Appreciation post- आशा बगे
Serendipity म्हणजे अचानक एखादी खूपच मोलाची गोष्ट हाती लागणे, हे कधीही कुठल्याही बाबतीत शक्य आहे. एखादं दर्जेदार पुस्तक अचानक हाती लागलं तर आनंद होतोच, पण एखाद्या दर्जेदार लेखकाची ओळख झाली, तर हिऱ्याची खाण सापडल्यासारखं वाटतं. आशा बगे हे नाव मला अगदी गेल्या महिन्यापर्यंत माहीत नव्हतं, आणि आता मला सर्वार्थाने आवडलेल्या लेखकांच्या यादीत त्यांचं नाव मला जोडावंच लागेल. स्त्रीवादी लिखाणात दोन्ही टोकं टाळणारं लिखाण मला वाचायला आवडतं. म्हणजे बाई म्हणून कशी मी बिचारी, त्यागाची मूर्ती, सोशिकतेचा मेरुपर्वत असलं काही मला शिसारी आणतं. त्याउलट स्त्रीत्व ही काहीतरी फार मोठी बेडी आहे, ती तोडून भिरकावून दिली पाहिजे वगैरे असलं काही असंबद्ध, कृत्रिम वाटतं. माझ्या कल्पनेतली स्त्री तिचं स्त्रीत्व तिला जमेल तसं जपत, साजरं करतच पुढे जात असते. ती पुरुषांशी स्पर्धा करत नाही, ती स्वतःशीच स्पर्धा करते कारण तिला कुणाला हरवायचं नाहीये, तिला स्वतःला जिंकायचं आहे. हे सगळं करत असताना एक मुलगी, बहीण, बायको, सून,आई, सासू ,आजी,मैत्रीण अशा सगळ्या भूमिका तिला पार पाडायच्या आहेत. या दोन्ही गोष्टी साधताना मात्र तिच्या वाट्याला नित्याची फरफट आहे, आपण कुठेतरी कमी पडतो आहोत, याची बोच आहे. हे सगळं मनात बाळगून जगणारी, तरीही कुठेही न थांबता पुढेच वाटचाल करणारी स्त्री मी पाहिली आहे, अनुभवली आहे. स्त्रीचं हे असं प्रतिबिंब कुठल्या लिखाणात दिसलं, तर ती माझ्यासाठी पर्वणी ठरते.
आशा बगे हे नाव मला अशाच एका संवेदनशील व्यक्ती आणि वाचक असणाऱ्या व्यक्तीकडून कळलं. "तू आशा बगे वाच", एवढं एक वाक्य मला पुरलं. आधी कुठलं पुस्तक वाचू वगैरे चिकित्सकपणा न करता हाताला लागली ती पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात केली. आशा बगेंचं लिखाण ही तुम्हाला वाचक म्हणून, माणूस म्हणून समृध्द करणारी पर्वणी आहे. त्या जणू काही तुमचं बोट धरुन तुम्हाला मनाचे असंख्य कोपरे, त्यात दडलेले भावनांचे कल्लोळ उजळवून दाखवतात. त्यात कुठेही भडकपणा नाही, एक स्निग्धता आहे. भावनेच्या तळाशी त्या घेऊन जातात, पण उगाच त्या भावनेची खरवड काढत बसत नाहीत. उगाच शब्दांचे उंच मनोरे उभे करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या लिखाणात वाचकाला ती भावना, प्रसंग अनुभवयाला मोकळी जागा ठेवली आहे, असं जाणवतं. Literary criticism मधे Writerly Text आणि Readerly Text अशा दोन संज्ञा आहेत. Readerly मधे लेखकाने त्याच्या मनात जो अर्थ, क्रम ठरवला आहे, तसा वाचकाने वाचणं असं अपेक्षित असतं. पण Writerly मधे वाचक त्या लिखाणाच्या अर्थाचा वाचता वाचता लेखकच होऊन जातो. तो आपला अर्थ आपण शोधून काढतो, वाचनाची प्रक्रिया Passive न राहता active होते. आशा बगेंचं लिखाण मला Writerly वाटलं. वाचत असताना त्या कथानकाशी मी जोडली गेले आहे, त्यातून मिळणारा अनुभव हा माझा माझ्यापुरता खूप खास आहे, ही जाणीव होत राहते.
मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे "स्त्रीवादी" या शब्दाला जी थोडी negative shade आहे, ती मला या लिखाणात आढळली नाही. स्त्री पुरुष ही विरोधी अर्थाची जोडी नसून,ती एकमेकांना पूरक आहे, हा complimentariness त्या खूप सुंदर पद्धतीने दाखवतात. फक्त नवरा नाही, तर वडील, काका,भाऊ, मित्र, शिक्षक, मुलगा, नातू अशा अनेक रुपात तिच्या आयुष्यात असणारा पुरुषही इथे तितकाच ठळकपणे पाहायला मिळतो. स्त्रीपुरुष नातेसंबंधातील वेगवेगळे आयाम, गुंतागुंत, त्यांची अपरिहार्यता त्यांच्या लिखाणातून सतत प्रतित होते. त्यांची पात्रं तुम्हाला जवळची वाटत जातात. त्यांच्या मनातली आंदोलनं आपल्याच वळणाची जाणवतात. निसटून गेलेला एखादा कोमल क्षण ते एखादी व्यक्ती, घटना, जागा ज्यांची स्मृती तुम्हाला फार हळवं करुन जाते, ती नेमकी शब्दांत पकडण्याची किमया या लेखनात दिसते. श्यामची आईमधे श्याम एके ठिकाणी म्हणतो, की मला तेंव्हा कुणी बोट जरी लावलं असतं तरी रडायला लागलो असतो. ही अस्वस्थता आपली आपल्यापुरती खरी असते, पण ती इतरांना समजत नाही, आपल्याला समजावता येतही नाही. सारं ठीक असूनही आतूनच काहीतरी चुकल्याची, निसटल्याची भावना त्या नेमकेपणाने दाखवून देतात.धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, दर्पण, माझी कथा माझी निवड, पूजा, वाटेवरलं गाव हे पाच कथासंग्रह वाचले. त्यातला आधीचा कुठला नंतरचा कुठला या संशोधनात मी पडले नाही. पण आता त्यांनी लिहिलेलं जे जे मिळेल ते वाचायला हवं, एवढं मनाशी पक्कं केलं आहे.
आजवर मला स्त्री लेखिकांमध्ये निःसंशय आवडलेल्या लेखिकांमधे मराठीत अरुणा ढेरे हे एकच नाव मी ठामपणे सांगू शकत होते, इथून पुढे आशा बगे हे नावही मी आवर्जून घेईन. फक्त एक वैधानिक इशारा, काही वाचकांना पुस्तकाचा आकार असं नाही, तर एकंदर impact अशा अर्थी light weight वाचायची इच्छा असते. त्यांच्यासाठी मात्र अरुणा ढेरे, आशा बगे recommendable नाहीत. संवेदनशील मनाची सशक्त लेखिका म्हणून आशा बगेंची मला माझ्यापुरती पटलेली ओळख मला दीर्घकाळ लक्षात राहील.
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
( २९. ०६.२०२३)
आशा बगे हे मराठी साहित्यातील मोठं नाव आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका आहेत त्या.
ReplyDelete