वारसा: नरहर कुरुंदकर

  #पुस्तकांच्या_पानांवरुन

       काही पुस्तकं आकाराने खूप छोटी असतात, पण वाचता वाचता संपत नाहीत. थोडक्याच शब्दांत आशय इतका ठासून भरलेला असतो, की वाचणाऱ्या व्यक्तीचा कस लागला पाहिजे. यावेळी वाचलं ते पुस्तक अशा प्रकारचं होतं. नरहर कुरुंदकर हे नाव खूप ऐकूनसुद्धा आजतागायत त्यांचं कोणतंच साहित्य मला वाचायला मिळालं नव्हतं. गेल्या आठवड्यात शेवटी एकदाचा हा दुष्काळ संपला, आणि माझ्या हाती पडलं ते त्यांचं वारसा हे पुस्तक. अगदी साजेशा नावाचं, महाभारताशी संबंधित विविध घटकांचा तर्कशुद्ध आढावा घेणारे चार लेख यात समाविष्ट आहेत.
     पहिला लेख डॉक्टर सुखटणकर यांनी संपादित केलेल्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्ती विषयी आहे. महाभारत हा विषय समग्र भारतातल्या जनमानसात इतका खोलवर रुजलेला असल्यामुळे; प्रांत, भाषा, संस्कृती नुसार अनेक प्रकारच्या कथा, दंतकथांची भर वेळोवेळी मूळ कथानकात पडत गेली आहे. त्यातून सध्या आपल्यासमोर असणारं महाभारत यातील मूळ कथानक आणि प्रक्षिप्त भाग अशी वर्गवारी करताना आलेल्या अडचणी अनेक प्रकारच्या आहेत. त्यातून मार्ग काढत डॉक्टर सुखटणकर यांनी संपादित केलेली चिकित्सक आवृत्ती नेमकी कशी आणि कोणत्या साधनांच्या आधारावर घडली, त्याचं विवेचन पहिल्या लेखात आहे. 
     तिसऱ्या लेखात ' महाभारत: एक सूडाचा प्रवास' या दाजी पणशीकर लिखीत पुस्तकाचं कुरुंदकर यांनी केलेलं परीक्षण आहे. महाभारताकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असू शकते. काहींच्या दृष्टीने ते एक महाकाव्य आहे, तर काहींच्या दृष्टीने तो आपला इतिहास आहे. मुळातच महाभारत या नावाचा, त्यातील व्यक्ती आणि घटनांचा विस्तारच इतका व्यापक आहे, की प्रत्येकाच्या मनावर त्याचा वेगळा परिणाम होऊ शकतो. अनेक प्रकारच्या माणसांच्या, अनेक प्रकारच्या भावना आणि कर्मांचा हा परिपाक आहे. पुस्तकात महाभारतात सूड ही मध्यवर्ती भावना किंवा कल्पना आहे, असा आशय आहे. त्याबद्दल, पुस्तकाच्या मांडणीबद्दल कुरुंदकर यांनी आपलं मत आणि विवेचन संयत शब्दांत मांडलं आहे. 
     चौथा लेख आहे, ' गीतारहस्य: एक टिपण'. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या या मराठीतल्या एका महत्त्वाच्या लिखाणावर त्यांचे विचार नक्की वाचण्यासारखे आहेत. लोकांच्या मनातील धार्मिक भावना आणि तत्कालीन परिस्थितीनुसार प्रत्येक भारतीयाकडून अपेक्षित देशकार्य याची टिळकांनी घातलेली सुरेख सांगड म्हणजे हा ग्रंथ. टिळकांना तुरुंगात कोणताही विषय लिखाणासाठी घेता आला असता, पण त्यांनी जाणीवपूर्वक हाच विषय निवडला, त्यामागे कारण होती ती तत्कालीन समाजमनात देवकार्य आणि देशकार्य या दोन कल्पनांचा संगम घडवण्याची गरज. मूळ ग्रंथ वाचायला तुम्हाला प्रेरित करेल, असा हा लेख आहे. 
     मला सगळ्यांत जास्त आवडलेला लेख, वारसा मधला दुसरा लेख ' भीष्म: एक चिंतन' याविषयी. महाभारतातल्या अनेक व्यक्तिरेखा आपल्याला अतीपरीचित, जास्त चर्चिल्या गेलेल्या आहेत. अगदी कुंती, द्रौपदी, गांधारी, धृतराष्ट्र, भीम, अर्जुन, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामादि अनेक व्यक्तीचरित्रे अनेक लेखकांनी समर्थपणे हाताळली आहे. श्रीकृष्ण तर सगळं व्यापून टाकतोच! युगांत, व्यासपर्व सारखं लिखाण एक एक व्यक्तीचा विचार करणारं आहे. तशा धाटणीचा हा लेख, आजवर फार क्वचित चर्चिल्या गेलेल्या परंतु अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीचं समग्र महाभारतातलं स्थान अधोरेखित करतो. भीष्म एक पितामह, एक ब्रह्मचारी, इच्छामरणाचा वर मिळालेले एक वीर यापलीकडे आपण त्यांच्या भूमिकेचे विविध कंगोरे नीट विचारात घेत नाही. विचार करायला भाग पाडणारा, अगदी जमून आलेला लेख असं मी त्याचं वर्णन करेन. भीष्म एक चिंतन या विषयावर मला एक वेगळा लेखच मी लिहावासा वाटतो आहे, इतकं विचारांना चालना देणारं हे लिखाण आहे, एवढं नक्कीच. 

     सरतेशेवटी नरहर कुरुंदकर यांचं लिखाण पहिल्यांदाच वाचल्यावर मला जे काही जाणवलं त्याविषयी. कुरुंदकर हे अभ्यासू वृत्तीचे, स्वतंत्र आणि निर्भीड बुद्धीचे विचारवंत आहेत, हे जाणवतं. त्यांचा कल आजवर चालत आलेल्या समजुती, विचारांच्या चौकटी बाजूला सारून एखाद्या गोष्टीच्या, कल्पनेच्या मुळाशी जाऊन ती गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासून पाहण्याचा आहे. मुळातच वृत्ती अभ्यासू असल्यामुळे दुसऱ्या कुणाची मतं पटली, तर तेही ते मोकळेपणी मान्य करतात. आणि जर नाहीच पटली, तर संयत शब्दांत आपली वेगळी भुमिका स्पष्ट करतात. यात त्यांना टीका करणे, विसंगत अगर विरोधी विचाराला कमी लेखणे, प्रचलित समजुतीचा अपमान करणे यातलं काहीच साध्य करायचं नसून विचार मांडणे हाच त्यांचा निखळ हेतू असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच माझ्या विचारांशी न जुळणारे त्यांनी मांडलेले विचार वाचताना मला कुठेही अपमान झाल्यासारखं, भावना दुखावल्यासारखं वाटलं नाही. विचारवंताचं "विचारवंत" असणं, हे तो अगर ती जे काही करत असेल, त्यातून प्रतीत व्हावं लागतं. विचारवंत किंवा अभ्यासक या बिरूदामागची जबाबदारी नेमकी समजलेल्या व्यक्तीचं लिखाण आपण वाचलं, याचं मला समाधान आहे. आता माझ्या वाचनाचा पुढचा टप्पा व्यासांचे शिल्प असणार आहे, हे सांगायला नको! एक छोटेखानी, पण विचारांना भरपूर खाद्य पुरवणारं लिखाण वाचायचं असेल, महाभारत या विषयाची आवड असेल, तर आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. 

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार