परीक्षेला पर्याय काय?


प्रत्येकाचं वर्षाचं कॅलेंडर दिवस सारखेच असले, तरी वेगळंच असतं. आम्हा शिक्षकी पेशातल्या लोकांचं तर total वेगळंच म्हणा ना! आम्ही निकाल- प्रवेश - परीक्षा आणि पुन्हा निकाल हे चार हंगाम जगणारी माणसं आहोत. या मुख्य गोष्टी सांभाळत आम्ही शिकवत असतो. एक पाठ्यपुस्तक, प्रत्येक धड्याला इतक्या तासिका, इतक्या तासिकांत एवढं शिकवून झालं पाहिजे असं टार्गेट, जोडीला क्लास टेस्ट मग सहामाही वार्षिक हेच आमचं life आहे. क्रमिक पुस्तक ही एवढी बुलंद चौकट असते, की ती तोडून शक्यतो बाहेर पडताच येत नाही. अर्थात काही याला अपवाद आहेत. पण बहुतेक सगळेच विद्यार्थी - पालक आणि शिक्षक पुस्तकांना आणि परीक्षेला त्याच्या निकालाला शरण गेलेले असतात. कधी कधी प्रश्न पडतो, की याचं फलित काय? आपण हे मुलांना शिकवतो ते त्यांना कळलं किती ते जाणून घेण्यासाठी परीक्षा घेतो की त्यांची नेमाने परीक्षा घेता यावी म्हणून त्यांना शिकवतो आहोत? खरं मान्य करायची तयारी असेल, तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर सांगता यायचं नाही. मला गेल्या दीड वर्षात आलेला अनुभव असा, की जी कुठेही चमकतीलच अशी मुलं चटकन लक्षात येतात. ती वर्गातही पुढे असतात, परीक्षेतही पुढे असतात. काही वर्गातही समोर दिसत नाहीत, परीक्षेतही दिसली तर भोपळा मागे ठेवून जातात. काही मुलं वर्गात मन लावून ऐकायचा, शिकायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करतात पण परीक्षेत मात्र मागे पडतात. अशा सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा एकच प्रकारची कशी काय? सध्याच्या परीक्षा पद्धतीत असंख्य त्रुटी आहेत, पण त्या दुरुस्त करायची जबाबदारी कोणी घ्यायला तयार होत नाही. परीक्षा नकोच असं म्हणणारे असंख्य आहेत, पण परीक्षेला पर्याय काय त्याचं उत्तर देणारे मात्र विरळच! 

