रहस्यभेद पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ( लेखक गो. ना.दातारशास्त्री)
#पुस्तकांच्या पानांवरुन
२०२१: पर्ण तिसरे
#रहस्यकथा
#रहस्यभेद
विविध साहित्य प्रकारातले लघुकथा आणि रहस्य कथा हे दोन प्रकार मला अधिक लक्षवेधी वाटतात. उत्स्फूर्तपणे सुचणारं काहीतरी ' a piece of life' या चौकटीत बसवून शब्दांची मर्यादा सांभाळत एक सुसंबद्ध गोष्ट निर्माण करणं यातून लघुकथेचा आविष्कार होतो. आणि रहस्यकथा लिहिणे म्हणजे कोळी ज्याप्रमाणे एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदुपर्यंत आपलं जाळं विणत जातो, तशा प्रकारे एक कल्पना, एक रहस्य विस्तारत नेणं. किचकट जाळं विणताना कोळी त्या जाळ्यात स्वतः अडकत नाही, तसंच रहस्यकथा लिहिताना लेखकाला प्रत्येक बारकाव्याबद्दल अखंड दक्ष राहावं लागतं. जिगसॉ पझलमधे जसं शेवटचा तुकडा त्याच्या जागेवर बसल्याशिवाय चित्र पूर्ण होत नाही, तसं एक एक बारकावा कथासूत्रात नीट गुंफल्याशिवाय रहस्यकथा परिपूर्ण होत नाही.
यावेळी वाचलेली रहस्यकथा आहे गोविंद नारायण दातार शास्त्री यांनी लिहिलेली रहस्यभेद ही दोन भागांत विभागलेली कादंबरी. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी वाचकांत दातार शास्त्री हे नाव शालिवाहन शक, इंद्रभुवनगुहा, विलासमंदिर, विश्वनाथ,कालिकामूर्ती, प्रवाळद्वीप, रहस्यभेद या साहित्याकृतींमुळे खूप लोकप्रिय होतं. दातारशास्त्री यांच्या लिखाणाचे दोन विशेष इथे सांगावेसे वाटतात. एक म्हणजे त्या काळच्या सुशिक्षीत, साक्षर अशा सामान्य मंडळींना पुराणकल्पनांपेक्षा एखाद्या अतिमानवी नायकाच्या अद्भुत साहसाने ओतप्रोत भरलेले साहित्य वाचायची इच्छा होती. प्रणय, पराक्रम, कपट कारस्थानं, त्यांवर केलेली यशस्वी मात, कथेच्या अंतापर्यंत अंदाज न बांधता येणारे रहस्य अशा प्रकारचं मनोरंजन वाचकांना हवं होतं, जे दातार शास्त्री यांनी वाचकांपर्यंत पोहोचवलं. दुसरा विशेष म्हणजे, हे लिखाण म्हणजे संपूर्णपणे त्यांचा स्वतःचा कल्पनाविलास नसून त्यांचं लिखाण हे जॉर्ज विल्यम रेनॉल्ड्स( १८१४-१८७९) या इंग्रजी लेखकाच्या कादंबऱ्यांचा अनुवाद आहे.
मुळात रहस्यकथा लिहिणं हेच एक कठीण काम आहे. त्यात एखाद्या भाषेत गाजलेल्या रहस्य कथेचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणं, हे तर त्याहूनही कठीण काम आहे. स्वतःची कल्पना लेखक हवी तशी विस्तारु शकतो, पण दुसऱ्याच्या लिखाणाचा अनुवाद करणं म्हणजे एका जमिनीत रुजलेलं रोपटं तिथून हलवून दुसऱ्या जमिनीत रुजवणं. त्यासाठी जशी जमिनीची पूर्वमशागत करावी लागते, रोपाला योग्य पोषण मिळेल अशी व्यवस्था करावी लागते त्याप्रमाणे इथे लेखकाला राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, भौगोलिक, भाषिक अशा अनेक बाबतीत अनुरुप बदल करावे लागतात. तीच कथावस्तू तिचा चेहरामोहरा त्या भाषेतलं साहित्य वाचणाऱ्या वाचकांना ओळखीचा वाटेल, इतपत नवी नावं, नवे नातेसंबंध, नवी रचना यांच्या साहाय्याने बदलून वाचकांना पेश करावी लागते. ही दुप्पट जिकिरीची प्रक्रिया लेखकाच्या लेखन आणि अनुवादशक्तीचा पूर्ण कस लावणारी आहे. या अशा कसोटीतून पास होऊन वाचकांच्या पसंतीस उतरल्यामुळे दातार शास्त्रींचं लिखाण लक्षवेधी ठरतं.
