जेरुसलेम

पुस्तकांच्या_पानांवरून
वर्ष २०२१: पर्ण आठवे

गेल्या आठवड्यात मध्यपूर्व आशियाशी संबंधित दोन पुस्तकं वाचली. पहिलं पुस्तक आहे सायमन सीबग मांटफिऑरी यांनी लिहिलेलं आणि सविता दामले यांनी मराठीत अनुवादित केलेलं 'जेरुसलेम: एक चरित्रकथा'. सध्या कायम विवादात असलेलं जेरुसलेम म्हणजे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशा तीनही धर्मांमधे एक पवित्र शहर, एक धर्मक्षेत्र म्हणून मान्यता पावलेलं आहे. ज्यू लोकांचं मूळ स्थान(Promised Land), तसेच ज्यू धर्मातलं सर्वोच्च पवित्र मानलं गेलेलं मुख्य धर्मस्थळ होली टेम्पल, जिथून जगाच्या रचनेचा पाया रचला गेला, जे देवाचं निवासस्थान आहे, Holy of Holies अशा मंदिराचं मूळ स्थान असलेली पश्चिम भिंत ( Western Wall) जेरुसलेम इथे आहे. राजा डेव्हिड (ख्रि.पू. १०१०-९७०) याने हे शहर जिंकून त्याला ज्यू साम्राज्याची राजधानी बनवलं. तर त्याचा मुलगा राजा सोलोमनने इथे ज्यू धर्माचं पहिलं तर राजा हेरड याने दुसरं Holy Temple बांधलं , असा इतिहास आहे. इस्लाम धर्मानुसार, प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी मक्केहून रात्रीचा प्रवास करून इथे येऊन ज्या जागी प्रार्थना केली, ती जागा(Blessed Land of Quran); अर्थात इस्लाम धर्मातील तिसरं सर्वोच्च पवित्र स्थळ म्हणून ओळखली जाणारी अल्- अक्सा मशीद इथे आहे. तर येशू ख्रिस्तांचा मृत्यू अर्थात Crucification आणि पुनरुत्थान अर्थात Resurrection जेरुसलेम इथेच झालं आहे. येशू ख्रिस्तांचं दफन केलेली जागा आणि tomb होली सेपलकर चर्चच्या आत आहे. ख्रिश्चन धर्मासाठी ही जागा Land of Gospels म्हणजे येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीशी संबंधीत आहे. अशा रीतीने तीनही प्रमुख अब्राहमिक धर्मांसाठी ही जागा पवित्र मानली जाते. ही सगळी माहिती विस्ताराने या पुस्तकात दिली आहे.


जेरुसलेमचं आज असणारं महत्त्व याची तुलना आपल्याकडे राजकीयदृष्ट्या दिल्ली, आणि धार्मिकदृष्ट्या काशी, मथुरा, अयोध्या अशा स्थानांचं जे महत्त्व आहे, त्याच्याशी करता येईल. अशा या शहराचा हजारो वर्षांचा इतिहास, त्यातील घटनाक्रम या पुस्तकाद्वारे समजून घेता येईल. या धार्मिक महत्त्वामुळे या शहराभोवती अनेक कथा- दंतकथा- आख्यायिका गेल्या अनेक पिढ्यांपासून रचल्या गेल्या आहेत. त्याही इथे वाचायला मिळतात. प्रस्तावनेतच लेखक म्हणतात त्यानुसार, या शहराभोवती रचल्या गेलेल्या कथा, दंतकथा, समजुती काढून घेतल्या तर तिथे काहीच उरत नाही, म्हणून जेरुसलेम हे अनेक मान्यतांचं शहर आहे. एकाच जागेवर तीनही धर्माच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी बांधकाम केलं असल्यामुळे ही जागा आमचीच, असा तीनही धर्मियांकडून दावा केला जातो. मग हा गुंतागुंतीचा इतिहास सुरु कसा झाला, त्याची ही कथा आहे; ज्यात निर्माणापेक्षा विध्वंस, स्थैर्यापेक्षा अराजकता, शांतीपेक्षा संहारच अधिक आहे. या शहराचा इतिहास वाचता वाचता तो तो धर्म कसा विकसित होत गेला, त्यात निर्माण झालेले उपपंथ, चालीरिती तेही वाचायला मिळेल. पुस्तक एकूण नऊ भागांत विभागलेलं आहे. ते नऊ विभाग असे आहेत: ज्यू धर्म, मूर्तीपूजा ( पेगनीझम), ख्रिश्चन धर्म, इस्लाम, क्रुसेड, माम्लुक, ऑटोमन, साम्राज्य ( नेपोलियन, अल्बेनियन, अरब, रशियन), झायनवाद. शेवटी उपसंहारात तिथली सद्यःस्थिती, तीन धर्मीय लोक आपली स्थळं कशा रितीने सांभाळतात त्याची व्यवस्था, लेखकाने सुचवलेला तोडगा आहे. पुढे मक्काबी- हेरड वंश, प्रेषित मुहम्मद- इस्लामी खलिफा आणि घराणी, जेरुसलेमचे क्रुसेडर राजे, हाश्मी शेरीफ घराणे यांच्या वंशावळी आणि २९ पानी लांबलचक संदर्भसूची आहे. अनुवाद करताना त्या भाषेत येणारी नावं, त्यांचं मराठी उच्चारण यासाठी नक्कीच खूप परिश्रम घ्यावे लागले असणार आहेत. शक्य तितक्या सोप्या भाषेत पण प्रभावीपणे ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी, यासाठी अनुवादकांनी नक्कीच प्रयत्न केले आहेत. जेरुसलेमसारख्या महत्त्वाच्या विषयावरचा एक उत्तम संदर्भग्रंथ मराठीत आणल्याबद्दल अनुवादकांचेही आभार मानायला हवे. 

मला आजवर जो इतिहास जाणून घ्यायचा होता, तो म्हणजे ज्यू लोकांचा इतिहास. वीणा गवाणकर यांचं गोल्डा वाचल्यापासून मला ज्यूंचा अगदी सुरुवातीपासूनचा इतिहास जाणून घ्यायचा होता. त्यांना हजारो वर्षे करावा लागलेला संघर्ष, त्यांचा प्रचंड प्रमाणावर झालेला नरसंहार, त्यातून ज्यू लोक कसे टिकले इथवर आणि या सगळ्याचा शेवट इस्राएलची निर्मिती, होली लॅंडमधे येणाऱ्या भागावरील सार्वभौमत्वासाठी सुरु असलेला इस्राएल-पॅलेस्टाईन वाद, सिक्स डे वॉर मधे कसा झाला, तोही एक उत्कंठावर्धक प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळेल.

पुस्तक मोठं आहे, भरपूर माहिती त्यात दिलेली आहे. वाचताना थोडासा information overdose झाल्याची भावना होते. शेवटी तिथे असलेल्या प्रत्येक धर्मस्थळाचीही timeline दिली असती, तर लक्षात ठेवायला सोपं गेलं असतं. व्हॅटिकन सिटीप्रमाणे जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय स्थळाचा दर्जा देऊन तिथली व्यवस्था आंतरराष्ट्रीय समितीतर्फे, तर पोलीस गस्त अरब- इस्राएल यांच्या संयुक्त दलांतर्फे किंवा एखादया आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे व्हावी, असा तोडगा लेखकांनी सुचवला आहे. हा तोडगा किंवा लेखकांनी वेगवेगळ्या प्रमुख घटनांचं जे interpretation केलं आहे, ते सर्वांनाच मान्य होईल असं नाही, असं त्यांनीच नमूद करून ठेवलं आहे. तरीही या शहराच्या इतिहासाची रूपरेषा समजून घेण्यासाठी मराठीत उपलब्ध असणारं महत्त्वाचं ससंदर्भ पुस्तक म्हणून मी या पुस्तकाची शिफारस करेन.
© नेहा ज्योती प्रदीप जोशी
१४.०६.२०२१

जेरुसलेम: एक चरित्रकथा
लेखक: सायमन सीबग मांटफिऑरी
अनुवाद: सविता दामले
प्रकाशक: डायमंड प्रकाशन
पृष्ठसंख्या: ७९०
मूल्य: ८९५ /-

Comments

Popular posts from this blog

वंदे गुरू परंपरा

नवी पिढी नव्या वाटा

आयदान- उर्मिला पवार