हेरंब कुलकर्णी संपादित परीक्षेला पर्याय काय? या पुस्तकात परीक्षेसंदर्भात अशा अनेक प्रश्नांचा विचार केलेला आहे. शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, कार्यकर्ते व प्रयोगशील शाळांनी केलेले एकत्रित चिंतन असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. नापाशी आणि आत्महत्या हा पहिला भाग परीक्षेचा ताण सहन न करू शकलेल्या आणि कमी मार्क्स म्हणजे आयुष्यातल्या सगळ्यांत मोठा पराभव असं मानून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या विद्यार्थांची नेमकी मानसिकता कशी असते, हे जाणून घ्यायला मदत करतो. दुसऱ्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे कृष्णमूर्ती, डॉ. वसंत गोवारीकर, भालचंद्र नेमाडे, अभय बंग, लक्ष्मण माने अशा अनेक मान्यवरांचे परीक्षा या विषयावरचे विचार संकलित केलेले आहेत. परीक्षा: एक सामजिक चर्चा या पुढच्या भागात परीक्षांची मुळे जनमानसांत केव्हापासून,किती, कशी खोलवर रुजलेली आहेत, त्याचा विचार केला आहे. भारतात पूर्वी गुरुकुल पद्धती होती;मग भारतीयांनी हे शिक्षणाचं आणि परीक्षेचं तुलनेने नवं तंत्र कसं स्वीकारलं, आणि अजूनही ते इतकं का उराशी बाळगलं आहे, याची उत्तरं मिळतील. परीक्षा: रिपोर्ट, सर्वेक्षण इत्यादी इत्यादी या भागात अगदीं वरच्या पातळीपासून विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांसाठी "परीक्षा " याचा नेमका अर्थ काय आहे, त्याबद्दल लेख दिलेले आहेत. परीक्षा अथवा मूल्यमापन या संदर्भात अनेक चांगले बदल, उपक्रम वरच्या पातळीवरून सुचवले जातात; पण विदयार्थी - शिक्षक - पालक या पातळीवर ते का आणि कसे फसतात, ते इथे समजू शकेल.आणि शेवटचा आणि last but not the least अशा ' आम्ही परीक्षा अशा घेतो ' या भागात परीक्षा या जुनाट, शिक्षण व्यवस्थेत असलेल्या प्रत्येकाच्या अंगाअंगात मुरलेल्या रोगाचा इलाज सांगितलेला आहे. अनेक प्रयोगशील शिक्षक, शिक्षणसंस्था, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी  आपापल्या परीने हे परीक्षेचं सर्वव्यापी, महाकाय स्वरूप बदलून ते विद्यार्थीभिमुख कसं केलं आहे, ते आपल्याला समजतं.अक्षरनंदन, सृजनआनंद, ग्राममंगल, कृष्णमूर्ती स्कूल, शांतीनिकेतन, एकलव्य मूल्यमापन पद्धती , गडचिरोली जिह्यातील सातत्यपूर्ण मूल्यमापन उपक्रम इत्यादी अभिनव उपक्रमांची माहिती सर्वांनी वाचून त्यांपासून प्रेरणा घ्यायला हवी. शिकवणे हा धंदा असं न मानता कर्तव्य मानून पूर्ण passion किंवा शिद्दतने शिकवणाऱ्या प्रत्येकाने हे लेख पुन्हा पुन्हा वाचावे, असे आहेत. 

एखाद्या चेंडूला दोरा बांधून टांगून ठेवलं आणि फिरवलं की तो सगळ्या बाजूंनी पाहता येतो. तसं हे पुस्तक वाचताना आपल्याला परीक्षेला सगळ्या बाजूंनी तपासून पाहता येतं. हे पुस्तक म्हणजे परीक्षा: भूतकाळ वर्तमानकाळ भविष्य अशी कुंडलीच आपल्यापुढे दिलेली आहे. वाचतांना अंतर्मुख करणारं, वास्तवाची जाणीव करुन देणारं आणि एक शिक्षक म्हणून मी माझ्या पातळीवर काय बदल करु शकते/ शकतो? याची जाणीव करुन देणारं पुस्तक, असं मी याचं वर्णन करेन. नव्या शैक्षणिक धोरणात होणारे बदल जेव्हा होतील तेव्हा होणारच आहेत, पण तोपर्यंत परीक्षेबाबतीत नव्या जाणिवेचे torchbearer तयार करणे, हा या पुस्तकाचा हेतू आहे.२००८ साली या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आलेली असल्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल यात अगदीं वास्तविक माहिती मिळेल असं नाही; पण भविष्यात नेमक्या अपेक्षा काय आहेत, किंवा पुढचा प्रवास कसा असेल याचं मार्गदर्शन नक्की मिळू शकेल. तेव्हा "येथून हो प्रारंभ नव्या जाणिवेचा" असं उद्दिष्ट ठेवून प्रत्येक शिक्षकाने इतकेच नव्हे तर शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रत्येकाने ( यात सुजाण पालक, विदयार्थी, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी असे सगळेच आले) आवर्जून वाचावं, म्हणून मी या पुस्तकाची शिफारस करेन.
 
_नेहा ज्योती प्रदीप जोशी
     ( २८.११.२०२२)


परीक्षेला पर्याय काय? 
संपादक:  हेरंब कुलकर्णी 
मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या: ३०४
मूल्य: २६० रुपये 
 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार