द्रोहपर्व : अजेय झणकर
#पुस्तकांच्या_पानांवरून
२०२१: पर्ण चौथे
#पुस्तक_परीक्षण
#ऐतिहासिक_कादंबरी
मराठी वाचकांना नारायणराव पेशवे माहीत आहेत, ते केवळ "काका मला वाचवा" आणि आनंदीबाईंनी त्यांच्यासाठी लिहिलेल्या पत्रात "ध चा मा केला" एवढ्याचसाठी. हे नाट्य माहीत असलं तरी प्रत्यक्षात तेव्हा काय घडत होतं, आणि मुख्य म्हणजे पेशव्यांचा अशा प्रकारे खून झाल्यावर त्याने राजकारणाला कशी वेगळीच कलाटणी मिळाली, याचा इतिहास द्रोहपर्व सांगते.
लेखकांनी सुरूवातीला आपल्या मनोगतात सांगितल्याप्राणे, सरदार महादजी शिंदे यांच्या फौजांनी पुण्याजवळच्या वडगाव इथे 'इष्टूर फाकड्या'ला मारून इंग्रज फौजांना पाणी पाजल्याचा इतिहास त्यांना १९९८ साली भाषांतरकरता वाचायला मिळाला. या इतिहासाने प्रेरित होऊन थेट लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीपर्यंत पोहोचून, प्रयत्नपूर्वक संशोधन करून, एक जागतिक श्रेणीचा इंग्रजी चित्रपट करण्याचा लेखकांचा मानस होता. पण पुढे चित्रपट या माध्यमाच्या इतिहासाशी प्रामाणिक राहण्याच्या बाबतीतल्या मर्यादा लक्षात घेऊन ही कादंबरी लिहिली गेली. इतिहासात असे अनेक वीर स्त्री- पुरुष होऊन गेले, की ज्यांनी आपली सारी शक्ती पणाला लावून निष्ठेने चाकरी केली,कोणतीही अवघड जबाबदारी पार पाडली. त्या साऱ्यांचीच नावं आपल्याला ठाऊक आहेत, असं नाही. अशाच अनामवीर- वीरांगनांचं प्रतिक म्हणून महादजी शिंदे यांच्या पथकातील शिपाई उदाजी आणि नाना फडणवीस यांची विश्वासू हेर तुळजा या दोन काल्पनिक पात्रांची रचना करुन सन १७७३ ते १७७९ या मराठी इतिहासाच्या प्रचंड राजकीय उलथापालथीच्या कालखंडाचा घेतलेला शब्दरूप मागोवा म्हणजे द्रोहपर्व!
सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे नारायणराव पेशव्यांच्या खूनाचा कट आणि पुढे गणेशोत्सव चालू असताना शनिवारवाड्यात प्रत्यक्ष घडलेला नृशंस नरसंहार इथूनच या कादंबरीची सुरुवात होते. ध चा मा केल्यानंतरच्या या सगळ्या घटनाक्रमामुळे वाचताना एक विलक्षण ताण जाणवत राहतो. राघोबांनी लबाडीने बळकावलेली पेशवाईची वस्त्रे, गंगाबाईंच्या पोटी वाढणाऱ्या नारायणरावांच्या अंशास चिरडण्यासाठी रचली जाणारी कारस्थानं, त्याला प्रत्युत्तर म्हणून नाना फडणवीस आणि बारभाईंचा उठाव, न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे यांनी प्रत्यक्ष रघुनाथरावांनाच नारायणरावांच्या खूनाचे मुख्य आरोपी म्हणून सुनावलेली देहदंडाची शिक्षा, एका बाजूला निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया, सदशिवभाऊंच्या तोतयाचं प्रकरण या सगळ्या पार्श्वभूमीवर रघुनाथरावांनी मुंबईच्या टोपीकर इंग्रजांशी पेशवाई परत मिळवण्यासाठी हातमिळवणी केली. रघुनाथरावांना हाताशी धरुन हिंदुस्थानातील त्या काळच्या सर्वांत बलाढय अशा मराठा साम्राज्याला नामोहरम करुन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा हा कट उभ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ सरदारांनी वेळीच ओळखला आणि त्यांची अभूतपूर्व अशी एकजूट झाली. त्याचीच परिणती म्हणजे वडगावच्या पहिल्या अंग्लो- मराठा युद्धात इंग्रजांचा झालेला पराभव! हा आजवर दुर्लक्षिला गेलेला, किंबहुना वाचकांपर्यंत तितकासा न पोहोचलेला इतिहास ही कादंबरी आपल्याला सांगते.
