मेळघाटावरील मोहर: डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे
निगिजे पूर्वीलिया मोहरा |कीं येईजे पश्चिमीचीये घरा
निश्चळपणे धनुर्धरा| चालणे एथिचें||
येणे मार्गे जया ठाया जाइजे| तो गावों आपणचि होईजे|
हे सांगो काय सहजें| जाणसी तूं||
- एखाद्या विशिष्ट गावाच्या (ध्येयाच्या) दिशेने स्थिर चित्तानं वाटचाल करणारी माणसं एक दिवस आपणच ते गाव (ध्येय) बनून जातात. ( ज्ञानेश्वरी )
तीन चार वर्षांपूर्वी झी मराठीवर उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेचा सन्मान केला गेला. त्यांचं नाव पुकारलं गेलं, तशा त्या उठल्या. आपल्या बाजूलाच बसलेल्या पतीच्या पाया पडल्या आणि व्यासपीठावर जाऊन त्यांनी पुरस्कार स्वीकारला. आपण कोणत्या परिस्थितीत कसल्या प्रकारचं काम काय भूमिकेतून करतो आहोत, यावर नेमकंच पण मुद्देसूद असं त्या बोलल्या. त्या होत्या डॉ. स्मिता कोल्हे आणि प्रेक्षकांत बसून डोळ्यांत पाणी आणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांना दाद देणारे त्यांचे पती म्हणजे डॉ. रवींद्र कोल्हे. इथे मला पहिल्यांदा कोल्हे दाम्पत्याची माहिती मिळाली. हे दोघे मेळघाट नावाच्या आदिवासी बहुल भागात समाजकार्य करतात, इतकंच मला माहीत होतं. त्यात हे पुस्तक काही दिवसांपूर्वी नजरेस पडलं, आणि माणसं किती अचाट आणि अफाट स्वरूपाचं आयुष्य जगत असतात, त्याची प्रचिती आली.
मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथील तापी- खापरा- सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. खरं तर या ठिकाणचा आणि या दोन्ही माणसांचा दुरान्वयेही काही संबंध नव्हता. मग ही दोघं तिथवर कशी पोचली, तो प्रवास प्रेरणादायी आहे. दोघेही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. डॉ. कोल्हे तर लहान असल्यापासून हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त. हा मुलगा फार वर्षे जगू शकणार नाही, जगलाच तरी हा रोग त्याची पाठ सोडणार नाही, असं भाकीत डॉक्टरांनी करुन ठेवलं होतं. या शारीरिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी त्यांच्या मनाला उभारी दिली, ती अध्यात्मिक विषयावरच्या वाचनाने. आपला जीव किती मोलाचा आहे, हे कळल्यावर मग तो आपल्यापुरता न जगता इतरांसाठी जगण्यात व्यतीत केला, तर त्याचं खरं सार्थक होईल, ही मनोभूमिका तयार होत गेली. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे जमेल तितकी काटकसर करुन एमबीबीएस करुन जनसेवा करायची, हे ध्येय डोळ्यापुढे होतं. सायकलवारी करुन गावोगावी जावून तिथल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, समाजकार्य करणाऱ्या संस्था कशा चालवल्या जातात तेही त्यांनी जवळून पाहिलं.इंटर्नशिप करताना बाबा आमटेंसारख्या ' जनसेवेसाठी काया झीजवणाऱ्या' महापुरुषाकडूनच प्रत्यक्ष प्रेरणा मिळाली. काही झालं तरी आपली संस्था काढायची नाही, तिथे जातोय तिथे तिथलाच एक होऊन राहायचं, हाच माझा मार्ग असा विचार पक्का झाला. दारिद्र्याने पोखरलेल्या, आजाराने ग्रासलेल्या, अज्ञानाने पिचलेल्या या भागात ते दाखल झाले. सुरुवातीला हा डॉक्टर न परवडणाऱ्या महागड्या गोळ्या देईल, किंवा याच्याकडून कसे उपचार करुन घ्यायचे असंच तिथल्या लोकांना वाटत होतं. पण या संपूर्ण काळात डॉक्टरांनी दाखवलेलं धैर्य, प्रामाणिक तळमळ आणि वैद्यकी कसब यामुळे ते त्या लोकांचे लाडके "डॉ. कोलू" होऊन गेले. आता इथेच आयुष्य व्यतीत करायचं आहे, हे पक्कं झाल्यावर जोडीदाराचा शोध सुरू झाला. डॉक्टरांच्या मोजक्याच पण शक्यतो कुठलीही मुलगी ऐकताच ठाम नकार देईल, अशा चार अटी होत्या.
