मोठी तिची सावली
पुस्तकांच्या पानांवरून
"मी कल्पवृक्षाच्या तळवटी बसलेली आहे. त्याची सावली छान विस्तारली आहे. कित्येक वसंत अनुभवले. शिशिरातली पानगळही पाहिली. अनेक पक्ष्यांनी या वृक्षाच्या आधारानं घरटी बांधली, अनेकांनी फळं चाखली. अज्ञानी जनांनी त्यावर कुऱ्हाडीही चालवल्या. कुणाबद्दलही राग, आकस न धरता साऱ्यांना शीतलता देत सावली मोठीच होत आहे. ... आणि मला कळत नाहीये की, क्षणोक्षणी मोठ्या होणाऱ्या सावलीकडे पाहू की जन्माची संगतसोबत करणाऱ्या माझ्या छोट्याशा ताईला पाहू? "हे शब्द आहेत मीना मंगेशकर- खडीकर यांचे आणि त्या ज्यांना आदराने महावृक्षाची उपमा देत आहेत, त्या आहेत तुमच्या आमच्या सर्वांच्या दीदी अर्थात गानकोकिळा लता मंगेशकर.
मोठी तिची सावली या प्रवीण जोशी यांनी शब्दांकन केलेल्या आपल्या या पुस्तकात मीना ताईंनी आपल्या दीदींच्या अनेक हृद्य आठवणी लिहून ठेवल्या आहेत. दीदी नावाचा सुरांचा महासागर माहीत नाहीत, इतका क्वचितच कुणी कोरडा मनुष्य असेल. आधीच्या, आत्ताच्या आणि असंख्य सुरसाधक आणि प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदी आपल्याला दिसल्या, पण त्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यांचा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मीनाताईंनी केलं आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची लाडकी लाडाकोडात वाढलेली लता, भावंडांना सांभाळत त्यांच्यापेक्षाही जास्त द्वाडपणा करणारी लता, वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर घर- लहान भावंडं सांभाळण्यासाठी घरची कर्ती झालेली लता, गळ्यात असणारे मंगेशकरी सूर- मनात लढायची अमर्याद जिद्द आणि आईवडिलांच्या संस्कारांचे बळ या भांडवलावर संगीताच्या क्षेत्रात आपली ओळख बनवू पाहणारी लता ते संगीतक्षेत्राची ओळख बनून गेलेल्या लतादीदी हा जीवनपट जसा दिसला, आठवला तसा मीनाताईंनी आपल्याला सांगितला आहे.
हे काही दीदींचं चरित्र नाही, हे आठवणींचं पुस्तक आहे. वाचताना जाणवत राहतो तो म्हणजे दीदींविषयी या सगळ्या भावंडांना वाटणारा आदर आणि या आठवणी लिहिताना ठेवलेली समदृष्टी. मनात आणलं असतं ज्यांनी दीदींविषयी वेगवेगळे विवाद केले, सुरुवातीच्या पडत्या काळात छळ केला त्यांचा मीनाताई नावानिशी उद्धार करु शकल्या असत्या. त्यांना वाटेल तितकं स्फोटक, सनसनाटी लिखाण त्या करु शकल्या असत्या, पण त्यांनी हा विषय खूप जबाबदारीने हाताळला आहे. कदाचित या लोकांचा उल्लेख करणं म्हणजे त्यांच्या विवादाला recognition दिल्यासारखं होईल किंवा फिरुन त्यांचा अपमान करावा इतकीही त्यांची पात्रता नाही असंही मीनाताईंना वाटलं असावं. मंगेशकर कुटुंबाला दिला जाणारा आदर यथोचित का आहे, ते यातून समजू शकेल. मी वसंतराव या चित्रपटामुळे माझ्या पिढीच्या लोकांना मास्टर दीनानाथ पडद्यावर पाहायला मिळाले. अतिशय राजबिंडे, रसिकांच्या गळ्यातला ताईत असणारे दीनानाथ वैयक्तिक आयुष्यात अतिशय सत्शील, समाधानी होते. त्यांनी १४ वेळा once more घेतल्याचा किस्सा आपल्याला माहीत आहे. पण एका नाटकात ते आणि ७-८ वर्षांची लता दोघांचीही गाणी होती, तेव्हां बाललताने वडिलांना आव्हान दिलं, " तुमच्यापेक्षा एक जास्तीचा once more घेऊन दाखवते की नाही ते बघाच!" आणि झालंही तसंच. त्या दिवशी मास्टर दीनानाथांपेक्षा जास्ती once more बाल लताने घेतले.
चारही मुलींवर जीवापाड माया, बाळला ( हृदयनाथ) तान्हा असल्यापासून छत्रपती शिवाजी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचं बाळकडू देणारे दीनानाथ स्वतः उत्तम ज्योतिषी होते. आपल्या मृत्यूची तारीख, वेळ त्यांनी लिहून ठेवली होती. या आपल्या आभाळाएवढ्या वडिलांचं छत्र हरपलं, हलाखीचे दिवस आले, तेव्हाही दीदी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करून होत्या. 'त्यांचं खरं गाणं मागे पडेल म्हणून माझ्या कोणत्याच मुलाने चित्रपटात पार्श्वगायन करु नये', अशी दीनानाथांची इच्छा होती. पण पुढे याच मंगेशकर स्वरपंचायतनाची या क्षेत्रावर सत्ता चालली. पाचही भावंडं या क्षेत्रात चमकली, हे क्षेत्र व्यापून राहिली. पण तरीही शेवटी ' लता मंगेशकर मात्र एकच घडली ', अशी प्रांजळ कबुलीही मीनाताई देतात. त्यांचं गाणं इतकं मोठं आहे, की त्यापुढे काहीवेळा त्यांचीच इतर कार्ये झाकली जातात. त्यांनी उभारलेल्या संस्था, गायकाला रॉयल्टी मिळावी यासाठी केलेले प्रयत्न, प्रत्येक प्रमुख भारतीय भाषेत त्यांनी गायलेली गाणी, त्याचे अल्बम्स- त्यामागचे किस्से अशा अनेक गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या, ते या पुस्तकातून. विषयाइतकीच सुबक आणि सुंदर मांडणी, आवर्जून वाचावी अशी बाबासाहेब पुरंदरे प्रस्तावना हेही या पुस्तकाचे विशेष आहेत.
गानकोकिळा ही पदवी हल्लीच्या फिल्मफेअर पुरस्कारासारखी विकत मिळत नाही. आपला खरा सूर हरवू न देता त्याच सुराची अखंड साधना करणारी कोणी एकच दीदी होते, गानकोकिळा होते. तो शाश्वत सूर अनंत काळासाठी आपल्यासोबत असणारच आहे. त्या सुराची ही गोष्ट, मोठी तिची सावली!
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
२५.०९.२०२२
मोठी तिची सावली
मीनाताई मंगेशकर- खडीकर
परचुरे प्रकाशन
पृष्ठसंख्या: २४०
Comments
Post a Comment