शिवछत्रपतींच्या गनिमी काव्याच्या मुलमंत्राशी प्रामाणिक राहताना काळानुरूप समोरच्या शत्रूचा अंदाज घेऊन त्यानुसार बदललेली मराठ्यांची युद्धनीती ,scorched earth policy लेखकांनी अभ्यासपूर्वक स्पष्ट केली आहे. त्या काळात वेगवेगळ्या प्रसंगी मराठा सरदारांनी गाजवलेला पराक्रम ससंदर्भ वाचकांपुढे आणला आहे. मराठे आणि इंग्रज यांच्यातील युद्ध दाखवत असताना कुठेही एका बाजूचं अवास्तव कौतुक आणि दुसऱ्या बाजूवर टीका हा प्रकार आढळत नाही. मराठ्यांच्या शौर्याचं, युद्धतंत्राचं कौतुक करत असताना इंग्रजांचं राजकारण, त्यांनी युद्धभूमीवर दाखवलेली चिकाटी, एक शिपाई म्हणून असणारे त्यांचे अंगभूत गुण हेही आपल्यापुढे मांडले आहेत. ब्रिटनचं सरकार तिथून इथल्या ईस्ट इंडिया कंपनीवर आपल्या regulating acts द्वारे कशाप्रकारे अंकुश ठेवायचा प्रयत्न करत असे, त्याला इथल्या प्रेसिडेन्सी कशा प्रतिसाद देत, ही खूप जणांना माहीत नसलेली बाजू इथे समजावून सांगितली आहे. हे लेखणीचं कौशल्य माञ मान्य करावंच लागेल. इष्टूर फाकड्यापासून तत्कालीन अनेक ब्रिटीश अधिकाऱ्यांची व्यक्तिचित्रं, त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष, त्याची पार्श्वभूमी हेही फार खुबीने स्पष्ट केलं आहेत. भरपूर माहिती असली तरी वाचताना वाचकाला कंटाळवाणं वाटणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन इतका मोठा घटनाक्रम कव्हर केला आहे. शेवटी वंशावळ, वडगावच्या युद्धाशी संबंधित विविध स्थळांचे, मार्गांचे नकाशे दिलेले आहेत.
वडगावची ही लढाई केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची आहे. कारण दिल्लीतल्या मोगलशाहीचं महत्त्व कमी झाल्यावर भारताच्या बहुतांश भागावर वर्चस्व असणारी,सर्वांत प्रबळ अशी सत्ता मराठ्यांची होती. या युद्धात जर मराठे पराभूत झाले असले, तर पारतंत्र्याची सुरुवात फार आधीच झाली असती. ही लढाई १७७९ मधे झाली, आणि पुढची लढाई थेट १८०३-०५ मधे झाली. यावरूनच वडगावचा विजय किती महत्त्वाचा होता, हे लक्षात येईल.
ही कादंबरी का वाचावी याचं उत्तर द्यायचं तर, लेखक म्हणतात त्याप्रमाणे, इतिहासापासून धडा घेतला तरच भविष्यकाळाचा डोळस वेध घेता येतो, याचा प्रत्यय देणारी ही ऐतिहासिक कादंबरी आहे. निधड्या छातीच्या मराठ्यांनी फिरंग्यांना भुईसपाट केल्यानंतरच संपलेल्या द्रोहपर्वाची ही कहाणी इतिहासप्रेमींनी तर आवर्जून वाचावी.
©नेहा ज्योती प्रदीप जोशी
#द्रोहपर्व
लेखक: अजेय झणकर
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या: ५०७
मूल्य: ३५०
मी वाचलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी ही सर्वोत्कृष्ट आहे. शेवटपर्यंत पुस्तक खाली ठेवावंसं वाटत नाही.
ReplyDelete