१) तिला महिना चारशे रुपयात घर चालवता यायला हवं. कारण त्यांच्याकडे महिन्याभरात साधारण ४०० रुग्ण येत. आणि ते प्रत्येकाची फी एक रुपया घेत.
२) मुलीची एका वेळी चाळीस किलोमीटर चालण्याची तयारी हवी. कारण तिथून तेवढ्या अंतरावर असणाऱ्या धारणी या गावात जायची वेळ खूपदा येईल, आणि बसची सुविधा उपलब्ध नाही.
३) पाच रुपयात लग्न करायची तयारी हवी. कारण नोंदणी विवाहाला तेवढाच खर्च येतो.
४) स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी भीक मागयची तयारी हवी. कारण त्याने अहंभाव गळून पडतो.
या दिव्य अटी ऐकून डॉक्टरांना होकार देणाऱ्या डॉ. स्मिता तितक्याच दिव्य!
सामान्य कुटुंबातला जन्म. त्वचेवर पांढरे चट्टे पडतात, केवळ या एका दोषामुळे त्यांना नकार पचवावे लागले होते. किंबहुना बाह्यरूपालाच महत्व देणाऱ्या मुलाला स्वीकारायची त्यांची तयारी नव्हती, तेव्हा "स्थळं" बघायला त्या एकट्याच जायच्या. स्वतःच्या हिंमतीवर नोकरी करणाऱ्या, कमावत्या स्मिताताईंना सजायची- नटायची आवड होती. पण त्यांची स्वतंत्र बुद्धी आणि कणखर व्यक्तिमत्त्व हीच खरी खासियत होती. डॉक्टरांबद्दल कळल्यावर,त्यांच्या अटी वाचल्यावर हा प्रांजळपणा त्यांना मोहवून गेला. स्वत: च्या पलीकडे पाहण्यात असणारं सौंदर्य त्यांना जाणवलं. डॉक्टरांशी त्यांनी समोरासमोर चर्चा केली, आणि त्यांनाच आपण जोडीदार म्हणून निवडल्याचं जाहीर करुन टाकलं. अर्थातच घरच्यांचा विरोध होता, पण स्मिताताईंनी आपल्या मनाचा कौल अंतिम मानला, आणि त्या बैरागडला डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे म्हणून दाखल झाल्या. तिथून या वनवासी दांपत्याची थक्क करणारी कहाणी सुरु झाली.
