A Reader's Reflections

     #पुस्तकांच्या_पानांवरुन 

      जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात. वाचन आणि वाचकांबद्दल सुध्दा असंच म्हणावं लागेल. प्रत्येकाची आवड, वाचायची पद्धत वेगवेगळी असू शकते. काही वाचक एकावेळी एकच पुस्तक वाचतात. काही at a time चार पाच पुस्तकं वाचत असतात. कुणाला कादंबरी आवडते, कुणाला चरित्र-आत्मचरित्रपर लिखाण आवडतं, कुणाला विनोदी तर कुणाला अध्यात्मिक विषयही आवडीचा असू शकतो. मला हेच पुस्तक का आवडतं, याला काही ठोस उत्तर असायलाच हवं असं नाही . काही पुस्तकं खूप नावाजलेली असतात, पण ते पुस्तक हौसेने वाचायला घ्यावं नी पत्ता चुकल्यासारखं वाटून जातं. तर कधी क्वचित निव्वळ योगायोगाने एखादं नेहमीच्या आपल्या आवडीच्या विषयांपेक्षा वेगळं पुस्तक वाचनात येतं आणि कायमचं तुमच्या मनात घर करुन जातं. आम्ही English Literature मधे उत्तम साहित्याचे गुण शिकलो होतो. Good literature is a literature which is universal, transcends the age in which it was created, plus which has multiple layers of meanings. 

    तुम्हाला असा अनुभव आहे का, की एखादं पुस्तक तुम्ही पहिल्यांदा वाचल्यावर तुम्हाला येणारा अनुभव आणि तेच पुस्तक काही वर्षांनी परत वाचल्यावर येणारा अनुभव यात बराच फरक असतो. तुमचं वाढतं वय, त्याबरोबर ओघाने येत जाणारे अनुभव आणि शहाणपण तुम्हाला त्याच शब्दांत दडलेला वेगळा अर्थ दाखवतात. काही पुस्तकं सतत वाचत राहण्याची पुस्तकं असतात. त्या पुस्तकांबाबतीत तुमचं स्टेटस "in a relationship' असं तयार झालेलं असतं. या पुस्तकांना ठरवून वेळ द्यावा लागतो, नाहीतर ती आपणहून तुम्हाला हाका मारायला लागतात. माझ्या बाबतीत स्वामी, छावा, श्रीमान योगी, व्यासपर्व, कृष्णकिनारा, मैत्रेयी, गुलमोहर, मोगरा फुलला, अमृतवेल,Pride and Prejudice, Atomic Habits अशी बरीच पुस्तकं आहेत; की जी मला सहा महिन्यांतून एकदा वाचावीच लागतात. 

   मी साधारण दहावीत असताना वपुंचं गुलमोहर वाचलं होतं. त्यातल्या कथा मला तेव्हा खूप खूप आवडल्या होतात.' कसं सुचतं एखद्याला इतकं' असं वाटलं होतं. तेच पुस्तक पुन्हा वर्षभरात वाचल्यावर त्यातल्या चार- पाच गोष्टी अगदी मनात भरल्या. तेव्हापासून आत्तापर्यंत जेव्हा केव्हा मी त्या गोष्टी वाचल्या आहेत, तेव्हा दरवेळी एक वेगळीच अनुभूती आल्यासारखं वाटतं. लायब्ररीत हे पुस्तक मला सतत खाणाखुणा करतच असतं.पान उलटताना पुढच्या पानावर कोणत्या ओळी आहेत, हे ठाऊक असूनही यातल्या ज्या कथा परत परत वाचल्या जातात, त्या आहेत: गांधारी, पुनर्जन्म, शिळा अहिल्या, शोध, भरती आणि नजर. यातले तो- ती, सुहासिनी - पद्मिनी, सदानंद- लीला, आबा देवकुळे. ही नुसती पात्रं नाहीत, त्या जीवंत व्यक्ती आहेत, किमान माझ्यासाठी तरी. त्यांना मला अधून मधून भेटावं लागतं, त्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे आतातरी काही उत्तर आहे का हे स्वतःलाच विचारुन पाहावं लागतं.

   माणसंचं कशाला, गुंतून राहायचं ठरवलं तर तर पुस्तकंही तुम्हाला गुंतवून ठेवू शकतात. फक्त एक वाचक म्हणून त्यांना त्यांचं ' देणं'  द्यावं लागतं. तुम्ही असे कोणत्या पुस्तकांचे देणेकरी आहात, की काही दिवसांनी तुम्हाला त्यांच्याकडे जावंच लागतं? मला ते अनुभव वाचायला नक्की आवडतील.

- नेहा ज्योती प्रदीप जोशी
(०९/१०/२०२२)

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार