गीतरामायण
#पुस्तकांच्या_पानांवरुन
२०२१: पर्ण पाचवे
अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली
कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली...
गीतरामायणाचे सूर घुमले नाहीत, असं एकही मराठी घर नसेल. गीतरामायण म्हणजे शुभंकर संस्कारांचं पाथेय ! महासागरासारखी व्याप्ती असणारी रामकथा केवळ ५६ गीतांच्या माध्यमातून शब्दबद्ध करणाऱ्या गदिमा तथा गजानन दिगंबर माडगूळकर आणि त्या गीतांना आपल्या श्रवणीय सुरांचे अलंकार चढवणाऱ्या बाबूजी तथा सुधीर फडके यांचे मराठी रसिकांवर अनंत उपकार आहेत. १९५५ साली पुणे आकाशवाणीचे सीताकांत लाड यांना धार्मिक किंवा नैतिक थीमवर आधारित लोकांना आवडेल, असा एखादा कार्यक्रम करायचा होता. त्यासाठी त्यांनी गदिमांना विचारणा केली. (म्हणजे तसं बघायला गेलं तर खरंच गदिमांनी गीत रामायण लिहावं ही रामाचीच इच्छा होती म्हणायची!) दोघांनी मिळून रामायणावर आधारित कार्यक्रम करायचा असं ठरवलं. गदिमा गीतं लिहितील, आणि बाबूजी संगीत दिग्दर्शन करतील आणि दर शुक्रवारी एक एक गाणं आकाशवाणीवर प्रसारित केलं जाईल हे ठरलं. आणि १ एप्रिल १९५५ साली 'स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती' या गीतापासून एक नवा इतिहास रचला गेला.
सुरूवातीला ५२ गीतांची असलेली मालिका त्या वर्षी अधिक मास असल्याने चार शुक्रवार जास्त येऊन ५६ गीतांची झाली. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला, की सलग दोनदा आकाशवाणीवर त्याचं प्रसारण झालं. आणि गीत रामायण या संग्रहालाही मराठी वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. आज हिंदी, इंग्रजी, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू, सिंधी, कोकणी, संस्कृत या भाषांत गीत रामायण अनुवादित झालं आहे, आणि या भाषांत कार्यक्रम करताना बाबूजींनी दिलेलं संगीतच वापरलं जातं.
गदिमांइतकेच माझे आवडते असणारे कवी बा. भ. बोरकर यांनी प्रस्तावनेत गदिमांना जी दिलखुलास दाद दिली आहे, गीतरामायणाच्या लोकप्रियतेची जी कारणं दिली आहेत, ती आवर्जून वाचण्यासारखी आहेत. आजवर मी वाचलेल्या अनेक प्रस्तावनांपैकी ही एक उत्तम प्रस्तावना आहे. स्वये श्रीरामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती या गाण्यापासून फ्लॅशबॅकने त्याच प्रसंगापर्यंतची सगळी रामकथा गीत रामायणात आहे. गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी असं दशरथ राजाचं वर्णन, कल्पतरुला फूल नसावे वसंत सरला तरी ही कौसल्येची मनोवेदना, पुढे रामजन्म, बाललीला वर्णन आहे. चार भावंडं एकत्र खेळताना बघून त्याचं वर्णन कौसल्यामाता 'माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण' असं करते. पुढे ताटिका वध प्रसंगातलं महर्षी विश्वामित्रांचं वीररसयुक्त आवाहन, लगेच पुढे आलेला अहिल्येचा शापमुक्तीचा प्रसंग, 'आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे' अशा शब्दात वर्णन केलेलं सीता-रामाचं स्वयंवर, पुढे रामाला व्हायचा राज्याभिषेक असे वेगवेगळे भावनिक प्रसंग फार विलक्षण ताकदीने हाताळले आहेत.
कैकेयी, दशरथ, कौसल्या, लक्ष्मण, भरत, सीता, हनुमान, पलीकडच्या पक्षाचे रावण, कुंभकर्ण ही पात्रं एक एक गीतातून इतकी प्रभावी आणि हुबेहूब साकारली आहेत, की त्याला तोड नाही. रामाला वनवासाला धाडलं म्हणून कैकेयीचा आणि आपल्या पित्याचा अतिशय तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करणारा, 'बैस तूच राज्यपदी, आड कोणी येई मधी, येऊ देत, त्यास कंठस्नान घालतो' असं म्हणणारा अँग्री यंग मॅन लक्ष्मण असो, किंवा कैकेयीला 'माता न तू वैरिणी' असं म्हणणारा, 'वैनतेयाची भरारी काय मशकास साधते, का गजाचा भार कुणी अश्व पृष्ठी लादते' अशा शब्दात श्रीरामापुढे आपल्या मर्यादा मान्य करणारा भरत हे दोघेही वास्तविक श्रीरामाचे सावत्र बंधू पण त्यांच्यातलं हे जगावेगळं प्रेम म्हणजे आजच्या आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी निर्माण केलेला उत्तुंग आदर्श आहे. भरत श्रीरामाला भेटायला आला असताना त्यांनी केलेला उपदेश ' पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे स्थितप्रज्ञ रामाचं दर्शन घडवणारं गीत माझं सगळ्यात आवडतं आहे. ही गीतं वाचताना माझी मोठी पंचाईत अशी झाली, की मला ती भरभर वाचताच येईनात! पूर्वी ऐकलेली गीतं मी बाबूजींच्या आवाजात वाचत होते. सीतेच्या तोंडी मोजकीच गीतं आहेत, पण त्यातून एक राजकुमारी, रघुकुलाची स्नुषा, श्रीरामांची सहचारिणी, वनवासी सीता, विरहिणी सीता, रावणासारख्या राक्षसापुढे ताठ मानेने उभी राहू शकणारी स्वाभिमानी सीता, सुख दुःखाचा निरंतर अनुभव घेत कष्टी झालेली सीता अशी तिची सगळी स्त्रीरुपं ठळकपणे अधोरेखित झाली आहेत. सेतू बांधा रे सागरी, देवहो बघा रामलीला, त्रिवार जयजयकार सारखी समूहगीतं; 'दुःखीच साह्य होतो दुःखात दु:खिताला' असं म्हणत रामांचा सन्मित्र झालेला सुग्रीव, कुंभकर्णाच्या तोंडी असलेलं 'लंकेवर काळ आज कठीण पातला', भक्तश्रेष्ठ हनुमंताचं ' प्रभो मज एकच वर द्यावा' अशा गीतांनी या रामायणाची शब्दशोभा अधिकच वर्धमान केली आहे.
मी पुलंच्या गुण गाईन आवडी किंवा मैत्र यामधे असं वाचलं होतं, की बाबासाहेब पुरंदरे एके दिवशी सकाळी जोगत्याचा वेश घेऊन गदिमांकडे गेले होते आणि त्यांनी गीत शिवायन लिहिण्याचं आश्वासन गदिमांकडून घेतलं होतं आणि त्यांनीही ते दिलं होतं. दुर्दैवाने ती गोष्ट घडली नाही, अन्यथा मराठी साहित्यात एक नवा इतिहास रचला गेला असता ! शिवायनाचं स्वप्न अधुरं राहिलं, पण गीतरामायणकार म्हणून गदिमांची ओळख मराठी रसिक कायम स्मरणात ठेवतील. खुद्द गदिमांनीच गीतरामायणाबद्दल आपल्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत, त्या अशा:
अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा, तीर्थे काव्याची धुंडिली
कुण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली
देव वाणीतले ओज शीतळते माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी
झंकारती कंठ वीणा, येई चांदण्याला पूर
भाव माधुर्याला येई, महाराष्ट्री पूर
चंद्र भारल्या जीवाला, नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड !
✍️नेहा ज्योती प्रदीप जोशी
२१.०४.२०२०
Comments
Post a Comment