आपण इथे या लोकांवर उपचार करायला आलो आहोत, अशी संकुचित भूमिका दोघांनीही ठेवली नव्हती. त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना अंधश्रद्धा, कुपोषण, दारिद्रय, सामाजिक असुरक्षितता अशा अनेक नकारात्मक घटकांच्या विळख्यातून या लोकांना बाहेर काढणं, याला त्यांनी प्राधान्य दिलं. रुग्णांवर उपचार करत असताना इथली खरी समस्या आहे, ते इथलं कुपोषण, हे त्यांना जाणवलं. इथून शास्त्रशुद्ध पद्धतीने कमी खर्चात कुठली पीकं कशी घ्यावीत, याचा वस्तुपाठ म्हणून डॉक्टरांनी स्वतःच शेती सुरू केली. वीटभट्टीचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. सरकारी पातळीवर या लोकांना अन्नधान्य मिळावं, म्हणून विविध उपक्रम चालू असतात. पण मधल्याच लोकांच्या मग्रुरी आणि भ्रष्टाचारामुळे खरे लाभार्थी कायम वंचित राहतात.आपल्यासाठी शासन नेमकं काय करतंय, मुळात हेच ठाऊक नसल्याने वर्षानुवर्षे ही माणसं पिचली जात होती. यावर उपाय म्हणून सर्वत्र स्वस्त धान्य वितरण केंद्रावर चाललेला भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला. इतकंच करून ते थांबले नाहीत, तर असं केंद्र त्यांनी स्वतः चालवून दाखवलं. वेळी स्वतः नुकसान सहन करून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत त्याच्या हक्काचं धान्य पोहोचेल, याकडे ते जातीने लक्ष पुरवतात. इकडे स्मिताताई वेगळंच क्षेत्र गाजवीत होत्या. एक स्त्री म्हणून त्यांना या समाजात वावरताना इथल्या स्त्रियांच्या अनेक समस्या जवळून बघता, अनुभवता आल्या. कुपोषण, अगदी बालवयापासून सुरू होणारी बाळंतपणे, कुपोषित मातांच्या पोटी जन्माला येणारी कुपोषित पिढी, दोन वेळच्या अन्नासाठी करायला लागणारा संघर्ष, स्त्री म्हणून जगताना समाजात दिला जाणारा निम्न दर्जा, शारीरिक- आर्थिक- सामाजिक अशा अनेक पातळ्यांवर होणारं शोषण नित्य त्यांच्या नजरेस पडत होतं. सन्मानाने जगण्याचा हक्क, अन्याय सहन करणं हेच प्रारब्ध असं न मानता झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी पाय रोवून उभे राहण्याचे बळ स्मिताताई देऊ पाहत होत्या. कुठल्याही धमक्या, दबाव, संकटांना भीक न घालण्याची त्यांची वृत्ती, एखादा मुद्दा लावून धरण्याची चिकाटी, स्वतःची मानहानी सहन करून तिथले धनधांडगे, पुढारी,भ्रष्टाचारात माखलेली पोलीस व्यवस्था, वेगळ्याच ध्रुवावरुन चालणारी न्यायव्यवस्था अशा अनेक पातळ्यांवर धडाडीने काम करताना कुणाशीही पंगा घेण्याची तयारी यामुळे " डॉक्टर तो ठीक हैं, लेकीन बाई खतरनाक हैं" असं त्यांच्याबद्दल बोललं जातं. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी' अशी या दांपत्याची पुढची पिढी: राम, रोहीत कोल्हे हा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मला भावलेली गोष्ट म्हणजे त्यांनी कुठलंच क्षेत्र वा समस्या निषिद्ध मानली नाही. आदिवासी समाजात खोलवर रुजलेली बळीची प्रथा बंद करता येईल का याचा प्रयत्न करताना त्यांनी या प्रथेला काय पर्याय देता येईल, त्याचा विचार केला आणि त्यातून कबड्डी स्पर्धा, रामनवमी उत्सवानिमित्ताने यात्रा सुरु झाली. या समाजाला शासन दरबारी असणारं राजकीय आरक्षण त्यांना मुख्य प्रवाहात आणू शकेल, याची त्यांना जाणीव करुन देऊन गावच्या निवडणुकीत आदिवासी