ही कादंबरी Rye House Plot or Ruth: the Conspirator's Daughter या १८५७ साली प्रकाशित झालेल्या सांस्कृतिक आणि इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कादंबरीचा अनुवाद आहे. मूळची कादंबरी १६८३ साली Rye House या ठिकाणी तत्कालीन राजा किंग चार्ल्स दुसरा याचा खून करण्यासाठी रचलेल्या कटावर आधारीत आहे. ॲंग्लीकन आणि रोमन कॅथलिक या दोन गटांमधील धार्मिक संघर्षाची या कथेला पार्श्वभूमी आहे. चार्ल्स दुसरा याच्या नेतृत्वाखाली झालेली राजेशाहीची पुनर्स्थापना, स्टुअर्ट घराण्याचा इतिहास, मोनमाऊथ बंड याची पार्श्वभूमी या कारणांमुळे ही कादंबरी तत्कालीन इंग्रजी साहित्यात विशेष महत्त्वाची मानली गेली.
मराठीत अनुवाद करताना लेखकांनी कथेचा कालखंड शालिवाहन शकाचं बारावं शतक असा निश्चित केला असून कथेचं मुख्य स्थान कर्नाटकच्या पश्चिम भागातील विक्रमपूर हे एक राज्य असून जैन आणि वैदिक या दोन प्रमुख धार्मिक गटाच्या लोकांची इथे वस्ती आहे. कथेत कलिविक्रम या सोमेश्वर नावाच्या पूर्वीच्या राजाच्या धाकट्या भावाने राजगादी ताब्यात घेतली आहे. या संघर्षात सोमेश्वराची बाजू घेऊन लढणारा पक्ष कलिविक्रम राज्य करु लागल्यापासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटला गेला आहे, त्यात जैन लोकांचा सहभाग अधिक आहे. यातील एक सरदार धनपाल आपल्या कुटुंबासह धान्यागार या ठिकाणी राहत आहे. पहिली काही प्रकरणं नवीन राजा आल्यापासून काय काय बदल घडले आहेत, ते स्पष्ट करतात. नवा राजा विषयसुखांत गढलेला, प्रजापालन या सर्वात महत्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणारा आहे. जुन्या पिढीतले धनपाल, सुनंदन, हिरण्यगुप्त असे सरदार आणि नव्या पिढीतले गुणपाल, विमर्दक, जयगुप्त, वसुगुप्त, श्रीरंग ई.,जुन्या पिढीची रहस्यं, नवीन काळात निर्माण झालेले प्रश्न अशा वातावरणात जुन्या पिढीचा प्रत्यक्ष बंडात सहभागी झालेला, अनेक वर्षांपासून अज्ञातवासात असलेला सुगतसेन नावाचा एक सरदार नाव बदलून राजधानीत परत येतो आणि एका नव्या राजकारणाची सुरुवात होते. जुन्या पिढीतले सरदार, नव्या दमाचे शिपाई, प्रधान मंडळातील सदस्य, इतकेच नव्हे तर राजाच्या अंतःपुरातील नाटकशाळासुद्धा एकावर एक कारस्थानं रचत जातात. जन्मरहस्यं, प्रेमप्रकरणं, राजकीय हेवेदावे, आंतरराज्यीय संबंध, विविध गटांकडून राज्य प्राप्तीसाठी चाललेले प्रयत्न, राज्यक्रांती अशा अनेकाविध घटकांनी हे रहस्य उत्तरोत्तर रंगत जातं. श्रीमती, शीलवती, चित्रलेखा, हंसमाला, नितंबिनी, मायावती, अनंगसेना, मनोरमा व त्यांच्या जोडीला गुणपाल, धनपाल, हिरण्यगुप्त, सुगतसेन, समरकेतू, विमर्दक, माथुरक अशी विलक्षण अनोळखी अशी पात्रांची नावं देखील या कथेचं गूढ वाढवतात.
एकूणच, रहस्यभेद ही दोन भागांत विभागलेली कादंबरी अगदी भागवतांच्या लिखाणाच्या तोडीची, किंवा एकमेवाद्वितीय जरी नसली, तर राजकीय रहस्यकथा म्हणून एकदा तरी नक्की वाचावी अशी आहे. अनुवाद असल्यामुळे वापरलेली भाषा थोडी अनैसर्गिक किंवा कृत्रिम, औपचारिक वाटते.समरकेतू हे पात्र अतिशय उत्तम वठलं आहे, पण बाकीची पात्रं ही ज्याला आपण 3 dimensional म्हणतो, तशी नाहीत. एकूण ७५ प्रकरणं असलेली कादंबरी पहिल्या भागात ३९ आणि पुढच्या भागात उरलेली प्रकरणं आहेत. दोन्ही भाग वाचायला मिळाले, तरच वाचक या कथेचा रहस्यभेद करु शकतील, अन्यथा नाही.
- नेहा ज्योती प्रदीप जोशी
(०४.०३.२०२१)
रहस्यभेद : पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
लेखक : श्री. गो. ना तथा गोविंद नारायण दातारशास्त्री
प्रकाशक: वरदा प्रकाशन
Well written. आस्था आणि रस असला तरच पुस्तकांबद्दल लिहिता येतं. ती आस्था दिसते आहे. छान!
ReplyDelete