हापूर गाद्यांचा इतिहास, राजे म्हणवून घेणारे संस्थानिक असं बरंच काही यात सापडेल.
मला वैयक्तिक आवडलं ते जिंजीचा रोमहर्षक प्रवास हे प्रकरण. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर महाराणी येसूबाईनी दूरदर्शीपणाने रामराजांना रायगड सोडून जिंजीकडे रवाना होण्यास सुचवलं. पण सर्वत्र मोगल सैन्याचा सुळसुळाट असताना रायगड ते जिंजी हा प्रवास हे एक मोठंच साहस होतं. ते रामराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसं पार पाडलं ते वाचताना अगदीं आग्र्यातून सुटका प्रकरणाची आठवण होते. त्यांनी केलेल्या एक से एक बढकर कल्पना थक्क करतात. छत्रपती शिवरायांच्या या सुपुत्राने बैरागी, व्यापारी, ज्योतिषी अशी वेगवेगळी सोंगं वठवत, काही वेळा प्रत्यक्ष मोगली छावणीत व्यापाऱ्याच्या वेषात रत्नांचा लिलाव करत सहिसलामत जिंजी कशी गाठली, ते वाचताना एखाद्या action film चा फील येतो. यावेळी त्यांना मदत करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारे बहिर्जी घोरपडे, मानसिंग मोरे, रुपसिंग भोसले, खंडो बल्लाळ आहेत; तसेच याही वेळी वतन मिळालं तरच मदत करू अशी भूमिका घेणारे नात्यातले गणोजी शिर्केही आहेत. हे सगळं मुळातूनच वाचायला हवं.
आपला इतिहास डोळसपणे शोधून त्यावरच्या साधक बाधक चर्चा संशोधकाच्या दृष्टीने स्वीकारायला हव्यात, असंही ते पुनरावलोकनात सुचवतात. हाही भाग आवर्जून वाचावा, असा आहे. फक्त जाज्वल्य अभिमान असून उपयोगाचा नाही, तर इतिहास शोधून आहे तसा स्वीकारायची संशोधक वृत्ती असायला हवी, इतिहासापासून काहीतरी शिकून ते प्रत्यक्षात आचरण्याची तयारी हवी. एका बैठकीत पूर्ण होईल इतकं छोटेखानी पण विचारांना चटपटीत खाद्य पुरवेल असं लिखाण, इतिहासाची रंजक मांडणी या कारणांसाठी तरी एकदा नक्की वाचावं, असं हे पुस्तक 'मंतरलेला इतिहास.'
_नेहा ज्योती प्रदीप जोशी
(१४/०७/२०२३)
मंतरलेला इतिहास
हर्षद सरपोतदार
देशमुख आणि कंपनी प्रकाशन
पृष्ठसंख्या २०९
मूल्य २५०/-
Comments
Post a Comment