पॅनल उभं केलं. पंचेचाळीस वर्षांत पहिल्यांदा आदिवासी सरपंच निवडून आला. जोडीला स्मिताताई उपसरपंच झाल्या. या काळात संडास बांधणे, वीज कनेक्शन, विहिरी, नाळ योजना असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले. व्याघ्र प्रकल्पाच्या वेळी पुनर्वसन होत असताना शेतजमिनींसंदर्भात असणाऱ्या हक्कांची उभयतांनी केलेली जागृती, थोडंफार शिकलेल्या मुलांना पांढरपेशी प्रभावामुळे ना गावचा ना शहराचा असं त्रिशंकू अवस्थेत राहावं लागता कामा नये, यासाठी लघुउद्योग प्रशिक्षण, शास्त्रशुद्ध अल्पाखर्चात शेती करण्याचं मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांचा यात उल्लेख करता येईल. आदिवासी समाजाला भुलवून केलं जाणारं धर्मांतर उघडकीस आणताना सांप्रदायिक हा शिक्का, माध्यमां मधून हेतुपुरस्सर केली जाणारी मानहानी या कशाचीच तमा त्यांनी केली नाही, हे विशेष! वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणाची, तत्वांची कास कधीच सोडली नाही. त्यांचं पहिलं अपत्य रोहीत याच्या जन्माच्या वेळी झालेल्या गुंतागुंतीमुळे पुढील उपचारांसाठी आई आणि बाळाला नागपूरला हलवावं, असं सगळेच सुचवत असताना ' स्वतःवर प्रसंग ओढवला म्हणून शहराकडे धाव घेउन खर्चिक उपचार करायचे, आणि सामान्यपणाच्या गप्पा मारायच्या', हा दुटप्पीपणा दोघांनाही अमान्य होता. हा प्रसंग वाचताना या दोघांनी एकमेकांवर जो विश्वास दाखवला, परिस्थिती जितकी पोक्तपणे हाताळली ते वाचताना थक्क व्हायला होतं. डॉक्टरांचं विशेष म्हणजे कोणताही ism त्यांची मर्यादा नाही. वेगवेगळ्या isms चा अर्क ते कोळून प्यायलेले आहेत. त्यामुळेच आपल्यावर हल्ला करायला आलेल्या लोकांचा सुरुवातीला अहिंसा तत्वाचा मान राखत त्यांनी प्रतिकार केला नाही, पण ते लोक जीवावर उठू पाहत आहेत हे लक्षात आलं, तेव्हा शिवाजी महाराजांनी आग्रा प्रसंगातून शिकवलेलं व्यावहारिक शहाणपण अंमलात आणू शकले.
हे पुस्तक लिहिताना लेखिकेने जवळपास सगळीकडे खरी नावं, खरे प्रसंग उभे केले आहेत. शरद पवार, नितीन गडकरी अशी नावं यात आहेत, ते त्यामुळे. कोल्हे दाम्पत्याचं आयुष्य हा मुख्य विषय असला तरी त्यांनी हाताळलेल्या समस्या आणि कार्य याला अधिक महत्त्व दिलं आहे. कुठेही पाल्हाळ न लावता, भावनेचा पाझर असं काहीच न होवू देता कमालीची वस्तूनिष्ठता दाखवली आहे. सरळ सोप्या भाषेत या दाम्पत्याचं अफाट कार्य, त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, मानसिक कुचंबणा लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रामाणिक तळमळ जाणवत राहते. हा सगळा जीवनपट उलगडताना बा भ बोरकरांच्या " देखणे ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखती" या पंक्तीची अनुभूती येत राहते. माणूसपणाच्या मर्यादा सांभाळत देवमाणूसपण जपणाऱ्या डॉ. कोल्हे दाम्पत्याचा हा जीवनपट आपण सगळ्यांनीच आवर्जून वाचावा, असाच आहे.
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
(१३/०४/२०२२)
मेळघाटावरील मोहर: डॉ रवींद्र आणि डॉ स्मिता कोल्हे
लेखिका: मृणालिनी चितळे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या: ३००
मूल्य: ३००₹
छान लिहिलयस नेहा! माझं राहिलयं हे पुस्तक वाचायचं.
ReplyDeleteधन्यवाद! नक्की वाचा
Delete